Home Blog Page 295

अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधात युवक काँग्रेसने दिले प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन! कारवाई न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हा एक गंभीर मुद्दा झालेला आहे. सरकारी जमिनी, आरक्षित भूखंड, रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागा याठिकाणी प्रभाग अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि भूमाफियांच्या संगनमताने शहरात राजरोसपणे अतिक्रमण केले जात आहे. अशाच प्रकारे मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग १८ मधील मौजे नवघर जूना सर्वे क्र. ४०९, नवीन सर्वे क्र. १६६, हिस्सा क्र. ६A या जागेवरील अनाधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या झोपड्या, भंगार गोडाऊन, ऑटो गॅरेजेसच्या आड अनैतिक व्यवसाय तसेच चरसी गर्दुल्यांचा अड्डा झाला असून अश्या असामाजिक कृतींमुळे परिसरातील महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर जागेवरील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण धारकांकडून सतत घाणीचे साम्राज्य निर्माण करण्यात येते त्यामुळे परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच सदर जागेवरील अनधिकृत भंगारचे गोडाऊन असल्यामुळे येथे आगीच्या दुर्घटना अनेक वेळा घडल्या असल्याने भविष्यात मोठी जीवितहानी होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. येथे मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असल्यामुळे परिसरात प्रदूषणाचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या समस्यांवर महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी म्हणून अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई करून तात्काळ अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी ओवळा-माजिवडा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल काटकर यांनी स्वतः लेखी तक्रार केली तसेच परिसरातील सोसायटी व नागरिकांकडून प्राप्त झालेले तक्रार अर्ज प्रभाग समिती ४ च्या नवनियुक्त विभाग प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त कांचना गायकवाड यांच्याकडे परिसरातील महिलांसमवेत भेट घेऊन निवेदन सुपूर्त केले.

या विषयावर याआधी देखील अनेक वेळा अनेक तक्रारी दाखल करून सुद्धा कारवाई झालेली नाही या बाबत विभाग प्रमुखांना कल्पना दिली त्या अनुषंगाने विषयाचे गांभीर्य लक्षात घेता येत्या दोन दिवसात सदर जागेची पाहणी करून तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रभाग अधिकारी कांचना गायकवाड यांनी दिले आहे.
आता त्यावर किती गांभीर्याने कारवाई केली जाते हे तर येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले तरी जर आता कारवाई झाली नाही तर त्याविरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओवळा-माजिवडा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल काटकर यांनी दिला आहे.

२० मार्च ‘हेड इंज्युरी’ दिनानिमित्त जाणून घ्या डोक्याला इजा होण्यापासून कसा बचाव कराल?

मुंबई, प्रतिनिधी : रस्त्यावरील अपघातात, खेळताना, मारामारीत डोक्याला जखम होऊन मेंदूला मार लागण्याची शक्यता असते. याला ‘हेड इंज्युरी’ असे म्हणतात. डोक्याला दुखापत झाल्यास अनेकदा रूग्णाचा मृत्यू किंवा अपंगत्व येण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याचदा डोक्याला बसणारा फटका हा सौम्य किंवा गंभीर स्वरूपाचा असू शकतो. परंतु, एखाद्या अपघातात मेंदूला इजा पोहोचल्यास अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. कवटीची हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात. या व्यतिरिक्त एपिड्युरल हेमेटोमा आणि सबड्युरल हेमेटोमा म्हणजे कवटीच्या आवरणाखाली रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

लक्षणे – डोक्याला झालेल्या दुखापतीची तीव्रता प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. डोक्याला मार लागलेल्या व्यक्तींमध्ये साधारणपणे ही लक्षणे दिसून येतात.
• डोकेदुखी
• फोटोफोबिया (प्रकाश संवेदनशीलता)
• चक्कर येणं
• मळमळणे
• वारंवार उलट्या होणे
• थकवा जाणवणे
• झोपेच्या पद्धतीत बदल होणे
• अस्पष्ट दृष्टी
• शुद्ध हरपणे

याव्यतिरिक्त डोक्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यास रूग्णाला बोलताना अडचणी येणं, बेशुद्धपणा, चालता न येणं, अशक्तपणा जाणवणे, कोमात जाणे, कानातून द्रव बाहेर येणं, अशी लक्षणं दिसून येतात.

निदान आणि उपचारः-
बऱ्याचदा अनेक लोक डोक्याला किरकोळ इजा झालेली आहे, असे मानून वैदयकीय तपासणी करून घेत नाही. परंतु, डोक्याला मार लागल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्स-रे, सीटी-स्कॅन किंवा एमआरआय करून घेणं गरजेचं आहे. यावरून डोक्याला किती खोलवर दुखापत झाली आहे, याचे अचूक निदान होते. या चाचणी अहवालातून रूग्णाला नेमकं काय उपचार द्यायचे हे डॉक्टर ठरतातत. अनेक प्रकरणांमध्ये जखम झालेल्य जागी टाके मारले जातात. तर काहींना दुखापत झालेल्या भागावर बर्फ लावला जातो. परंतु मेंदूला लागल्याने आत रक्तस्त्राव झाला असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते.

डोक्याचे संरक्षण करण्यासाठी काय करावेतः-
• बाईकवरून प्रवास करताना निमयितपणे हेल्मेट परिधान करा.
• लहान मुलं कोणत्या मैदानात खेळत आहेत, याची माहिती पालकांनी करून घेणं गरजेचं आहे.
• अशक्तपणा जाणवत असल्यास खेळणं टाळावेत
• खराब रस्त्यावर सायकल चालविणे किंवा स्केटिंग करणे टाळा,
• पूल, पार्क किंवा समुद्रकिनाऱ्यावर आखून दिलेल्या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करा. याकडे दुर्लक्ष करणे हानीकरण ठरू शकते.
• गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करा.
• मदयपान करून गाडी चालवू नका, यामुळे अपघात होऊ शकतो आणि डोक्याला दुखापत होण्याची शक्यता अस शकते.
• घरात असणाऱ्या पायऱ्या नेहमी स्वच्छ ठेवा.
• घरातील खिडक्यांना ग्रील बसवून घ्या, जेणेकरून तेथून कोणी खाली पडणार नाही.

लेखक : डॉ. प्रशांत बोराडे, विभागप्रमुख क्रिटिकल केअर युनिट, ग्लोबल रूग्णालय, मुंबई

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा पोलिसांच्या ताब्यात

अवधूत सावंत, प्रतिनिधी (नवी मुंबई) : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विधीसंघर्षित बालकास नवी मुंबईच्या एनआरआय सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी यांची पत्नी आणि दोन मुली स्वामी नारायण यांच्या सत्संगच्या कार्यक्रमास बेलापूर येथे गेले होते. त्यावेळी तेथे एका अनोळखी विधीसंघर्षित बालकाने फिर्यादी यांच्या एका मुलीला तुला कोणीतरी बाहेर बोलवत आहे असे सांगून गोड बोलून तिला सोबत बाहेर नेऊन तिच्या सोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

सदर बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारारीवरून एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून, सदर मुलास बेलापूर परिसरातून ताब्यात घेतले.

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन भेटले होते? सी.सी.टी.व्हीत कैद

अवधूत सावंत, प्रतिनिधी : जगविख्यात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेलं स्कॉर्पिओ वाहन सापडलेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ताब्यात अजून दोन लक्झरी वाहनं जप्त केली आहेत. यामधील एक कार रत्नागिरीमधील शिवसेना नेता विजयकुमार भोसले यांच्या नावावर रजिस्टर आहे. तर दुसरं वाहन मर्सिडीज बेन्झ आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे

तीन दिवसांपूर्वी वाझेंकडून वापरण्यात येत असलेली मर्सिडीज पोलिसांकडून जप्त करण्यात आली. ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसकडे सध्या अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा ताबा आहे.

मे. ठाणे सत्र न्यायालयात एटीएस कडून वाझेंची कोठडी मागितली जाऊ शकते. यादरम्यान एनआयए आणि एटीएस ने सी.सी.टी.व्हीं.ची तपासणी केली असता १७ फेब्रुवारीला मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात फोर्ट मुंबई जीपीओ जवळ मर्सिडीज कारच्या आत १० मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.

मनसुख हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते

आपली स्कॉर्पिओ मुलूंड – ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता. सी.सी.टी.व्ही मध्ये सचिन वाझे आपलं कार्यालय असणाऱ्या मुंबई पोलीस मुख्यालयातून मर्सिडीजमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यानंतर त्यांचं वाहन सी.एस.एम.टी बाहेर सिग्लजवळ उभं असल्याचं दिसलं आहे.

सिग्नल सुरु झाल्यानंतर मर्सिडीज त्याच जागी उभी असते आणि वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचं सी.सी.टी.व्ही त दिसत आहे.
काही मिनिटांनी मनसुख हिरेन रस्ता ओलांडून येतात आणि मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर मर्सिडीज जीपीओच्या समोर उभी असल्याचं दिसत आहे. एनआयए आणि एटीएस ने आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवत ह्या गोष्टींची उकल करून समोर आणल्या आहेत.

पीपीई किट घालून द्यावी लागणार MPSC ची परीक्षा! आयोगाच्या निर्णयानंतर चर्चेला उधाण!

अवधुत सावंत, प्रतिनिधी : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. दरम्यान MPSC ची परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती, मात्र राज्यातील विद्यार्थ्यांनी याबाबत राज्य सरकारचा निषेध करीत आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर २१ मार्च रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरम्यान एक महत्त्वाची मात्र अजब बातमी समोर आली आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव बळावू नये यासाठी विद्यार्थ्यांना बेसिक किट घालून परीक्षा द्यावी लागणार आहे. आयोगाच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दोन किट दिले जाणार आहे. किटमध्ये नेमकं काय असेल या बाबत अद्याप कोणीतही माहिती मिळू शकलेली नाही.