Home Blog Page 313

भ्रष्ट नेते, अधिकारी वागतात तोऱ्यावर! शहरातील करदाते नागरिक मात्र वाऱ्यावर !

मीरा-भाईंदर, प्रतिनिधी : मीरा भाईंदर शहरात सध्या उद्याने, स्मशानभूमी, दफनभूमी आणि रुग्णालये या सार्वजनिक ठिकाणी अगोदरच चांगल्या स्थितीत असलेले प्रवेशद्वार तोडून पुन्हा नवीन प्रवेशद्वार बनविले जात आहेत आणि त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. परंतु मुख्य प्रश्न असा आहे कि शहरात आरोग्य सेवेची अत्यंत बिकट अवस्था असताना आणि नागरिकांच्या अत्यावश्यक अशा आरोग्य सेवेवर अधिक खर्च करण्याची गरज असताना ह्या प्रवेशद्वारांवरच एव्हढा वायफळ खर्च का केला जात आहे? हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.

मीरारोड परिसरात एकमेव असलेले स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयाचे प्रवेशद्वार देखील तोडून नवीन चकचकीत असे नवीन प्रवेशद्वार बनविले गेले आहे आणि त्यावर अंदाजे पंचवीस लाख रुपयांचा निधी खर्च केला गेला आहे. परंतु याच रुग्णालयाची आतून अवस्था काय आहे? या रुग्णालयात नागरिकांना कशा प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविल्या जातात? याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता अत्यंत धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळालेली आहे.

या रुग्णालयातील सौचालयाची अवस्था किती बिकट आहे, ऑपरेटर रूम इथे देखील घाण पसरलेली आहे, एव्हढे मोठे रुग्णालय असून देखील या रुग्णालयातील एकमेव एक्सरे मशीन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेली लाखोंच्या मशीन अगदी भंगारात पडलेल्या दिसत आहेत, त्याबद्दल अनेक तक्रारी करून देखील अद्याप एक्सरे मशीन सुरु करण्यात आलेली नसून नागरिकांना नाईलाजाने खाजगी डॉक्टर कडून एक्सरे काढून घ्यावे लागत आहेत.

या रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेस जे फर्निचर वापरतात ते सर्व फर्निचर अत्यंत वाईट अवस्थेत असून मोडकळीस आलेले आहे, या रुग्णालयात प्रसूतिगृह असून इथे अनेक महिला इथे प्रस्तुसाठी येतात परंतु या रुग्णालयाची लिफ्ट गेल्या अनेक महिन्यापासून बंद पडलेली आहे आणि गरोदर महिलांना अगदी अवघडलेल्या अवस्थेत देखील दोन माळे जिने चढून वर यावे लागते तर हि अत्यन्त दयनीय अशी परिस्थिती आहे.

हे आहे लिक्विड ऑक्सिजन रूम आणि स्वच्छतागृह पण इथेही अत्यंत वाईट अवस्था पाहायला मिळत आहे अशा प्रकारे सिलिंग गळत आहे तर बाथरूममध्ये भंगार सामान भरून ठेवण्यात आलेले आहे, या रुग्णालयात एकूण आठ डायलेसिस मशीन आहेत पैकी फक्त पाच मशीन सध्या चालू असून तीन मशीन गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहेत तर डायलेसिस रूममधील एसी देखील बंदच पडलेले आहेत.

या रुग्णालयाच्या कन्सल्टिंग रूमची अवस्था देखील अत्यंत वाईट असून जिथे पेशंटची तपासणी केली जाते तिथेही अत्यंत वाईट अवस्था पाहायला मिळत आहे अशा अत्यंत कोंदट जागेत बसून डोक्टर पेशंटची तपासणी करीत आहेत.

या रुग्णालयातील एकमेव लॅब म्हणजेच प्रयोगशाळा आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या रुग्णालयाच्या लॅबमध्ये एकही कॉम्पुटर नाही आणि आजही इथे हाताने रिपोर्ट लिहाव्या लागत आहेत, या लॅबमध्ये एकमेव असलेली लिपिड प्रोफाईलची मशीन गेली अनेक महिने बंद पडलेली आहे परंतु त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही, सॅनिटायजर रूम म्हणजेच निर्जंतुकीकरण रूम परंतु इथे हि अत्यंत वाईट अवस्था असल्याचे दिसत आहे.

ज्या गरोदर महिलांची सिझेरियन केली जाते किंवा ज्या पेशंटचे ऑपशन केले जाते त्यांना ज्या खोलीत आणले जाते त्या ठिकाणची अवस्था देखील अत्यंत वाईट असून येथील एसी देखील बंद पडलेले आहेत डॉक्टरांना बसण्याची देखील योग्य सोय नाही आहे.

या रुग्णालयाच्या ऑपशन थियेटर ऑपरेशनच्या तीन लाईट पैकी फक्त एकच लाईट चालू असून डॉक्टारांना एकाच लाईटच्या उजेडामध्ये ऑपरेशन करावे लागत आहे, ऑपरेशन थिएटर मधील एक एसी बंद आहे तर दुसऱ्या एसीतून पाणी गळत आहे, ऑपरेशन थिएटरचे सिलिंग देखील गळत आहे. ज्या पलंगावर ऑपरेशन केले जाते त्या पलंगाची देखील गेली अनेक महिन्यापासून त्याची सर्व्हिसिंग झालेली नाही, ते योग्य रीतीने काम करत नाही, तरी देखील डॉक्टरांना तशाच अवस्थेत ऑपरेशन करावे लागत आहेत तर अशा एक नाही तर अनेक समस्या या रुग्णालयात आहेत परंतु महापालिका प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष देताना दिसत नाही.

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना अत्यावश्यक असलेली आरोग्य सेवा पुरविण्यात महानगरपालिका प्रशासन पर्णपणे अपयशी ठरलेली आहे परंतु त्याच ठिकाणी शहरातील राजकीय पक्षाचे नेते, ठेकेदार, अधिकारी यांचे उखळ पांढरे करण्यासाठी कोट्यावधींचा वायफळ खर्च करून हे प्रवेशद्वार बनविले जात असल्याचा आरोप शहरातील नागरिकांकडून केला जात असून भ्रष्टनेते, अधिकारी तुपाशी आणि करदाते नागरिक मात्र उपाशी अशी अवस्था पाहायला मिळत आहे.

मीरारोडच्या एस. कुमार ज्वेलर्सवर दिवसाढवळ्या दरोडा! बंदुकीचा धाक दाखवून लाखोंचे दागिने लुटले !

मीरा-भाईंदर प्रतिनिधी : मीरारोड पूर्वेकडील शांतीनगर परिसरात गजबजलेल्या ठिकाणी दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा पडला असून चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून लाखोंचे दागिने लुटून नेल्याची घटना घडल्याने शहरात एकाच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार ७ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकली वरून चार अज्ञात व्यक्ती दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने मीरारोड पूर्वेकडील शांतीनगर सेक्टर क्रमांक चारच्या भर चौकात असलेले एस. कुमार गोल्ड एन्ड डायमंड जेवलर्स या दागिन्यांच्या शोरूम मध्ये शिरले . त्यानंतर त्यांनी दागिने पाहण्याच्या बहाण्याने तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकत्रित केले आणि मग त्या चार दरोडेखोरां पैकी एकाने त्याच्याकडे असलेले पिस्तूल बाहेर काढून शोरूम मधील कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली आणि मग त्यांच्या इतर साथीदारांनी शोरूम मधील सर्व दागिने त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या चारही दरोडेखोरांनी अगदी शांतपणे बाहेर येऊन पळून जात होते पण त्यांनी आणलेल्या दोन मोटारसायकली पैकी एक मोटारसायकल चालूच झाली नाही म्हणून ती एक मोटारसायकल तिथेच सोडून पळ काढला.

हि सर्व घटना दागिन्यांच्या शोरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून अत्यंत शांतपणे हा दरोडा टाकण्यात येत होता असे स्पष्ट दिसत आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी गजबजलेल्या ठिकाणी हे दागिन्याचे शोरूम आहे. दिवसा ढवळ्या हा दरोडा टाकण्यात येत असताना देखील कुणीच याकडे लक्ष दिले नाही किंवा कुणीच आरडा ओरडा का केला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे मोठे दागिन्याचे शोरूम असून देखील या शोरूममध्ये अलार्म सिस्टम बसविण्यात आली नव्हती का? किंवा बसवलेली असली तरी ती का वाजविण्यात आली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मीरा-भाईंदर महानगरापलिका क्षेत्र आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रा करीत नवीन पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर सशस्त्र दरोडा टाकण्याची हि पहिलीच मोठी घटना घडली असून त्यामुळे ह्या घटनेतील आरोपी दरोडेखोरांना पकडण्याचे एक मोठे आव्हान आता मीरा-भाईंदर शहरातील पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पोलीस आता हे प्रकरण कोणत्या प्रकारे हाताळतात आणि किती लवकर ह्या दरोडेखोरांना पकडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मात्र मीरारोड परिसरातील मुख्य रस्त्यावर, बाजार असलेल्यात गजबजलेल्या ठिकाणी एका नामांकित दागिन्यांच्या शोरुमवर दिवसा ढवळ्या अशा प्रकारे सशस्त्र दरोडा पडल्याने मीरा-भाईंदर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भारतीय शेतकऱ्यानां करार शेतीची भीती का वाटते? अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना करार शेतीमुळे फायदा झाला की नुकसान?

प्रतिनिधी : भारतातील शेतकऱ्यानां करार शेतीची भीती का वाटत आहे त्यामागे एक मोठा इतिहास दडलेला आहे. अमेरिका सारख्या प्रगत देशात देखील या करार शेती पद्धतीमुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळालेली आहेत.

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना भागामध्ये डुक्करपालन करणारे एक शेतकरी विल्यम थॉमस बटलर यांनी 1995 साली एका मांसप्रक्रियेच्या क्षेत्रातील कंपनीशी कंत्राट केलं होतं. “आपण कोणाशी कंत्राट केला, तर त्यांच्यावर आपला कमी-अधिक विश्वास असतो,” असं बटलर करारातील अटींबाबत म्हणतात. तर दर वर्षी किती नफा व्हायला हवा, याबद्दल कंपनीने त्यांना सांगितलं होतं, असं ते म्हणतात.

बटलर यांनी जवळपास सहा लाख डॉलर कर्ज घेऊन 108 एकर जमिनीवर सहा कुंपणं घालून घेतली. पहिली पाच-सहा वर्षं त्यांना 25,000 ते 30,000 डॉलर इतका नफा झाला. यातून त्यांनी आणखी चार कुंपणं घातली.

परंतु, नंतर गोष्टी बदलायला लागल्या असं बटलर सांगतात. ते म्हणतात, “कचराव्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जाईल, हे पहिलं आश्वासन कंपनीने पाळलं नाही. आपण रोज किती कचरा निर्माण करतो, याची माहिती असलेला कोणीही शेतकरी माझ्या ओळखीत तरी नाही.

“माझ्या छोट्याशा शेतात रोज जवळपास 40 हजार किलो कचरा निर्माण होतो. 1995 साली कोणत्याही शेतकऱ्याला हे माहीत असतं, तर अशा व्यवहाराला तो तयारच झाला नसता. पण आम्हाला याबाबत पूर्ण अंधारात ठेवण्यात आलं होतं.”

उत्पन्नातील चढ-उतार सुरू झाल्यावर कंत्राटासंबंधीच्या जबाबदाऱ्याही वाढायला लागल्या. बटलर सांगतात, “आम्ही कसे खूप पैसे कमावू, ते आम्हाला सांगण्यात आलं होतं. पण त्या सगळ्याच अतिशयोक्तीच्या गप्पा होत्या. हळूहळू अनेक वर्षांनी त्यांनी त्यांच्या बाजूने देण्यात आलेल्या हमीमध्ये बदल केले. सुरुवातीला सगळी जबाबदारी कंपनीवर होती. शेतकऱ्यांना केवळ डुकरं पाळायचं काम होतं. आजार किंवा बाजारातील चढ-उतार यांसारख्या गोष्टींची चिंता डुक्कर पाळणाऱ्या शेतकऱ्याने करायची नव्हती.

“सुरुवातीला तसंच झालंदेखील. पण हळूहळू कंत्राट बदलायला लागलं आणि आजारांपासून ते बाजारातील चढ-उताराची जोखीमसुद्धा आम्हालाच पेलावी लागली. या सगळ्यासाठीची नुकसानभरपाई कंपनीऐवजी आमच्याकडूनच जमा केली जाऊ लागली. आम्हाला आशा वाटत होती तसं काहीच घडलं नाही आणि आम्ही त्यावरचं नियंत्रण गमावून बसलो. आम्ही फक्त काम करायचो, कंपनीच्या आश्वासनांनुसार पुढे जात होतो. काही समतोलच राहिला नाही. केवळ व्यवहारात लिहिलेल्या हिशेबानुसार आम्हाला पावलं उचलायला सांगण्यात आलं.”

कर्जाचा भार डोक्यावर असल्यामुळे बटलर यांच्यासाठी या कंत्राटातून बाहेर पडण्याचा पर्यायही बंद झाला होता. आता मला हे कंत्राट मोडताही येणार नाही, कारण तसं केलं तर दुसरी कोणतीही स्थानिक कंपनी माझ्याशी कंत्राट करण्याची शक्यता खूपच कमी होईल, असं ते सांगतात.

शिवाय, हे कंत्राट मोडलं तर आत्तापर्यंत केलेल्या गुंतवणुकीवरही पाणी सोडल्यासारखं होणार. नफा कमावण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी शेतकऱ्यांची पूर्णतः पिळवणूक केली आहे, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

कोंबड्या पाळणाऱ्या शेतकऱ्यांना कंत्राटाच्या हिशेबानुसार कमी खर्चात चांगली कोंबडी पोसली, तर त्याची भरपाई दिली जाते, असं शेतकरी सांगतात. याला ‘टूर्नामेन्ट सिस्ट’ असं म्हणतात. यामध्ये शेतकऱ्यांची परस्परांमध्ये स्पर्धा लावली जाते आणि त्यातील अर्ध्या शेतकऱ्यांना बोनस मिळतो, तर उरलेल्या अर्ध्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कपात केली जाते.

शेती व पशुपालन यांना आधुनिक बनवण्यासाठी कंत्राटी शेती सहायक आहे आणि त्यातून बाजारपेठेचा चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध होईल, असं सांगून कित्येक दशकं कंत्राटी शेतीला प्रोत्साहन दिलं गेलं.

परंतु, या बदलांमुळे बाजारपेठेची ताकद काही मोजक्या कंपन्यांच्या हातात एकवटत जाईल आणि त्यांना शेतकऱ्यांचं शोषण करणं सोपं जाईल, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. अशा तऱ्हेचे आरोप कंपन्या फेटाळून लावतात आणि कंत्राटी शेतीवर भर देतात. कंत्राटी शेती शेतकऱ्यांसाठी आणि प्रक्रिया करणाऱ्या कंपनीसाठीदेखील लाभदायक आहे, असा त्यांचा दावा असतो.

कंपन्यांच्या संकेतस्थळांवर संतुष्ट आणि यशस्वी कामगारांच्या अनेक कहाण्या आहेत, पण हे केवळ माध्यमांना व नेत्यांना खूश करण्याचे प्रकार आहेत, असे टीकाकार म्हणतात. अमेरिकेत 80 टक्क्यांहून अधिक बीफचं उत्पादन व त्यावरील प्रक्रिया चार कंपन्यांच्या हातात आहे.

या सगळ्या उदाहरणाकडे पाहिल्या नंतर असे दिसून येते कि करार शेतीमुळे शेतकऱ्यानां फायदा कमी आणि नुकसानच जास्त झाल्याचे दिसून येतो. करार करणाऱ्या कंपन्या करारातील अटींमध्ये बदल करतात त्यामुळे शेतकरी कायद्याच्या कचाट्यात अडकून पडतो आणि मग त्याला कंपनी सांगेल त्या भावात आपला माल विकण्या शिवाय इतर दुसरा पर्याय नसतो.

या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच भारतातील शेतकरी देखील करार शेतीला विरोध करीत आहेत आणि त्यांना वाटत आहे कि नवीन शेतकरी कायदयामुळे करार शेती करून कंपन्या त्यांच्या जमिनीवर कब्जा करतील. या भीतीमुळेच भारतातील शेतकरी नवीन कायद्याला विरोध करीत आहेत.

बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद परिसरात भीतीचे वातावरण!

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील महादेव वाडी पाझर तलावाच्या पश्चिमेला एक हँड ग्रेनेड/हातगोळा सदृश वस्तू.आढळून आली आहे. याबाबत परिसरातील एका जागरूक नागरिकांने पोलिसांना याची माहिती देताच तात्काळ पोलिसांनी याची दखल घेत संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन या वस्तू पासून कुणालाही धोका होणार नाही याची दक्षता घेतली असून ती वस्तू ताब्यात घेऊन तिचे रासायनिक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविली आहे.

जनतेने घाबरू नये आणि कुणीही अफवा पसरवू नये!

याबाबत अधिक माहिती देताना लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निखिल पिंगळे यांनी सांगितले कि जोपर्यंत त्या वस्तूचे प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषण होत नाही तोपर्यंत कुणीही आपल्या मनाचे निष्कर्ष मांडू नये. त्या बॉम्ब सदृश्य वस्तू बाबत आपण आत्ताच नक्की काही सांगू शकत नाही! हा बॉम्ब आहे कि आणखीन काही आहे? तो खरा आहे की खोटा? शिवाय असे डमी बॉम्ब देखील असतात, तो जुना देखील असू शकतो. नष्ट केल्यानंतर तपास करून रासायनिक प्रयोगशाळेकडून त्याचा सविस्तर अहवाल हाती आल्यानंतर मगच याची खात्री होऊ शकते की हा खरा आहे कि खोटा आहे? कधीचा आहे किंवा डमी आहे. त्यामुळे इतर कुठलीही अफवा कोणीही पसरवू नये आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन लातूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ निखिल पिंगळे यांनी नागरिकांना केले आहे.

हि बॉम्ब सदृश्य वस्तू कुठून आली? ती नेमकी काय वस्तू आहे? याबाबत लातूर पोलीस पुढील तपास करीत आहेत तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा याबाबत कोणतीही अफवा पसरवू नये असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.

मिरा भाईंदर शहरात राजकीय “घर वापसी” सुरु ! शिवसेनेचे मेंनेंजिस सातन यांचा शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश !

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेला स्पष्ट बहुमत मिळून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुत्सदी राजकीय डावपेचा समोर भाजप अगदी हतबल झाली आणि महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष यांनी मिळून महा विकास आघाडीची स्थापना करून भाजपच्या हातून सत्ता खेचून आणली. महाराष्ट्रातील सत्तास्थाने आता बदलली असून भाजपाची सत्ता जाऊन महा आघाडीची सत्ता आली आणि त्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय “घर वापसी” सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

२०१४ च्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस सारख्या अनेक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेले होते परंतु भाजपच्या कार्यप्रणालीमुळे त्या सर्वांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत असून त्यामुळे आता या सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एका अर्थाने त्यांची “घर वापसी” सुरु झाली आहे. अशाच प्रकारचे चित्र मिरा भाईंदर शहरात देखील पाहायला मिळत असून मूळचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असलेले आणि शिवसेनेत गेलेले मेनेंजीस सातनं यांनी आज ०३ जानेवारी रोजी आपल्या शेकडों समर्थकांसह काँग्रेस पक्षात पुर्नप्रवेश केला.

आपल्याला काही तरी मिळावे अशी अपेक्षा ठेऊन पक्षात येणाऱ्यांनी प्रथम समाज कार्याच्या माध्यमातून जनसमस्या सोडवत लोकांना जोडण्याचे काम करावे, तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळणारच आहे कोणीही थांबवू शकत नाही त्यासाठी मेहनत महत्वाची आहे, कार्यकर्त्यां मधूनच नेते घडत असतात, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विचारधारेला पायदळी तुडवत इतर पक्षात जाणाऱ्याना जनता लक्षात ठेवते, त्यामुळे कर्म करीत रहा फळाची अपेक्षा करीत बसू नका असा सल्ला यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

काशीमिरा हायवे पट्यातील शिवसेनेचे धडाडीचे सक्रीय नेते मेंनेंजीस सातन यांनी मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत शेकडो महिला- पुरुष कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. नयानगर येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हुसेन बोलत होते, ते पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आग्रही राहून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या तर जनता तुम्हाला दुवा देत ती जोडली जाईल, आज सातन यांचे समाज कार्य उल्लेखनीय आहे, कोणत्याही पदावर नसताना देखील अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची त्यांची तळमळ,जिद्द दिसून येते.

शिवसेनेत राहून जनतेची कामे होत नाहीत त्यामुळे आम्ही शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे सांगत या शहराचा सर्वांगीण विकास काँग्रेस काळात झाला असून आमच्या परिसरातील समस्या सर्व प्रथम मुझफ्फर भाऊ व माजी महापौर तुळशीदास म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सोडविल्या गेल्याने काँग्रेस सर्व धर्म समभाव मानत सर्वांना बरोबर घेऊन काम करते म्हणून पक्षात परत आलो अशी प्रतिक्रिया मेनेंजीस सातनं यांनी दिली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत,नगरसेवक अनिल सावंत, अश्रफ शेख, गीता परदेशी, रुबिना शेख,एस. ए. खान, महिला अध्यक्ष लीलाताई पाटील, युवक अध्यक्ष दीप काकडे, प्रवक्ते प्रकाश नागणे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांत मिरा भाईंदर शहरातील राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस पक्षाने आता कात टाकायला सुरुवात केल्याचे दिसून येत असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश केला जात आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला नवीन उभारी मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.