Home Blog Page 301

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहातांच्या ७११ क्लब प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या सह फसवणूक व बनावटगिरीची कलमं लावली! मेहतांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदराचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे असलेले मिरारोड येथील वादग्रस्त ७११ क्लबच्या गुन्ह्याचा तपास तक्रारीं नंतर स्थानिक पोलिसां कडून काढून घेत तो मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिल्या नंतर आता तपास वेगाने होऊ लागला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सदर गुन्ह्यात आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या सह फसवणूक, बनावटगीरीची कलमे वाढविली आहेत. त्यामुळे मेहतांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

मीरारोडच्या कनकीया भागात ना-विकास क्षेत्रात कांदळवन व पाणथळ नष्ट करून कांदळवन पासूनच्या ५० मीटर बफर झोन क्षेत्रात तसेच सीआरझेड चे उल्लंघन करून ७११ क्लब व तारांकित हॉटेल उभारण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. २०१० पासून पर्यावरण संरक्षण आणि एमआरटीपी अंतर्गत अनेक गुन्हे सदर जागेत दाखल आहेत. तसे असताना पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीचे सर्रास उल्लंघन करून मेहतांच्या सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीला नियमबाह्य परवानग्या देण्यात आल्या.

अनोंदणीकृत मुखत्यारपत्राच्या आधारे बांधकाम परवानग्या देतानाच येथे कोणताच राष्ट्रीय वा राज्य महामार्ग नसताना देखील १ अतिरिक्त चटईक्षेत्र देण्यात आले. ३० मीटर रुंद रस्त्या पासून ३० मीटर खोली पर्यंतच रहिवास वापर करता येत असला तरी तेथे केवळ स्टील्ट सहित तळ अधिक १ मजल्याचीच इमारत बांधता येत असताना येथे मात्र तळघर, तळ अधिक ४ मजली इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे राज्याच्या नगररचना विभागाचे संचालक यांनी दोन वेळा सदर जागेतील प्रस्ताव हे नामंजूर केलेले आहेत. मीरा भाईंदरसह मुंबई उपनगर भागात वीज पुरवठा करणाऱ्या २२० केव्ही अश्या अति उच्च दाबाच्या केबल व टॉवर खाली बांधकाम करत निर्देशांचे उल्लंघन केले आदी तक्रारी आहेत. तसे असताना सुद्धा पालिकेने आमदार – नगरसेवक असलेल्या मेहतांच्या कंपनीस बांधकाम परवानगी आणि भोगवटा दाखला दिला. इतकेच नव्हे तर आणखी १ अतिरिक्त चटईक्षेत्र देता यावे म्हणून येथील झोन बदलण्याचा ठराव महासभेत केला गेला.

त्यातच गेल्या महिन्यात मंजूर केलेल्या नकाशा पेक्षा सुद्धा सीआरझेड व अन्य क्षेत्रात बेकायदेशीर वाढीव अनधिकृत बांधकाम केले म्हणून पालिकेच्या नगररचना विभागानेच प्रभाग समिती क्रमांक ४ च्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांना पत्र व नकाशा देऊन कार्यवाही करण्यास कळवले आहे,

सप्टेंबर २०१९ मध्ये मीरारोड पोलीस ठाण्यात मेहतांसह तत्कालीन पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, महापालिकेचे संबंधित अधिकारी व सेव्हन इलेव्हन हॉटेल्सचे भागधारक, संचालक आदींवर गुन्हा दाखल झाला. सदर तपास सध्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले याना देण्यात आला. परंतु भोसले यांनी सुमारे सव्वा वर्ष तपास तर काटेकोरपणे केला नाहीच शिवाय आवश्यक ती कायद्याची कलमे सुद्धा लावली नाहीत त्यामुळे भोसलें विरुद्ध देखील तक्रारी झाल्या आहेत .

अखेर जानेवारी मध्ये शासनाने सदर गुन्ह्याचा तपास भोसलें कडून काढून घेत आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला. शाखेचे उपायुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक मंदार लाड व पथकाने वेगाने तपास सुरु केला. आणि आता आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक, बनावटगिरीची कलमे लावली आहेत. या मुळे मेहतांसह आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान स्थानिक पोलिसां कडून गुन्हा काढून घेत तो मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखे कडे दिल्याने मेहता सह प्रशांत केळुस्कर, संजय सुर्वे आदींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु तेथून अजून तरी त्यांना कोणाला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात माजी आमदार नरेंद्र मेहतासह त्यांना या ७११ क्लबच्या कारस्थानात मदत करणारे संबंधित सर्व विभागाचे अधिकारी यांच्या अडचणीत वाढ होणार हे मात्र नक्की!

झाडांच्या संरक्षणाच्या बाबतीत मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन उदासीन; जुन्या झाडांभोवती डेब्रिज टाकून मारले जात आहे.

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनाच्या बाबतीत नेहमीच उदासीन राहिलेले आहे. शहरातील अनेक ठिकाणी मातीचा भराव आणि डेब्रिज टाकून अनेक मोठ्या झाडांना मारून टाकले जात असून महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

अशाच प्रकारे भाईंदर पश्चिमेकडील चंदूलाल वाडी, क्रॉस गार्डन समोर असलेल्या हजारो लोकांना ऑक्सिजनचे जीवनदान देणाऱ्या जुन्या भल्या मोठ्या उंबराच्या झाडाला त्याच्या बुंध्याशी माती आणि डेब्रिज टाकून हळूहळू मारले जात आहे.

भाईंदर पश्चिमेकडील चांदूलाल पार्क समोर क्रॉस गार्डन या ठिकाणी मुख्य रस्त्यावर उंबराचे भलेमोठे झाड आहे. शनिवारी सकाळी मोटारसायकलने या रस्त्यावरून जात असताना झाडाखाली आल्यावर या झाडाची एक मोठी फांदी तुटून पाटडिया कॉम्प्लेक्सच्या समोर असलेल्या झोपडपट्टीत राहणारे रामविलास प्रजापती (४१) यांच्या डोक्यात पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला.

झड्याच्या बुंध्या भोवती डेब्रिसचा बेकायदेशीर भराव करून हे मजबूत असलेले उंबराचे झाड कमकुवत केले गेले आहे. झाड कमकुवत झाल्याने फांदी तुटून खालून जाणाऱ्या दोन नागरिकांवर पडली त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला अशी ही दुर्दैवी दुर्घटना घडली.

या प्रकरणी सदर जागा मालक व डेब्रिस टाकणारे यांच्यावर नागरी झाडांचे जतन अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आता केली जात आहे.

सदर झाडा सभोवताली असलेले डेब्रिस त्वरित काढून घेऊन या झाडाला जीवनदान देण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे शहरातील अन्य झाडांच्या सभोवताली अशाच प्रकारे टाकण्यात येत असलेल्या डेब्रिस, भराव काढून घेण्याची मोहीम महानगरपालिके तर्फे तातडीने हाती घेण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून केली जात आहे जेणे करून झाडांचे संवर्धन, संरक्षण करता येईल.

चोर समजून जमावाने केली दोन युवकांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू तर एक गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: भाईंदर पूर्वेकडील नवघर गाव येथे इंदिरा नगर मध्ये काल रात्री दोन युवकांना जमावाने बेदम मारहाण केली या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पहाटे 5 च्या सुमारास दोन युवक संशयास्पद अवस्थेत इंदिरानगर परिसरात फिरत असल्याचे दिसून आल्याने या युवकांना पाहून जमाव एकत्रित झाला आणि जमावाने या युवकांना चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण इतक्या अमानुषपणे करण्यात आली की त्यापैकी एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक हा अत्यंत गंभीर अवस्थेत होता.

दोन युवक निपचित अवस्थेत पडलेले दिसल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांनी नवघर पोलिस ठाण्याला कळवले असता नवघर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दोन्ही युवकांना रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी एका युवकाला मृत घोषित करण्यात आले तर दुसऱ्या युवकाचे उपचार भाईंदर पश्चिमेकडील टेंबा रुग्णालयात केले जात आहेत.

या प्रकरणात नवघर पोलीसांनी आता पर्यंत चार लोकांना ताब्यात घेतले असून हे दोन युवक कोण होते? ते इंदिरा नगर परिसरात का फिरत होते? त्याचा पुढील तपास नवघर पोलिसांकडून केला जात आहे.

कल्याण डोंबिवली मनपा ची कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी जंतुनाशक व धूर फवारणी

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

संपूर्ण राज्यात आणि डोंबिवली कल्याणात महाभयंकर कोरोना साथीचा संसर्ग वाढत चालला असताना रुग्ण संख्येत दिवसाकाठी वाढ होत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिके तर्फे सुरक्षा उपाय योजना म्हणून जंतुनाशक आणि धुर फवारणी मोहिम कल्याण डोंबिवली शहरात राबविण्यात येत आहे.

पालिकेचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, कल्याण डोंबिवली शहरात विशेष मोहिम ६ आणि ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून, घनकचरा व्यवस्थापक उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रभागात कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.

डोंबिवली येथील `फ` आणि `ग` प्रभाग क्षेत्रात मोहीम राबविण्यात आली. यावेळी पालिकेचे मुख्य आरोग्य निरिक्षक नरेंद्र धोत्रे, वसंत देगलूरकर, शेकडो कर्मचारी ११ सिटी ट्रक्टर्स, ४ जिप फॉग मशीन, तसेच दहा प्रभागातील हँड फॉग मशीन द्वारे जंतुनाशक फवारणी आणि धुरावणी करण्यात आली.

कल्याण मधील महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत १४ लाख ८४ हजार १०० रुपये किमतीचा १०० किलो गांजा जप्त

प्रतिनिधी : अवधुत सावंत (डोंबिवली)

कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सापळा रचून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या विजयकुमार पटेल याला अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ८४ हजार १०० रुपयांचा १०० किलो वजनाच्या गांजासह मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली जीप असा एकूण १८,०३,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कल्याण सत्र न्यायालयात आरोपीस हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बिर्ला कॉलेज रोडवर इंदिरा नगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर एक जण अंमली पदार्थांचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून विजयकुमार पटेल याला पकडून गजाआड केले व एव्हढा गांजा कुठून आणला व कोणाला विकणार होता याची पुढील चौकशी सुरू आहे.