Home Blog Page 293

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

अवधूत सावंत, प्रतिनिधी : जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे.

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना

मुंबई दिनांक २६ : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक २८ मार्च २०२१) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य,वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले- लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण…

मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

धोका टळला नाही उलट वाढला..

ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होतांना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेने ही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

कडक निर्बंधांचे संकेत..

जनतेने ही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की आपण बेड्स, आरोग्य सुविधा वाढवू परंतू डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

लसीकरणाचा वेग वाढवा..
लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा नवीन विषाणु आणि औषोद्धोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे.

याचीही काळजी घ्या..

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्नि सुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यु व ऑक्सीजन बेड्स ची संख्या वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खुप वाढवले आहे, मुंबईत दिवसाला ५० हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्टींगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अधिक लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे मागणी करावी.. – अमित देशमुख

गावात लसीकरणाची पुर्वतयारी झाली का याची शहनिशा केली जावी तसेच लसीकरणाचा वेग वाढवतांना राज्याला केंद्राकडून मोठ्यासंख्येने लस उपलब्ध होण्यासाठी केंद्राकडे मागणी करावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले. त्यांनी ऑक्सीजनचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी त्याची मागणी उत्पादकांपर्यंत वेळेत पोहोचण्याची गरजही व्यक्त केली. शाळा आणि महाविद्यालये सुरु होण्यापूर्वी शिक्षक आणि प्राध्यापकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, ट्रान्सपोर्ट व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांनाही लस देण्यात यावी असेही ते म्हणाले. राज्याच्या ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई पुण्याप्रमाणे ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढते आहे तिथे ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी, तसेच लक्षणे नसलेल्या परंतू विलगीकरणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी कोविड सेंटर्स उभारली जावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या.

राज्यात ५२ लाख लोकांना लस देण्यात आली असून राज्य आजघडीला लसीकरणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

रेल्वेच्या डब्यात धड नसलेले शीर आढळल्याने खळबळ!

अवधुत सावंत, प्रतिनिधी (कल्याण) : अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या यार्डात असलेल्या एका लोकल डब्यात धड नसलेले शीर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन आलेली लोकल अंबरनाथ रेल्वे स्थानकात सायडिंगला उभी असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हितेंद्र राजभर, असे शीर आणि धड आढळून आलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे.

मृत तरुणाचे शीर लोकलमध्ये तर धड रेल्वे रुळावर

काल सकाळच्या सुमारास अंबरनाथ येथील सायडिंग ला उभ्या असलेल्या एका लोकलमधील लगेजच्या डब्यात एका तरुणाचे धड नसलेले शीर आढळल्याचे स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी अंबरनाथ यार्डात जाऊन शीर ताब्यात घेत व्यक्तीचे धड शोधायला सुरुवात केली. याच दरम्यान अंबरनाथ उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये एक व्यक्तीचे धड पोलिसांना आढळले. या संबंधी अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीचे नाव हितेंद्र राजभर असल्याचे समोर आले आहे.

रेल्वेचा खुलासा: ही हत्या नसून रेल्वे अपघात

मृत हितेंद्र उल्हासनगर स्थानकावरून मध्यरात्री १२.२० च्या शेवटच्या लोकल मध्ये चढला होता. यावेळी तो दरवाजात उभा असतांना त्याचे डोके रेल्वे रुळाजवळील असलेल्या खांबाला आदळले. यात त्याचे शीर लोकलच्या डब्यात राहिले आणि धड उल्हासनगर स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला पडले होते, अशी माहिती रेल्वे सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी दिली. ही हत्या नसून रेल्वे अपघात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

खाजगी फोटो वायरल करण्याची धमकी देऊन १७ वर्षीय मुलीवर कल्याणमध्ये बलात्काराची घटना!

प्रतिनिधी, अवधुत सावंत(कल्याण) :  कल्याण मध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला एका उंच इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील बंद खोलीत नेऊन २१ वर्षीय आरोपीने बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना कल्याण पश्चिम भागातील एका गृहसंकुलात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सदर आरोपीचे नाव रितिक मांजी आहे. पीडित तरुणी नातेवाईकांना जेवणाचा डबा देऊन दुपारच्या सुमारास घरच्या दिशेने दुचाकीवरून जात होती. त्याच सुमारास कल्याण पश्चिम भागातील एका चौकात आरोपीने तिला रस्त्यात गाठून तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणी घाबरली होती. याचाच फायदा घेत पुन्हा धमकी देऊन आरोपी तिच्याच दुचाकीवरून बसून तिला कल्याण पश्चिम भागातील एका उंच गृहसंकुलातील अकराव्या मजल्यावर असलेल्या एका बंद खोलीत नेले. त्यानंतर त्याने तिला आरडाओरडा करशील तर मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार करुन घटनास्थळावरून पसार झाला होता.

घडलेल्या प्रकारामुळे पीडित भयभीत झाली होती. त्यानंतर घरी येऊन तिने तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती घरच्यांना दिली. नातेवाईकांनी तिला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती महिला पोलीस अधिकाऱ्याना दिली. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एकास अटक करून त्याच्याकडून अर्धा किलो कोकेन जप्त केले

प्रतिनिधी: अवधुत सावंत (मुंबई ): अंमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटने एका इसमाकडून तब्बल अर्धा किलो कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सदर इसमास आग्रीपाडा म्युन्सिपल शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानातील इलेक्ट्रिक पोल जवळून फारुख उमरभाई नावाच्या इसमास, आग्रीपाडा रोड येथून ताब्यात घेतले. त्याच्याजवळून एकूण तब्बल अर्धा किलो कोकेन ज्याची बाजारात अंदाजे किंमत रुपये १,५०,००,०००/- आहे असा हा अंमली पदार्थ मिळून आला.

सदरचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे व पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांकडून मीडिया ला सांगण्यात आले.

काशिमीरा गुन्हे शाखा युनिट-१ ने धडक कारवाई करत एकूण १५,६९,२७६ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त

मिरा भाईंदर प्रतिनिधी : गेल्या काही दिवसां पासून गुन्हे शाखा क्र. १ काशिमीरा यांचेकडून प्रतिबंधित गुटखा साठवणूक करणारे आणि विक्रेत्यांवर धडक कारवाई केली जात असून लाखोंचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अशाच प्रकारची मोठी कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ यांचेकडून करण्यात आली असून शुक्रवार १९ मार्च रोजी पोलीस नाईक पुष्पेंद्र थापा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भाईंदर पश्चिमेकडील जलाराम जनरल स्टोर्स या दुकानावर छापा टाकून ९,८८,१३२ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे भाईंदर पश्चिमेलाच गणेश देओल नगर या झोपडपट्टीत सार्वजनिक सौचालायाच्या बाजूला असलेल्या एका खोलीमध्ये साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण ५,८१,१४४ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

काशिमीरा गुन्हे शाखा युनिट क्र. १ अशा प्रकारे धडक कारवाई करत एकाच दिवसात एकूण १५,६९,२७६ रुपये किमतीचा माल जप्त केला असून भाईंदर पोलीस ठाण्यात अनुक्रमे गुन्हा नोंद क्र. ११२/२०२१ भादवीस कलम ३२८, १८८,२७३ अन्न सुरक्षा अधिनियम २००६ चे कलम २६(२) (४), ३०(२)(ए) आणि त्याच ठिकाणी गुन्हा नोंद क्र. ११३/२०२१ भादवीस कलम ३२८, १८८,२७३ अन्न सुरक्षा अधिनियम २००६ चे कलम २६(२) (४), ३०(२)(ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट क्र. १ चे सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख व गुन्हे प्रकटीकरण शाखा क्र. १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या सहकार्याने सहायक पोलीस निरीक्षक विलास कुटे, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक राजू तांबे, पोलीस हवालदार संदीप शिंदे, किशोर वाडिले, अविनाश गर्जे, पोलीस नाईक पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, विकास राजपूत व त्यांचे इतर सहकारी यांनी मिळून कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बजरंग अडसूळ करीत आहेत.

मिरा भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला त्याच बरोबर सुगंधित तंबाखू यांच्या वाहतुकीवर सतत कारवाया केल्या जात असून आता पर्यंत कोट्यवधींचा माल जप्त केला गेला आहे तरी देखील मात्र या प्रतिबंधित मालाची चोरटी वाहतूक आणि साठवणूक काही कमी होताना दिसत नाही. अशा प्रकारच्या प्रतिबंधित मालावर कशा प्रकारे नियंत्रण आणले जाईल हाच एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलेला आहे.