Home Blog Page 303

पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी जबाबदार! – गृहमंत्री अनिल देशमुख

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल, तेथील संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले.

आमदार रवींद्र फाटक, महादेव जानकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यात ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असेल, त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ठाणे जिल्ह्य़ात अमली पदार्थविरोधी पथकाने ११ ठिकाणी छापे टाकून ४२ लोकांवर कारवाई केली आहे.
वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व करोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार मिरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या मिरारोडच्या1कानांकिया परिसरात सुरू असलेल्या शिशा लॉंज या हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक दत्ता लोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकून एकूण 11 ग्राहक, 06 काम करणारे यांना अटक करण्यात आली आहे तर 14 हुक्का जप्त केले आहेत.

हुक्का पार्लरवर कारवाई केली जात असली तरी महामार्गावर असलेल्या हॉटेल्समध्ये आणि शहरातील अनेक मोठ्या गिफ्ट शॉप, जनरल स्टोअर्स शा दुकानातून पेन हुक्का, इलेक्ट्रिक हुक्का व हुक्क्याचे साहित्य सर्रासपणे विक्रीसाठी ठेवले जात असून ते सामान्य जनते सोबतच अल्पवयीन मुलांना सहज उपलब्ध होत आहे त्यावर देखील पोलीस कारवाई करणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम गजाआड

प्रतिनिधी: अवधुत सावंत

एका ३२ वर्षीय लिंगपिसाट नराधमाने शेजारीच राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

शिकवणीवरून घरी परत येत असताना घडला प्रकार…

शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडिता आपल्या कुटुंबासह राहत असून ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर तिच्या शेजारीच लिंगपिसाट नराधम राहत असल्याने त्याची आधीपासूनच ओळख होती. त्यातच काल दुपारच्या सुमाराला पीडित मुलगी एका खाजगी शिकवणीतून घरी जात होती. त्यावेळी तिला रस्त्यात गाठून या नराधमाने ओळखीचा फायदा घेत, तिला दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या घटनेनंतर नराधम फरार झाला होता. तर पीडित मुलगी कशीबशी आपल्या घरी पोहोचून घरच्यांना तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगताच घरच्यांना धक्काच बसला होता. घरच्यांनी तिला घेऊन शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली व त्या लिंगपिसाट नराधमावर गुन्हा दाखल केला.

नराधमाला चार दिवसाची पोलीस कोठडी…

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जलदगतीने तपास करून काही तासातच त्या नराधमाला ताब्यात घेऊन त्याला अटक केली. तर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

बेधुंद होऊन बारबालासोबत पोलीस कर्मचाऱ्याचा नृत्याविष्कार; व्हिडीओ व्हायरल!

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने सर्वचच शासकीय यंत्रणा सज्ज होऊन आपआपल्या परीने महाभयंकर कोरोनाला आळा घालण्यासाठी दिवसरात्र एक करीत आहेत. त्यातच उल्हासनगर पोलीस परिमंडळच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र कायदा व नियम धाब्यावर बसवुन ऑर्केष्ट्राच्या नावाखाली डान्सबारमध्ये छमछम सुरु असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे एक पोलीस कर्मचारीच छमछम बार मधील नृत्यावर एका बारबालासोबत बेधुंद होऊन आपल्या नृत्य कलाविष्कार सादर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. वैजनाथ राख असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

छमछम’ला कोणाचा आर्शिवाद ?

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या डान्सबार विरोधात अनेक संघटना व समाजसेवकांनी तक्रारी करुनही या डान्सबारवर पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप होत असतानाच, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत पेट्रोलियम समोरील “राखी बार” मध्ये ऑर्केष्ट्राच्या नावाखाली छमछम रात्री उशिरापर्यत सुरु असते. याच बारमध्ये वैजनाथ राख हा पोलीस कर्मचारी जेव्हा एका बारबाला बरोबर बेधुंद होऊन तिचा हात हातात घेऊन तिला गोल फिरवत “जब में आई सुहागवाली रात में उसने चुमेशी किया सुरुवात रे” व “आई लव यु प्यार करु छु” या गाण्यावर नृत्य सादर करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कोणाच्या आशिर्वादाने हा डान्सबार सुरु आहेत याचा छडा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लावल्याची मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.

रेशनिंग दुकानातील मागील बाजूस दारू पिऊन झालेल्या वादातून ३० वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या!

प्रतिनिधी: अवधुत सावंत (कल्याण)

कल्याणात ७० वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून झालेल्या हत्येला २४ तास उलटत नाही तोच डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील असणाऱ्या लोढा हेवन परिसरात रेशनिंग दुकानातील मागील बाजूस दारू पिऊन झालेल्या वादातून एका ३० वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात घडली आहे. लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे शहरात मात्र एकचं खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की श्वेता गुप्ता (३०) असं मयत महिलेचं नाव असून श्वेता गुप्ता आणि तिचा पती राजेश गुप्ता हे डोंबिवलीतील लोढा हेवन येथील भवानी चौक परिसरात गेले दहा वर्ष रेशनिंग चं दुकान भाडेतत्वावर चालवत होते.

काल रात्रीच्या सुमारास याच रेशनिंग दुकानातील मागील बाजूस राजेश गुप्ता, त्याची पत्नी श्वेता गुप्ता व त्यांच्या दुकानामध्ये काम करणारा कामगार गुडीकुमार श्रीराम इकबाल सिंग हे तिघेही दारू पित बसले होते. यावेळी श्वेता हिने आपल्या प्रियकराचे नाव घेतल्याने पती राजेश गुप्ता हा रागावून बाहेर निघून गेला. याच दरम्यान कामगार गुडीकुमार श्रीराम इकबाल सिंग याचा श्वेता गुप्ता हिच्याशी वाद झाला व त्याने श्वेताची गळ्यावर वार करत तिची हत्या केली.

पती राजेश याने मानपाडा पोलीस यांना तक्रार दिल्यावर मानपाडा पोलीस यांनी तक्रारीनुसार गुडीकुमार श्रीराम इकबाल सिंग या कामगाराला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू असल्याचे परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त श्री.विवेक पानसरे यांनी मिडियाला सांगितले.

ऑन ड्युटी पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांना न्यायालयीन कोठडीची हवा

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

मास्क विना फिरणाऱ्या बेपरवाह नागरिकांवर कारवाई करणाऱ्या ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा फैलाव पुन्हा दुप्पटीने होत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पुन्हा रस्त्यावर विना मास्क बेपरवाह फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. त्यातच ऑन ड्युटी वर असताना मास्क बाबत एका तरुणाला विचारणा करणाऱ्या पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करून धक्काबुकी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं-4 परिसरातील श्रीराम चौकात घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघा भावांना अटक केली गेली आहे. आशिष व आकाश त्रिपाठी (रा. प्रभुरामनगर कोळसेवाडी) असे ऑन ड्युटी पोलिसाला शिवीगाळ करून धक्कबुकी करणाऱ्या आरोपी भावांची नावे आहेत.

दोघांचीही कारागृहात रवानगी…

जिल्ह्यातील विविध शहरात कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य चौकांसह अन्य ठिकाणी स्थानिक महापालिका पथक व पोलीस कर्मचारी विना मास्क बेपरवाह फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. अशाच एक कारवाई दरम्यान उल्हासनगरमधील कॅम्प नं-4 येथील श्रीराम चौकात विना मास्क फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी हटकले. यामुळे तो तरुण संतप्त होऊन पोलिसाला जाब विचारण्यासाठी घरी जाऊन भावाला घेऊन आला. दोघा भावांनी त्या ऑन ड्युटी पोलिसाला विना मास्क जाताना का हटकले ? याचा जाब विचारून त्या पोलिसाला भर भरस्त्यातच शिवीगाळ केली.

याप्रकारचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी शिवीगाळ करणाऱ्या आशिष व आकाश त्रिपाठी या दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलीस व महापालिका पथकाने नागरिकां सोबत उद्धटपणाणे वागण्या ऐवजी सहानुभूतीपूर्वक वागावे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.