Home Blog Page 276

गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुख उच्च न्यायालयात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सी.बी.आय) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मे. उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर मे.उच्च न्यायालयाने परमबीर यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिलेले असतानाही सी.बी.आय ने सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेणे, त्यांच्याकडे महत्त्वाची प्रकरणे सोपवणे या प्रकरणांचाही प्राथमिक माहिती अहवालात (एफ.आय.आर) समावेश केला आहे, असा आरोप राज्य सरकारने केला आहे.

राज्य सरकारने ही याचिका दाखल केली असून मंगळवारी त्यावर सुनावणीची शक्यता आहे. परमबीर यांच्या पत्राचा आधार घेत अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मलबारहिल पोलिसांत तक्रार नोंदवली होती. मात्र या तक्रारीची प्राथमिक चौकशी करण्यात आलेली नाही हे लक्षात आल्यावर मे.उच्च न्यायालयाने आरोपांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश सी.बी.आय.ला दिले होते. वरिष्ठ पदावरील पोलीस अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या आरोपांची पारदर्शी चौकशी होण्याच्या दृष्टीने हे आदेश देण्यात आल्याचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती न्यायालयाने स्पष्ट केले होते.

प्राथमिक चौकशीअंती सी.बी.आय.ने देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला. याविरोधात देशमुख यांनी मे. उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली असून सी.बी.आय ला कठोर कारवाईपासून मज्जाव करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारनेही देशमुख यांच्यावर सी.बी.आय ने दाखल केलेल्या वाझे प्रकरणाबाबतच्या एफ.आय.आर ला आव्हान दिले आहे.

सीरम’ने महाराष्ट्राला लस देताना झुकतं माप द्याव – आरोग्यमंत्री राजेश टोपे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोविड व्हॅक्सीन बनवणारे ‘सीरम इन्स्टिट्यूट’ हे महराष्ट्रातील पुण्यात आहे. त्यामुळे अदर पूनावाला यांनी लस देण्याच्याबाबतीत महाराष्ट्राला काहीसं झुकतं माप द्यावं, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात सध्या करोना संसर्ग दुपटीने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत.

तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यालाही सुरूवात झाली आहे.
मात्र, लस तुटवड्यामुळे राज्य सरकारकडून हा लसीकरणाचा टप्पा राबवताना अडथळे येत असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सीरमचे पूनावाला यांना ही विनंती केल्याचे दिसत आहे. ”अदर पूनावाला यांना आमची विनंती आहे की, ते पुण्यातील असल्याने व महाराष्ट्रातच सीरम इन्स्टिट्यूट असल्याने, काहीही करून सीरम इन्स्टिट्यूटने झुकतं माप हे महाराष्ट्राला दिलं पाहिजे.” असं राजेश टोपे प्रसार माध्यमांशी बोलाताना म्हणाले आहेत. तसेच, ”कुठल्याही पद्धतीने आम्हाला लसीकरण १८ ते ४४ असेल, यासाठी लागणारी किंमत ही राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे व जून महिन्यात असलायला हवं. जेणेकरून आपल्याला अधिक गतीनं लसीकरण करता येईल.

सध्या पुरेशी लसचं उपलब्ध नसल्याने जरी आपल्या जवळ निधी आहे. आपण खर्च करायला तयार आहोत, विकत घ्यायला तयार आहोत पण उपलब्धच नसल्याने आपल्याला १८ ते ४४ वयोगाटातील लसीकरण ते कमी गतीनं करावं लागत आहे.” असंही यावेळी राजेश टोपेंनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

कोविड सेंटरमध्ये वाजविली जाणार मोहम्मद रफ़ी, मुकेश, किशोर कुमारची गाणी मिरा भाईंदर महानगरपालिकेचा अजब उपक्रम?

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी

एकीकडे कोविडच्या रुग्णांना चागल्या सोयी सुविधा देखील पुरविल्या जात नसताना आणि रुग्णांना वेळेवर जेवण-पाणी देखील दिले जात नसताना मिरा भाईंदर महानगरपालिका आता कोविड सेंटरच्या दिवसाची सुरूवात भुपाळीने होणार असून यासोबत सकाळ संध्याकाळ कोविड सेंटरमध्ये रुगणांच्या मनोरंजनासाठी मोहम्मद रफ़ी, मुकेश, किशोर कुमारची गाणी देखील वाजविले आहेत. अशा प्रकारे कोविड सेंटर मधील उपचारार्थ दाखल असलेल्या कोविड रुग्णांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरातील सर्व कोविड सेंटर मधील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक रहावे यासाठीच महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

मिरा भाईंदर महापालिकेचे स्व. प्रमोद महाजन सभागृह, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी हॉल, स्व. मिनाताई ठाकरे हॉल, भारतरत्न पं. भिमसेन जोशी रुग्णालय, समृद्धी कोविड केअर सेंटर, कॉरन्टाईन सेंटर R1 व R2 (गोल्डन नेस्ट) व डेल्टा गार्डन या ठिकाणी शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महानगरपालिकेची सर्व प्रशासकीय यंत्रणेबरोबरच कोविड सेंटर मधील सर्व डॉक्टर, नर्सेस तसेच इतर कर्मचारी वर्ग रुग्णांची काळजी घेत आहे. मात्र या कोविड सेंटर मधील वातावरण आणखी प्रफ़ुल्लीत आणि प्रसन्न रहावे आणि रुग्णांमध्येही सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी काही दिवसातच या सर्व कोविड सेंटर मध्ये ध्वनी यंत्रणा लावण्यात येणार आहे. या ध्वनी यंत्रणेमधून सर्व कोविड सेंटरची सुरूवात भुपाळीने होणार आहे. त्यानंतर मोहम्मद रफ़ी, मुकेश, किशोरकुमार, लता मंगेशकर, आशा भोसले या जुन्या काळातील गायकांबरोबरच नव्या काळातील गायकांचे गाणे सुध्दा यासर्व कोविड सेंटरमध्ये वाजले जाणार आहे.

सर्व रुग्ण उपचारांना प्रतिसाद देतातच पण काही रुग्णांच्या मनात कोविड बाबत भिती निर्माण झालेली असते. त्यामुळेच या उपक्रमाची सुरुवात करत असून संगीतासारखे दुसरे औषध नाही त्यामुळे हा अनोखा उपक्रम सुरू करीत असल्याची माहिती आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी दिली. त्याचप्रमाणे सर्व कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी समुपदेशन आणि योगा क्लासेस सुध्दा सुरू करीत असल्याचे आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी स्पष्ट केले. असे असले तरी कोविड सेंटर मधील रुग्णांना वेळेवर औषधे दिली जात नाहीत, त्यांना वेळेवर जेवण-पाणी देखील मिळत नाही, चार चार तास गरज असलेल्या रुग्णांना पाहायला नर्सेस देखील जागेवर नसतात, मृत झालेल्या रुग्णाला तासनतास इतर रुग्णां सोबत तसेच ठेवले जाते अशा अनेक तक्रारी येथे उपचारासाठी दाखल असलेल्या नागरिकांनी केल्या आहेत. आणि आता तर कोविड सेंटर मध्ये रुगणांचे नातेवाईक,मित्रमंडळी, इतर नागरिक आणि पत्रकार यांना प्रवेशबंदी असल्याचे फलक मुख्य प्रवेशद्वारावर लावले असून कोविड सेंटर मध्ये सर्व काही आलबेल आहे असे वाटत नाही आणि म्हणून महापालिका प्रशासन काहीतरी लपविण्यासाठी हा उपद्व्याप करीत असल्याचे बोलले जात आहे.

जे रुग्ण या कोविड सेंटर मधून बरे होऊन घरी आले त्यांनी आपले अनुभव सांगताना बोलले की कोविड सेंटर मध्ये फारच भयानक परिस्थिती आहे. नातेवाईकांना आतील माहिती सुद्धा दिली जात नाही अशी परिस्थिती असताना बाहेर मात्र सर्व काही खूप चागले आहे सर्व रुग्णांना खूप चांगल्या सुविधा पुरविल्या जात आहेत असे महानगरपालिके कडून भासवले जात आहे. महापालिका प्रशासनाने इतर वायफळ गोष्टी वर वेळ आणि पैसा वाया न घालवता रुग्णांच्या चागल्या सुविधा आणि उपचार यांचेवर अधिक लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मुंबईत लाखो घरकामगार महिला सरकारी लाभापासून वंचित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरकाम करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याची घोषणा राज्य सरकार तर्फे करण्यात आली असून त्यासाठी रक्कमही मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही रक्कम केवळ ‘महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा’त नोंदणी असलेल्या महिलांना मिळणार असल्याने उर्वरित लाखोजणी या लाभापासून वंचित राहणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकामगारांना अनेक घरांनी कामावरून काढून टाकले. सध्या रेल्वे प्रवासावरील निर्बंधांमुळेही महिलांना घरकामासाठी जाणे अवघड झाले आहे.

गेल्यावर्षभरापासून अनेक घरकामगार महिलांचा रोजगार बुडाला आहे. सध्या याच महिलांना सरकारची १५०० रुपयांची मदत मिळणार आहे असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

मात्र, ही मदत घरेलू कामगार मंडळाकडे नोंदणी झालेल्या महिलांनाच मिळणार आहे. घरेलू ‘कामगार कल्याण मंडळ’ घरकामगारांसाठी विविध योजना राबवत असते. मात्र गेल्या काही वर्षात हे मंडळ निष्क्रीय झाले आहे व अनेक योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे सुरवातीच्या काळात नोंदणी केलेल्या अनेक महिलांनी मागील काही वर्षात नोंदणीचे नुतनीकरण केलेले नाही. तसेच घरकामगारांसाठी असे काही मंडळ आहे, याचीही अनेकजणींना माहितीच नाही.

त्यातून सद्यस्थितीत घरकामगार मंडळाकडे नोंदणीकृत आणि या नोंदणींचे नुतनीकरण झाले अशा केवळ १ लाख ५ हजार महिला आहेत. ‘मंडळाकडे सुमारे १ लाख घरेलू कामगार महिलांची माहिती उपलब्ध आहे. त्यांना मदत निधी पोहचविण्याची तयारी सुरू आहे, असे विकास आयुक्त (असंघटीत कामगार) पंकज कुमार यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

नोंदणीपेक्षा घरकामगारांची संख्या मोठी..

मुंबई आणि परिसरातील सुमारे ५ लाख घरकामगार महिला काम करतात. मंडळाने या घरेलू कामगारांच्या नोंदणीसाठी प्रामुख्याने कधी पुढाकार घेतला नाही असा आरोप घरकाम करणाऱ्या महिलांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला आहे .

मोबाईल तंत्राच्या अभावामुळे रिपाईच्या वतीने गरीबांसाठी लसीकरण नावनोंदणी मोहीम

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली येथील इंदिरा नगर वस्तीतील नागरिक मोबाईल तंत्राच्या अभावामुळे लसीकरणापासून मोठ्या संख्येने वंचित आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांचे लसीकरण मोठ्या संख्येने होणे गरजेचे आहे. यासाठी रिपाईच्या (आठवले) डोंबिवली शहर शाखेच्या वतीने इंदिरा नगर येथील नागरिकांची लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे.
अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी दिली आहे.

स्वच्छतेची कोणत्याही सोयीसुविधा नसताना कोरोना संसर्ग इंदिरा नगर मध्ये जाणवलेला नाही. परंतु येथे घरकाम करणारे, गवंडी, सुतार, प्लंबर, वायरमन, रिक्षाचालक, फेरिवाले, कचरावेचक
इत्यादी कष्टकरी समाज मोठ्या संख्येने राहत आहेत. दैनंदिन कामानिमित्त ते बाहेर पडत असल्याने बाहेरुन संसर्गाचा प्रसार वस्तीत होऊ शकतो. त्याचप्रमाणे येथील नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये, त्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे.

सरकारने लसीकरणाच्या नोंदणीसाठी ऑनलाईन
सोय जरी केली असली तरी त्यासाठी अँड्रॉईड मोबाईल असणे आवश्यक आहे. येथील अनेक नागरिकांकडे अश्या प्रकारचे मोबाईल नाहीत. तर अनेकांकडे मोबाईल असून नोंदणी करण्याचे मोबाईल मधील तंत्र अवगत नसल्याने येथील नागरिकांचे मोठ्या संख्येने अद्याप लसीकरण झालेले नाही. अशी माहिती रिपाईच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

रिपाईच्या वतीने इंदिरा नगर येथे पक्ष कार्यालय सुरु आहे. या कार्यालयात १ मे पासून लसीकरण नोंदणी सुरु करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी हि नोंदणी सुरु असते.

लस कुप्यांचा पुरेसा पुरवठा शासनाच्या वतीने होत नसल्याने कल्याण-डोंबिवली शहरातील लसीकरण केंद्रे बंद आहेत.परंतु हि लस केंद्र पुर्ववत होताच, नोंदणीकृत लाभार्थ्यांना मोबाईल लघुसंदेशाद्वारे (मेसेज) लस केंद्र कळविले जाईल अशी माहिती रिपाईच्या वतीने देण्यात आली आहे.

संपर्क – रिपाई वार्ड अध्यक्ष तेजस जोंधळे – ९९८७९७२४१४.
धम्मपाल सरकटे – ८६५२७२६८८४/९९२०९४६३७९