Home Blog Page 316

मिरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याची खासदार राजन विचारे यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मागणी

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांच्यासोबत २३ डिसेंबर रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सर्व पक्षीय खासदारांच्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील विकास मुद्द्यांवर चर्चा केली.

त्यामध्ये सर्वप्रथम एम. आर. व्ही. सी. मार्फत बोरवली ते विरार दोन वाढीव लाइन टाकण्याच्या कामाची स्थिती जाणून घेतली असून मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा आराखडा बनविताना खासदार राजन विचारे यांनी मी केलेल्या सूचनांचा समावेश केला आहे का? तसेच या नवीन लाईनमुळे दोन्ही रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळू शकणार आहे का? असा सवाल खासदार राजन विचारे यांनी बैठकीमध्ये घेतला.

त्यावर पश्चिम रेल्वेने खासदार राजन विचारे यांना बोरवली ते विरार दरम्यान पाचव्या व सहाव्या लाईनचे काम एम आर व्ही सी मार्फत हाती घेण्यात आलेले आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील बोरवली, दहिसर, मिरा रोड, नायगाव, वसई रोड वरील आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील भाईंदर नालासोपारा व विरार पर्यंतचा आराखडा एम आर व्ही सी मार्फत मान्यतेसाठी पश्चिम रेल्वेस प्राप्त झालेला नाही. प्राप्त झाल्यास मान्यता देऊ असे रेल्वेने कळवले आहे.

तसेच एम आर व्हि सी ने नायगाव व भाईंदर या दोन रेल्वेस्थानकामधील नव्याने होणाऱ्या खाडी पुलाच्या दोन्ही बाजू असेलेल्या मातीच्या चाचणीच्या सर्वेक्षणाच्या निविदा काढण्यात आलेला आहेत. तसेच 11.70 हेक्‍टर जमीन मिळविण्यासाठी पालघर व ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. तसेच हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यास चार वर्षे लागणार आहेत असे रेल्वे कडून खासदार राजन विचारे यांना कळवले आहे.

तसेच नव्याने होणाऱ्या रेल्वे मार्गामुळे भाईंदर व मीरा रोड या रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मान्यता घेण्यात येईल व त्यानंतर या रेल्वे स्थानकात गाड्यांना थांबा मिळू शकेल असे कळविले आहे. जोधपूर, जयपूर, अजमेर, उदयपूर अहमदाबाद या व इतर राज्यात जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या येताना व जाताना थांबा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहे असे खासदार राजन विचारे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

खासदार राजन विचारे यांनी पश्चिम रेल्वेला विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना रेल्वे प्रशासनाकडून या दोन्ही रेल्वे स्थानकातील पादचारी पूल, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकते जिने, लिफ्ट, तिकीट खिडकी, एटीव्हीएम मशीन, रेल्वे स्थानकातील फेऱ्या, शौचालय, सुरक्षेसाठी बसविलेले सी सी टीव्ही यावर भर देऊन वाढविण्यात येतील असे रेल्वे प्रशासनाने कळविले.

पुढील प्रश्नांमध्ये होर्डींग ने मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानके झाकली गेली असून नागरिकांना अडथळा ठरत आहेत ती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावी अशी मागणी वारंवार करून सुद्धा रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यावर बाधित ठरणारी सर्व होल्डिंग काढून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केली जातील असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

पुढील प्रश्नांमध्ये खासदार राजन विचारे यांनी भाईंदर पश्चिम फाटक रोड येथील भुयारी मार्गाच्या दुरवस्थेबाबत विचारले असता रेल्वे प्रशासनाने या कामाच्या निविदा प्रक्रिया 30 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होऊन महानगरपालिके मार्फत रस्त्याचे काम मार्गी लागेल असे कळविले आहे. तसेच या ठिकाणी नवीन उड्डाणपुलासाठी प्राधिकरणामार्फत आराखडा प्राप्त झाल्यास डिपॉझिट टर्म वर उड्डाणपुलाची निर्मिती करू शकतो असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मिरा-भाईंदरकरांसाठी खुश खबर! कोव्हीड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला लवकरच होणार सुरुवात !

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठी महापालिकेची तयारी युध्दपातळीवर सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत महापालिकेसह खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी शिक्षिका यांच्यासह अन्य–कोविड योद्ध्यांचे लसीकरण करणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.

पालिका प्रशासनाने सोमवार दि.21/12/2020 रोजी कोरोना लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा व नियोजनासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सिटी टास्क फोर्स सभेचे आयोजन केले होते.

या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, पोलिस उप-आयुक्त वि.एम.सागर, महापालिका उपायुक्त संभाजी वाघमारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ, लसीकरण अधिकारी डॉ. अंजली पाटील, हिवताप अधिकारी, शहर क्षयरोग अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. जळगावकर, वैद्यकीय अधिक्षक, नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, विविध वैद्यकीय संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, बालविकास प्रकल्प अधिकारी, बालरोग तज्ज्ञ, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, आयएफएम, लायन्स क्लब प्रतिनिधी, एनएसएस कॉडीनेटर रॉयल कॉलेज, एकात्मिक बालविकास प्रकल्प प्रतिनिधी, रोटरी क्लब प्रतिनिधी इ. उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. जळगावकर यांनी कोविड लसीकरणाची कार्यपध्दती व रुपरेषा कशाप्रकारे राहील याबाबतची माहिती दिली. यानंतर महानगरपालिकेतर्फे लसीकरण मोहिम राबविण्यासाठी केलेल्या तयारीचे सादरीकरण करण्यात आले. कोविड लसीकरण उपक्रमाची यशस्वी अमंलबजावणी करण्याच्या दृष्टीने उपस्थित सदस्यांचा सहभाग कशा प्रकारे असेल याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.

कोविड-19 लसीकरण अंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी महानगरपलिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत 21 आरोग्य संस्थामधील 1688 कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील 671 संस्थामधून 4148 कर्मचारी अशाप्रकारे एकूण 5836 कर्मचाऱ्यांची संगणीकृत नोंदणी शासन निर्देशित कोविन ऍ़पमध्ये करण्यात आली आहे. लसीकरणास सुरूवात झाल्यानंतर नोंदणीकृत व्यक्तींच्या मोबाईलवर लसीकरण दिवस आणि स्थळ याचा संदेश प्राप्त होणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी
प्रतीक्षालय, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष असे तीन स्वतंत्र कक्ष असणार आहेत.

प्रत्येक पथकामध्ये 1 व्हॅक्सीनेटर ऑफीसर व 4 व्हॅक्सीनेशन ऑफीसर यांचा समावेश राहील. एका पथकामार्फत 100 व्यक्तींना लस दिली जाईल. या लसीकरण मोहिमेसाठी राज्य तसेच जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण 17 डिसेंबर 2020 रोजी पूर्ण झाले असून आरोग्य केंद्र स्तरावर परिचारिका/औषध निर्माण अधिकारी / प्रसविका /बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी/टीबीएचव्ही/ आशा स्वयंसेविका / अंगणवाडी सेविका इ. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

लसीकरणांनंतरही त्रिसुत्रीचे पालन करणे बंधनकारक!

लसीकरण झाल्यानंतर ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करून चालणार नाही आणि पूर्वी प्रमाणे त्रिसूत्री नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. वारंवार हातधुणे अथवा सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क घालणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसुत्रीचे पालन करणे बंधनकारक आहे. या बैठकीत सर्व संस्थान आवश्यकतेनुसार अपेक्षित मनुष्यबळ, लसीकरणासाठी जागा, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग इ. पूरक बाबी महानगरपालिकेस उपलब्ध करून देणेबाबत आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्यामार्फत सूचित करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कॅव्हिड क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच या लसीकरणाचा लाभ मिळणार असला तरी येणाऱ्या काळात सामान्य नागरिकांना देखील कोव्हीड-१९ च्या लसीकरण मोहिमेत सामील करण्यात येणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांकरिता हि बातमी निश्चितच दिलासा देणारी आहे. असे असले तरी सर्व सामान्यांनी देखील त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करायलाच हवे.

ग्लोबल रूग्णालयातर्फे ‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’ शस्त्रक्रियेद्वारे एक वर्षाच्या मुलासाठी यकृतदान

मुंबई, प्रतिनिधी : परळ येथील ग्लोबल रूग्णालयात ‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’ शस्त्रक्रियेद्वारे ३२ वर्षीय व्यक्तीने यकृतदान करून आपल्या एक वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहे. पश्चिम भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. रवी मोहंका यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे.

यकृतदानाच्या पारंपारिक पद्धतीत शरीराला चीर देऊन ही शस्त्रक्रिया केली जात होती. परंतु, टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रियेत नाभीच्या खाली लहानसे छिद्र देत ही शस्त्रक्रिया केली जाते. लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट (एलडीएलटी) शस्त्रक्रियेमुळे आता अवयवांच्या प्रतिक्षा यादीवर असणाऱ्या रूग्णांचा मृत्यूदर कमी होत चालला आहे. अनेक रूग्णांना दात्याकडुन मिळालेल्या यकृतामुळे नवीन आयुष्य मिळत आहे.

नयूम खान हा अवघ्या एक वर्षांचा मुलगा असून जन्मतः त्याला बिलीअरी अट्रेसिया हा यकृताचा एक दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील रूग्णालयात या मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी परेल येथील ग्लोबल रूग्णालयात हलवण्यात आले.

याठिकाणी वैद्यकीय चाचणीनंतर यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार ३२ वर्षीय वजीर खान यांनी आपल्या यकृताचा डाव्या बाजूचा भाग मुलाला दान केल्यानंतर या मुलावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकी १० हजार नवजात बालकांपैकी एकाला हा आजार असतो. यात प्रत्यारोपणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो.

परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. रवी मोहंका म्हणाले की, ‘‘या मुलाला असणाऱ्या बिलीअरी अट्रेसिया या दुर्मिळ आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला मुंबईत उपचारासाठी आणले होते. वैद्यकीय चाचणीनंतर मुलाचे प्राण वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचं होते. त्यानुसार वडीलांनी यकृत दान करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यानुसार लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया तंत्राचा वापर करून हेपेटेक्टॉमी करण्याचा निर्णय घेतला. यात दुर्बिणीद्वारे यकृताचा भाग काढून घेतला जातो. टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रिया हा एक सुरक्षित पर्याय आहे. यात कमी वेदना, रक्तस्त्राव कमी होणे आणि गुतांगुत होण्याची शक्यता कमी होते. तरुण दात्यासाठी हा पर्य़ाय अतिशय फायदेशीर आहे.’’

ग्लोबल रूग्णालयातील कॅडॅव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रशांथा राव म्हणाले की, ‘‘यकृतदानाची प्रक्रिया करताना (अंदाजे १५-२० सेंटिमीटर) इतका छेद करावा लागतो. या शस्त्रक्रियेमुळे दात्याला २-३ वर्ष वेदना जाणवू शकतात. परंतु, टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रियेमुळे दात्याला कोणतीही वेदना होत नाही, शरीरावर चट्टे दिसत नाहीत आणि गुतांगुत निर्माण होण्याची शक्यताही खूप कमी असते.’’

लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले की, “सर्व मार्गदर्शक सूचना व प्रोटोकॉलचे पालन करून या मुलावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुलाची प्रकृती सुधारल्यानंतर लवकरच हे कुटुंब दक्षिण आफ्रिकेला परत जाणार आहेत.”.

‘‘आमच्या रूग्णालयातील यकृत शस्त्रक्रियेसाठी असणाऱ्या डॉक्टरांची टीम रूग्णांना अत्यंत दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत. लॅप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रिया ही मोजक्याच केंद्रांमध्ये केली जात आहे. आमच्या रूग्णालयात ही अशी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने आम्ही आनंदी आहोत.

ही शस्त्रक्रिया लँप्रोस्कोपिक पध्दतीद्वारे करण्यात आली असून दात्याकडून यकृताचा काही भाग घेण्यात आला आहे. ही प्रकिया अतिशय सुलभ असल्याने यकृताच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना यकृतदान करण्यासाठी अनेकांना प्रोत्साहन देईल’’, असे ग्लोबल रूग्णालयातील (मुंबई) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर यांनी सांगितले.

रूग्ण वजीर खान म्हणाले की, “ग्लोबल रूग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने केलेल्या उपचाराबद्दल मी आभारी आहे. बाळ आता रडत नसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे, हे पाहून आनंद होत आहे. पूर्वी बाळ नेहमी आईजवळच राहत होते. परंतु आता ते पहिल्यांदा माझ्या कुशीत झोपले. ही भावना माझ्यासाठी खूप खास आहे. यकृतदानाच्या शस्त्रक्रियेमुळे मला फार वेदना झाली नाही. आम्ही उपचारांसाठी भारतात येणाऱ्या घेतलेला निर्णय योग्य ठरला आहे.”

लोखंडी रॉडने मारहाणीत जखमी झालेल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची पत्नीची मागणी!

मीरारोड, प्रतिनिधी : मीरारोड पूर्वेकडील मीरा गावठण भागात राहाणाऱ्या शंभू जाधव नावाच्या इसमाचा गेल्या २६ ऑक्टॉबर रोजी त्याच्या राहत्या घरी संशयास्पद रित्या मृत्यू झाला. याबाबत त्याची पत्नी सुरेखा शंभू जाधव हिने काशिमीरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन माझ्या पतीचा खून झाला असून खून त्याचाच सख्खा भाऊ दीपक जाधव त्याची पत्नी गुलाब दीपक जाधव आणि आणखीन एक अनोळखी इसम या तिघांनी मिळून केला असल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा सखोल तपास करून दीपक जाधव आणि त्याचे साथीदार यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सुरेखा शंभू जाधव या तक्रारदार महिलेने दिलेल्या माहिती नुसार गेल्या २४ ऑक्टॉबर रोजी शंभू जाधव हा दारूच्या नशेत दीपक जाधव यांच्या घराच्या समोर धिंगाणा घालत होता आणि त्याच वेळी त्याने दीपक जाधव यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दीपक जाधवच्या गाडीची काच फोडली. त्यानंतर दीपक जाधव त्याची पत्नी गुलाब जाधव आणि आणखीन एक अनोळखी इसम या तिघांनी मिळून शंभू जाधव याला लोखंडी रॉड आणि लाकडाच्या दांडक्याने अमानुष मारहाण केली आणि त्याला एका खोलीत कोंडून ठेवले. दोन दिवसांनी शंभू जाधव याचा त्याच खोलीतच मृतदेह आढळून आला.

दीपक जाधव याने पोलिसांना न कळविता किंवा त्याच्या मुलांना, पत्नीला देखील न कळवता किंवा त्याचे इतर नातेवाईक यांना देखील न कळविता शंभू जाधवचा अंतिम संस्कार देखील घाई-गडबडीत उरकून टाकला. मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यासाठी मृत्यूचा दाखल्याची आवश्यकता असते त्यासाठी दीपक जाधवने त्याच परिसरातील डॉक्टर पांडे यांच्याकडून शवविच्छेदन न करता मृत्यू दाखला बनवून घेतला आणि शंभू जाधवच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असा आरोप केला असून माझ्या पतीचा खुनाचा झाला असल्याचा आरोप सुरेखा जाधव या तक्रारदार महिलेने केला आहे.

दीपक जाधव, शंभू जाधव आणि त्याचे मयत झाले दोन भाऊ असे एकूण चार भाऊ होते त्यापैकी दोन भावांच्या मृत्यू आधीच झाल्यानंतर त्यांच्या मीरा गावठण परिसरातील कोट्यवधी किमतीच्या त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे शंभू आणि दीपक हे दोघेच वारसदार होते. शंभू जाधव याला दारूचे व्यसन असल्यामुळे हि मालमत्ता एकट्यानेच हडपण्याचा दीपक जाधव हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत होता.

या मालमत्तेयावरून शंभू जाधव आणि त्याचा भाऊ दीपक जाधव या दोघांचे अनेक वेळा भांडण झाले होते आणि दीपक जाधवने शंभू जाधव याला यापूर्वी देखील अनेकवेळा मारहाण देखील केली होती दीपक जाधव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याचेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि म्हणूनच मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने माझ्या पतीचा काटा काढला आहे असा आरोप मयत शंभू जाधवची पत्नी सुरेखा जाधव हिने केला आहे.

शंभू जाधवच्या मुलाने लपून मृतदेहाचे फोटो काढले असून शंभू जाधव यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपात मारहाण केल्याच्या अनेक खुणा दिसत आहेत असे असून देखील आणि शंभू जाधवचा मृत्यू अनैसर्गिकपणे झालेला असून देखील अशोका क्लिनिकचे डॉक्टर पांडे यांनी शंभूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला का नाही? किंवा पोलिसांना देखील का कळविले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर अनैसर्गिक रित्या झाला असल्याचे दिसत असेल किंवा मृतकाच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा दिसत असतील तर डॉक्टरने त्याचा मृत्यू दाखला बनवून न देता ताबडतोब पोलिसांना कळवून त्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले पाहिजे असा नियम असताना देखील डॉक्टर पांडे यांनी घाई गडबडीत मृत्यू दाखला बनविला आणि त्याच आधारावर महापालिकेकडून दहन दाखला बनवून शंभू जाधवच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असून शंभू जाधव हा त्याचा भाऊ दीपक जाधव, त्याची पत्नी गुलाब जाधव आणि त्यांचा साथीदार यांच्या मारहाणीमुळेच मरण पावला असून त्यांचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काशिमीरा पोलीस ठाण्यात शुंभु जाधवची पत्नी सुरेखा जाधव हिचा तक्रार अर्ज दाखल करून घेतला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून परिस्थितीजन्य पुरावे पाहूनच खुनाचा गुन्हा दाखल करायचा कि नाही हे ठरविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात सत्य काय ते पोलिसांच्या तपासानंतरच बाहेर येणार असले तरी एका व्यक्तीचा अनैसर्गिक अवेळी मृत्यू झाला आहे आणि म्हणून त्याच्या मृतात्म्याला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतीय पत्रकार संघ (AIJ) महाराष्ट्र अध्यक्ष एम एस शेख यांनी चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल चे प्राध्यापक अजय कौल सर यांचा केला सत्कार

मिलन शाह, मुंबई : महाराष्ट्र सारा देश, विश्व कोरोनाच्या संसर्गाने ग्रस्त आहे अनेक व्यवसाय, उद्योग धंदे बुडाल्यामुळे सर्वांना त्याची आर्थिक झळ बसली आहे. यामुळेच शिक्षण क्षेत्रातील अनेक अनुदानित विनाअनुदानित काळातील विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र चालू आहे या ऑनलाईन शिक्षणामुळे आज शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षणालाही काही मर्यादा आहेत आज अनेक पालकांची व्यवसाय उद्योग धंदे बुडाल्यामुळे त्याना आर्थिक चणचणीला सामोर जावे लागत आहे.

फी न भरल्यामुळे कोणताही विद्यार्थी शाळेपासून व शिक्षणापासून दूर राहणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची व संस्थाचालकांची आहे असे सांगितले आहे.

गोरगरीब विद्यार्थ्यांना एक आश्रयस्थान असलेले अजय कौल यांनी आपल्या विभागात सामाजिक वसा जपत असताना शिक्षणाचे कार्य अव्याहत चालू ठेवले आहे मोहल्ला कमिटी द्वारे सर्वधर्मसमभाव एकात्मता या राष्ट्रीय ऐक्य या भावना समाजात रुजवल्या आहेत वर्सोवा विभाग म्हणजे सर्वसामान्य गरीब मच्छीमार व मध्यमवर्गी असलेल्या लोकवस्तीचा हा विभाग. कोव्हीड 19 प्रार्दुभावात अनेक गरजूंना वैद्यकीय, आर्थिक तसेच शैक्षणिक मदत केली आहे. अजय कौल सरांच्या कामगिरीबद्दल त्यांना कोरोना योद्धा हा किताब ही देण्यात आला आहे.

अजय कौल सर यांनी केलेल्या कामाची दखल घेत भारतीय पत्रकार संघ (AIJ) महाराष्ट्र अध्यक्ष एम एस शेख यांनी चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल चे प्राध्यापक अजय कौल सर यांचा सत्कार शाल श्रीफळ व भारतीय पत्रकार संघ (AIJ) सन्मान पत्र देऊन सन्मानित केले. याप्रसंगी शाळेचे उप मुख्याध्यापक प्रशांत काशीद, इस्माईल खान, शोहेब म्यानुर उपस्थित होते.