Home Blog Page 289

कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य अधिकाऱ्यांचा काळाबाजार.. टी.एम.सी च्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

व्हेंटिलेटरची निविदा मंजूर करण्यासाठी मागितला होता मोबदला.. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना पाच लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऐरोली परिसरात केली अटक.

ठाणे महानगर पालिकेत व्हेंटिलेटर पुरविण्यासंबंधीची निविदा मंजूर करून देण्यासाठी डॉ. राजू मुरुडकर यांनी ही लाच घेतल्याची बाब तपासात पुढे आली आहे.

या निमित्ताने करोना काळातील त्यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. नवी मुंबई भागातील एका कंपनीमार्फत ठाणे महापालिकेत ३० व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी निविदा मंजूर करून देतो, असे सांगत निविदेच्या एकूण रकमेपैकी दहा टक्के रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांनी १५ लाखांची मागणी केली होती. याबाबत संबंधित ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार या विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली.
त्यामध्ये पाच लाख रुपये लाचेचा पहिला हप्ता देण्यासाठी डॉ. मुरुडकर यांनी ऐरोलीतील एका खासगी रुग्णालयात बोलविल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने ऐरोली परिसरात सापळा रचला. त्यावेळेस संबंधित ठेकेदाराकडून पाच लाखांची लाच घेताना डॉ. मुरुडकर यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, मुलींवर आली वेश्या व्यवसायाची नामुष्की, वसईतील दुर्दैवी घटना!

वसई-विरार, प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून जीवनाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश अनेकांना पडला असताना काही असामाजिक तत्व मात्र असहाय्य महिलांच्या मजबुरीचा फायदा उचलून आपल उखळ पांढर करून घेत असल्याचे पोलीस तपासात उघड झाल आहे. वसईमध्ये वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सापळा रचून एका महिला आरोपीला अटक करून पीडित मुलींची सुटका केली आहे.

वसई पूर्वेकडील रेंज नाका येथे मुंबईतून वसईत येवून मुली पुरवत असल्याची खबर अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार प्रकाश निकम यांना माहीती मिळाली होती. अरुणा चौहान नावाची वेश्या पैसे घेवून मुली पुरवते अशी माहिती निकम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांना दिली. पोलीस उपआयुक्त प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे सहाय्यक फौजदार प्रकाश निकम पोलीस हवालदार बापु पवार, सुनिता कांटेला ,पोलीस नाईक रोशन किणी , महेंद्र शेट्ये ,विशाल कांबळे , पुनम जगदाळे , काजल पाटील,राजेश निवृत्ती पदमने यांच्या पथकाने सापळा रचून अरुणाला अटक केली.

कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना आपल्या रोजीरोटीला मुकावे लागले अनेक कंपन्या बंद झाल्याने महिला बेरोजगार झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी मिळेल ते काम करण्याची नामुष्की ओढवली असल्याने त्या मजबुरीचा फायदा उठवून वेश्या दलाल अरुणा हिने अशा महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ओढले. या दोन्ही पीडित मुली एका कंपनीत कामाला जात होत्या. मात्र, ते काम बंद झाल्याने आपला संसाराचा गाडा चालवायचा कसा अशा विवंचनेत असताना त्यांची ओळख अरुणाशी झाली. तिने ‘आपण मुंबईत धंदा न करता वसईमध्ये करूया, तिकडे तुम्हाला कोणी ओळखणार नाही’ असे सांगून पैशाचे आमिष दाखवून आणल्या होत्या.

शेवटी पोटापाण्याचा प्रश्न असल्याने त्या तयार झाल्या होत्या. मुंबईत राहणाऱ्या वेश्या दलाल महिलेने फोनवर ग्राहकांशी संपर्क साधून ग्राहकांच्या मागणी नुसार, मुली पुरवण्याचे काम करीत असल्याची बातमी प्रकाश निकम यांना मिळताच त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदशर्नाखाली एका सामाजिक संस्थेची मदत घेत एका बोगस गिऱ्हाईकाने वेश्या अरुणा हिला फोन करून मुलीची मागणी करायला सांगितले. अरुणाने एका मुलीचे 2000 रुपये सांगितले. त्यानंतर वसईच्या फादरवाडी येथील कृष्णा उडपी हॉटेलकडे भेटण्यासाठी बोलावले. अरुणा 2 मुलींना घेवून रिक्षाततून आल्या आणि कृष्णा उडप्पी येथे आल्या असता आणलेल्या दोन मुलींपैकी एका मुलीची निवड करण्यास सांगितली. त्याप्रमाणे बोगस गिऱ्हाईकाने एका मुलीस पसंत केले व ठरल्याप्रमाणे व्यवहाराचे 2000 रुपये अरुणाकडे दिले. आणि खात्री झाल्यानंतर अनैतिक वाहतूक शाखेचे दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दलाल अरुणा व 2 पीडित मुलींना ताब्यात घेतले.

अरुणा ही मुंबई सायन हून त्या दोन पीडित मुलीना घेवून आली होती. दलाल महिला ही फोनवरून गिऱ्हाईकांना संपर्क करून त्यांच्या मागणीनुसार, मुली पुरवत असल्याची कबुली तिने पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा करून 2 पीडित मुलींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे.पुढील तपास वालीव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद करोडीवाल करीत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात संसाराचा गाडा कसा हाकायाचा या विवंचनेत असलेली सामान्य वर्गातील जनता आता पोटापाण्यासाठी वाम मार्गाला जाण्यासाठी मजबूर झाली आहे हे यावरून दिसत असून सरकारने जनतेच्या रोजगाराचा प्रश्न लवकरच सोडविला नाही तर देशात अराजकता माजेल अशी भिती सामाजिक कार्यकर्ते यांनी वर्तविली आहे.

मीरा भाईंदर शहराचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार? खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये उद्योगमंत्र्याचे अधिकाऱ्यांना आदेश!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिरा भाईंदर

मिरा भाईंदर शहराला अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले असून शहरातील सत्ताधारी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले असून राज्य सरकार जाणीवपूर्वक कमी पाणी पुरवठा करीत असल्याचा आरोप करून जर शहराला होणार पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला नाही तर येत्या 12 तारखेला महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी दिला आहे.

गेल्या वर्षी याच विषयावर मीरा-भाईंदर शहराला अपेक्षित पाणीपुरवठ्यापेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याने खासदार राजन विचारे यांच्या वतीने 12 ऑक्टोंबर 2020 रोजी अपुरा पाणीपुरवठा संदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत 125 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा एमआयडीसीकडून केला जाईल असे ठरले होते. परंतु मीरा भाईंदर मधील नागरिकांना प्रत्यक्षात 93 दशलक्ष लिटर पाणी मिळत होते. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात होणाऱ्या कमी पाणीपुरवठ्याला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

खासदार राजन विचारे यांच्या मागणीनुसार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनामध्ये पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आज बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना तात्काळ बैठकीचे आयोजन करा अशा सूचना करण्यात आल्या होत्या. खासदार राजन विचारे यांनी औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले.

बैठकीला, आमदार गीता जैन, मुख्य अभियंता सुधाकर वाघ, मिरा भाइंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, कार्यकारी अभियंता दीपक खांबीत, सुरेश वाकोडे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शिवसेना गटनेत्या नीलम ढवण, माजी विरोधी पक्ष नेता राजू भोईर व इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मीरा-भाईंदर शहराला कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये मीरा-भाईंदर शहरास अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने तो तात्काळ वाढवून नियमित पाणीपुरवठा करणे तसेच आय आय टी यांच्या अहवालानुसार ठाणे साकेत येथे बुस्टिंगची क्षमता वाढविण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेस परवानगी देणे व एमआयडीसी पंपिंगच्या ठिकाणी कचरा साठल्याने पंपिंग बंद होते. त्यासाठी स्क्रीनिंगची यंत्रणा बसविणे. येत्या दोन दिवसांमध्येच 125 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांना दिले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व मुख्य अभियंता सुधाकर वाघ यांनी देखील यापुढे मीरा भाईंदर मधील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही असे या चर्चेदरम्यान आश्वासित केले.

मिरा भाईंदर शहरातील पाणी प्रश्नावर यापूर्वी देखील अनेक वेळा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे सोबत बैठकी झालेल्या आहेत अनेक वेळा याच विषयावर चर्चा झालेल्या आहेत परंतु शहराला आजही आवश्यक तेव्हढा पाणी पुरवठा होत नाही आणि याच विषयावर सर्वच राजकीय पक्ष मात्र राजकारण करत आहेत. आताही उद्योग मंत्र्यांच्या आदेशानुसार 125 एम एल डी पाणी मिळेलच याची काही शास्वती दिसत नाही असे बोलले जात आहे.

लॉक डाउनच्या भीतीने परराज्यांतील गाड्यांसाठी लोकांची झुंबड

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, कुर्ला, बांद्रा, ठाणे, पुणे रेल्वे स्थानकांवर गर्दी
मुंबईसह राज्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या आणि पुन्हा टाळेबंदीच्या भीतीने मुंबई आणि राज्याच्या अंतर्गत भागांत रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील, परगावातील नागरिकांनी पुन्हा एकदा परतीची वाट धरली आहे.
बांद्रा व लोकमान्य टिळक कुर्ला टर्मिनसवर सकाळपासून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांनी मोठी गर्दी केली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, दादर स्थानकातही परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली. तर पुण्यातही हीच स्थिती आहे.
काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या करोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली व कल्याण शहर आणि उपनगरांत कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून जनतेशी साधलेल्या संवादादरम्यान पुन्हा टाळेबंदीचे संकेत शुक्रवारी दिले असता त्यांची परतण्याची तयारी सुरु झाली आहे.
त्यामुळे गेल्या वर्षीच्या अनुभवाने धास्तावलेले कामगार, विद्यार्थी यांनी आपल्या मूळगावी धाव घेण्यास सुरुवात केली आहे.

आरक्षित आसनांची क्षमता संपली?
अनेक गाडय़ांतील पुढील काही दिवसांची आरक्षित आसनांची क्षमता संपली असून यातून रोज ३५ हजार प्रवाशी प्रवास करत आहेत.
सी.एस.एम.टी. रेल्वे स्थानकात परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली आहे.

दुचाक्या चोरून विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात काशीमिरा क्राईम युनिटला यश

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाईंदर व मीरा रोड परिसरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी दुचाकी चोरांचा शोध घेत असताना तांत्रिक तपासातून असे गुन्हे करणारा इसम हा योगेश मांगल्या असल्याची माहिती काशीमीरा क्राईम युनिटच्या पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर आरोपीला भाईंदर पश्चिम येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दरम्यान सन २०१७ पासून मुंबई भाईंदर व मीरा रोड परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकी चोरी करून त्या अर्नाळा तालुका वसई येथे राहणारे सचिन वैती आणि कल्पक वैती यांच्या मदतीने विक्री केल्या. एकूण २५ मोटारसायकल त्यात २० ऍक्टिवा, २ डियो, १ माइस्ट्रो, १ युनिकॉर्न, १ पल्सर यांचा समावेश आहे. यात सचिन व कल्पक वैती याना अटक करण्यात आली आहे व पुढील तपास सुरू आहे असे काशीमीरा क्राईम युनिट पोलिसांतर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे.