Home Blog Page 317

अनधिकृत बॅनर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून हल्ला करणाऱ्या दोघांवर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

मिरारोड, प्रतिनिधी : मिरारोड पूर्वेकडील नयानगर येथील गंगा कॉम्प्लेक्स परिसरातील अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढण्यासाठी गेलेले महापालिकेचे प्रभाग अधिकारी आणि कर्मचारी यांना धक्कामुक्की करून आणि शिवीगाळ करत धमावुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात अमनशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल रहमान मकबूल हुसेन शेख उर्फ रहमान कालिया आणि ट्रस्टचे सेक्रेटरी सलीम अजमुद्दीन शेख नावाच्या दोन इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी मिरा-भाईंदर शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी सोमवार दिनांक २१ डिसेंबर पासून मिरा-भाईंदर शहरातील सर्व अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग हटविण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार शहरातील सर्व अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग हटविण्याची मोहीम सुरु करण्यात आलेली आहे.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ०४ चे प्रभाग अधिकारी आपल्या कर्माचार्यांसह नयानगर परिसरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग हटविण्याच्या कामात व्यस्त असताना लोधारोड येथील गंगा कॉम्प्लेक्स येथे अमनशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अनधिकृत बॅनर काढीत होते त्यावेळी आरोपी अब्दुल रहमान शेख उर्फ रहमान कालिया आणि त्याचा साथीदार सलीम शेख यांनी घटना स्थळी येऊन बॅनर काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली.

त्यावेळी कर्तव्यावर असलेले प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांनी मध्यस्थी करून सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्कामुक्की करून बघून घेण्याची धमकी दिली आणि या ठिकाणी गर्दी जमवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.

प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांनी नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भादविसं चे कलम ३५३, ३२३, ५०६, १८८, २६९, २७०, ३४ त्याच प्रमाणे महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम २०२० चे कलम ११ सोबत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(बी) व साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नयानगर पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असून सध्या आरोपीना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले असून ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले असून नयानगर पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिका नव्हे हि तर महा भ्रष्टाचारी महानगरपालिका!

भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे रोज नवनवीन प्रकरणं बाहेर येत असून मिरा-भाईंदर महानगरपालिका आता महा भ्रष्टाचारी महानगरपालिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या भ्रष्टाचारामध्ये महानगरपालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच आघाडीवर राहिलेला असून रस्त्याचे डांबरीकरण, गटारांचे-नाल्यांचे बांधकाम, फुटपाथ सुशोभीकरण, उद्यानाचे सुशोभीकरण काँक्रीटचे रस्ते, सौचालयांचे बांधकाम किंवा इतर कोणतेही बांधकाम असो बोट ठेवाल तिथे फक्त आणि फक्त भ्रष्टाचारच बाहेर पडत आहे.

गेल्या मार्च महिन्यांपासून संपूर्ण देशात कोरोना या भयंकर साथरोगामुळे लोकडाऊन केले गेले होते आणि देशात आणीबाणी सारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अशा प्रसंगी देखील मीरा-भाईंदर महानगरपालीकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी “आपदा मी भी अवसर ढुंढिये” म्हणजेच “संकटात देखील संधी शोधा” या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषवाक्याला जरा जास्तच मनावर घेऊन कोरोना काळात आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.

अशाच प्रकारचा आणखीन एक नवा भ्रष्टाचार सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्नासिंह यांनीच उघडकीस आणल्याने सत्ताधारी भाजपाची चांगलीच तारांबळ उडाली असून गेल्या अनेक वर्षांत सत्ताधारी पक्ष असून महापालिकेतील भ्रष्टाचार मात्र शिगेला पोहचला असल्याने शहरातील नागरिकां कडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाचे भाईंदर पूर्वेकडील प्रभाग क्रमांक ०५ चे नगरसेवक श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्नासिंह यांनी सोमवार २१ डिसेंबर रोजी महापालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये पत्रकार परिषद आयोजित करून कोरोनाच्या काळात महानगरपालिकेद्वारे चालविण्यात येत असलेल्या विलगीकर केंद्रात (कोरंटाईन सेंटर) नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या साहित्याच्या खरेदीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची पुराव्यानिशी माहिती उघड केली.

नगरसेवक मुन्नासिंह यांनी उपस्थित पत्रकारांना ठेकेदारांना अदा करण्यात आलेल्या बिलांच्या प्रति आणि इतर पुरावे व कागदपत्रांच्या प्रति दाखवून माहिती दिली कि ठेकेदाराने १० रुपयाचे साबण ३५ रुपयांत, ८९ रुपयाचे गुड नाईट १७५ रुपयांत, ५०-६० रुपयांची प्लॅस्टिकची बादली १५० रुपयांत १५ रुपयांची क्रीम ६७ रुपयांत तर ४०० रुपयांची पीपीई किट ७०० रुपयांत अशा प्रकारचे साहित्य १०० ते ७०० टक्के वाढीव दराने खरेदी केली असून महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याची माहिती दिली आहे.

नगरसेवक मुन्नासिंह यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीमध्ये आरोप केला आहे कि अलगीकरण केंद्रात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अधिकतम किरकोळ विक्री मूल्य (MRP) पेक्षा वाढीव १०० ते ७०० टक्के दराने साहित्य खरेदी केल्याचे दाखवून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदार यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे आणि या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत महापौर ज्योत्सना हसनाले यांचेशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी देखील कोरोना सारख्या महाकठीण प्रसंगात देखील पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार अशा प्रकारे भ्रष्टाचार करीत असल्याने या प्रकारा बाबत नाराजी व्यक्त केली असून या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी आयुक्त डॉ. विजय राठोड यांचेकडे केली असल्याचे सांगितले आहे.

महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी मात्र साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाला नसून लोकडाऊनमुळे सर्व वाहने बंद होती आणि पुरवठा बंद झाला होता त्यामुळे ठेकेदाराला काही काळापुरते वाढीव दराने साहित्य खरेदी करावा लागला मात्र नंतर मूळ दारातच साहित्य खरेदी केला असल्याचे थातुरमातुर उत्तर दिले असून लोकडाऊनचे नियम फक्त सामान्य नागरिकां करिता लागू होते परंतु अत्यावश्यक सेवा पुरविणारे शासकीय पुरवठादारानां वाहतुकीची किंवा इतर कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती मग या ठेकेदारांना अशा प्रकारे वाढीव दराने साहित्य खरेदी करण्याची गरज का लागावी? या प्रश्नावर मात्र त्यांनी काहीही बोलण्याचे टाळले आहे.

सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्नासिंह यांनीच कोरोना सारख्या कठीण प्रसंगी देखील महापालिकेत होत असलेला हा भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे आता सत्ताधारी पक्ष भाजपाची चांगलीच गोची झाली असून आता त्यावर महापौर, उप महापौर काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असे असले तरी आता मीरा-भाईंदर महानगरपालिका हि महा-भ्रष्टाचारी महानगरपालिका झाली असल्याचे बोलले जात असून शहरातील नागरिकां कडून संताप व्यक्त केला जात आहे.

चार वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न! नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

भाईंदर, प्रतिनिधी : भाईंदर पश्चिमेकडील भोला नगरमध्ये एका चार वर्षांच्या मुलीचे बसमधून अपहरण तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठार मारण्याच्या उद्देशाने एका पोत्यामध्ये बांधून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. मात्र पोलिसांनी अत्यंत्य जलदगतीने तपासाची सुत्रे फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी सध्या जिवंत असली तरी तरी तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारा करिता तिला मुंबईच्या नायर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या संदर्भात भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांनी दिलेल्या माहिती नुसार एका नराधम बस चालकाने भाईंदर पश्चिमे कडील भोला नगर येथे राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करत आधी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि यानंतर तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत या मुलीला गोणीत बांधून फेकले.

मुलीच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी चार तासात आरोपी बस चालकाला वसईतून अटक केली आहे. या घटनेत चिमुकलीचा जीव वाचला असला तरी तिची प्रकृती गंभीर असून पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी मुलीचे अपहरण झाल्यानंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती.

भाईंदर पश्चिमे कडील भोला नगर येथे झोपडपट्टीतील लहान मुलं रविवारी दुपारी एकच्या सुमारास घरा समोर उभ्या असलेल्या लक्झरी बसमध्ये खेळत होती काही वेळाने हि बस निघून गेली. त्यावेळी सर्वजण बसमधून खाली उतरले मात्र चार वर्षांची चिमुकली गायब असल्याचे दिसल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. यानंतर भाईंदर पोलिसांनी जलदगतीने आपल्या तपासाची सूत्रे हलवत बस चालकाचा शोध लावला. यावेळी आरोपी बसचालक वसई माणिकपूर येथे असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी शिताफीने आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. बसमध्येच लैंगिक अत्याचार करून चार वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले. तसेच प्लास्टिकच्या पोत्यात भरून वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला तिला फेकण्यात आल्याचे समजले. पोलिसांनी ताबडतोड घटनास्थळी धाव घेत शोध घेतला असता वालीव पोलिसांनी ही चिमुकली जखमी अवस्थेत आढळून आली. त्यानंतर पीडित मुलीला तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल केलं आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजार केल्यानंतर त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले सांगितले. एका चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर हा दुर्दैवी प्रसंग घडल्याने मिरा भाईंदर शहरातील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गुरू आणि शनि ग्रहांची होणार दुर्मिळ युती! 400 वर्षांनतर अगदी जवळ येणार हे दोन ग्रह!

आज सोमवार म्हणजेच 21 डिसेंबरला गुरू आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. जवळपास 400 वर्षांनंतर हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर आणि अगदी जवळ असतील.

हि घटना अत्यन्त दुर्मिळ असून अशा प्रकारची घटना 1623मध्ये घडली होती. पुन्हा 2080 मध्ये ही घटना घडण्याची शक्यता वैज्ञानिक वर्तुळातून वर्तवण्यात आली आहे.

आज सोमवार म्हणजेच 21 डिसेंबरला गुरू आणि शनि हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त 0.1 डिग्री अंतरावर असतील. विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह एकमेकांजवळ आल्यानंतर ते प्रत्येकाला पाहता येईल, असं नासानं म्हटलं आहे.

जर तुम्हाला ही घटना पाहायची असेल तर https://nasa.tumblr.com/post/637859420873818112/the-great-conjunction-of-jupiter-and-saturn या लिंकवर क्लिक करावं लागेल. नासाच्या वेबसाईटवर या विषयावर नासानं सविस्तर माहिती दिली आहे.

Credits: NASA/JPL-Caltech

कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे पण त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही! : डॉ. हर्षवर्धन (केंद्रीय आरोग्यमंत्री)

कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही असं मत भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केलं आहे. सरकार सावध असल्याचंही त्यांनी सांगितलं.

युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजात) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत याविषयी सखोल चर्चा केली.

कोरोनाच्या या नव्या प्रजातीच्या माहितीनंतर इंग्लंडवरुन येणारी सर्व विमाने रद्द करावीत आणि आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करावे अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याचं WHO ने बीबीसीला सांगितलं.

सध्या कोरोना व्हायरसवरच्या लशी बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या या नव्या प्रजातीतील फरकामुळे त्याच्यावर लशीचा प्रभाव पडेल की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.

पण कोरोनाच्या नव्या प्रजातीवर लस कशा पद्धतीने परिणाम करते, हे अद्याप स्पष्ट नाही असे असले तरी भारतातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.