Home Blog Page 32

लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या डोंबिवली पोलीसांनी आवळल्या मुसक्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शहरात नुकतीच शेजार धर्माला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका २२ वर्षीय नराधमाने ६ वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीवर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील आयरेगावात घडली असून याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलीसांनी नराधमाला अटक केली आहे. कुंदन रवींद्र चौहान (वय: २१ वर्ष) असे अटक नराधमाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह डोंबिवली पूर्वेकडील भागात आयरेगाव येथील एका चाळीत राहते. तर नराधम आरोपी हाही त्याच चाळीत शेजारी राहतो. विशेष म्हणजे आरोपी नराधम हा मूळचा उत्तरपदेश मधील आजमगडचा रहिवाशी असून तो काही दिवसापूर्वीच आयरेगावातील नातेवाईकाकडे आला होता. त्यातच ५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी त्याला घरा बाहेर दिसली होती. त्यावेळी तिला बहाण्याने नराधम त्याच्या घरात घेऊन गेला. त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद करत त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतानाच, पीडितीचे आई तिला शोधत होती. त्याचवेळी मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने तिने बंद घराचा दरवाजा ठोकला असता, पीडित मुलगी रडतच बाहेर आली होती. त्यानंतर आईला संशय आल्याने मुलीकडे खोलवर चौकशी केली असता, तिने घडलेला प्रसंग आईला सांगताच आईला मोठा धक्काच बसला.

आईने तातडीने पीडित मुलीला घेऊन डोंबिवली पोलीस ठाणे गाठून मुलीवर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच, पोलीसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून पीडितेच्या २६ वर्षीय आईच्या तक्रारीवरून आरोपी नराधमावर विनयभंगासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला. दरम्यान ७ मे रोजी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत त्याला पोलीसी खाक्या दाखवला असता त्याने अखेर पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर डोंबिवली पोलीसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्या नाराधमाला अधिक पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलीस करत आहेत.

 

नव्या पर्यटन आराखड्याने शिर्डी शहराचं रूप पालटणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री विखे-पाटील यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला.

महसूलमंत्री विखे-पाटील यांनी आज सकाळी श्रीसाईबाबा समाधी मंदीराचे दर्शन घेत शिर्डी सौंदर्यकरणाच्या आराखड्याची प्रत साईचरणी अर्पण केली. शिर्डी संस्थान सभागृहात वास्तूविशारद तज्ज्ञ अजय कुलकर्णी यांनी या सौंदर्यकरण आराखड्याचे चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केले. त्यानंतर पत्रकारांशी महसूलमंत्र्यांनी संवाद साधला. याप्रसंगी शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की , शिर्डी शहर, मंदीर परिसर, परिक्रमा मार्गाचे सुशोभीकरण करून ठिकठिकाणी सौंदर्यस्थळे विकसित व्हावीत यासाठी राज्यशासनाकडून शिर्डीसाठी ५२ कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मंदीरासमोरील पादचारी मार्ग, शहरातील मुख्य प्रवेश मार्ग, मुख्य चौक, मंदीर आवारातील पादचारी मार्ग, शिर्डी परिक्रमेचा १४ किलोमीटरचा मार्गाच्या सौंदर्यीकरणाचे सुनियोजन करण्यात आले आहे.

काय आहे विकास आराखड्यात ?

पहिल्या टप्प्यातील कामांना तीन महिन्यात सुरूवात होईल. सौंदर्यकरण, सुशोभीकरण करताना ग्रामस्थांच्या सूचनांचाही गांभीर्याने विचार करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी गावाच्या मूळ ढाच्याला कोठेही धक्का लागू न देता शिर्डी शहराचा अंर्तबाह्य चेहरामोहरा बदलण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५० कोटी रूपये खर्चून श्री साईबाबांच्या जीवनाची माहिती देणारा ‘थीम पॉर्क’ उभारण्यात येणार आहे. शेती महामंडळाच्या जागेवर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी ७० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

शिर्डी विमानतळावर एकाच वेळेस १२ विमाने थांबतील असे नवीन टर्मिनल इमारतीसाठी ६०० कोटी मंजूर झाले आहेत. लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. शेती महामंडळाच्या जागेवर ‘लॉजिस्टिक पार्क’, ‘इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे ही महसूलमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी येणार

श्री साईबाबा वातानुकूलीत दर्शनरांग इमारत, शैक्षणिक संकुल व निळवंडे धरण पाणी कालव्याचे लोकार्पणासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याचवेळी भव्य शेतकरी मेळावा घेण्याचे प्रस्तावित आहे. राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आमंत्रणास पंतप्रधान कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. असे ही महसूलमंत्र्यांनी विखे पाटील यावेळी सांगितले. लवकरच मंदीरात सातबाराधारक स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून फुल विक्रीला सुरूवात होणार असल्याची विखे-पाटील यांनी सांगितले.

सौंदर्यकरणाचा प्रस्तावित आराखडा

शहर नियोजक तथा वास्तूविशारद तज्ज्ञ अजय कुलकर्णी यांनी शिर्डी परिसर सौंदर्यकरणाचा आराखडा तयार केला आहे. शिर्डी श्री साईबाबा मंदीर परिसरातील पादचारी मार्ग, परिक्रमेचा १४ किलोमीटर मार्ग, ५ एकर परिसरात साई वृंदावन पार्क विकसित करणे, दांडीच्या धर्तीवर पर्यावरणपूरक सोलर बगीचा, शहरातील प्रवेश मार्गातील चौकांमध्ये तसेच शहरातील मुख्य चौकात सौंदर्यस्थळे विकसित करणे, परिक्रमा मार्गावर त्रिकोणी खांबावर कोरीव साईचरित्र आदी विशेष कामे पहिल्या टप्प्यातील आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहेत.

या सुशोभिकरणाच्या कामांसाठी स्थानिक स्तरावर तयार करण्यात आलेले फर्निचर, दगड, वीटांचा वापर करण्यात येणार आहे. या कामांमध्ये साईनेज डिझाईन, पुरेशा वॉश रूम, लँडस्केपची कामे, भूयारी पादचारी मार्ग, झाडे-झुडपांसह नैसर्गिक सजावट, आकर्षक बैठक ‌व्यवस्था, ग्राफिक्स, भित्तीचित्रे, पर्यायी मार्ग, अल्प उपहार केंद्र, विश्रांती कक्ष, मदत केंद्र, पर्यटन माहिती केंद्र, सीसीटीव्ही, रेन वॉटर हॉर्वेस्टींग, वॉटर पॉईंट इत्यादी प्रस्तावित करण्यात आले आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या या वर्षीच्या परेड मध्ये केवळ महिलाच महिला दिसणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महिला सक्षमीकरणासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून यंदा २०२३ साली झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही महिला सक्षमीकरणाची झलक दिसली. आता केंद्र सरकारने २०२४ मध्ये होणाऱ्या ‘प्रजासत्ताक दिन परेड २०२४’ संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. लष्करी आणि इतर क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या प्रमुख प्रयत्नात, २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केवळ महिलाच प्रदर्शन मार्च पास्टमध्ये भाग घेतील.

सूत्रांनुसार, संरक्षण मंत्रालयाच्या औपचारिक शाखेने सर्व सुरक्षा दलांना तसेच इतर महत्त्वाच्या भागधारकांना एक नोट पाठवली आहे जी इतर सर्व मंत्रालये आणि विभागांच्या समन्वयाने प्रजासत्ताक दिन परेडचे आयोजन करते. “तपशीलवार विचारविमर्शानंतर, प्रजासत्ताक दिन २०२४ च्या कर्तव्याच्या मार्गावर परेड दरम्यान दल (मार्च आणि बँड), झलक आणि प्रात्यक्षिकांसह सर्व महिलांचा सहभाग असेल,” असे ते म्हणाले.

संरक्षण मंत्रालयाने येत्या वर्षात सर्व महिलांची परेड आयोजित करण्याचा निर्णय गृह, संस्कृती आणि शहरी विकास मंत्रालयासह इतर मंत्रालयांना सुद्धा कळवला आहे.

 

साडेतीन किलो सोने जप्त करत मुंबई विमानतळावर तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रात महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) मोठे यश मिळाले आहे. डीआरआयने मुंबईत जवळपास ३.३५ किलो सोने जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे २.१ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे डीआरआयने ही कारवाई केली आहे.

काय प्रकरण आहे ?

गुप्तचर माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शोध घेतला. यावेळी त्यांनी एक प्रवासी, ड्युटी फ्री शॉपचे काही कर्मचारी आणि फूड कोर्टचे काही कर्मचारी पकडले. त्याच्याकडूनच ही वसुली करण्यात आली.

असे आहे रॅकेट

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार हे सोने पेस्टच्या स्वरूपात जप्त करण्यात आले आहे. त्याचे वजन सुमारे ३.३५ किलो आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे २.१ कोटी रुपये इतकी आहे. विमानतळाचे कर्मचारी हे तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेऊन विविध ठिकाणी पुढील व्यक्तीकडे सुपूर्द करायचे.

 

कल्याणमध्ये स्विफ्ट गाडीच्या डिक्कीतून बेशुद्धावस्थेत गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी; पोलीसांना पाहून आरोपी फरार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण पश्चिम येथे गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध झालेल्या गोवंशीय जातीची जनावरं स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन तस्करी सुरु होती. कल्याण बाजारपेठ पोलीसांनी छापा मारून एका आरोपीला ताब्यात घेत २ गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. तर ५ आरोपी फरार झाले आहेत. कल्याण पश्चिमेत गोवंशीय जातीच्या जनावरांना गुंगीचे औषध देत बेशुद्धावस्थेत स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन तस्करी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी छापा मारत सोयब निजाम करके या आरोपीला रंगेहाथ पकडत २ गोवांशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. बाजारपेठ पोलीसांनी एक रिक्षा आणि २ स्विफ्ट गाड्या असा एकूण २,६०,००० /- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमनानुसार गुन्हा दाखल करत या तस्करीत फरार झालेल्या ५ आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कल्याण बाजारपेठ पोलीसांना कल्याण पश्चिमेकडील रेतीबंदर खाडी परीसरात जीन्स कारखान्याजवळ सार्वजनिक मोकळी जागा आहे. या ठिकाणी गाईंना आणून त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोलप यांना मिळाली होती. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि अरुण घोलप, पोलीस हवालदार सचिन साळवी, प्रेम बागुल, बाविस्कर, पावसे व पोलीस नाईक कातकडे, फड यांच्या पथकाने कल्याण पश्चिम येथील सर्वोदय सागर इमारतीच्या शेजारी खाडीकिनारी छापा मारत आरोपी सोयब निजाम करके (वय: ३२ वर्ष) याला रंगेहात पकडत २ गाईंची सुटका केली. तर या छापेमारी दरम्यान १) इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी, २) अरबाज, ३) गोरू, ४) मच्छी, ५) आवली, ६) बारक्या असे सहा आरोपी फरार झाले आहेत. नमूद २ गोवंशीय जातीच्या जनावरांना बापगांव गोशाळा येथे पुढील संगोपनासाठी जमा करण्यात आले आहे.

बाजारपेठ पोलीसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी संगनमत करून ग्रामीण भागात रानामध्ये चारा खात असलेल्या गोवंशीय जातीच्या जनावरांना गुंगीचे इंजेक्शन मारायचे आणि नंतर ही जनावर खाली बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना एका चादरीमध्ये गुंडाळून पाच ते सहा जण मिळून त्यांना स्विफ्ट गाडीच्या डिक्कीमध्ये भरून वाहतूक करून कत्तल  करायचे.