Home Blog Page 296

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन भेटले होते? सी.सी.टी.व्हीत कैद

अवधूत सावंत, प्रतिनिधी : जगविख्यात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेलं स्कॉर्पिओ वाहन सापडलेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ताब्यात अजून दोन लक्झरी वाहनं जप्त केली आहेत. यामधील एक कार रत्नागिरीमधील शिवसेना नेता विजयकुमार भोसले यांच्या नावावर रजिस्टर आहे. तर दुसरं वाहन मर्सिडीज बेन्झ आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे

तीन दिवसांपूर्वी वाझेंकडून वापरण्यात येत असलेली मर्सिडीज पोलिसांकडून जप्त करण्यात आली. ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसकडे सध्या अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा ताबा आहे.

मे. ठाणे सत्र न्यायालयात एटीएस कडून वाझेंची कोठडी मागितली जाऊ शकते. यादरम्यान एनआयए आणि एटीएस ने सी.सी.टी.व्हीं.ची तपासणी केली असता १७ फेब्रुवारीला मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात फोर्ट मुंबई जीपीओ जवळ मर्सिडीज कारच्या आत १० मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.

मनसुख हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते

आपली स्कॉर्पिओ मुलूंड – ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता. सी.सी.टी.व्ही मध्ये सचिन वाझे आपलं कार्यालय असणाऱ्या मुंबई पोलीस मुख्यालयातून मर्सिडीजमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यानंतर त्यांचं वाहन सी.एस.एम.टी बाहेर सिग्लजवळ उभं असल्याचं दिसलं आहे.

सिग्नल सुरु झाल्यानंतर मर्सिडीज त्याच जागी उभी असते आणि वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचं सी.सी.टी.व्ही त दिसत आहे.
काही मिनिटांनी मनसुख हिरेन रस्ता ओलांडून येतात आणि मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर मर्सिडीज जीपीओच्या समोर उभी असल्याचं दिसत आहे. एनआयए आणि एटीएस ने आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवत ह्या गोष्टींची उकल करून समोर आणल्या आहेत.

पीपीई किट घालून द्यावी लागणार MPSC ची परीक्षा! आयोगाच्या निर्णयानंतर चर्चेला उधाण!

अवधुत सावंत, प्रतिनिधी : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. दरम्यान MPSC ची परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती, मात्र राज्यातील विद्यार्थ्यांनी याबाबत राज्य सरकारचा निषेध करीत आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर २१ मार्च रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरम्यान एक महत्त्वाची मात्र अजब बातमी समोर आली आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव बळावू नये यासाठी विद्यार्थ्यांना बेसिक किट घालून परीक्षा द्यावी लागणार आहे. आयोगाच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दोन किट दिले जाणार आहे. किटमध्ये नेमकं काय असेल या बाबत अद्याप कोणीतही माहिती मिळू शकलेली नाही.

प्राधान्य गटाचे लसीकरण तीन ते चार महिन्यात पूर्ण करा!– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अवधुत सावंत, प्रतिनिधी :

राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता…

कोविड लसीकरणात महाराष्ट्र अव्वलस्थानी…

उच्चांकी रुग्ण संख्येमुळे काटेकोर निर्बंध पाळण्याचेही जिल्ह्यांना निर्देश…

अवधूत सावंत, प्रतिनिधी (मुंबई) : एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे आव्हान आपल्यासमोर असून येत्या तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचेच आहेत हे सांगत येणारा उन्हाळा लक्षात घेऊन सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, व उन्हापासून संरक्षण होईल अशी व्यवस्था उभारावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ठाकरे विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे लसीकरण संदर्भात बैठकीत बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दर दिवशी ३ लाख लस दिली पाहिजे

दरम्यान राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना काल केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी येणाऱ्या रुग्णांपेक्षा आज रोजीची संख्या उच्चांकी असून राज्यातील जिल्हा प्रशासनाने अतिशय वेगाने रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधणे, निर्बंधांचे आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थान नंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे मात्र दर दिवशी ३ लाख लस दिली पाहिजे यादृष्टीने नियोजन करण्याचे त्यांनी आरोग्य विभागास सांगितले.

कोविड लसीकरणात अव्वलस्थानी

कोविड लसीकरणात १८ मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र संपूर्ण देशात जवळजवळ अव्वलस्थानी आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. आत्तापर्यंत दोन्ही मिळून ३६ लाख ३ हजार ४२४ डोस देण्यात आले असून केवळ राजस्थान 36 लाख 84 हजार डोस देऊन महाराष्ट्रापेक्षा किंचित पुढे आहे असे दैनंदिन लसीकरण अहवालावरून दिसते. कालच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पंतप्रधानांसमवेतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत महाराष्ट्रातील लसीकरण प्रमाण चांगले आहे, असे सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे असले तरी दिवसाला 3 लाख डोस देऊन लसीकरण वाढविण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही दिली होती. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी देखील लसीकरणासाठी आणखी लसीचा साठा मिळावा अशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

महाराष्ट्राने 31 लाख 5 हजार 169 पहिला डोस आणि 4 लाख 98 हजार 255 दुसरा डोस असे लसीकरण केले आहे. तर राजस्थानने 30 लाख 92 हजार 635 पहिले डोस व 5 लाख 92 हजार 208 दुसरे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेशने एकूण दोन्ही मिळून 32 लाख 46 हजार 323, पश्चिम बंगालने 30 लाख 17 हजार 35, गुजरातने 28 लाख 53 हजार 958 असे दोन्ही मिळून डोस दिले आहेत. त्यानंतरची इतर काही राज्ये पुढीलप्रमाणे आहेत : कर्नाटक 19 लाख 27 हजार 246, केरळ 18 लाख 91 हजार 431, तामिळनाडू 17 लाख 18 हजार 313, मध्यप्रदेश 18 लाख 66 हजार 138, बिहार 16 लाख 34 हजार 65, आंध्र प्रदेश 13 लाख 16 हजार 192, दिल्ली 8 लाख 67 हजार 433

लस वाया जाऊ देऊ नका

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात इतर काही राज्यांच्या तुलनेत लस विविध कारणामुळे वाया जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. काही राज्यांत २० टक्क्यांपर्यंत लस वाया जाते मात्र महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ ६ टक्के आहे, ते देखील शून्यावर आले पाहिजे. केंद्र सरकारने दिलेल्या नियमांप्रमाणेच लसीकरण झाले पाहिजे हे पाहावे.

उन्हाळा लक्षात घेऊन वेळ ठेवा

राज्यात बहुतांश ठिकाणी तीव्र उन्हाळा असतो, त्याचा परिणाम कमी लसीकरणावर होऊ शकतो हे गृहीत धरून नागरिकांना दुपारच्या आत किंवा दुपारनंतर व उशिरा रात्री पर्यंत लस देण्याची व्यवस्था करावी तसेच ज्येष्ठ व सहव्याधी रुग्ण रांगांमध्ये उभे असतात त्यांची गैरसोय होणार नाही व कुठेही वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पावसाळ्यात फिल्ड रुग्णालयांची काळजी घ्या

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या फिल्ड रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढत आहेत. येणारा पावसाळा लक्षात घेऊन त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे व आवश्यक ती देखभाल व दुरुस्ती करून घ्यावी जेणेकरून पावसाचा त्रास होणार नाही अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

बदलत्या लक्षणांची नोंद घ्या

कोरोना विषाणूच्या बदलत्या लक्षणांची नोंद वैद्यकीय तज्ज्ञांनी घ्यावी तसेच आवश्यक त्या उपचार पद्धतीविषयी राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संसर्ग असो किंवा लसीकरण, दोघांच्या बाबतीत अधिक मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर लोकांमध्ये जनजागृती करावी असे सांगितले. राज्यात एकवेळ होती जेव्हा दिवसाला केवळ २ हजार रुग्ण येत होते. आता गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे , त्यादृष्टीने परत एकदा तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपात वैद्यकीय कर्मचारी व सहायक नियुक्त करा तसेच बेड्सची जादा संख्या कशी उपलब्ध राहील याचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले.

उच्चांकी संख्या गाठल्याने काळजी घेण्याची गरज

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी यावेळी सांगितले की, आपण दिवसेंदिवस लसीकरणाचा वेग वाढवीत असून काल दिवसाला २ लाख ७५ हजार डोस देण्यात आले. लवकरच आपण ३ लाख डोस दर दिवशी देऊ शकू. प्राधान्य गटात १.७७ कोटी जणांना दोन डोस म्हणजे एकूण पहिल्या टप्प्यात ३.५ कोटी डोसची आवश्यकता आहे. अजून साधारणपणे ३ कोटी डोस द्यायचे आहेत. लसीकरण वेग वाढल्यानंतर ३ ते ४ महिन्यात ते पूर्ण होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१७ सप्टेंबर २०२० रोजी असलेल्या रुग्ण संख्येपेक्षा उच्चांकी संख्या गाठली असून अशीच वाढती संख्या राहिल्यास एप्रिल पहिल्या आठवड्यात ३ लाख सक्रिय रुग्ण राज्यात होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी प्राधान्याने आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे.

या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मुंबई पालिका आयुक्त आय एस चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉक्टर शशांक जोशी, डॉ संजय ओक, डॉ तात्याराव लहाने, डॉ राहुल पंडित आदी उपस्थित होते. या सदस्यांनी यावेळी लसीकरण वाढविण्यासाठी विविध सूचना केल्या.

डोंबिवलीतील “सर्वोदय पार्क सोसायटी” तून बालमजूर कामगाराची सुटका; मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अवधूत सावंत, प्रतिनिधी (डोंबिवली) : डोंबिवलीतील नांदीवली पंचनांद येथील “सर्वोदय पार्क सोसायटी” गृहसंकुलातुन ३०० रुपये रोजंदारीवर मजुरीचे काम करणाऱ्या एका १६ वर्षे किशोरवयीन अवस्थेतील बालमजूर कामगाराची सुटका करण्यास राष्ट्रीय पदक विजेते पत्रकार तथा साप्ताहिक “युवा सह्याद्री” चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री. अवधुत सावंत व “सलाम बालक ठाणे सिटी चाईल्डलाईन” च्या समन्वयक सौ.श्रद्धा संतोष नारकर यांना यश आले असून त्याबाबत मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित मुकादम नामे बळवंत तुकाराम कुप्पे (४३ वर्षे), राहणार आजदेगाव, डोंबिवली (पूर्व) याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डोंम्बिवलीतील नांदीवली पंचानंद येथील सर्वोदय पार्क सोसायटीतील “ए / ००३” सदनिकेत “महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पदक विजेते (२००९)” तथा साप्ताहिक “युवा सह्याद्री” चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री.अवधुत मधुकर सावंत (वय ५५ वर्षे) हे आपल्या पत्नी व दोन मुलांसमवेत सन २००२-२००३ पासून वरील संकुलात राहत असून काल दि.१७.०३.२०२१ रोजी दुपारी २.४५ वाजता कामावरून आपल्या घरी जेवण्यासाठी परतले असता त्यांना आपल्या बेडरूम च्या पाठीमागील बाजूस जोरजोरात खोदकाम करत असल्याचा त्यांना आवाज ऐकू आला. आवाज नक्की कुठून येतोय हे पाहण्याकरता म्हणून स्लायडिंग उघडून पाहिले असता एकूण ३ मजूर कामगार तिथे भरदुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गटाराचे खोदकाम करीत असल्याचे त्यांनी पाहिले. सदर ३ कामगारांना त्यांनी टोकले असता व त्यांची नावं व वय विचारले असता त्यांनी त्यांची नावे १). अमर विठ्ठल इचुरे (वय १९ वर्षे), २). वीरेंद्र पटेल (वय २० वर्षे) व त्यातील एक मुलगा हा किशोरवयीन बालमजूर काम करताना आढळून आला म्हणून त्यांनी त्यांच्या मुकादमाला बोलावून आणण्यास सांगितले व त्यांना सुचवले की नियमाप्रमाणे दुपारी २ ते ४ या वेळात काही आजारी वयस्क जेवून त्यांच्या रोज घ्यावयाच्या औषधी गोळ्या घेऊन वामकुक्षी घेतात तर तुम्ही ही थोडा वेळ आराम करून ४ वाजल्या नंतर कामाला सुरुवात करावी असे विनंतीवजा सांगून काम थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कामगार २). वीरेंद्र पटेल (२०) याने सदर काम पाठीमागे बंगल्यात राहणाऱ्या शेट सुभाष म्हात्रे याने आम्हाला करण्यास सांगितले आहे व आम्हाला वेळ काळ ठरवून दिलेली व निश्चित करून दिलेली नाही असे सांगताच पत्रकार अवधुत सावंत यांनी आपलं विझिटिंग कार्ड त्याला देत आधी काम बंद कर आणि तुझ्या त्या शेटला हे माझं कार्ड देऊन भेटायला बोलवं असं सांगताच त्याने निमूटपणे काम बंद केले व ४ वाजून ०६ मिनिटांनी पुन्हा खोदकाम करण्यास सुरू केले. तेवढ्या वेळात पत्रकार
अवधुत सावंत यांनी त्या कामगारांचे काम करतानाचे फोटो व विडिओ काढून चाईल्ड हेल्पलाईन क्र. १०९८ वर कॉल करून तक्रार केली की एक किशोरवयीन बालकामगार सदर सर्वोदय पार्क सोसायटीत काम करत आहे व त्याचे फोटो व विडिओ काढलेला आहे. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वाल्यांनी ती तक्रार ताबडतोब “सलाम बालक ठाणे सिटी चाईल्डलाईन” च्या समन्वयक सौ. श्रद्धा संतोष नारकर यांना वर्ग करून त्यांनी त्वरित हरकत घेत पत्रकार सावंत यांना फोन करून त्यांच्याकडून फोटो व विडिओ मागवून घेऊन ते पाहून झाल्यानंतर पत्रकार अवधुत सावंत यांना पुन्हा फोन करून लगेच मानपाडा पोलीस स्टेशनला फोन करण्यास व तक्रार करण्यास सुचवले. सावंत यांनी मानपाडा पोलिसांना फोन करून तशी तक्रार देऊन बिट मार्शल चा नंबर घेऊन त्यांनासुद्धा फोन करून ताबडतोब बोलवून घेतले. तोवर सौ.श्रद्धा नारकर यांनीही मानपाडा पोलीस ठाण्यात पीएसआय दिनकर सुर्वे यांना सदर बाब समजावून गुन्हा अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ व ७९ खाली गुन्हा मोडत असल्याने तसा तो नोंदवण्यास सुचवले.

बिटमार्शल यांचे घटनास्थळी आगमन

बिटमार्शल भास्कर गायकवाड व ताराचंद सोनवणे हे घटनास्थळी आल्यावर त्यांनी पाहिले की त्या ३ कामगारांनी कोरोनाची नियमावली न पाळता चेहऱ्यावर मास्क ही परिधान केलेले नाहीत आणि त्यातील एक मुलगा किशोरवयीन दिसत असून त्याचं वय विचारून खातरजमा केल्यावर त्या मुलाला बिट मार्शल यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन हजर केले असता पीएसआय सुर्वे यांनी पुढील चौकशी केली असता त्या किशोरवयीन मुलाने बळवंत तुकाराम कुप्पे (वय ४३) राहणार सिताकुंज, बिल्डिंग नं.१, आजदेगाव डोंबिवली (पूर्व) याचे नांव सांगितले म्हणून मानपाडा पोलिसांनी त्याच्या विरुद्ध बालकामगार आहे हे माहीत असून सुद्धा त्यास कामावर ठेवुन त्याचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करून त्या किशोरवयीन मुलावर अन्याय केला आहे म्हणून दि.१८.०३.२०२१ रोजी सकाळी ११:३१ वाजता गुन्हा दाखल केला आहे.

सदर किशोरवयीन मुलांस दि.१८.०३.२०२१ रोजी मानपाडा पोलिसांनी उल्हासनगर – ५ येथील चाईल्ड वेल्फेयर कमिटी समोर हजर केले. तेथील (सीडब्लूसी) च्या न्यायाधीश सौ.सुनीता बाबूळकर यांच्या समोर त्या मुलाला हजर केले असता चौकशी अंती त्या मूलाकडून कळले की तो कर्नाटक येथे राहणारा असून ११ वी आर्टस् शाखेत शिक्षण घेत असून इकडे दावडी येथे त्याची मावशी राहते तिच्याकडे सध्या तो राहत आहे. लॉकडाऊन मुळे त्याच्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे म्हणून घरच्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून तो काम करत आहे असे सांगितले. सौ.बाबूळकर यांनी त्या मुलाची कस्टडी सलाम बालक ठाणे सिटी चाईल्डलाईन च्या ताब्यात देत त्या मुलाला कर्नाटक येथे त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप पणे पोहोचवण्याचे आदेश दिले.

तक्रारदार म्हणून स्वतः पत्रकार अवधुत सावंत चाईल्ड वेल्फेयर कमिटी समोर हजर

पत्रकार अवधुत सावंत यांनी सीडब्लूसी च्या न्यायाधीश सौ.सुनीता बाबूळकर यांना सुचनावजा एक विनंती केली की सदर “सर्वोदय पार्क” ही १२ विंग ची सोसायटी असून त्या मध्ये जवळपास २०० सभासद असून सोसायटीची समिती ह्यांची प्राथमिक जबाबदारी होती की सोसायटीच्या समितीच्या सभासदांपैकी एकाने तरी कामाच्या ठिकाणी स्वतः जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी उभं राहून सध्याच्या कोरोना सारख्या जागतिक भीषण महामारीच्या काळात महापालिकेने लादलेले निर्देश बाहेरचे कामगार संकुलात काम करायला आले आहेत तर ते मास्क परिधान करण्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाही? एखादा बालमजूर तर काम करत नाही ना?

तर समितीने आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे म्हणून त्यांच्यावर ही कायदेशीर फौजदारी कारवाई व्हावी जेणेकरून इतर लापरवाह सोसायट्यांनाही त्याचा तसा वचक बसू शकेल. तर सौ.सुनीता बाबूळकर यांना पत्रकार सावंत यांनी सूचना रास्त वाटली म्हणून श्री.सावंत यांना समितीला तसे लेखी पत्र देण्यास सांगितले व सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीवर फौजदारी कारवाईचे आश्वासन दिले व सलाम बालक ठाणे सिटी चाईल्ड हेल्पलाईन च्या समन्वयक सौ.श्रद्धा नारकर यांना सोसायटीला तसा समन्स बाजावण्याचे निर्देश दिले.

लातूरचे सुपुत्र मुंबई क्राईम ब्रँचचे आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर!

मुंबई प्रतिनिधी : मुंबई पोलीस दलात सध्या कार्यरत असलेले लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र निसार तांबोळी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

निसार तांबोळी हे 1996 पासून पोलीस सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस झालेले जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण केल्या असून कुठल्याही वादविवादात ना अडकलेले ते एकमेव अधिकारी आहेत.

हिंगोली, नांदेड, वर्धा, नंदुरबार, अमरावती, नाशिक, मुंबई अशा अनेक ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. 2009 ते 2012 या कालावधीत मुंबई क्राईम ब्रांचमध्ये ते कार्यरत होते, 2008 ते 2009 एअरपोर्ट झोन, 2015 ते 2017 औरंगाबाद येथे SRPF येथे मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे.

त्यांना यापूर्वी SRPF औरंगाबादचा परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या निसार तांबोळी यांना भ्रष्टाचारमुक्त भारताची संकल्पना फार आवडते, स्वच्छ कारभार हा त्यांचा अजेंडा असून आपल्या प्रतिमेला आजपर्यंत कसलाही डाग त्यांनी लागू दिलेला नाही.

स्वच्छ प्रतिमेचे एक तरुण तडफदार पोलीस अधिकारी म्हणून त्यांची चांगली ओळख जनमानसात आहे, मुंबई क्राईम ब्रँचसाठी दुसऱ्यांदा प्रशासनाने त्यांना पाचारण केले आहे, शासन जिथे पाठवेल तिथे जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची त्यांची नेहमीच तयारी असते. लातूरचे भूमिपुत्र असलेले प्रामाणिक पोलीस अधिकारी निसार तांबोळी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.