Home Blog Page 290

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी:अवधुत सावंत

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर मंथन सुरू आहे. देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लादलेल्या १०० कोटींच्या शुल्काबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविली आहे. इतकेच नव्हे तर कोर्टाने सीबीआयला १५ दिवसांच्या आत या संदर्भात प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्यांच्या चौकशीत काही तथ्य समोर आल्यास पुढील कारवाई करा असे सांगितले आहे. वकील जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देखील घेतले जात आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्या नंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून महाविकास आघाडी सरकारवर हल्ला करण्याची आणखीन एक संधी विरोधकांना मिळाली आहे.

रेमडीसीविर इंजेक्शन, मेडिकल्स, ऑक्सिजनचा काळा बाजार करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई – राजेंद्र शिंगणे

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या महाराष्ट्रात कोविडच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, संभाव्य वाढणाऱ्या रुग्णांचे हित लक्षात घेऊन मेडिकल्स, ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले. या संदर्भात रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादक व मेडिकल्स, ऑक्सीजन उत्पादक यांच्या प्रतिनिधींसमवेत बांद्रा येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, रेमडेसिविर इंजेक्शन व मेडिकल्स, ऑक्सिजनचे उत्पादक यांचे प्रतिनीधी तसेच अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक

राज्यात केवळ सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सर्व रक्तपेढ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून रक्तदान शिबिरे आयोजित करावी, असे आवाहनही राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र राज्यासाठी जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व ऑक्सिजनची उपलब्धता यांचे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. सर्व उत्पादकांनी प्राधान्याने महाराष्ट्र राज्यासाठी औषधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेले असून, सध्या देखील सुमारे ५० ते ६० हजार इंजेक्शनचा साठा दररोज उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा फारसा तुटवडा नाही.

राज्यात निर्माण होणाऱ्या ऑक्सीजन साठ्यापैकी ८० टक्के साठा हा वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवला आहे. महाराष्ट्र राज्यातील दररोजचे ऑक्सीजनचे उत्पादन १२५० मेट्रीक टन इतके असून त्यापैकी ७०० टन साठा वैद्यकीय कारणासाठी वापरला जात आहे. तसेच आवश्यकता भासल्यास जेथे कोविड रुग्ण मोठया संख्येने नाहीत अशा राज्यामधुन देखील ऑक्सिजन प्राप्त करुन घेण्यासाठी प्रशासन स्तरावर चाचपणी सुरु आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा त्यांचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास अथवा प्रशासनाच्या हेल्पलाईन १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांना औषध मिळवून देण्यास निश्चित मदत केली जाईल व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द कडक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड!

रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड! सिनेसृष्टीत पसरली शोककळा!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करताना त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. त्यांनी १०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.

सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. १९४७ च्या ‘जुगनू’ चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका शशिकला यांनी साकारली. मात्र यानंतर काम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. १९६२ साली ‘आरती’ चित्रपटात निगेटिव्ह भूमिका शशिकला यांना मिळाली. आरती चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.

‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (२००३) इत्यादी. शशिकला यांच्या सिनेमातील योगदानासाठी भारत सरकारनं २००७ साली ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं. २००९ साली त्यांना व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही प्रदान करण्यात आला होता. आजच्या त्यांच्या एक्झिट मुळे संपूर्ण सिनेसृष्टी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे..

वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शनिवार व रविवारी राज्यात पूर्णतः लॉकडाऊन तर इतर दिवशी कडक निर्बंध!

वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शनिवार व रविवारी राज्यात पूर्णतः लॉकडाऊन तर इतर दिवशी कडक निर्बंध

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मागील दोन दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वैद्यकीय क्षेत्रातील तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन लॉकडाऊन विषयी चर्चा केली होती अखेर आज मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यातील कडक निर्बधांची घोषणा केली आहे. आता राज्यात दिवसा जमावबंदी लागू असेल व रात्री 08 नंतर संचार बंदी केली असून शनिवार व रविवारी पूर्णतः कडक लॉकडाऊन असेल.

सिनेमागृह, नाट्यगृह, खेळाची मैदाने पुर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच हॉटेल, मॉल्स, गार्डन देखील बंद राहणार असून हॉटेल पार्सलसेवा पुरता सुरू राहील. राज्यातील सर्व शासकीय आस्थापनातील कर्मचाऱ्यांना ५० टक्के क्षमतेने तर इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जरी लागला नसला तरी कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नागरिकांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे राज्य सरकारने जनतेला जाहीररीत्या आव्हान केले आहे.

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून रुग्णाचे प्राण वाचविणास मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा GSWA ने केला सत्कार!

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून रुग्णाचे प्राण वाचविणास मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा केला सत्कार!

मिरारोड, प्रतिनिधी : ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वीपणे राबवून फुप्फुसाच्या गंभीर आजाराच्या रुग्णाला रुग्णवाहिकेने अवघ्या 35 मिनिटांत मुंबईच्या पावनहंस विमानतळावर पोहचविण्यासाठी मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा मिरारोडच्या गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने सन्मान करून त्यांचे आभार मानले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की, मिरारोड पूर्वेकडील वॉकहार्ड हॉस्पीटल येथून एका गंभीर आजारी पेशंटला फुप्फुसाच्या उपचारासाठी पवनहंस विलेपार्ले विमानतळावरुन हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे होते. हॉस्पीटल प्रशासन तसेच पेशंटचे नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेने विनाअडथळा पेशंट सुखरुप पाठविण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक रमेश भामे यांचेशी आज 2 एप्रिल रोजी सकाळी ०७.३५ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता वाहतूक पोलीसांनी सदर रुग्णवाहिका योग्य त्या बंदोबस्तात पायलट वाहनाच्या मदतीने कोठेही ट्राफीक जॅममध्ये अडकणार नाही व रुग्णवाहिकेला पूर्ण रस्ता मोकळा मिळेल याची खबरदारी घेतली. पोलीसांनी ग्रीन कॉरीडॉर मोहीम राबवून अवघ्या 35 मिनीटांत मिरारोडच्या वोकहार्ड हॉस्पीटल पासून ते मुंबईच्या विलेपार्ले पवनहंस विमानतळ येथे अंबुलन्सने विनाअडथळा पेशंट सुखरुप पोहचविले.

ग्रीन कॉरीडॉर मोहीम, यशस्वी होण्यासाठी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मिरारोड ते विलेपार्ले यादरम्यान वाहतूक बंदोबस्त लावून घेण्यात आला. त्यांनतर वाहतूक शाखेच्या पायलेटींग कार सोबत सकाळी ०९.१० वाजता ही रुग्णवाहिका वोकार्ड हॉस्पिटल मिरारोड येथून निघून ०९.१७ वाजता रुग्णवाहिकेने दहीसर टोलनाका पार केला व पवनहंस विलेपाले विमानतळावर ०९.४५ वाजता पेशंटला घेऊन सुखरुप पोहचली. वाहतूक पोलीसांनी वोकार्ड हॉस्पिटल, मिरारोड ते विमानतळ केवळ ३५ मिनीटात पेशंटला सुखरूप पोहचवले. पेशंट १०.०५ वा. एअर एम्बुलेन्सने रवाना होऊन ११.४० वाजता हैद्राबादला बागमपेठ विमानतळावर पोहचले.

मिरा भाईंदर शहरात प्रथमच ग्रीन कोरीडोर मोहीम यशस्वी पद्धतीने हाताळल्याबद्दल मीरा भाईंदर शहरातील अनेक मान्यवर नेते आणि नागरीकांनी मिरा-भाईंदर पोलिस आयुक्त सदानंद दाते, रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, डी.सी.पी मंजुनाथ, CSO जुहू एअरपोर्ट पवार, सांताक्रुजचे पोलिस निरीक्षक घानोरे या सर्वांचे आभार मानले तसेच सुर्यकांत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक), रमेश भामे पोलीस निरीक्षक (वाहतूक) तसेच वाहतूक अंमलदार, वाहतूक शाखा मिरा-भाईंदर यांचे विशेष कौतुक केले आहे.

या प्रसंगाचे औचित्य साधून मिरारोड पूर्वेकडील गोकुळ व्हिलेज येथे असलेली गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बाणविलकर यांच्या संकल्पनेतून वाहतूक शाखेच्या पोलिसांचा सन्मान करण्याचे ठरवले. त्यानुसार शनिवारी 3 एप्रिल रोजी संस्थेच्या वतीने काशिमिरा येथील वाहतूक शाखेत जाऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे यांचेसह उपस्थित सर्व वाहतूक पोलिसांचा सत्कार करून त्यांचे विशेष आभार मानले. याप्रसंगी गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बाणविलकर सोबत संस्थेचे सचिव कवी खान, संस्थेचे सदस्य प्रवीण सालीयन आणि सॅमी इत्यादी उपस्थित होते.