Home Blog Page 300

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नेमणुकीस असल्याचे सांगणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

मिलन शाह, निगडी, पुणे : विनामास्क फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अडवले आणि दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावर त्या बहाद्दराने आपण इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) दिल्लीमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यानंतर मात्र त्याची बोबडी वळली आणि तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले आणि तो तोतया आयबी पोलीस असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर निगडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

प्रतीक सुनील भावसार (वय २५, रा. वाकड) असे तोतया आयबी पोलिसाचे नाव आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार सोपान बोधवड यांना एक तरुण दुचाकीवरून (एम एच 12 / एम एस 3035) विनामास्क आल्याचे दिसले.

बोधवड यांनी तरुणाला थांबवले आणि मास्क न वापरल्या बद्दल ५०० रुपये दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावर तरुणाने आपण आयबी दिल्ली मध्ये कार्यरत असल्याचे सरळसोटपणे सांगितले.

बोधवड यांनी तरुणाकडे ओळखपत्र मागितले असता त्याने आयबीमध्ये कार्यरत असल्याने ओळखपत्र दाखवून ओळख सांगता येत नसल्याचे सांगितले. त्याचा संशय आल्याने बोधवड यांनी वरिष्ठांना माहिती दिली.

वरिष्ठांनी थेट आयबीमध्ये संपर्क करून संबंधित तरुणाची माहिती काढली. मात्र, असा कोणताही तरुण आयबीमध्ये कार्यरत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

मूत्रपिंड विकार असलेल्यांनी उत्तम आयुष्य कसे जगावे..???

World Kidney Day

सध्या देशात अनेक लोक मूत्रपिंड विकारासह आयुष्य जगताना दिसून येत आहेत. या आजारांबद्दल लोकांमध्ये फारशी माहिती नसल्याने या आजाराकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. वेळीच निदान व उपचार न झाल्यास मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता अधिक असते. मूत्रपिंड निकामी झाल्यास मृत्यू अटळ आहे, असे मानून अनेक जण धास्तावतात. परंतु, मूत्रपिंड विकार म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो. जीवनशैलीत योग्य तो बदल केल्यास मूत्रपिंडाने त्रस्त असणारे रूग्ण निरोगी आयुष्य जगू शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतायेत.

मूत्रपिंड हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर काढून टाकण्याचे कार्य मूत्रपिंड करते. निरोगी आयुष्य जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्यपद्धतीने होणं गरजेचं आहे. परंतु, योग्यरित्या काळजी न घेतल्यास मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते. मूत्रपिंड दररोज १८० लीटर इतके रक्त शुद्ध करते. त्यातून दोन लीटर मूत्र दररोज तयार होते. रक्तशुद्धीकरणासह मूत्रपिंड शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्याचेही काम करते. रक्तदाब नियंत्रणात राहतो, शरीरातील हाडे मजबूत राहतात आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीलाही मदत मिळते.

मूत्रपिंडाचा विकार असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे मूत्रपिंडाचा विकार लवकर लक्षातच येत नाही. हळूहळू थकवा येणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, रात्री लघवीला जाण्यासाठी उठावे लागणे, सारखे लघवीला जावे लागणे अशी लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येता. पण या आजाराबद्दल माहिती नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वेळीच निदान न आल्याने आजार बळावतो.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मूत्रपिंडाच्या आजाराने पिडित अनेक रूग्णांना वर्षांनुवर्ष औषध आणि डायलिसिस वर राहावे लागते. यातील अनेक रूग्णांना मानसिक दडपणही येतं. परंतु, जीवनशैलीत आवश्यक बदल केल्यास हे रूग्ण निरोगी आयुष्य जगू शकतात.

तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार असेल तर कसे जगायचे ते जाणून घ्या…

1. निरोगी आहार घ्या – मूत्रपिंडाच्या समस्येमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडू शकते. यामुळे मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. रक्तदाब व मधुमेही रूग्णांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ताजी फळे, भाज्या आणि बटाटे आणि संपूर्ण धान्य यासारख्या पदार्थांचे आहारात समावेश करा. नियमित आहारात सोयाबीन, डाळी, मासे आणि अंडी समाविष्ठ करा. जेवणात मीठाचा वापर कमी करा. मसालेदार, तेलकट आणि जंक फूड खाऊ नये. मूत्रपिंडाची समस्या असल्यास द्रवपदार्थाचे अधिकाधिक सेवन करा.

2. शारीरिक स्वास्थ्य राखा – मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रूग्णांनी शारीरिक स्वास्थ्यसाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा. याशिवाय तुम्ही फिजिओथेरपिस्टचाही सल्ला घेऊ शकता.

3. मद्यपान आणि धूम्रपानाचे सेवन करणे टाळा – धुम्रपानाच्या सेवनामुळे फुफ्फुसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे धुम्रपानाचे सेवन करणं शक्यतो टाळावे. त्याचप्रमाणे दारूचे अतिरिक्त व्यसनही आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते.

4. नियमित पाठपुरावा करा – आपल्या शरीरात होणारे बदल लक्षात घ्या. काही लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधांसंदर्भात कुठलीही शंका असल्यास डॉक्टरांशी चर्चा करा. नियमितपणे रक्तातील साखरेची मात्रा तपासून घ्या.

5. कुटुंबियांशी आपल्या स्थितीबद्दल बोला – स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवू नका. आपल्या आरोग्याच्या स्थितीबद्दल कुटुंबियांशी मनमोकळेपणे बोला. मूत्रपिंडाने त्रस्त असणाऱ्या इतर लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. याशिवाय मनातील भिती घालवण्यासाठी समुपदेशनसाठी मानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घेऊ शकता.

लेखक : डॉ. महेश प्रसाद, सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट, वोक्हार्ट रूग्णालय मीरारोड

गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या इसमांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे – तेलंगना राज्य येथून १२ किलो गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना अटक करण्यात ठाण्याच्या गुन्हे शाखा, घटक – १ यांना यश आले आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, एक इसम कॅसलमील नाका, अभिरुची बस स्टॉप, ठाणे येथे गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक – १ यांना मिळाली.

सदर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ११.९५० किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला.

सदर प्रकरणी त्यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास सुरू आहे.

कल्याण डोंबिवलीत वाढला कोरोनाचा कहर! उद्यापासून कठोर निर्बंध लागू!

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर पुन्हा वाढला असून पालिका प्रशासनाकडून कठोर निर्बंध उद्यापासून (दि. 11 मार्च) जाहीर करण्यात आले. यामध्ये दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळेसह लग्न व हळदी समारंभांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर पुन्हा वाढला असून पालिका प्रशासनाकडून कठोर निर्बंध उद्यापासून (दि. 11 मार्च) जाहीर करण्यात आले. यामध्ये दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळेसह लग्न व हळदी समारंभांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तर हे टाळेबंदी नसून निर्बंध लागू करण्यात आल्याचेही यावेळी पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले

पालिकेसह पोलीस प्रशासनही उद्यापासून सज्ज.

कल्याण डोंबिवलीमध्ये आज (दि. 10 मार्च) कोरोनाग्रस्तांचा आकडा आला व सर्वच प्रशासकीय यंत्रणांची धावपळ उडाली. आज कल्याण डोंबिवलीमध्ये 392 नवे कोरोनाग्रस्त आढळले. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजेच 5 महिन्यांनंतर येथील कोविड रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉक्टर, आयुर्वेदिक, होमिओपॅथी असोसिएशन, महापालिका प्रभाग अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली. यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी करायच्या उपायांवर चर्चा करत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद

उद्या असणाऱ्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील सर्व शिव मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार. केवळ पूजा करण्यासाठी ही मंदिरे उघडली जाणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच होम आयसोलेशनमध्ये (गृह विलगीकरणात) असणारे कोविड रुग्ण सर्रासपणे फिरत असल्याचे आढळून आले असून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवावे. असे रुग्ण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये उद्यापासून हे असतील निर्बंध..

अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंतच सुरू ठेवणे.शनिवार आणि रविवारी पी1-पी2 नूसार दुकाने सुरू ठेवणे.खाद्यपदार्थ आणि इतर हातगाड्या संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी असेल. हॉटेल्स-रेस्टॉरंट-बार रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवणे. पोळीभाजी केंद्र 9 वाजेपर्यंत सुरू राहणार.पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार.भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवणार.लग्न- हळदी समारंभात 50 पेक्षा अधिक लोकं नकोत, जास्त लोकं असल्यास गुन्हे दाखल होणार.लग्न हळदी समारंभ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी, मास्क घातलेच पाहिजेत.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन झाल्यास वधू आणि वराच्या पित्यासह हॉल व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई! नेपाळी चरस तस्कर अटकेत; त्याच्याकडून १४ किलो चरस जप्त

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कांदिवलीच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाला एक नेपाळी गॅंग नेपाळहून मुंबईमध्ये चरस ची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने नॅशनल पार्कजवळ नानासाहेब धर्माधिकारी चौक येथे सापळा रचला.

काही वेळातच या गॅंग चा एक सदस्य तिथे आला असता त्याला अटकाव करून दोन पंचासमक्ष पंचनाम्या अंतर्गत त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत एकूण १४ किलो ५६ ग्राम चरस हा अंमली पदार्थ आढळून आला.

हा चरस चा साठा त्याने नेपाळहून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या मालासहित सदर इसमाला अटक करण्यात आली असून अमली पदार्थ कक्षाची पुढील चौकशी व तपास सुरू आहे.