Home Blog Page 311

डेटिंग साईटद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून १६ जणांना लुबाडणाऱ्या तरुणीला अटक

मिलन शाह, चिंचवड (पुणे) : बंबल, टिंडर या डेटिंग साईटद्वारे युवकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना भेटण्यासाठी बोलावून गुंगीचे औषध देऊन लुबाडणारी तरुणी गुन्हे शाखा युनिट चारच्या जाळ्यात अडकली आहे. या तरुणीने तब्बल १६ युवकांना डेटिंग साईटवरून मैत्री करून लुबाडले आहे. मात्र, केवळ चार जणांनी फिर्याद दिली आहे. हे चारही गुन्हे उघडकीस आले असून सायली देवेंद्र काळे (वय २७, रा. साधू वासवानी रोड, पुणे) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने १० डिसेंबर २०२० रोजी रावेत येथील एका युवकासोबत त्याच्या घरी येऊन त्याच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस करीत होते. पोलिसांनी तिचाच फंडा वापरून तिला पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस हवालदार प्रवीण दळे, पोलीस नाईक तुषार शेटे, गौस नदाफ आणि पोलीस शिपाई प्रशांत सैद यांनी फिर्यादी तरुणाशी संपर्क करून आरोपी तरुणीची माहिती काढली.

चेन्नई येथील तरुणाची आणि आरोपी तरुणीची बंबल या डेटिंग ॲपवरून मैत्री झाली असल्याने पोलिसांनी बनावट प्रोफाइल तयार केले. बंबल या डेटिंग ॲपमध्ये शोध सुरु केला. अखेर तिची प्रोफाइल सापडली आणि पोलिसांनी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. बरेच दिवस तरुणीने पोलिसांच्या बनावट प्रोफाइलला प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, आरोपी तरुणीने चेन्नई येथील एका तरुणाला डेटिंग साईटच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला पुण्यात भेटायला बोलावले. वाकड येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ते दोघेही राहिले. दरम्यान तरुणीने तरुणाला आग्रहाने सॉफ्टड्रिंक पाजले. त्यातून तिने तरुणाला गुंगीचे औषध दिले.

सॉफ्टड्रिंक प्यायल्यानंतर तरुणाला गुंगी आली आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण एक लाख ५० हजारांचा मुद्देमाल घेऊन हॉटेलमधून पळ काढला.
याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. देहूरोड आणि वाकड येथे झालेल्या दोन्ही गुन्ह्यांची पद्धत एकच असल्याने हे प्रकरण उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी गुन्हे शाखा युनिट चारकडे सोपवले.

इतरांना जाळ्यात ओढण्याच्या पॅटर्नमध्ये ती स्वत:च अडकली

देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना ज्या तरुणीच्या प्रोफाइलवर पोलिसांच्या बनावट अकाउंटवरून रिक्वेस्ट पाठवल्या होत्या, त्यातील एका प्रोफाइलची रिक्वेस्ट तरुणीने स्वीकारली. त्यातून पोलिसांनी तिच्याशी संवाद वाढवून तिला भूमकर चौक येथे तिच्या वेळेनुसार भेटायला बोलावले. २६ जानेवारी रोजी तरुणी वाकड येथे आली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तीच आरोपी तरुणी असल्याचे निष्पन्न झाले. तिला अटक करून वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही तरुणी मूळ पुण्यात राहत नसलेल्या युवकांना शोधून त्यांच्याशी संपर्क साधायची. त्यांना बाहेर भेटायला बोलावत. त्यानंतर त्यांना लॉजवर अथवा घरी नेण्यास सांगून त्यांच्या पेयांमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून बेशुद्ध करायची. संबंधित तरुण बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन चोरून न्यायची.

या तरुणीने एक वर्षाच्या कालावधीत तब्बल १६ युवकांना अशा पद्धतीने फसवले आहे. पोलिसांनी तिच्याकडून १५ लाख २५ हजार रुपयांचे २८९ ग्रॅम सोन्याचे दागिने व मोबाईल फोन जप्त केले आहेत. तरुणांना गंडवून चोरलेले सोन्याचे दागिने ही तरुणी पुण्यातील सराफांकडे वेगवेगळी भावनिक कारणे सांगून गहाण ठेवायची.

रास्ता पेठ येथील एका सराफाला तिने सांगितले की, तिचे वडील सेवानिवृत्त कर्नल आहेत. त्यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. सध्या त्यांच्यावर रुबी हॉल येथे उपचार सुरु आहेत. तिला पैशांची तीव्र गरज आहे.’ असे सांगून चोरलेले सोने सराफाकडे गहाण ठेऊन पैसे घेतले होते.

गुंगीचे औषधे तिच्या आईचीच….

आरोपी तरुणी तरुणांच्या पेयांमध्ये जे गुंगीचे औषध टाकत होती ते औषध तिच्या आईचे होते. तिच्या आईला विस्मृतीचा आजार होता. त्यामुळे डॉक्टरांनी तरुणीच्या आईला गुंगीचे औषधे दिली होती. ती औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी करून तरुणांच्या पेयांमध्ये टाकण्यासाठी ही तरुणी वापरत होती. लुबाडल्या पैशांमधून ती कपडे आणि चैनीच्या वस्तू खरेदी करत असे. तसेच हे पैसे ती नशा करण्यासाठी आणि पार्ट्यांसाठी देखील वापरत होती.

ती एका ठिकाणी नोकरी करत असल्याचे तिने घरी सांगितले होते. प्रत्येक महिन्यात ती घरी ठराविक रक्कम देखील देत होती. मात्र, नोकरीच्या नावाखाली तिने हा फसवणूक करून लुबाडण्याचा गोरखधंदा चालवला होता, हे तिच्या घरच्यांना पोलीस कारवाईसाठी घरी गेल्यानंतर माहिती झाले.

या ‘बंबल बी’च्या जाळ्यात अडकलेले अनेक तरुण फिर्याद देण्यासाठी पुढे येत नसत. समाजात आपली बदनामी होईल या करणापोटी ते पोलिसात येण्याचे टाळत तसेच ही तरुणी फिर्याद देणा-यावरच उलटे आरोप करेल अशी भीती देखील अनेकांना वाटत होती. दरम्यान वाकड, देहूरोड आणि चंदननगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून ते गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही तरुणी केवळ तरुणांनाच नव्हे तर महिलांना देखील आपल्या जाळ्यात ओढायची. फेक प्रोफाइल द्वारे महिलांशी संपर्क करून त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचे देखील प्रकार तपासात समोर आले आहेत. दोन महिलांसोबत तिने ब्लॅकमेलिंग केल्याची प्रकरणे उघड झाली आहेत. आणखी काही महिलांसोबत तिने अशा प्रकारची फसवणूक केले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

चोरलेल्या फोनचे काय करायची?

ही तरुणी बंबल व टिंडर ॲपवरून तरुणांशी संपर्क करून त्यांच्याशी कधीही रेग्युलर कॉलवर बोलत नसे. फक्त संबंधित ॲपवर चॅटिंग आणि व्हाट्सअपवर कॉल करत असे. ज्यामुळे पोलिसांनी रेग्युलर कॉलिंग तपासल्यास पोलिसांच्या हाती काहीही लागू नये, असा तिचा उद्देश होता.

तसेच जाळ्यात अडकलेल्या तरुणांचे दागिने, पैसे आणि फोन चोरून न्यायची. चोरलेला फोन स्वतः वापरत नसे. तसेच त्याची कुणाला विक्री सुद्धा करत नसे. तर चोरलेल्या फोनमधून प्रथम ती संबंधित डेटिंग ॲप अनइन्स्टॉल करायची. त्यानंतर फोन फोडून तो कच-यात फेकून द्यायची. यामुळे डेटिंग ॲपचा तरुणीच्या विरोधातील कुठलाही पुरावा पोलिसांना सापडत नव्हता.

एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि अँपेक्स हॉस्पिटलच्या सहयोगाने नवीन कर्करोग उपचार केंद्र सुरू

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कर्करूग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि अँपेक्स हॉस्पिटलच्या सहयोगाने नवीन कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असून सर्व प्रकाराच्या कर्करोगावर याठिकाणी उपचार दिले जाणार आहेत. यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांना दुरवर उपचारासाठी करावी लागणारी पायपीठ आता कमी होऊन या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कर्करोग हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे. कर्करोग या आजाराला सायलेंट किलर असंही म्हटले जाते. कर्करोग हा विकार अनुवंशिक असू शकतो. त्याचप्रमाणे तंबाखू सेवन, धुम्रपानआणि व्हायरस इन्फेक्शन यांच्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, २०१७ या वर्षापासून आतापर्यंत मुंबईत २५०४ कर्करूग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यात १४२४ जणांना केमोथेरपी देण्यात आली आहे. याशिवाय पुरूषांमध्ये साधारणतः तोंडाचा, अन्ननलिका, पोट, कोलोरेक्टल आणि फुफ्फुसाचा कर्करोग सर्वांधिक आढळून येतो. तर महिलांमध्ये स्तन, गर्भाशयाच्या मुखाचा, डोके आणि मानेचा कर्करोग अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पुरूषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण ६० टक्के तर महिलांमध्ये हे प्रमाण ४० टक्के इतके आहे.

साधारणपणे १५-२० टक्के पुरूषांना तोंडाचा कर्करोग तर महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. उतारवयात कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. यात स्तनाचा, तोंडाचा, रक्ताचा, यकृताचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. २० ते ३० टक्के तरुणांमध्ये स्तनाचा आणि तोंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. लहान वयात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तरुणवयात या मुलांना कर्करोगाचा सामना करावा लागतो. याशिवाय स्त्रियांमध्ये कमी वयात स्तनाचा कर्करोग होण्यामागे अनुवांशिक घटक, हार्मोनल बदल, अल्कोहोलचे सेवन, लठ्ठपणा, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागील मुख्य कारणे आहेत.

डॉ. संजय शर्मा म्हणाले, “अपेक्स हॉस्पिटलच्या सहकार्याने हे केंद्र पश्चिम उपनगरातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचार दिले जाणार आहे. केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी, तोंडाच्या कर्करोगासाठी लेसर शस्त्रक्रिया, तोंडावाटे आणि स्तनाच्या कर्करोगासाठी पुनर्रचना शस्त्रक्रिया, डोके आणि मान कर्करोगाच्या रूग्णांसाठी मायक्रोस्व्हुलर फ्लॅप शस्त्रक्रिया यासारखे उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे. या रूग्णालयात मालाड ते विरार आणि गुजरात, सूरत आणि अहमदाबाद येथून रूग्ण उपचारासाठी येत आहेत. या शिवाय लवकरच केमोथेरपीसह सर्जिकल सेवा सुरू करणार आहोत.”

डॉ. धैर्याशील सावंत म्हणाले, “पूर्वी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ५-१० टक्के होते. तर मागील पाच वर्षात यात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या केंद्रात रूग्णाच्या स्थितीनुसार प्रत्येक वयोगटातील कर्करूग्णांसाठी इम्युनोथेरपी दिली जाणार आहे. डोके आणि मान, फुफ्फुस, मूत्रपिंड, मूत्राशय, यकृत किंवा स्तनाचा कर्करोग असलेल्या रूग्णांमध्ये इम्यूनोथेरपीचा वापर केला जाणार आहे. कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे, यासाठी मॅमोग्राफी, अँन्टीजेन चाचणी, कोलोनोस्कोपी यांसारख्या कर्करोगावरील वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे.”

डॉ व्रजेश शाह म्हणाले, “कर्करोगाची लक्षणं पटकन करून त्यावर उपचार व्हावेत, यासाठी शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जेणेकरून वेळीच निदान झाल्यास रूग्ण कर्करोगातून लवकर बरा होऊ शकतो.”

बीएसयुपी योजनेतील घोटाळेबाज अधिकारी आणि त्यांचे दलाल यांचेवर गुन्हे दाखल करणार ! – महापौर ज्योत्स्ना हसनाळे

 

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर शहरातील अतिचर्चित महत्वाकांक्षि बीएसयुपी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल करून दोषीं आढळणारे मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील बडे अधिकारी आणि त्यांचे दलाल यांचेवर गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन मिरा-भाईंदर शहराच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी आज महानगरपालीकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले.

येत्या ०५ फेब्रुवारी रोजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरक्षण क्रमांक ३०० येथे भाजपचे जेष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात येणारे कला दालनाचे भूमिपूजन त्याच बरोबर अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणारे २३ मजल्यांपर्यंत पोहचण्याची क्षमता असणारे टर्न टेबल लॅडर (TTL) ह्या अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण त्याच बरोबर बीएसयुपी योजनेतील प्रलंबित १८ गाळे धारकांना त्यांच्या गाळ्यांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत त्या संबंधित माहिती देण्याकरिता बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी बीएसयुपी योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी वरील प्रमाणे आश्वासन दिले आहे.

शहरी भागातील दुर्बल घटकातील नागरिकांना पक्की घरे देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या बीएसयुपी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या बेनामी सदनिका या योजनेत आहेत. एकाच पत्त्यावर एकाच परिवाराच्या सदस्यांच्या नावे अनेक सदनिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत, महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांच्या संगनमताने अनेक सदनिका बेनामी नावाने लाटल्या असून त्या खुल्या बाजारात आठ ते दहा लाखांत विकल्या जात आहेत अशा अनेक तक्रारी महापालिकडे करण्यात आलेल्या आहेत.

ज्या पात्र झोपडी धारकांना सदनिका वाटप केल्या आहेत त्या त्यांना न मिळता इतर लोकांनी लाटल्या आहेत, ट्रांसीट कैम्प मधील अनेक सदनिका देखील पात्र झोपडी धारकांना न देता इतर लोकांना भाड्याने देण्यात आलेल्या असून त्या सदनिकांचे दर महिन्याला आठ ते दहा हजार भाडे महापालिकेचे अधिकारी आणि दलाल घेत आहेत असे अनेक आरोप या योजनेच्या संदर्भात नेहमीच होत आलेले आहेत, त्या संदर्भात मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे अनेक लेखी तक्रारी देखील करण्यात आलेल्या आहेत मात्र महापालिका प्रशासनाने या संदर्भात साधी चौकशी सुद्धा अजून केली नाही. दरवेळी आरोप केले जातात मात्र पुढे काहीच होत नाही! जे खरोखर पात्र झोपडी धारक आहेत त्यांना अजून घरं मिळाली नसून त्यांना तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून गेली अनेक वर्षे ते नागरिक अक्षरशः नरक यातना भोगत आहेत मात्र त्याच ठिकाणी स्थानिक नेते, दलाल आणि महापालिका अधिकारी मात्र आपले उखळ पांढरे करून घेत असून या सर्व योजनेची सखोल चौकशी झाल्यास या योजनेतील अनेक भ्रष्टाचार बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महापौर ज्योत्सना हसनाळे यांनी पत्रकारांसमोर बीएसयुपी योजनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणारे महापालिका अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि दलाल यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचेवर कठोर कारवाई करू असे आश्वासन जरी दिले असले तरी या योजनेतील भ्रष्टाचारात महापालिकेचे बडे अधिकारी आणि स्थानिक राजकीय नेते यांचा सक्रिय सहभाग पाहता प्रत्यक्षात अशा प्रकारची कोणतीही चौकशी होईल का? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि महापौर खरोखरच या योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यात गांभीर्य दाखवतील का? हे तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार असले तरी आता हा भ्रष्टाचार जास्त काळ दाबून ठेवता येणार नसून या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा लागोपाठ करणार असल्याचे उपस्थित अनेक पत्रकारांनी बोलून दाखविले आहे.

 

कल्याणच्या पत्रीपुलाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण

0
  1. मिलन शाह, कल्याण : येथील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पत्री पुलाचे लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री ना.श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री ना.श्री.आदित्य ठाकरे तसेच नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

या लोकार्पण सोहळ्यासमयी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या पत्री पुलाचे बांधकाम पुर्णत्वास नेण्याकरिता अनेक समस्या आणि अडचणींवर मात करत अहोरात्र मेहनत करणारे एमएसआरडीसी विभाग तसेच रेल्वे प्रशासन अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल, कंत्राटदार आणि कामगार यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

कल्याण व डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असलेला हा पूल नागरिकांकरिता खुला झाल्याने आता पूल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रमोद पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.राधेश्याम मोपलवार, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रेल्वे प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

डी मार्टच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या 13 जणांचे जीव वाचविणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचा स्वाभिमान संघटने तर्फे सत्कार!

मीरा भाईंदर, प्रतिनिधि : भाईंदर पश्चिमेकडील 150 फूट रोड वर असलेले डी मार्टच्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी संध्याकाळी 7.45 वा च्या सुमारास तीन लहान मुलांसह 13 नागरिक अडकल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतू मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून अडीच तास अथक प्रयत्न करून रात्री 10 वाजता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्या नंतरच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून या नागरिकांचे जीव वाचविले म्हणून शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

त्या निमित्ताने आज मंगळवार 19 जानेवारी रोजी मीरा भाईंदर शहरातील स्वाभिमान संघटने तर्फे अग्निशमन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कौतुकास्पद कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे व त्यांचे सर्व अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचारी व मिरा भाईंदर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मनोज राणे सोबत कृष्णा दरेकर, देवदास सावंत व विजय इंदुलकर इत्यादी उपस्थित होते.

स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरीवर आपण नेहमीच टीका करीत असतो हे तर नेहमीचेच झालेले आहे परंतु एखाद्या वेळी महापालिका प्रशासनाच्या एखाद्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी एखादी चांगली कामगिरी केली असेल तर त्याचे कौतुक देखील केले पाहिजे जेणेकरून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम करण्याचा उत्साह वाढला जातो आणि म्हणून आम्ही अग्निशमन दलाच्या जवानांचा आज सत्कार केला अशी प्रतिक्रिया स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मनोज राणे यांनी दिली आहे.

भाईंदर पश्चिमेकडे मॅक्सस मॉलच्या समोर असलेल्या डी मार्ट या शॉपिंग मॉलमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी येत असतात. तीन माजल्याचे हे डी मार्ट शॉपिंग मॉल गर्दीने गजबजलेले असते. या डी मार्टमध्ये वरच्या तीन मजल्यावर जाण्यासाठी जिन्या सोबतच लिफ्ट देखील लावण्यात आलेली आहे आणि खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक त्या लिफ्टचा वापर मोठया प्रमाणावर करीत असतात.

रविवारी सायंकाळी 7.45 सुमारास अशाच प्रकारे 15 जण लिफ्टचा वापर करून वर जात असताना काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लिफ्ट अचानक बंद पडली आणि ते 15 नागरिक लिफ्टमध्ये अडकल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तातडीने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी अडीच तास अथक प्रयत्न करून मोठ्या शिताफीने या 15 जणांची सुटका केली आणि उपस्थित सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सर्व जवान शहरातील कोणत्याही प्रकारच्या आणी-बाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी नेहमीच सज्ज व तत्पर असतात आणि एखाद्या संकटाच्या वेळी संपूर्ण शहरातील कोणत्याही ठिकाणी किमान पाच ते दहा मिनिटात पोहोचले पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्वरित मदत करता येईल त्यानुसार मी माझ्या सर्व सहकार्यांना सूचना दिल्या आहेत आणि तशी आमच्या अग्निशमन दलाची तयारी देखील आहे. माझ्या विभागातील सर्व जवान व अधिकारी मी दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करतात याचे मला समाधान आहे आणि या विभागाचा मी विभाग प्रमुख आहे याचा मला अभिमान देखील आहे. – प्रकाश बोराडे (मुख्य अग्निशमन अधिकारी)