Home Blog Page 312

डी मार्टच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या 13 जणांचे जीव वाचविणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचा स्वाभिमान संघटने तर्फे सत्कार!

मीरा भाईंदर, प्रतिनिधि : भाईंदर पश्चिमेकडील 150 फूट रोड वर असलेले डी मार्टच्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी संध्याकाळी 7.45 वा च्या सुमारास तीन लहान मुलांसह 13 नागरिक अडकल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतू मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून अडीच तास अथक प्रयत्न करून रात्री 10 वाजता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्या नंतरच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून या नागरिकांचे जीव वाचविले म्हणून शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

त्या निमित्ताने आज मंगळवार 19 जानेवारी रोजी मीरा भाईंदर शहरातील स्वाभिमान संघटने तर्फे अग्निशमन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कौतुकास्पद कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे व त्यांचे सर्व अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचारी व मिरा भाईंदर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मनोज राणे सोबत कृष्णा दरेकर, देवदास सावंत व विजय इंदुलकर इत्यादी उपस्थित होते.

स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरीवर आपण नेहमीच टीका करीत असतो हे तर नेहमीचेच झालेले आहे परंतु एखाद्या वेळी महापालिका प्रशासनाच्या एखाद्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी एखादी चांगली कामगिरी केली असेल तर त्याचे कौतुक देखील केले पाहिजे जेणेकरून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम करण्याचा उत्साह वाढला जातो आणि म्हणून आम्ही अग्निशमन दलाच्या जवानांचा आज सत्कार केला अशी प्रतिक्रिया स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मनोज राणे यांनी दिली आहे.

भाईंदर पश्चिमेकडे मॅक्सस मॉलच्या समोर असलेल्या डी मार्ट या शॉपिंग मॉलमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी येत असतात. तीन माजल्याचे हे डी मार्ट शॉपिंग मॉल गर्दीने गजबजलेले असते. या डी मार्टमध्ये वरच्या तीन मजल्यावर जाण्यासाठी जिन्या सोबतच लिफ्ट देखील लावण्यात आलेली आहे आणि खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक त्या लिफ्टचा वापर मोठया प्रमाणावर करीत असतात.

रविवारी सायंकाळी 7.45 सुमारास अशाच प्रकारे 15 जण लिफ्टचा वापर करून वर जात असताना काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लिफ्ट अचानक बंद पडली आणि ते 15 नागरिक लिफ्टमध्ये अडकल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तातडीने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी अडीच तास अथक प्रयत्न करून मोठ्या शिताफीने या 15 जणांची सुटका केली आणि उपस्थित सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सर्व जवान शहरातील कोणत्याही प्रकारच्या आणी-बाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी नेहमीच सज्ज व तत्पर असतात आणि एखाद्या संकटाच्या वेळी संपूर्ण शहरातील कोणत्याही ठिकाणी किमान पाच ते दहा मिनिटात पोहोचले पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्वरित मदत करता येईल त्यानुसार मी माझ्या सर्व सहकार्यांना सूचना दिल्या आहेत आणि तशी आमच्या अग्निशमन दलाची तयारी देखील आहे. माझ्या विभागातील सर्व जवान व अधिकारी मी दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करतात याचे मला समाधान आहे आणि या विभागाचा मी विभाग प्रमुख आहे याचा मला अभिमान देखील आहे. – प्रकाश बोराडे (मुख्य अग्निशमन अधिकारी)

डी मार्टच्या लिफ्टमध्ये अडकले 15 जण अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून केली सुटका!

मीरा भाईंदर, प्रतिनिधि: भाईंदर पश्चिमेकडील 150 फूट रोड वर असलेले डी मार्टच्या लिफ्टमध्ये रविवारी संध्याकाळी 7.45 वा च्या सुमारास अचानक 15 नागरिक अडकल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतू मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून अडीच तास अथक प्रयत्न करून रात्री 10 वाजता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्या नंतरच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

भाईंदर पश्चिमेकडे मॅक्सस मॉलच्या समोर असलेल्या डी मार्ट या शॉपिंग मॉलमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी येत असतात. तीन माजल्याचे हे डी मार्ट शॉपिंग मॉल गर्दीने गजबजलेले असते. या डी मार्टमध्ये वरच्या तीन मजल्यावर जाण्यासाठी जिन्या सोबतच लिफ्ट देखील लावण्यात आलेली आहे आणि खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक त्या लिफ्टचा वापर मोठया प्रमाणावर करीत असतात.

रविवारी सायंकाळी 7.45 सुमारास अशाच प्रकारे 15 जण लिफ्टचा वापर करून वर जात असताना काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लिफ्ट अचानक बंद पडली आणि ते 15 नागरिक लिफ्टमध्ये अडकल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तातडीने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी अडीच तास अथक प्रयत्न करून मोठ्या शिताफीने या 15 जणांची सुटका केली आणि उपस्थित सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.

डी मार्ट सारख्या गजबजलेल्या आणि महत्वाच्या ठिकाणी इमारतीमध्ये बसविण्यात आलेली लिफ्ट अश्या प्रकारे अचानक बंद पडल्याने शहरातील इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या लिफ्टच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरातील हजारों इमारतीमध्ये विना परवाना लिफ्ट चालवल्या जात आहेत. त्याच प्रमाणे अनेक इमारतींना परवाना आहे परंतु त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नसल्याचे आता उघड झाले आहे.

मुळात नियमानुसार इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या लिफ्टचे दर वर्षी निरीक्षण करून त्याचा परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक असते. त्याच प्रमाणे प्रत्येक इमारतीच्या लिफ्टमध्ये हा परवाना दर्शनी भागाववर लावणे देखील बंधनकारक असते परंतु शहरातील अनेक इमारती या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

म्हणून आता या विषयावर महापालिका प्रशासन काय कारवाई करते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तो पर्यंत शहरातील नागरिकांची सुरक्षा मात्र टांगणीवर असणार आहे.

राजस्थानातून चोरट्या मार्गाने येणारा सुमारे सव्वा कोटीचा प्रतिबंधित गुटखा जप्त! नाशिक पोलिसांची कारवाई!

नाशिक, प्रतिनिधि : महाराष्ट्रात गुटख्याच्या खरेदी-विक्री वर बंदी घालण्यात आली असली तरी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक व विक्री केली जात असल्याचे अनेक वेळा पहायला मिळत आहे. अनेकवेळा पोलीस अशा प्रकारे गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यावर देखील कारवाई करतात तरी देखील पर राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा येणे थांबलेले नाही.

अशातच नाशिक शहरात विक्रीसाठी आणलेला प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप पकडण्यात आली असून त्याची किंमत अंदाजे सव्वा कोटी असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी, दि.16/01/2021 रोजी रात्रीचे सुमारास नाशिक ते सापुतारा महामार्गावर राजस्थान येथुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधी तंबाखु घेवुन दोन कंटनेर नाशिकच्या दिशेने येणार असल्याची पक्की खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने करंजखेड फाटा, ता दिंडोरी व त्याच्या आसपासच्या परिसरात सापळा रचून 02 कंटेनर ताब्यात घेतले.

सदर दोन्ही कंटनेरची झडती घेतली असता त्यामध्ये मिराज कंपनीचा 1, 24, 34, 730/- रूपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा सुगंधीत तंबाखुचा साठा मिळुन आला. सदर अवैध साठा घेऊन जाणारे ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत 1) महेंद्रसिंग शंबुसिंहानी सोलंकी, रा. उदयपुर, राजस्थान, 2) शामसिंग चतुरसिंहजी राव, रा. बिदसर, चितोडगड, राजस्थान, 3) अर्जुनसिंग जसवंतसिंग राणावत, रा. चितोडगड, राजस्थान, 4) लोगलजी मेहवाल, रा. उदयपुर, राजस्थान

या चार ही जणांना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखुचा साठा व त्यासोबत दोन कंटनेर वाहन असा एकुण 1, 64, 34, 730/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या बाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकारी व अंमलदार पुढील तपास करीत आहे.

राज्यात गुटखा बंदी असली तरी देखील परराज्यातून चोरट्या मार्गाने या प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याने त्याला पूर्णपणे आळा घालणे हे आता पोलिसां समोर एक मोठे आव्हान ठरत आहे.

आज पासून शासनाच्या कोविड-19 लसीकरणाची मोहीम सुरू! मिरारोड येथील वोकहार्ट हॉस्पिटल झाले सहभागी

मुंबई, प्रतिनिधी : कोरोना व या साथरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूला समूळ नष्ट करण्यासाठी पूर्ण भारतात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. देशव्यापी कविड-19 लीकरण मोहीम मंतप्रधानांच्या हस्ते आज शनिवारी 16 जानेवारी 2021 पसून सुरू करण्यात आली आहे. मीरा भाईंदर शहरात देखील आज पासून कोविड-19 च्या लसीकरणाला सुरुवात झाली असून शासनाकडून पहिल्या टप्प्या करीता एकूण 8000 लसी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

लसीकरण महिमेत करिता शहरात एकूण तीन ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहेत, भाईंदर पश्चिमेकडे टेम्बा हॉस्पिटल, पूर्वेकडे स्व बाळासाहेब ठाकरे उद्यान येथील जम्बो कोविड सेंटर सोबतच मीराड येथील येथील वोकहार्ट हॉस्पिटलने या कोरोनाच्या लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला आहे.

वोकहार्ट हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉ पंकज धमीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी आणि खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी अंदाजे शंभर लोकांना ही लस देण्यात येणार असून पहिला टप्पा पूर्ण झाल्या नंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन कोरोना वोरियर्स म्हणजेच महानगरपालिकेचे इतर कर्मचारी, पोलिस विभागातील कर्मचारी-अधिकारी व इतर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण केले जाणार आहे. यावेळी आपली प्रतिक्रिया देताना डॉ पंकज धामिजा म्हणाले की, लसीकरणाच्या बातमीने लोकांना नक्कीच आशा मिळाली आहे. वोकहार्ट हॉस्पिटल, मीरारोड या लसीकरण मोहिमेचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि रुग्णांच्या आरोग्यासाठी चोवीस तास कार्य करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शना नुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी. त्यानंतर तिसरऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे.

एकूणच बहू प्रतिक्षित असलेल्या कोरोनाच्या या लसीचे आगमन झाल्या नंतर देशातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आता देशातून कोरोना ह्या साथ रोगाचे समूळ उच्चाटन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

येणाऱ्या काळात मीरा भाईंदर शहराचा महापौर काँग्रेसचाच किंवा काँग्रेसच्या सहकार्याने झालेला असेल! – असलम शेख

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : मीरा भाईंदर शहराचा सर्वांगीण विकास मुझफ्फर हुसैन यांच्या नेतृत्वाखाली झाला असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरवासीयांना सर्व मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम कॉंग्रेसने सत्ताकाळात केले असल्याचे मत मुंबईचे पालकमंत्री, मत्स्य व वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे. मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने भाईंदर पश्चिम येथील अग्रवाल ग्राउंडवर आयोजित कार्यकर्ता मेळावा व पदवितरण कार्यक्रमात शेख बोलत होते,

ते पुढे म्हणाले की डॉ. बाबासाहेबांनी दिलेली देशाची घटना हा एक धर्मग्रंथ असून काँग्रेस पक्ष त्याच्या आधारावर चालत आला आहे, सर्वधर्मसमभावचा नारा सर्वप्रथम काँग्रेसने दिला आणि आजही आम्ही त्या विचारधारेशी बांधील आहोत, परंतु गेल्या सहा वर्षांपासून देश वेगळ्याच दिशेनं वाटचाल करीत असून मोठमोठ्या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर मोदी सरकार चालत असून गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगार देशोधडीला लागले आहेत.

महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, महागाईने कहर केला आहे, धर्माधर्मा मध्ये तेढ निर्माण केली जात आहे, नोटबंदी, जीएसटी सारखे निर्णय घेऊन देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणली आहे, जे ६० वर्षात काँग्रेसने या देशाला दिले ते विकण्याचे पाप मोदींनी केल्याचा आरोप अस्लम शेख यांनी केला.

सरकारी यंत्रणेला हाताशी धरून विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केले जात असून काँग्रेसने कधी अशा प्रकारे राज्य केले नसल्याचे सांगत राज्यपाल देखील केंद्राच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याने लोकनियुक्त सरकारला नीट काम करू दिले जात नसल्याने लोकशाही धोक्यात आली आहे, शेजारील राष्ट्रांशी संबंध सलोख्याचे नाहीत त्यामुळे देशाला धोका निर्माण झाला आहे. देश वाचवण्यासाठी पुन्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटित होऊन ही हुकूमशाही मोडून काढली पाहिजे.

कोरोनाच्या संकटकाळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखत त्यांना जिल्हा, तालुका समिती, एस.ई .ओ. आदी ठिकाणी संधी दिली जाईल असे आश्वासन मंत्री अस्लम शेख यांनी यावेळी दिले.

यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन यांनीही आपले विचार व्यक्त केले, ते म्हणाले की शहरात काँग्रेस पक्ष्याला जिवंत ठेवण्यासाठी व भ्रष्ट व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढलो. काँग्रेस पक्ष नेहमी शहराचा विकास नजरेसमोर ठेऊन काम करीत आला असून शहराचा विकास नियोजन आराखडा आम्ही बनवला परंतु भाजप वाल्यांनी सत्तेच्या जोरावर फक्त भ्रष्टाचार केला.

शहराला रस्ते, रुग्णालय, शाळा, परिवहन सेवा, अतिरिक्त पाणी पुरवठा योजना काँग्रेसने आणली परंतु भाजप वाल्यांनी फक्त बॅनर बाजी करून येथील जनतेची फसवणूक केल्याचे हुसेन म्हणाले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, त्यात ३ कार्यकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, सचीव, सहसचिव, ब्लॉक अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. सर्वांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, सचिव मेहुल व्होरा, सुरेश दळवी, पर्यावरणचे प्रदेश अध्यक्ष समीर वर्तक, वसई विरार काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष दीप काकडे, गटनेते झुबेर इनामदार, महिला अध्यक्षा लीलाताई पाटील, जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, जिल्हा, ब्लॉक चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मीरा भाईंदर शहरातील काँगेस पक्षाने आता कात टाकायला सुरुवात केली असून गेल्या काही दिवसात काँग्रेस पक्षाने जनतेच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्याच प्रमाणे शहरातील अनेक वर्षे रेंगाळलेल्या पक्षाच्या नियुक्त्या देखील आता मार्गी लावल्या जात असल्याचे दिसून येत असून सोमवारी 11 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शेकडोंच्या संख्येने नवीन नियुक्या केल्या आहेत.