Home Blog Page 288

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक – मुख्यमंत्री

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या.

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडेसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट लवकर मिळणे, प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण सर्वसमावेषक नियोजन करू तसेच सर्व घटकांचा यात विचारही करू पण आता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले आहे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.

हातावर पोट असणाऱ्या वर्गाची सगळ्यांनाच चिंता..

मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. यूकेने दोन महिने आधीच कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय. कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे.

सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन..

सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणेदेखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सूचना मांडल्या. रेमडेसिवीर उपलब्धता, ऑक्सिजन नियोजन, लॉकडाऊन लावण्यापूर्वी संतुलित भूमिका घेणे आदी विषय त्यांनी मांडले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पावले उचलावी लागतील तसेच या औषधाचा अतिरेकही थांबवावा लागेल.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक नगरपरिषद व पालिकेकडे लिक्विड ऑक्सिजन साठा टँक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तात्काळ कार्यवाही करावी असे सुचविले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑक्सिजन कमतरता वाढल्याने प्रश्न उद्भवले असून कडक निर्बंध लावून रुग्ण वाढ रोखावी असे सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, तसेच आमदार नाना पटोले, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास. डॉ तात्याराव लहाने यांनीदेखील विचार मांडले.

केडीएमसी चे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे माथेरान मधील रस्त्याला नामकरण

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी महापालिकेत रुजू झाल्यापासून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शुन्य कचरा मोहिम राबविण्यासाठी अनेकविध अभिनव संकल्पना व उपक्रम राबविल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू होण्यापूर्वी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्हयाचे तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रामदास कोकरे यांचेकडे सोपविला होता.

त्याआधी वेंगुर्ला व कर्जत येथे त्यांचेमार्फत राबविलेली ‘कचरा मुक्त डंपिंग ग्राऊंड’ ही संकल्पना महाराष्ट्राचे मिनी हिल स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये देखील राबविली आणि ती यशस्वी करुन दाखविली. रामदास कोकरे यांनी माथेरानमधील डंपिंग ग्राऊंडचे रुपांतर खेळाच्या मैदानात केले. तसेच माथेरानच्या पर्यावरण पुरक सर्वांगीण विकासात भरीव योगदान दिल्याबाबत माथेरान गिरीस्थान नगर परिषदेने, नगर परिषद हद्दीतील ‘सेटविला नाका ते कचरा डेपो’ या रस्त्याचे नामकरण ‘रामदास तुकाराम कोकरे मार्ग’ असे करुन रामदास कोकरे यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

सदर नामकरणाच्या उद्घाटन सोहळ्यास तत्कालिन रायगड जिल्हाधिकारी व विद्यमान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी , माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, अतिरिक्त आयुुुक्त सुनिल पवार, उपायुक्त उमाकांत गायकवाड, माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव व इतर मान्यवर हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

संपादक: मोइन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, ठाणे शहरात काही इसम अधिक किंमतीने रेमडेसिवीर हे इंजेक्शन काळ्या बाजाराने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकास मिळाली होती.

सदर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ठाण्यातील तीन हात नाका, इटर्निटी सर्व्हिस रोड येथे सापळा रचून एका इसमास रेमडेसिवीर इंजेक्शन हे बाजार मूल्यापेक्षा जास्त किंमतीने अनुक्रमे ५ ते १० हजार रु. किंमतीने बेकायदेशीररीत्या विक्री करत असताना १६ इंजेक्शनसह ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या इसमास ठाण्यातील बाळकूम नाका येथून ५ इंजेक्शनसह पकडले.

त्यांच्याकडून एकूण २१ रेमडॅक, रेमडेसिवीर इंजेक्शन, मोबाईल फोन अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लॉकडाऊनबाबत केडीएमसीच्या मार्गदर्शन सूचना जारी; काय चालू काय बंद बघा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये कोवीड रुग्णांच्या संख्येने कळस गाठला असून महापालिका प्रशासन सर्वस्वपणाला लावत त्याच्याशी दोन हात करत आहे. तर राज्य शासनाने शनिवार आणि रविवारी दोन दिवस आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. या दोन्ही दिवसांत परीक्षार्थी विद्यार्थी, ऑनलाईन फूड होम डिलीव्हरी, भाजीपाला, चिकन, मटण, मासे विक्रेते, वाईन शॉपबाबत असणाऱ्या निर्बंधांबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली. तर अनेक मद्यप्रेमींच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असणारे वाईन शॉप ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच कल्याण डोंबिवलीतील सध्याची कोवीड रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी शनिवारी – रविवारी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

शनिवार-रविवार बाबत या आहेत सूचना..

विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी कोणताही अडथळा असणार नाही. हॉल तिकीट दाखवून प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर एका प्रवाशाला परवानगी देण्यात आली आहे.

ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो, स्विगी आदींना २४ तास होम डिलिव्हरीसाठी परवानगी…

अत्यावश्यक किराणा, दूध, भाजीपाला, फळविक्रेते, मिठाई यांची दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहतील.

मटण-चिकन-अंडी-मासे विक्री दुकाने आठवडाभर नियमांचे पालन करत सकाळी ७ ते रात्री ८ सुरू राहणार..

भाजीपाला विक्रेते ६ फूट अंतर ठेऊन आणि वर्तुळ काढून विक्री करणार…

औषध दुकाने हॉस्पिटल यांना वेळेचे बंधन नाही..

पीठ गिरणी आठवड्याचे सातही दिवस सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत सुरू राहणार.

आईस्क्रीम, ज्यूस, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रस्त्याच्या कडेचे स्टॉलला ७ ते सायंकाळी ८ पर्यंत फक्त पार्सल विक्रीस परवानगी. होम डिलिव्हरी करणार असेल तरच सुरू अन्यथा बंद ठेवायचे.

इतर सूचना..

वाईन शॉप ३० एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंदच असणार.

चष्मे दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ सुरू ठेवण्यास परवानगी.

चार्टर्ड अकाऊंटस् ऑफिसेस सोमवार ते शुक्रवार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत परवानगी.

अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या मुंबईतील तरूणीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश!

• इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूशी झुंज देऊन ती पुन्हा जगतेय आयुष्य
• सलग पाच वर्षांत तिच्यावर ११ वेळा विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या
• कोहिनुर रूग्णालयात यशस्वी उपचार

मुंबई, प्रतिनिधी: अपघातानंतर एखाद्याचं आयुष्यचं बदलून जातं. असंच काहीस मुंबईत राहणाऱ्या २४ वर्षीय निरमोही या तरूणीच्या बाबतीत घडलंय. रस्ते अपघातात या तरूणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती कोमात गेली होती. तिला ४५ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सलग पाच वर्षांत तिच्यावर ११ वेळा विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जगण्याची कुठलीही उमेद नसताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने मृत्यूशी ही झुंज जिंकलीय. आणि आता ती पूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगू लागली आहे.

मुंबईतील कोहिनूर रूग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले आहे. या रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. विश्वनाथन अय्यंर यांच्यासह अन्य डॉक्टरांच्या टीमने हे यशस्वी उपचार केले आहेत. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे तिला नवीन आयुष्य मिळाले आहे.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१५ मध्ये जेवणासाठी हॉटेलमध्ये जात असताना कालिना येथे घरासमोरील रस्त्यावर तिला अपघात झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी तिला नजीकच्या नर्सिंग होममध्ये दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार देण्यात आले. परंतु, प्रकृती खूपच चिंताजनक असल्याने तातडीने तिला कोहिनूर रूग्णालयात हलविण्यात आले. या रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. विश्वनाथन अय्यंर यांच्याकडे उपचार सुरू झाले. अपघातात डोक्याला इजा झाल्याने ती कोमात गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून धक्का बसला. मुलीचा जीव वाचवण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणं गरजेचं होते. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. साधारणतः शस्त्रक्रियेनंतर १५ दिवसांनी ती कोमातून बाहेर आली. मात्र, तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. डॉक्टरांनी ११ वेळा डोक्यावर शस्त्रक्रिया केल्या. फेब्रुवारी २०२० मध्ये एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता तिची प्रकृती उत्तम आहे.

कोहिनूर रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. विश्वनाथन अय्यंर म्हणाले की, या रूग्णालयात आणले तेव्हा या मुलीची प्रकृती खूपच नाजूक होती. मेंदूच्या सीटीस्कॅन तपासणी केली असता या अपघातामुळे तिच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे निदान झाले. डोक्याची टाळू उघड करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः ४५ दिवस तिला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मागील पाच वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ११ वेळा डोक्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याशिवाय नियमित फिजिओथेरपी आणि स्पिच थेरपी देण्यात येत आहे. आता तिची प्रकृती उत्तम असून ती आधीप्रमाणे भरतनाट्यम नृत्य करू शकतेय.

डॉ. अय्यंर पुढे म्हणाले की, मेंदूला इजा झाल्यास रूग्ण बरा होऊ शकत नाही, हा गैरसमज आहे. कुठल्याही अपघातात डोक्याला दुखापत झाल्यास पुढील १-२ तासात रूग्णाला प्राथमिक उपचार मिळणं गरजेचं असते. खासगी रूग्णालयात रूग्णावर लगेच उपचार होणार नाही, अशी भिती अनेकांच्या मनात असते. परंतु, खासग रूग्णालयात रूग्णाची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी उपचार दिले जातात. मेंदूला दुखापत झालेली असल्यास रूग्णाला बरं व्हायला वेळ लागतो. परंतु, या कठिण काळात कुटुंबियांची साथ खूपच महत्त्वाची असते. यामुळे रूग्ण लवकर बरा होऊ शकतो.

निरमोहिच्या आईने सांगितले की, अचानक मुलीचा अपघात झाल्याने आम्ही खूपच घाबरून गेलो होतो. मुलगी वाचण्याची शक्यता खूपच कमी दिसत होती. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले आहे. याशिवाय, जगण्याच्या इच्छाशक्तीमुळे मुलीने मृत्यूवर मात केली आहे. आता ती आधीप्रमाणे भरतनाट्यम करू लागली आहे. आणखीन एक शस्त्रक्रिया बाकी असून लॉकडाऊननंतर ती करण्यात येणार आहे.