Home Blog Page 307

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे डोंबिवली येथील पाटीदार भवन हे कोविड केअर सेंटर पुर्ववत सुरू करा – राजेश कदम

अवधूत सावंत, डोंबिवली, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे डोंबिवली येथील पाटीदार भवन हे कोविड केअर सेंटर पुर्ववत सुरू करणे बाबत माननीय आयुक्तांना नुकतेच मनसे तुन शिवसेनेत प्रवेश केलेले शिवसैनिक राजेश कदम यांनी मागणी केली आहे सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून डोंबिवलीतील सावळाराम क्रिडा संकुल येथे सुरू असलेले कोविड केअर सेंटर हे पूर्ण क्षमतेने रुग्णांनी भरून गेलेले आहे त्यामुळे डोंबिवलीतील रुग्णांना सध्या कल्याणला वर्ग करावे लागते मधल्या काळात कोरोना रुग्णांचा आकडा कमी आल्यामुळे हळूहळू महानगरपालिकेचे इतर कोविड सेंटर हे बंद करण्यासाठी घेतले होते त्या अनुषंगाने पाटीदार भवन येथे सुरू असलेले कोविड केअर सेंटर हे सुद्धा जवळजवळ बंद करण्यात आले होते परंतु आता रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सदर पाटीदार भवन कोविड केअर सेंटर हे पूर्ववत सुरु करावे अशी मागणी शिवसेनेकडून होते आहे.

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकास धावती भेट! रेल्वेच्या आणि महापालिका अधिकाऱ्यांना केल्या सूचना!

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : खासदार राजन विचारे यांनी रात्री उशिरा भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर मीरा भाईंदर महानगरपालिका मार्फत सुरु असलेल्या प्रवेशद्वाराच्या कामाची पाहणी रेल्वे व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, आमदार गीता जैन तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, सुरेश वाकोडे तसेच पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल इंजीनियर राजेश अग्रवाल, इस्टेट विभागाचे सीनियर डिव्हिजनल इंजीनियर सुधीर दुबे, ब्रिज प्रकल्पाचे डिव्हिजनल इंजीनियर अनुप अवस्थी, इलेक्ट्रिकल सीनियर डिव्हिजनल इंजीनियर मोहन पपनोई, चीफ कमर्शिअल इंजिनियर मनोज मिश्रा, आरपीएफ शिंदे त्याचबरोबर एम आर व्ही सी चे जॉईंट एम डी कन्हैया शहा व इतर अधिकारी व उपशहर प्रमुख पप्पू भिसे, छगन चव्हाण व इतर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी भाईंदर पश्‍चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर महानगरपालिकेचे सुरु असलेल्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. खासदार विचारे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना व महापालिका अधिकाऱ्यांना हायकोर्टाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी २ मिनिटात रेल्वे स्थानकाबाहेर पडली पाहिजे. त्यामुळे स्थानका बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे असावे याची आठवण करून दिली. तसेच या सुरू झालेल्या कामाचे रेल्वे, महानगरपालिका व वाहतूक शाखा यांनी एकत्र बसून रिक्षा स्टॅन्डची जागा निश्चित करून नियोजनबद्ध सुधारित आराखडा तयार करावा मगच काम सुरु करावे. खा. विचारे यांनी स्थानकाबाहेर वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच स्थानकाबाहेरील फेरीवाले रोखण्यासाठी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस स्टेशन च्या मदतीने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या कामासाठी राज्य शासनाचे विशेष अनुदान निधीतून 2 कोटी व महानगरपालिका निधीतून 6 कोटी असे एकूण 8 कोटी खर्च होणार आहे. त्यासाठी रेल्वेने पश्चिम रेल्वे कडून मंजूर झालेले पूर्व व पश्चिमेस सुरु असलेली लिफ्ट व सरकत्या जिन्यांचे काम सुरु करण्याचे आदेश रेल्वेला दिले आहेत. तसेच अतिरिक्त वाढणाऱ्या लिफ्ट व सरकत्या जिन्यांचे काम महापालिकेने रेल्वेमार्फत करून घ्यावे असे निर्देश यावेळी देण्यात आले.

छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करणाऱ्या दिनेश जैनला स्थायी समिती सभापती पदाचे बक्षीस?

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील घोडबंदर रोड येथे शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य ३० फूट उंचीच्या पुतळा उभारणीच्या कामाच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत विरोध करणाऱ्या भाजपा नगरसेवक दिनेश जैन यांना स्थायी समिती सभापती पदाची भाजपा कडून बक्षिसी देण्यात आल्याची चर्चा शहरात केली जात असून अनेक राजकीय नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिनेश जैन हे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक असून आज स्थायी समितीच्या निवडणुकीत त्यांची सभापती पदी निवड करण्यात आली आहे.

गेल्या सोमवारी 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत घोडबंदर ते जेसल पार्क या 60 मीटर रस्त्याच्या चौकात राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 येथे शहराच्या प्रवेशद्वारावर 2 कोटी 95 रुपये खर्च करून ब्राँझ धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा 30 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याची निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता परंतु भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य दिनेश जैन यांनी कोणतेही कारण नसताना सुधारित निविदा सादर करावी असा ठराव मांडून या प्रस्तावाला विरोध केला आणि सत्ताधारी भाजपने बहुमताने सदर निविदा मंजुरीचा प्रस्ताव रद्द केला.

भाजप नगरसेवक दिनेश जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला विरोध केल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति आदर हे फक्त निवडणुकी पुरते दिखाऊ असते मुळात भाजपच्या नेत्यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल अजिबात आदर नाही त्यासाठी आता शहरातील जनताच त्यांना योग्य उत्तर देईल दिनेश जैन यांनी आपल्या टक्केवारीसाठीच या प्रस्तावाला विरोध केला आहे अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली आहे.

28 फेब्रुवारी रोजी तत्कालीन सभापती अशोक तिवारी यांचा एक वर्षाचा कालावधी संपणार असून नवीन सभापती पदासाठी भाजप तर्फे दिनेश जैन, राकेश शहा आणि सुरेश खंडेलवाल यांना उमेदवारी देण्यात आली होती तर शिवसेने तर्फे कमलेश भोईर एकमेव उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे भाजप विरुद्ध भाजप अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपचे संख्याबळ पाहता स्थायी समितीचा सभापती त्यांचाच होणार हे जवळपास निश्चित असले तरी सद्ध्या भाजप मध्ये दोन गट सक्रिय असून भाजपच्या निष्ठावंतांचा ए ग्रुप आणि माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांचा बी ग्रुप झालेले आहेत. नरेंद्र मेहता गटाचे राकेश शहा आणि दिनेश जैन हे दोन उमेदवार स्थायी समितीच्या सभापती पदासाठी उमेदवार होते तर त्यांच्या विरोधी बी गटातील सुरेश खंडेलवाल हे देखील सभापती पदाच्या शर्यतीत उतरले होते.

नरेंद्र मेहातांच्या विरोधी गटातील भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आणि रवी व्यास यांनी सुरेश खंडेलवाल यांना स्थायी समितीच्या सभापती पदासाठी आपला उमेदवार घोषित केल्याने बहुमताने सुरेश खंडेलवाल यांची निवड होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती आणि त्या निमित्ताने भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे सोबतच विरोधी गटाचे नेतृत्व करणारे रवी व्यास यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाची हीच खरी कसोटी लागणार होती परंतु नरेंद्र मेहता गटाचे दिनेश जैन यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याने रवी व्यास आणि हेमंत म्हात्रे यांना एक प्रकारे मोठा धक्काच बसला असल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तूळात केली जात आहे.

स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत माजी आमदार नरेंद्र मेहता गटाची पुन्हा एकदा सरशी झाली असून मीरा-भाईंदर शहरात भारतीय जनता पक्षावर अजूनही नरेंद्र मेहता यांचेच वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करून दिनेश जैन यांनी निविदेचा प्रस्ताव रद्द केला आणि त्याचेच बक्षीस म्हणून त्यांना स्थायी समितीचे सभापती पद दिल्याची प्रतिक्रिया अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणामुळे आता शहरातील राजकारण चांगलेच तापले असून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या भाजप विरोधात जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. आता यापुढे हे प्रकरण काय वळण घेते आणि त्यामुळे शहराच्या राजकारणामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“भाजपचे नगरसेवक दिनेश जैन यांना ठाऊक होते की पुढचे स्थायी समितीचे सभापती तेच होणार आहेत आणि म्हणून 2 कोटी 95 लाखाची ही निविदा आपल्या कार्यकाळात मंजूर करून घ्यावी आणि त्याची टक्केवारी आपल्यालाच मिळावी या उद्देशाने दिनेश जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत!” – प्रवीण पाटील (विरोधी पक्षनेते, शिवसेना)

डोंबिवलीतील काटई नाक्यावर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले दीड टन गोमांस

अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनिधी : रविवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० चा सुमारास बजरंग दल कार्यकर्ते श्री उत्तेकर हे काटई येथून डोंबिवलीच्या दिशेने येत होते त्या वेळेस एक बोलेरो पिकअप ट्रक त्यांना दिसला त्यातून लाल रंगाचे पाणी पडताना त्यांना दिसले म्हणून संशय आल्याने त्यांनी ती गाडी मानपाडा पेट्रोल पंप जवळ थांबवली आणि ड्रायव्हरला विचारलं की गाडीत काय आहे? तर ड्रायव्हर ने त्यांना पहिले उलटसुलट खोटी उत्तरं दिली व नंतर कबुली दिली की गाडी मध्ये जवळपास १०-१२ गाई बैलांचे मटन आहे व तो ते घेऊन मालेगाव वरून गोवंडी, मुंबईला नेत आहे. हे समजल्या वर उत्तेकर ह्यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते मनोज गिरी ह्यांना संपर्क साधला.

मग घटना स्थळी बजरंग दल जिल्हा संयोजक करण उल्लेंगल, अजीत विश्वकर्मा, निखील म्हात्रे,
मनीष चव्हाण, गणेश मिश्रा, मिथिलेश पासवान, प्रकल्प चव्हाण, अश्विन पवार, शेरा ताक, संतोष गुप्ता व इतर कार्यकर्ते पोहोचले व पोलिसांना संपर्क करून सदर गाडी घेऊन मानपाडा पोलिस स्टेशनला गेले व पशुसंवर्धन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

सदर प्रकरणात टेम्पो चालक आरोपी अटक केलेला आहे. व सदर गाडी चा मालक हा सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सध्या तो दुसऱ्या एका गोमांस तस्करी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात अटक आहे.

अकोला शहरात लॉकडाऊनच्या निर्देशाचा भंग करणाऱ्या जवळपास दीडशे वाहनांवर गुन्हे दाखल

शोएबुद्दीन, पातूर, प्रतिनिधी : अकोला शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने काही निर्देश जारी केले आहेत. या प्रमाणे तीन चाकी वाहनात चालक अधिक दोन प्रवासी व चारचाकी वाहनात चालक अधिक तीन प्रवासी ह्यांना प्रवास करण्यास परवानगी असून दुचाकी वर फक्त दोन लोकांना हेल्मेट व मास्क सह प्रवास करण्यास परवानगी आहे. ह्या निर्देशाचा भंग करणाऱ्या वाहनचालकां विरुद्ध धडक कारवाई शहर वाहतूक शाखेने सुरू केली असून गेल्या चार दिवसात जवळपास दीडशे वाहन चालकांवर गुन्हे व दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा नुसार दिलेल्या निर्देशाचा भंग करणाऱ्या वाहन चालकविरुद्ध कारवाईची धडक मोहीम सुरूच राहणार असल्याने वाहन चालकांनी विनाकारण बाहेर फिरू नये व आपली वाहने बाहेर काढताना प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे अन्यथा शहर वाहतूक शाखा अश्या वाहन चालकांवर दंडात्मक व गुन्हे दाखल करण्याची कारवाई करेल असा इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे।