Home Blog Page 297

आयुक्त दिलीप ढोले यांची नियुक्ती नियमबाह्य? पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने झाली नियुक्ती?

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात कोरोनाचा प्रकोप आता पुन्हा दिवसेंदिवस वाढत असताना आताच कुठे जम बसविलेले आणि स्वतः MBBS डॉक्टर देखील असलेले आयुक्त डॉ. विजय राठोड (IAS) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून आता मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर तत्कालीन अतिरीक्त आयुक्त दिलीप ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानेच दिलीप ढोले यांची आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली अशी चर्चा शहरात केली जात असली तरी ही नियुक्ती बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मुळात तांत्रीक दृष्ट्या दिलीप ढोले यांची आयुक्त पदावर नियुक्ती केलीच जाऊ शकत नाही कारण दिनांक १० मे २००४ चा शासन निर्णय क्र.: एमसीओ-१२९५/३३०८/प्र.क्र./१३८/९५/नवि-१४  आणि  दिनांक ४ मे २००६ चा शासन निर्णय क्र.: संकीर्ण-१००५/वर्गीकरण/प्र.क्र.३७९/०५/नवि-२४ नुसार राज्यातील सर्वच ‘ड’ वर्ग महानगरपालिकेवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (भाप्रसे) अथवा मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी यांचीच नियुक्ती केली जाऊ शकते. त्याच प्रमाणे सन 2019 साली मिरा भाईंदर महानगरपालिकेसाठी मंजूर करण्यात आलेला आकृतिबंध त्यामध्ये देखील मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त पद हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अथवा संवर्ग मुख्याधिकारी करिता राखीव करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे शासन नियमानुसार प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची तांत्रिक व लेखा सेवेतील पदावर किंवा तांत्रिक व लेखा सेवेतील अधिकाऱ्याची प्रशासकीय सेवेतील पदावर बादलीने किंवा प्रतिनियुक्तीने नेमणूक करता येणार नाही असा नियम राज्य शासनाने मंजूर केलेला आहे.

दिलीप ढोले हे यापूर्वी उपायुक्त वस्तू व सेवा कर संवर्ग या पदावर कार्यरत होते. त्यानंतर ते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यामानाने तांत्रिकदृष्ट्या दिलीप ढोले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) नाहीत किंवा ते मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी देखील नाहीत आणि म्हणून ते कोणत्याही महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्त पदावर नेमणूक करण्यास पात्र ठरत नाहीत आणि म्हणूनच त्यांची मीरा-भाईंदर महागरपालिकेच्या आयुक्त पदावरील नियुक्ती बेकायदेशीर ठरत आहे.

दिलीप ढोले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर नेमणूक करण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडं घातलं आणि त्यासाठी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणं करण्याची तयारी ही दर्शविली असे बोलले जात आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या दिलीप ढोले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) किंवा मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी नसल्यामुळे यांची सरळ आयुक्त पदावर नियुक्ती करता येणार नाही हे जाणून आधी १९ ऑगस्ट २०२० रोजी त्यांची ‘अतिरिक्त आयुक्त’ पदावर प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात आली आणि त्यानंतर आता डॉ. विजय राठोड यांची तडकाफडकी बदली करून दिनांक ३ मार्च २०२१ रोजी ‘आयुक्त’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आता त्यांच्या नियुक्तीचा विषय वादग्रस्त ठरला आहे.

महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत असताना देखील आयुक्तांचे सर्व कामकाज दिलीप ढोले हेच पाहतात, त्यांच्या मंजुरी शिवाय आयुक्त डॉ. विजय राठोड कोणतेही निर्णय घेत नाहीत अशी चर्चा सुरुवाती पासूनच केली जात होती. आयुक्त डॉ. विजय राठोड स्वतः कोणताही निर्णय घेत नाहीत, प्रत्येक कामाची फाईल आधी दिलीप ढोले यांच्याकडे पाठविली जाते आणि त्यांच्या मंजुरी नंतरच त्या फाईलवर आयुक्त सही करतात असे आरोप केले जात होते. त्यामुळे एका अर्थाने डॉ. विजय राठोड हे फक्त नावापुरते आयुक्त होते परंतु खरे आयुक्त तर दिलीप ढोले हेच आहेत अशी चर्चा सुरुवाती पासूनच केली जात होती आणि आता सरळ आयुक्त पदावर दिलीप ढोले यांची नियुक्ती करण्यात आल्याने या आरोपांना बळ मिळत आहे.

त्यामुळे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असताना डॉक्टर असलेल्या एका भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्याची अचानक बदली करून त्यांच्या ऐवजी आयुक्त पदावर दिलीप ढोले सारख्या अयोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता आयुक्त दिलीप ढोले यांच्या आयुक्त पदाच्या नियुक्तीच्या विरोधात अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस पासून ते थेट राज्यपालांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींवर आता काय कारवाई केली जाते आणि दिलीप ढोले यांचे आयुक्त पद कायम राहते किंवा नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार उद्धवजी? – फडणवीस

अवधूत सावंत, प्रतिनिधी : पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीच्या मुद्य्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ट्विटद्वारे म्हणतात, आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शरजील उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला आणि महाविकासआघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले? मूळ तक्रारीत भादंविचे २९५ (अ) कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम १५३ (अ) जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते.

तसेच, खरे तर एफआयआर २९५ (अ), १५३ (अ) या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’ विरोधात युद्ध पुकारण्यासाठी १२४ (अ) हे कलम सुद्धा लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. असा घणघणाती सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे.

अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी? असा सवाल देखील फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेला आहे.

अरबी समुद्रातील उत्तन येथील खुट्याची वाट याखडकावर दिपस्तंभ कामाचे जल भूमिपूजन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील उत्तन येथील मच्छीमारांसाठी समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या बोटीचे खडकावर आदळून होणारे नुकसान टाळण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनच्या उपलब्ध झालेल्या निधीतून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत दीपस्तंभाच्या कामाचे जलभूमीपूजन प्रार्थनापूर्वक खासदार राजन विचारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला संघटक स्नेहल सावंत, शहर प्रमुख बर्नाड डिमेलो, जयराम मेसे, पप्पू भिसे, उपशहर प्रमुख केशीनाथ पाटील, अशोक मोरे, नगरसेवक एलियस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, स्थानिक मच्छीमार जमातीचे पाटील कलमेड गौर्या, डिक्सन डीमेकर, मॅक्सी नेतोगर, ऑस्कर ग्रेसेस, वासुदेव मयेकर, व इतर शिवसैनिक पदाधिकारी व स्थानिक मच्छिमार उपस्थित होते.

गेल्या १० वर्षापासून खुट्याची वाट या खडकावर दीपस्तंभ उभे रहावे अशी सर्व मच्छिमारांची मागणी होती. उत्तन, पाली, डोंगरी चौक तसेच इतर गावातील मच्छीमाऱ्यांचा मच्छिमारी हा पारंपारिक व्यवसाय असून छोटे मोठे मच्छिमार त्यांचा उदरनिर्वाह या मच्छीमारीवरती करतात. त्यांच्या बोटी भर समुद्रातून किनाऱ्यावर येत असताना या समुद्रातील खडकाळ भाग हा दिसून न आल्याने या खडकावर त्यांची बोट आदळून बोटीचे नुकसान व अनेक मच्छीमारांना आपले प्राण गमवावे लागले होते.

खासदार राजन विचारे यांनी सन २०१८-१९ च्या जिल्हानियोजनामध्ये ९० लाखाचा निधी उपलब्ध करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत दीपस्तंभाच्या कामास जल भूमिपूजन करून कामास सुरुवात करून दिली.
तसेच खासदार राजन विचारे यांनी कातल्याची वाट, वाशी खडक आणि सऱ्याची वाट या तीन खडकांवर दीपस्तंभ लावण्याच्या सूचना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर या उत्तन भातोडी व पातान बंदरावर नव्याने जलभंजक (ब्रेक वॉटर) होणाऱ्या जेट्टीच्या कामाच्या स्थळाची पाहणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत केली व लवकरच या कामाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.

गुंगीचे औषध देऊन मोबाइल चोरी करणारा भामटा अटकेत! आरोपीकडून १३ मोबाइल हस्तगत, लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

अवधूत सावंत, प्रतिनिधी : चहात गुंगीचे औषध टाकून सहप्रवाशाला बेशुद्ध करून मोबाईल चोरी करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १३ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपीचे नाव हमीद खान आहे.

राजस्थानमधील बिकानेर येथील आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी दीपक शर्मा यांनी ९ मार्चला वांद्रे टर्मिनस येथून जाणाऱ्या वांद्रे ते बिकानेर गाडीचे आरक्षण केले होते.

शर्मा चालू तिकीट खिडक्यांच्या समोरील एका हॉलमध्ये बसले असता एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला आणि ‘कहा जाना है’ असे विचारू लागला. तेव्हा आपण राजस्थानला जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले. गाडी येण्यास वेळ असल्याचे सांगत त्या इसमाने शर्मा यांना चहा पिण्याचा आग्रह केला. हॉलबाहेरील चहाच्या दुकानाकडे दोघे गेले आणि तेथे त्यांनी चहा घेतला.
ते दोघेही चहा पिऊन पुन्हा हॉलमध्ये परतले. तेव्हा शर्मा बेशुद्ध पडले होते. तोपर्यंत त्यांच्याजवळील मुद्देमाल त्या इसमाने लंपास करून पोबारा केला.

वांद्रे टर्मिनसवर तैनात असलेल्या पोलिसांना शर्मा बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसताच त्यांना तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल केले. काही वेळाने शुद्धीवर आलेल्या शर्मा यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी स्थानकातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासले आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कुर्ला येथे राहणाऱ्या हमीद खानला पकडले.

त्याच्याकडे २ लाख ८ हजार रुपये किमतीचे १३ मोबाइल आणि अन्य मुद्देमाल सापडला. गुंगीच्या २० गोळ्या आणि पाच ते दहा गोळ्यांची पावडरही सापडली व पुढील तपास सुरू आहे..

शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली दहिसरमध्ये 500 माथाडी कामगारांचा शिवसेनेत प्रवेश

 

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी : कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सदैव आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. बोरिवली- दहिसरमधील 500 माथाडी कामगारांनी काल शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना घोसाळकर यांनी उपस्थितांचे शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले.

शिवसेना कधीही जात- धर्म- पंथ मानत नाही. सर्व धर्मियांना- समाजातील सर्वांना सोबत घेऊन जाणारा एकमेव पक्ष शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना ही शिकवण दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कामगारांवर जिथे-जिथे अन्याय होईल तेव्हा शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान महिन्याभरापूर्वी आपण कामगारांच्या विविध प्रश्‍नांबाबत विनोद घोसाळकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तातडीने याप्रकरणी पावले उचलत कामगारांना न्याय मिळवून दिल्याचे कामगार नेते इकबाल पटेल यांनी सांगितले.

याप्रसंगी उपस्थित परवेझ शेख, नौशाद शेख, अहमद शेख, सलमान उस्मानी व सलीम शेख यांनी आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, विधानसभा संघटक कर्णा अमीन, माजी नगरसेवक मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर सहित मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.