Home Blog Page 315

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक! राज्यभरात करणार आंदोलने!

पुणे, प्रतिनिधी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्यामुळे महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली असून या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हानिहाय आंदोलने करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्या स्वतः मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील आंदोलनामध्ये सामील होणार असून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा भडका उडवून केंद्र सरकारला कडक शब्दांत जाब विचारावा, असे आवाहनदेखील त्यांनी महिला पदाधिका-यांना केले आहे.

गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ ही गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास मध्यमवर्गीय गृहिणींनाच जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे, असा आरोपही रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल ७० रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्यादेखील कमी आहे. दर महिन्याला सरकार ही दरवाढ करू लागले आहे. त्यामुळे ही अन्याय्य दरवाढ त्वरित रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

“केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत घरगुती गॅस सिलेंडर च्या किमती सातत्याने वाढविल्या आहेत त्यामुळे मध्यमवर्गीय गृहिणींना त्याचा चांगलाच फटका बसला आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करीत असून जो पर्यंत घरगुती गॅसच्या ह्या वाढलेल्या किमती कमी होणार नाहीत तो पर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार – श्रीमती.पौर्णिमा विष्णू काटकर (प्रदेश सचिव तथा पुणे शहर निरीक्षक, राष्ट्रवादी महिला काँग्रेस)  

पुण्याच्या भीमा नदीच्या पात्रात सापडली पाच फूट उंचीची १ टन वजनाची पुरातन मूर्ती

मिलन शाह, पुणे : पुणे येथील भीमा नदीच्या पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे. मूर्तीचे तोंडाची उंची जवळपास पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे.

दौंड-नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी काम केलेला पूल उभारला आहे. या पूलाच्या बाजूलाच दुसऱ्या रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात ही अवाढव्य मूर्ती सापडली असून कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढून ठेवली आहे.

स्थानिक नागरिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आली असावी. मात्र, मूर्तीचा प्रचंड आकार आणि वजन जास्त असल्याने ही मूर्ती पाण्यातून वाहून येऊ शकत नाही. ती याच ठिकाणची असल्याची शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली. मूर्तीच्या मुखाचा भाग सापडला असून याच परिसरात मूर्तीचे इतर अवशेषही सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकरी प्रबोधिनीच्या उपाध्यक्षपदी पनवेलचे रामदास पाटील यांची नियुक्ती !!

0

जगदीश काशिकर, उरण : रायगड जिल्हा: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई परिसरातील मूळ भूमीपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी समाजाचे अस्तित्व सध्या विविध कारणांनी धोक्यात आले आहे. त्यामुळे कोळी बांधव, कामगार, शेतकरी वर्गांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी प्रबोधिनी ही संस्था शेतकऱ्यांना, कोळी बांधवांना, कामगारांना विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. अश्या या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच रामदास हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मु – नितळस तालुका पनवेल येथील रहिवाशी असलेले रामदास हरिश्चंद्र पाटील यांचे आजपर्यंतचे कार्य व गोरगरिबांविषयी, कामगार, कोळी, शेतकरी बांधवांविषयी असलेली तळमळ पाहता कामगार, कोळी बांधव, शेतकऱ्यांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी प्रबोधन या संस्थेच्या उपाध्यक्षपदी रामदास हरिश्चंद्र पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिली. रामदास पाटील यांची निवड संस्थेच्या उपाध्यक्ष पदी झाल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रवादी काँगेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी !

मिलन शाह, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर एका व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली) असे फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयातील दूरध्वनीवर जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीने फोन करून ‘रूपाली चाकणकर कुठे आहे, मला तिचा मोबाईल नंबर हवा आहे. ती काय करते पाहून घेतो. तिचे धायरी येथील कार्यालय पेटवून देतो’, अशी धमकी दिली.

चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी सदर प्रकार चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या पूर्वी मनसेच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान फोनवरून धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनाही धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे-सोलापूर रस्त्यावर बर्निंग बसचा थरार! बस चालकाच्या समयसूचकतेमुळे प्रवासी बचावले!

मिलन शाह, लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथील मनाली हॉटेलसमोर सकाळी आठच्या सुमारास एका खासगी बसला आग लागली. चालकाच्या समयसुचकतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या अग्निशमन दलांच्या जवानांनी तातडीने आग विझवली.

सकाळी सोलापूरच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या खासगी प्रवासी बसमध्ये अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. बर्निंग बसचा हा थरार पाहून परिरातील ग्रामस्थ आणि बसमधील प्रवाशांची एकच धावपळ सुरू झाली. चालक आणि वाहकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने सर्व प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर उतरवले.

नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर १५ ते २० मिनीटांमध्ये पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या. त्यांनी पाण्याचा मारा करत एका तासात आग विझवली. या दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती.