Home Blog Page 314

बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद परिसरात भीतीचे वातावरण!

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील महादेव वाडी पाझर तलावाच्या पश्चिमेला एक हँड ग्रेनेड/हातगोळा सदृश वस्तू.आढळून आली आहे. याबाबत परिसरातील एका जागरूक नागरिकांने पोलिसांना याची माहिती देताच तात्काळ पोलिसांनी याची दखल घेत संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन या वस्तू पासून कुणालाही धोका होणार नाही याची दक्षता घेतली असून ती वस्तू ताब्यात घेऊन तिचे रासायनिक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविली आहे.

जनतेने घाबरू नये आणि कुणीही अफवा पसरवू नये!

याबाबत अधिक माहिती देताना लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निखिल पिंगळे यांनी सांगितले कि जोपर्यंत त्या वस्तूचे प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषण होत नाही तोपर्यंत कुणीही आपल्या मनाचे निष्कर्ष मांडू नये. त्या बॉम्ब सदृश्य वस्तू बाबत आपण आत्ताच नक्की काही सांगू शकत नाही! हा बॉम्ब आहे कि आणखीन काही आहे? तो खरा आहे की खोटा? शिवाय असे डमी बॉम्ब देखील असतात, तो जुना देखील असू शकतो. नष्ट केल्यानंतर तपास करून रासायनिक प्रयोगशाळेकडून त्याचा सविस्तर अहवाल हाती आल्यानंतर मगच याची खात्री होऊ शकते की हा खरा आहे कि खोटा आहे? कधीचा आहे किंवा डमी आहे. त्यामुळे इतर कुठलीही अफवा कोणीही पसरवू नये आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन लातूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ निखिल पिंगळे यांनी नागरिकांना केले आहे.

हि बॉम्ब सदृश्य वस्तू कुठून आली? ती नेमकी काय वस्तू आहे? याबाबत लातूर पोलीस पुढील तपास करीत आहेत तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा याबाबत कोणतीही अफवा पसरवू नये असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.

मिरा भाईंदर शहरात राजकीय “घर वापसी” सुरु ! शिवसेनेचे मेंनेंजिस सातन यांचा शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश !

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेला स्पष्ट बहुमत मिळून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुत्सदी राजकीय डावपेचा समोर भाजप अगदी हतबल झाली आणि महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष यांनी मिळून महा विकास आघाडीची स्थापना करून भाजपच्या हातून सत्ता खेचून आणली. महाराष्ट्रातील सत्तास्थाने आता बदलली असून भाजपाची सत्ता जाऊन महा आघाडीची सत्ता आली आणि त्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय “घर वापसी” सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

२०१४ च्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस सारख्या अनेक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेले होते परंतु भाजपच्या कार्यप्रणालीमुळे त्या सर्वांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत असून त्यामुळे आता या सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एका अर्थाने त्यांची “घर वापसी” सुरु झाली आहे. अशाच प्रकारचे चित्र मिरा भाईंदर शहरात देखील पाहायला मिळत असून मूळचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असलेले आणि शिवसेनेत गेलेले मेनेंजीस सातनं यांनी आज ०३ जानेवारी रोजी आपल्या शेकडों समर्थकांसह काँग्रेस पक्षात पुर्नप्रवेश केला.

आपल्याला काही तरी मिळावे अशी अपेक्षा ठेऊन पक्षात येणाऱ्यांनी प्रथम समाज कार्याच्या माध्यमातून जनसमस्या सोडवत लोकांना जोडण्याचे काम करावे, तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळणारच आहे कोणीही थांबवू शकत नाही त्यासाठी मेहनत महत्वाची आहे, कार्यकर्त्यां मधूनच नेते घडत असतात, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विचारधारेला पायदळी तुडवत इतर पक्षात जाणाऱ्याना जनता लक्षात ठेवते, त्यामुळे कर्म करीत रहा फळाची अपेक्षा करीत बसू नका असा सल्ला यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

काशीमिरा हायवे पट्यातील शिवसेनेचे धडाडीचे सक्रीय नेते मेंनेंजीस सातन यांनी मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत शेकडो महिला- पुरुष कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. नयानगर येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हुसेन बोलत होते, ते पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आग्रही राहून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या तर जनता तुम्हाला दुवा देत ती जोडली जाईल, आज सातन यांचे समाज कार्य उल्लेखनीय आहे, कोणत्याही पदावर नसताना देखील अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची त्यांची तळमळ,जिद्द दिसून येते.

शिवसेनेत राहून जनतेची कामे होत नाहीत त्यामुळे आम्ही शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे सांगत या शहराचा सर्वांगीण विकास काँग्रेस काळात झाला असून आमच्या परिसरातील समस्या सर्व प्रथम मुझफ्फर भाऊ व माजी महापौर तुळशीदास म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सोडविल्या गेल्याने काँग्रेस सर्व धर्म समभाव मानत सर्वांना बरोबर घेऊन काम करते म्हणून पक्षात परत आलो अशी प्रतिक्रिया मेनेंजीस सातनं यांनी दिली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत,नगरसेवक अनिल सावंत, अश्रफ शेख, गीता परदेशी, रुबिना शेख,एस. ए. खान, महिला अध्यक्ष लीलाताई पाटील, युवक अध्यक्ष दीप काकडे, प्रवक्ते प्रकाश नागणे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांत मिरा भाईंदर शहरातील राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस पक्षाने आता कात टाकायला सुरुवात केल्याचे दिसून येत असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश केला जात आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला नवीन उभारी मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मिरा भाईंदर महापालिकेतील नियमबाह्य पद्धतीने केलेल्या प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेला डावलून मीरा भाईंदर महापालिकेतील प्रभाग समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड करताना राजकिय पक्षांनी आपल्याच कार्यकर्त्यांची सोय व्हावी म्हणून नुसती खोगीर भरती करण्यात आली असून सदर नियुक्त्या नियमबाह्य असून त्या तात्काळ रद्द करून पालिका निधीचा गैरवापर थांबविण्यात यावा अशी मागणी शहरातील सामाजिक संस्थांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाचे निर्देश तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या नियमानुसार पालिकेचे स्वीकृत सदस्य नियुक्त करताना सामाजिक क्षेत्रात त्यांचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे त्याची विशेष पात्रता असणे आवश्यक असते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर, वकील, शिक्षण तज्ञ, मुख्याध्यापक, लेखापाल, अभियांत्रिकी पदवी धारक, महापालिकेचा निवृत्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच सामाजिक संघटनेचा पदाधिकारी आदी वर्गवारीतील असायला हवा. एकूण ७ संवर्गा पैकी प्रत्येक संवर्गातील एका पात्रता धारक व्यक्तीची नियुक्ती सुनिश्चित करता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न करावा असे शासनाने स्पष्ट केलेले आहे.

तसे असताना मिरा भाईंदर शहरातील महापालिकेत २०१८ साली प्रशासन व सत्ताधारी भाजपने मिळून प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्यांची केलेली नियुक्ती नियमबाह्य असून त्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याची मागणी सामाजिक संस्था तर्फे केली जात आहे. प्रत्येक प्रभाग समित्यामध्ये जास्तीजास्त ३ स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या एकूण ६ प्रभाग समित्या आहेत.

या समित्यांवर सत्ताधारी भाजपा व पालिका प्रशासनाने संगनमताने शासनाचे निर्देश डावलून आपल्याच पक्षाचे पदाधिकारी, गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आदींची नियुक्ती केलेली आहे. प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून कुठे तीन तर कुठे दोन अश्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.

सदर नियुक्त्या करतेवेळी नियमांचे उल्लंघन झाले असल्याची तक्रारी करून देखील सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या बळावर निर्णय घेतले त्याच्याकडे पालिकेच्या नगरसचिव कार्यालयासह, प्रशासनाने देखील या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केले असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेचे कार्यकर्ते अंकुश मालुसरे यांनी केले आहेत.

ह्या राजकीय खोगीर भरतीला महापालिका प्रशासनाचे अधिकारी आणि त्या संबंधित ठराव करणारे हे सत्ताधारी नगरसेवक जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी केली आहे.
अशा प्रकारे नियुक्त केलेल्या स्वीकृत सदस्यांना आता पर्यंत देण्यात आलेले मानधन त्यांच्याकडून वसूल केले जावे. तसेच नियमात तरतूद नसताना प्रत्येकी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला तो कोणत्या निकषात करण्यात आला? याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान 2017 साली निवडणूक होऊन गेली तीन वर्षे महापालिका स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आलेली नव्हती. आणि आता जेमतेम दोन वर्षे शिल्लक राहिली असताना ४ स्वीकृत सदस्य नेमण्याच्या सत्ताधारी भाजपाने महासभेत मंजूर केलेल्या ठरावाला राज्य शासना सोबतच उच्च न्यायालयाने देखील सर्वच स्वीकृत सदस्य नेमण्याच्या भाजपच्या ठरावाला स्थगिती दिली असून उच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या मनमानी आणि बेकायदेशीर मिळालेली हि चपराक आहे असे सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता म्हणाले.

तांत्रिक आणि विशेष कौशल्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शहरातील मान्यवरांचा पालिकेच्या कामकाजात चांगला उपयोग व्हावा असा हेतू स्वीकृत सदस्य पदा मागे आहे. परंतु मनमानी व भ्रष्ट कारभार करण्यास मोकळीक मिळावी तसेच केवळ राजकारण्यांची सोय लावण्यासाठी ह्या नियमबाह्य नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.

शहरातील तळागाळातील नागरीकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आंदोलन उभं करण्याची जबाबदारी युवक कॉंग्रेसची – मुझफ्फर हुसैन

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिवसा निमित्त मीरा भाईंदर युवक काँग्रेसकडून युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाईंदर पश्चिमेकडील सेकंडरी शाळेच्या आवारात आयोजित या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक मिरा भाईंदर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीप काकडे यांनी उपस्थित युवकांना संबोधित केले. शहरात अनेक समस्या आहेत. आपल्याला जनतेच्या घराघरात पोहचण गरजेचं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत पुढच्या निवडणुकीत १२ पेक्षा अधिक युवक काँग्रेसचे नगरसेवक असतील, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.

इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाली त्याला 136 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानंतर देशाच्या जनता काँग्रेस सोबत राहिली. सध्या देशाची परिस्थिती लक्षात घेता भाजप वाटोळं करायला निघाली आहे. भारताचे संविधान धोक्यात असून जनतेनं जागृत होणं गरजेचं आहे. देशात भाजप फक्त जातीपातीचे राजकारण करत आहे. देशाच्या मोठ्या संस्थांचा गैरवापर होत असल्याचं मत माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी व्यक्त केलं.

या कार्यक्रमात ५० हुन अधिक नव्या कार्यकर्त्यांना पदभार देऊन मिरा भाईंदर युवक कॉंग्रेस मध्ये नियुक्ती करण्यात आली. त्याच प्रमाणे १६७ तरुणांनी युवक कॉंग्रेस मध्ये पक्षप्रवेश घेतला.

रस्त्यावरील अनधिकृत बस पार्किंगच्या मुद्द्यावर मनसे झाली आक्रमक! कठोर कारवाई करण्याची केली मागणी!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृत बस पार्किंग केल्या जातात. गेल्या आठवड्यात भाईंदर पश्चिम येथील भोला नगरच्या मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये अपहरण करून एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा निंदनीय प्रकार घडण्याच्या आधी मनसेने अनेक वेळा मिरा भाईंदर शहरात होत असलेल्या अनधिकृत बस पार्किंग विरोधात कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पत्र व्यवहार केला होता जर आधीच कारवाई झाली असती तर असा प्रकार घडला नसता असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून आता तर हा निंदनीय प्रकार घडल्या नंतर मनसे अनधिकृत पार्किंगवर होत असलेल्या कारवाईवर बारीक लक्ष ठेऊन आहे.

भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस बोस मैदानाच्या बाजूला आज देखील काही बस पार्क करण्यात आल्याचे समजताच मनसेच्या महिला उपशहर अध्यक्षा सौ.वैशाली येरूणकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ कळविले तसेच मनसेचे कामगार नेते व १४५ विधानसभा अध्यक्ष संदिप राणे, शहर सचिव अनिल रानावडे व महिला उपशहर अध्यक्षा सौ.वैशाली येरूणकर यांनी देखील त्या जागेवर जाऊन वाहतूक पोलिसांना या अनधिकृत बस पार्किंगवर कारवाई करण्यास भाग पाडले. या प्रसंगी विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष करण कांडणगिरे तसेच विनायक यादव, प्रमोद निळेकर, शरद मांडरे इत्यादी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात अशा प्रकारे अनधिकृत बस पार्किंग केल्या जात आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतच आहे परंतु ह्या बसेस मध्ये रात्रीच्या वेळी अनेक गैर प्रकार केले जात असून त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था देखील धोक्यात आली आहे म्हणून ह्या सर्व अनधिकृत बस पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

आता यावर वाहतूक पोलीस विभाग किती गांभीर्याने कारवाई करेल याबद्दल शंका उपस्थित केली जात असून ह्या अनधिकृत बस पार्किंग करणाऱ्या बस मालकांकडून दर महिन्याला हप्ता दिला जातो असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ह्या आरोपात किती तथ्य आहे हे तर नंतर कळेल मात्र रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या या बसेस मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर बेशिस्तपणे बसेस पार्किंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याच प्रमाणे त्यांना बसेस उभ्या करण्यासाठी वेगळी जागा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.