Home Blog Page 277

डोंबिवली पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाण पुलाचे ७ गर्डर चढविण्याचे काम पूर्ण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पुल धोकादायक झाल्यामुळे १५ सप्टेंबर २०१९ पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. सदर पुल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कोविड-१९ च्या संचार बंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद असताना उड्डाण पुल पुर्नबांधणीचे काम महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने तातडीने हाती घेण्यात आले आणि १७ एप्रिल रोजी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. दि. २२.०३.२०२१ रोजी १५ मिटरचे ७ गर्डर बसविण्यात आले आणि दि. २ एप्रिल रोजी १२ मिटरचे आणखीन ७ गर्डर बसविण्यात आले आणि आज दि.०३.०५.२०२१ रोजी तिसऱ्या व शेवटच्या स्‍पॅनचे १८ मिटरचे ७ गर्डर चढविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.


राजाजी पथवरील स्पॅनचे कामाकरीता दि.०७.०५.२०२१ पर्यत वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. सदर गर्डर्स चढवून झाल्यानंतर क्रॉस गर्डर्स जोडण्यासाठी व स्लॅबचे सेंटरींग लावतांना पादचाऱ्यांचा व वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्‍यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे.

पोहोच रस्त्याचे उर्वरित काम व गर्डरवरील स्लॅबचे काम पूर्ण करुन येत्या पावसाळयापूर्वी डोंबिवली पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पूल वाहतूकीला खुला करणेबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वेकडील लोकांना डोंबिवली पश्चिमेला जाण्यासाठी सध्या जो ठाकुर्ली येथून वळसा घालून जाण्याचा एकमेव मार्ग आहे त्याला कोपर उड्डाण पूलाचा दुसरा पर्याय खुला होईल असे आयुक्तांतर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

घरगुती सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे घरात उडाला आगीचा भडका, ५ जण जखमी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील रमेशवाडी येथे घरगुती एलपीजी गॅसची गळती झाल्याने घरात आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

घरात पसरलेल्या एलपीजी गॅसमुळे आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बदलापूर शहरातील रमेशवाडी भागात असलेल्या ‘जय हाईट्स’ या इमारतीत घडली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ५ जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

घरगुती सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे घरात आगीचा भडका उडाल्याने ५ जण गंभीर रित्या जखमी

घरगुती गॅस दुरुस्ती करताना सिलिंडरचा उडालेल्या भडक्यामुळे बदलापूर शहरातील रमेशवाडी भागातील ‘जय हाईट्स’ या इमारतीत निलेश तायडे यांच्या पत्नी काल दि.१ मे रात्रीच्या सुमारास स्वयंपाक करीत होत्या. यावेळी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमधून बऱ्यास वेळेपासून गळती होत असल्याने त्यांनी दुरुस्तीसाठी मेकॅनिकला बोलावले होते. मेकॅनिक या सिलिंडरची दुरुस्ती करत असताना अचानक सिलिंडरचा भडका उडाला. त्यातच गॅसमधून जास्त प्रमाणात गळती होऊन संपूर्ण घरात गॅस पसरला होता. त्यामुळे आगीचा भडका झाला. यात तायडे यांच्यासह त्यांच्या पत्नी, दोन मुलं आणि दुरुस्तीसाठी आलेला मॅकेनिक असे ५ जण आगीत होरपळले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर तातडीने नियंत्रण मिळविले. तर शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने जखमींना उल्हासनगर मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शाळांना सुट्ट्या जाहीर; पुढील शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होणार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शनिवार दि. १ मे, २०२१ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून या सुट्टीचा कालावधी दि.१३ जून, २०२१ पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे.

पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार दि.१४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात येतील, तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार दि.२८ जून २०२१ रोजी शाळा सुरू होतील. या संदर्भात शिक्षण संचालकांनी नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय-अशासकीय, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या आहेत.

शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.

माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोविड-१९ च्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील ते यथावकाश संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येतील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दिनी’ शिवभोजन थाळीने ओलांडला ४ कोटींचा टप्पा – छगन भुजबळ

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लॉकडाऊन घोषित केल्यानंतर राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली ‘ मोफत शिवभोजन थाळी’ योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यात २६ जानेवारी २०२० ते १ मे २०२१ या कालावधीत तब्बल ४ कोटी नागरिकांनी ‘शिवभोजन थाळी’ चा लाभ घेतला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ‘शिवभोजन थाळी’ ही महत्त्वाकांक्षी योजना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. राज्यात २६ जानेवारी २०२० ला या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय मार्च २०२० मध्ये घेण्यात आला होता. हा सवलतीचा दर मार्च २०२१ पर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र, अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने आणि पुन्हा आपण राज्यात कडक निर्बंध लागू केल्यामुळे ही थाळी आता आपण ‘मोफत’ देत आहे. तसेच राज्य शासनाने यापूर्वीच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या प्रतिदिन इष्टांकामध्ये दिडपट वाढ केली आहे. यात जे ‘शिवभोजन केंद्र’ दिवसाला १०० थाळ्या वितरित करत होते आता तेच केंद्र १५० थाळ्या वितरित करीत आहे.

राज्यातील कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन अनुदान देत आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या ‘शिवभोजन थाळी’च्या उद्दिष्टामध्ये वाढ करून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा मानसदेखील छगन भुजबळ यांनी बोलताना व्यक्त केला.

वराज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या या ‘शिवभोजन थाळी’ योजनेला मिळणारा वाढता प्रतिसाद राज्य शासनास प्रेरणादायी आहे, तसेच राज्यातील गरीब, मजूर आणि कामगार वर्गाला या योजनेचा फायदा होत असल्यामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तातडीने ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ‘ऑक्सिजन बॅंक’ च्या माध्यमातून मिळणार मोठा दिलासा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑक्सिजन बँक’ योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. एमएमआर रीजन मध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ही गरज लगेचच्या लगेच भरून काढता येणे अवघड आहे. अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते व तो दगावण्याची शक्यता असते अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी श्री.शिंदे यांनी या ‘ऑक्सिजन बॅंके’ च्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला पाच लिटर क्षमतेच्या १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असले तरी कालांतराने दहा लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येतील असे श्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
मशीन्स द्वारे हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन त्यातील नायट्रोजन वेगळा करुन रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्ष याच्या माध्यमातून ही सेवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील गरजू रुग्णापर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण दररोज ऐकत आहोत. अशात डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी सूरु केलेला हा उपक्रम निश्चितच पथदर्शी ठरेल असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आज ऑक्सिजन बॅंकेच्या या लोकार्पण सोहळ्याला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. गरजू कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी या ऑक्सिजन बँकेचा लाभ घेण्यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्यालय, मंगला हायस्कूल शेजारी, कोपरी ठाणे पूर्व येथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.