Home Blog Page 287

राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू.. आर्थिक सहाय्य कोणाला किती ? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि. १३ एप्रिल २०२१
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज..

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी..

कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही..

एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार..

कामगारांसह, आदिवासी,  असंघटीत क्षेत्राला दिलासा..

मुंबई, दि. १३ : – कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले आहे.

राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.

केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडक टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट म्हटले आहे.

सर्व दुर्बल घटकांना दिलासा

आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.

एक महिना मोफत अन्नधान्य

अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.

शिवभोजन थाळी मोफत

राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.

निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य

या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल. .

बांधकाम कामगारांना अनुदान

नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य

राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.

आदिवासी कुटुंबांना सहाय्य

आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.

कोविडवरील सुविधा उभारणी

याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

ब्रेक द चैन !! काय आहेत निर्बंध ?
उद्या सायंकाळी ८ वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे. मंगळवेडा पंढरपूर मध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील.

उद्या संध्याकाळपासून राज्यात १४४ कलम लागू

पुढचे १५ दिवस संचारबंदी अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावराचे दवाखाने सुरु राहतील.मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू राहतील.

अधिस्विकृती पत्रकारांना मुभा

हाॅटेल्स, रेस्टांरंट “टेक अ वे” सुरुच राहतील

रस्त्यावरच्या ठेलेवाल्यांनाही “टेक अ वे” ची घोषणा

प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ ७ कोटी लोकांना देण्यात येईल एक महिना मोफत. १० रुपयांची शिवभोजन थाळी ५ रुपयांवर केली तेव्हा काही कोटी लोकांनी याचा लाभ घेतला, आता मोफत देणार.

रोजी रोटीचा भार नाही कर्तव्य पार पाडत आहे

वयोवृदध, महिला, आदिवासी, निराधार लोकांना २ महिन्यांकरीता हजार रुपये ३५ लाख लोकांना देत आहोत

नोंदणीकृत बांधकाम मजूरांना आणि घरकाम करणा-या लोकांना मदत करीत आहोत

अधिकृत फेरीवाल्यांना १५०० रुपये देत आहोत ५ लाख लाभार्थ्यांना फायदा होणार

नोंदणी असलेल्या रिक्षाचालकांना १५०० रुपये देत आहोत

५ हजार ४०० कोटी रुपये आपण कोव्हिडसाठी वापरत आहोत

असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अर्थसहाय्य जाहीर केले आहे..

‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर रुग्णांना रेमडीसीवीर इंजेक्शन, दत्त मेडिकलचा सेवाभाव

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यातच रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, अकोल्यातील सेवाभावी दत्त मेडिकलने गेल्या महिनाभरापासून एक वेगळा सेवाभाव जपला आहे. हे मेडिकल रेमडीसीवीर इंजेक्शन ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर रुग्णांना देत आहे. त्यामुळेच एकीकडे इतर ठिकाणी काळ्या बाजारात ४० ते ५० हजारांपर्यंत विकलं जाणारं हे इंजेक्शन अकोल्यात मूळ १४७५ रुपये दरात मिळत आहे.शहरातील सिव्हिल लाईन्स चौकातील दत्त मेडिकलची ओळख सेवाभावी मेडिकल अशी आहे.

महिनाभरापूर्वी मेडिकलचे संस्थापक संचालक प्रकाश सावला यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होते. यावेळी त्यांनी रुग्णालयांकडून रेमडीसीवीर इंजेक्शनच्या माध्यमातून रुग्णांची होत असलेली लूट पाहिली. अणि त्यामधूनच ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर रेमडेसिवीर इंजेक्शन महिनाभरापासून ग्राहकांना द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाचं जिल्हा प्रशासन आणि मंत्रालय पातळीवर कौतुक झालं आहे.सध्या रेमडीसीवीरचा होत असलेला काळाबाजार पाहता अगदी परवडणाऱ्या भावात इंजेक्शन मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळाला आहे.

अकोल्यातील कोरोना रुग्णांची सद्यस्थिती : एकूण पॉझिटिव्ह अहवाल – ३१०१५ – मृत – ५१३ डिस्चार्ज – २५४१० – दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) – ४०९२
सध्या कोरोनाच्या या संकटकाळातही अनेकजण माणुसकी हरवताना दिसत आहेत. मात्र, अकोल्यातील दत्त मेडिकलने दिलेला हा माणुसकीचा परिचय निश्चित राज्यातील इतर मेडिकल चालकांनी आत्मसात करणं गरजेचं आहे.

अँटिलिया प्रकरणात मोठी कारवाई; सचिन वाझेंच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्याला एनआयए ने केली अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांचे सीआययू तील सहकारी सहायक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांना अटक केली. काझी यांनी सचिन वाझे यांना मदत केल्याचा आरोप आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि सचिन वाझे यांचे सहकारी रियाझ काझी यांना रविवारी अटक केली. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यालगत स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्याच्या आरोपाखाली एनआयए ने आधीच सचिन वाझे यांना अटक केली होती. वाझे यांची चौकशी केल्यानंतर त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काझी देखील अँटिलिया प्रकरणात सामील आहेत. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यास त्यांनी वाझे यांची मदत केल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत एपीआय रियाझ काझी यांना आज एनआयएने अनेक दिवसांच्या चौकशीनंतर अटक केली. एनआयए ने काझी यांची अनेक दिवस कित्येक तास चौकशी केलेली आहे. काझी यांनी पुरावे नष्ट करण्यास आणि या गुन्ह्यात वाझे यांना मदत केल्याचा आरोप आहे. सचिन वाझे यांच्या घरातून सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर घेऊन जाणारा काझीच असल्याचे सांगण्यात येत आहे. कारच्या बनावट नंबर प्लेट खरेदी केल्याच्या प्रकरणातील आरोपीही असल्याचे मानले जाते. काझी यांना एनआयए कोठडीसाठी आज न्यायालयात हजर केले जाईल. सचिन वाझे यांना याआधीच एनआयएने अटक केली होती. सध्या ते तुरुंगात आहेत. त्यांच्यावर अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरन हत्येच्या कटाचा आरोपही आहे.

पनवेल येथे ऑइल चोरी करून अपहार करणाऱ्यांना अटक;  ४२.८ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी: अवधुत सावंत

रायगड जिल्ह्यात पनवेल येथे मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकेमिकल ऑईलची चोरी करून अपहार करणारे ५ ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक यांच्यासह १ चालकास अटक करून त्यांच्याकडून एकूण ४२,८०,०००/- रुपयांचा मुद्देमाल पनवेल शहर पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी यांच्या हस्थी केमिकल तळोजा कंपनीचा ‘मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकार्बेन ऑईलचा’ टॅंक सुनील ट्रान्स्पोर्टच्या ट्रक चालकाच्या ताब्यात पोहच करण्यासाठी दिला असता त्याने त्याच्या साथीदारांशी आपसात संगनमत करून पनवेल मधील पळस्पे येथील निलेश ढाब्याजवळ सदर टॅन्कमधील ११,६००/- रु. किंमतीचे अंदाजे २०० लिटर ऑइल चोरी करून पिंपामध्ये काढून अपहार केला होता. सदर ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिसांनी छापा मारला असता सदर इसम हे पळून गेले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून सदर गुन्ह्यातील चालक आणि त्याच्या ५ साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ४२,८०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पत्रकाराच्या खुनाशी संबंधांचा आरोप; महाविकास आघाडीच्या सरकारातील आणखी एक मंत्री अडचणीत

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी येथील एका साप्ताहिकाच्या पत्रकाराच्या हत्येसंदर्भात एका मंत्र्याचे नाव येऊ लागले आहे. पत्रकार रोहिदास दातीर हत्येप्रकरणात भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर आरोप केला आहे.

राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिस तपासाचा हवाला देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित असल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे. या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच दातीर यांची हत्या झाली आहे, त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे.

सहा एप्रिलला राहुरीत पत्रकार दातीर यांचे अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.पोलिसांचा तपास सुरू असताना या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. राहुरीचे माजी आमदार कर्डिले यासंबंधी शनिवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या घटनेसंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत.

कर्डिले म्हणाले, ‘पत्रकार दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती घेतली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली गेली, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली. तेव्हा कळाले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रॅन्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागीदार आहेत. दातीर यांना पठारे कुटुंबीयांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही. १८ एकरची मालमत्ता लाटण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असेल.

या प्रकरणाशी आवश्यक असलेली कागदपत्रे आमच्याकडे आहेत. ती आम्ही पोलिसांना पुरवायला तयार आहोत. दातीर यांच्या पत्नीच्या जीवालाही धोका आहे. आम्ही त्यांना भेटून आलो. त्यावेळी त्यांनी बंदोबस्त देण्याची मागणी केली. मी आमदार असल्याच्या काळात या मतदारसंघात अशा घटना झाल्या नाहीत. अलीकडे अशा चार घटना घडल्या आहेत. दातीर यांची हत्या झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून तनपुरे अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले नाहीत. कारण त्यांना भीती आहे की भेटायला गेलो तर दातीर यांची पत्नी आपल्यावरच आरोप करेल. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा. राजकीय पाठबळ असल्याशिवाय एवढा गंभीर गुन्हा होऊ शकत नाही. यामध्ये खोट्या आरोपींना अटक न करता खऱ्या आरोपींना अटक करावी, अशी मागणी कर्डिले यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनाही आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची विनंती करणार आहोत. येत्या पंधरा दिवसांत कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू. दातीर यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या समाजाला याची माहिती आहे, मात्र आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आपण यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही कर्डिले यांनी सांगितले.