Home Blog Page 292

कल्याण पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८६ मधील धक्कादायक प्रकार उघड.. गोलवली समता नगर मधील कचरा कुंडीत टाकले जात आहेत वापरलेले पीपीई कीट आणि रुग्णांसाठी वापरलेले साहित्य…

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र (आय) मधील प्रभाग क्र. ८६ गोलवली समता नगर येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेली १० ते १५ दिवस वापरलेले पीपीई किट्स तसेच रुग्णांसाठी वापरलेले साहित्य टाकले जात आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातील नागरीकांत आश्चर्य व संताप व्यक्त केला जात असून रात्रीच्या अंधारात टाकण्यात येणाऱ्या वस्तुंमुळे परिसरात कोरोना सारख्या संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता स्थानिक नागरीकांत व्यक्त करण्यात येत आहे .

या परिसरातील माजी ग्राम पंचायत सदस्य श्री. भरत जाधव यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार प्रभाग क्षेत्र (आय) मध्ये असलेल्या समता नगर गोलवली वार्ड क्रमांक ८६ मध्ये असलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात गेली १० ते १५ दिवस रात्रीच्या वेळी अज्ञात कंपनी, रुग्णालय यांनी रुग्णांसाठी वापरलेले पीपीई कीट, हॅन्ड ग्लोव्ह्ज, मास्क, याच बरोबर रुग्णांना वापरून झालेले अन्य साहित्य टाकले जात आहे. या कचऱ्यावर पाळीव तसेच बेवारस कुत्रे, मांजरी यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, हेच प्राणी नागरी वस्ती मध्येही येत असतात अशा गंभीर स्वरुपाच्या प्रकारामुळे परिसरात कोरोना सह अन्य रोगजंतूही पसरण्याची शक्यता आहे. यासाठी या ठिकाणी कोणती अज्ञात व्यक्ती हे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक साहित्य टाकत आहे त्याचा स्थानिक पालिका प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेनेही शोध घेउन संबंधीतांवर कायदेशीर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरीकांकडून होऊ लागली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा दणका! सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश जारी; मेस्मा कायदाही लागू

अवधुत सावंत, मुंबई प्रतिनिधी : कोरोना रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने रात्री उशिरा जारी केला आहे. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रूग्णालयांवर सरकारी अंकुश प्रस्थापित झाला आहे.

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या खासगी अथवा सामाजिक संस्थांच्या रूग्णालयांसाठी हा आदेश लागू राहणार आहे. ही रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

खासगी रूग्णालये एकेका रूग्णांकडून आठ दिवसांसाठी ५ लाख, २५ लाख रुपये अशी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत होते. सरकारने आता या पिळवणुकीला चाप लावला आहे.
सरकारी व महापालिकांच्या रूग्णालयांमधील जागा मोठ्या प्रमाणात व्यापल्या आहेत. त्यामुळे कोविड रूग्णांना नाईलाजाने खासगी रूग्णालयांमध्ये भरती व्हावे लागत आहे. परंतु रूग्णांच्या या मजबुरीचा गैरफायदा खासगी रूग्णालये घेत होती.
अक्षरशः लाखो रूपये उकळले जात होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. दोन्ही मंत्र्यांच्या सुचनेनुसार हा आदेश आम्ही जारी केला असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिली.

या आदेशानुसार आम्ही खासगी रूग्णालयांसाठी अत्यावश्यक सेवा कायदाही (मेस्माही) लागू केला आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांतील डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचारी संप करू शकत नाहीत. ही सेवा बजावणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.
या आदेशात आपत्ती निवारण कायदाही लागू केला आहे. त्यामुळे सरकारचा आदेश खासगी रूग्णालयांनी मानला नाही, तर त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशीही माहिती सुधाकर शिंदे यांनी दिली.

सध्यापर्यंत खासगी रूग्णालये कोविड रूग्णांकडून एका दिवसासाठी ५० हजार किंवा त्यापेक्षा मनमानी पद्धतीने दर आकारत होते. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार एका दिवसासाठी जास्तीत जास्त ४ हजार, ७.५ हजार व ९ हजार रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरांनुसार सरकारने हे दर निश्चित केले असल्याचे आदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांनी एका दिवसांत स्वतः टाईप करून या आदेशाचा तब्बल १८ पानांचा मसुदा तयार केला. वांद्र्यावरून स्वतः गाडी चालवत ते आरोग्य सचिव, आरोग्य मंत्री यांच्याकडे गेले. त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या. त्यानंतर रात्री शिंदे मुख्यमंत्र्यांकडे गेले. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर रात्री उशिरा हा आदेश जारी करण्यात आला आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास केले प्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत, सुरेश वाकोडेसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : पाणथळ जमीनी आणि कांदळवनाचे संरक्षण करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य शासनाचे कायदे व नियमांचे उल्लंघन मीरा भाईंदर महापालिके कडून सातत्याने केले जात आहे. कांदळवन क्षेत्रामध्ये जमीन मालकांना टीडीआर मिळावा म्हणून कोट्यावधी रुपयांच्या नाल्यांचे कंत्राट बेकायदेशीरपणे दिल्याच्या तक्रारीवरून पालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबित व सुरेश वाकोडे यांच्यासह ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा भाईंदर शहरातील पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होण्याच्या नावाखाली महापालिकेने शहरात २२ नाल्यांचे तब्बल ९५ कोटींचे बांधकामाचे कंत्राट एकट्या मे. आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या ठेकेदारास दिले आहे. या ठेकेदाराचे बांधकाम काम निकृष्ठ असल्याच्या अनेक तक्रारी महापालिका आयुक्तांना केल्या असतानाच कंत्राटदाराने काही ठिकाणी उपकंत्राटदार नेमले असल्याची माहिती समोर आली आहेत. त्यामुळे कांदळवनात या नाल्यांची बांधकामे थांबवून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

मिरारोड पूर्वेकडील नेमिनाथ हाईट्स व हटकेश येथील पाण्याच्या टाकी मागील परिसरात कांदळवन क्षेत्रात महापालिकेने दोन नाल्यांचे बांधकाम चालवले होते. नेमिनाथ हाईट्स मागील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद करून पालिकेने आणखी एक नाला बांधण्यास घेतला होता. सदर ठिकाणी कोणताच नाला नव्हता. तर पाण्याच्या टाकी मागील नाला सुद्धा मूळ नैसर्गिक नाला खुला करून घोडबंदर खाडीला न जोडताच हा प्रकार पालिकेने चालवला होता. ठेकेदारांना आर्थिक फायदा करून देण्यासाठी आणि संबंधित जमीन मालकांना टीडीआर तसेच आजूबाजूच्या विकासकांना फायदा करून देण्यासाठी पालिकेने हा घाट घातल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी चालवल्या होत्या.

या प्रकरणी परिसरातील स्थानिक जागरूक नागरिक असलेल्या रुपाली श्रीवास्तव यांनी सुद्धा तक्रारी केल्या होत्या. मीरा भाईंदर स्तरावरील कांदळवन समितीने ह्या दोन्ही परिसराची पाहणी करून कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास व उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून पालिकेने भराव व बांधकाम केल्याचा अहवाल दिला होता. समितीच्या पाहणी वेळी पालिकेचे अधिकारी नरेंद्र चव्हाण सुद्धा उपस्थित होते आणि त्यांना दोन्ही कामे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तरी सुद्धा महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय राठोड सह शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित व सुरेश वाकोडे, कनिष्ठ अभियंता चेतन म्हात्रे व ठेकेदार यांनी नाल्यांचे बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले. पोलिसांनी अनेकवेळा काम बंद करून सुद्धा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पालिकेने काम चालवले होते.

वन विभागासह समितीच्या अहवाला नंतर अखेर अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या मंजुरी नंतर मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मीरारोड पोलिसांनी दिपक खांबित, सुरेश वाकोडे, ठेकेदार व इतर संबंधित अधिकारी आणि वाहन यंत्र साहित्याचे चालक – मालक आदींवर पर्यावरण संरक्षण कायद्या खाली गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे हे अधिकारी व ठेकेदार यांच्या या आधी सुद्धा पर्यावरण ऱ्हासाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी अजूनही प्रलंबित आहेत.

ज्या अधिकार्यांवर कांदळवनांचे आणि पाणथळ जमिनीचे सरंक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच आशिकारी अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्यामुळे शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीसाठी शासनाची मार्गदर्शक सूचना जारी!

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधि : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती ३१ मार्चला साजरी केली जाणार आहे. कोविड-19 मुळे यावर्षी तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

शिवजयंतीला अनेक शिवप्रेमी किलले शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र सरकारने केलं आहे.

दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी अशा कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

तसेच दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम व शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.

वाझे-हिरेन भेटीचे पुरावे एन.आय.ए कडे? डीएनए चाचणीच्या प्रतिक्षेत!

प्रतिनिधी, अवधुत सावंत : सध्या एन.आय.ए च्या कोठडीत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची मे. विशेष न्यायालयाने ३ एप्रिल पर्यंत पुन्हा एन.आय.ए च्या कोठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणात एन.आय.ए ने आत्तापर्यंत केलेल्या तपासातील काही मुद्दे न्यायालयात ठेऊन त्यासंदर्भात पुढील तपास करण्यासाठी सचिन वाझे यांची कोठडी मागितली होती. एनआयएची ही मागणी न्यायालयाने मान्य केली.

यावेळी सचिन वाझेंकडच्या बेहिशेबी ६२ बुलेट्स, वाझे-हिरेन भेटीचे पुरावे अशा अनेक गोष्टी एन.आय.ए ने न्यायालयासमोर ठेवल्याचं वृत्त दिलं आहे.

‘सचिन वाझे यांच्या घरी अशा ६२ बुलेट्स सापडल्या, ज्यांचा कोणताही हिशोब त्यांच्याकडे नव्हता. तसेच, त्यांना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरसाठी देण्यात आलेल्या ३० बुलेट्सपैकी फक्त ५ बुलेट्स सापडल्या असून उरलेल्या २५ बुलेट्स कुठे गेल्या, हे वाझेंना माहीत नसल्याचं एन.आय.ए ने कोर्टात नमूद केल्याचं’ या वृत्तात म्हटलं आहे.

तसेच, ‘१७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची भेट झाल्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत, याच वेळी मनसुख हिरेनने सचिन वाझेंना कारची चावी दिली, जी चोरीला गेल्याचा दावा त्यांनी नंतर केला होता’, असं देखील एन.आय.ए ने यावेळी न्यायालयाला सांगितलं.
एन.आय.ए ने डीएनए टेस्टसाठी मनसुख हिरेन यांचे रक्ताचे नमुने घेतले असून या प्रकरणात सापडलेल्या गाड्यांमधून देखील नमूने गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजून नवीन गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.