Home Blog Page 321

वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पुण्याच्या कोथरूड भागात शिरलेल्या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू !

पुणे, प्रतिनिधी : पुण्यात बुधवारी कोथरुड भागातल्या महात्मा सोसायटीत रानगवा शिरला. पोलीस, अग्निशमन दल, वनविभाग यांनी बघ्यांच्या गर्दीला प्रतिकार करत या रानगव्याची सुटका करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. भुलीचं इंजेक्शन देऊन तसंच जाळीचा वापर करून त्याला रोखण्यात आलं. भूगावच्या प्राणी केंद्रात त्याला नेण्यात आलं. मात्र रानगव्याने तिथे प्राण सोडले.

मानवी वस्तीत येणाऱ्या प्राण्यांच्या निमित्ताने प्राणी विरुद्ध माणसं हा संघर्ष अनेक महानगरांमध्ये तीव्र होताना दिसतो आहे. पुण्यातल्या गच्च लोकवस्तीच्या भागात आलेल्या रानगव्याविषयी फार माहितीही लोकांना नव्हती.

सुरुवातीला अनेकांना म्हैसच वाटली, मात्र रंग, चेहरा आणि आकारमान पाहून हा वेगळा प्राणी असल्याचं स्थानिकांच्या नंतर लक्षात आलं.

पुण्यातल्या शहरी भागात आलेला गवा नर होता. त्याचं वजन जवळपास 700 ते 800 किलो एवढं होतं. पाच ते साडेपाच फूट एवढी त्याची उंची होती.

पुणे शहरालगतच्या मुळशी, वेल्हा, पुरंदर हे तालुके आहेत. या भागात दाट झाडी आणि डोंगरारांगा आहेत. पुण्याच्या काही भागात बिबट्या आला होता. सात वर्षांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरात गवा आला होता.

“पश्चिम घाट परिसरात रानगवे सर्रास आढळतात. एका रानगव्याचं वजन साधारण 700-1000 किलो असू शकतं. आकारमान मोठं असलं तरी हा प्राणी लाजाळू असतो,” असं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितलं.

त्यांनी रानगव्याच्या गुणवैशिष्ट्यांसंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की, “पुण्यात घडलेल्या प्रकारातही गव्यासमोर पाचशेहून अधिक माणसं होती. त्यांच्यापैकी एकालाही छोटी जखमही झाली नाही. गव्याने त्यांना काहीही केलं नाही. म्हैस असती तर उपस्थित लोकांपैकी एखाद्याला फ्रॅक्चर किंवा गंभीर जखम झाली असती. रानटी म्हशी आक्रमक असतात, त्या एकत्र येऊन सिंहावर हल्ला करू शकतात पण गवा तसं करत नाही. कळपाने राहतात.”

“गव्याची घाणेंद्रियं तीक्ष्ण असतात. त्यामुळे वास तीव्रतेने कळतात मात्र ऐकण्याची क्षमता आणि दृष्टी तितकी सक्षम नसते. प्रचंड शरीर आणि वास ओळखण्याची हातोटी हे गव्याचं गुणवैशिष्ट्य असतं,” असं खरे यांनी सांगितलं.

“पूर्ण वाढ झालेल्या गव्याचं वजन हजार किलोपर्यंत असू शकतं. गव्याला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे पायांचा रंग. पायात मोजे घालावे तसा हा रंग असतो. त्याला स्टॉकिंग्ज म्हणतात. हा रंग गव्याला म्हशींपासून वेगळा करतो. नोव्हेंबर ते मार्च हा गव्यांचा प्रजननकाळ असतो.

“गवे सहसा माणसांवर हल्ले चढवत नाहीत. गव्यांमध्ये आपापसात मारामारी होतात पण मुद्दाम त्यांनी माणसावर हल्ला केला असं होत नाही. पुण्यात आलेल्या गव्याने कोणालाही जखमी केलं नाही. कात्रजच्या केंद्रात त्याच्या जखमांवर उपचार करून त्याला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात नेणार होते. मात्र प्रचंड गर्दी, आवाज याने तो गोंधळून गेला आणि त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.”

पुण्याच्या आसपास गव्यांचा अधिवास ऐकिवात नाही. बुधवारी पुण्यात शिरलेला गवा आपल्या कळपापासून भरकटला असावा असं त्यांनी स्पष्ट केलं.

“प्राणी मानवी वस्तीत येतात तेव्हा गोंधळलेले, घाबरलेले असतात. गर्दी न करता त्यांना मोकळीक दिली तर वनविभाग योग्य ती कार्यवाही करून संबंधित प्राण्याला त्याच्या अधिवासाच्या ठिकाणी किंवा जवळच्या जंगलात सोडून देतात. गर्दीला रोखण्यात पोलीस तसंच स्थानिक प्रशासनाची भूमिकाही मोलाची असते.

“पाण्याचा फवारा मारणं तसंच प्राण्याला रोखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये अग्निशमन दलाची महत्त्वाची असते. या विभागांमधील समन्वयातून प्राण्याला परत सुरक्षितपणे जंगलात पाठवता येऊ शकतं. सर्वसामान्य माणसांनी अशा परिस्थितीत घरी राहावं,” असं पेठे यांनी सांगितलं.
असं असले तरी वन विभागाने वेळेवर काहीतरी करून रानगव्याला सुरक्षित स्थळी नेले असते तर या रानगव्याचे प्राण वाचू शकले असते अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरु करण्याची आमदार बाबासाहेब पाटील यांची मागणी

चाकूर-लातूर, प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षापासून मंजुरी मिळून देखील लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित असून हे रखडलेले काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की, २०१२ – १३ मध्ये लातूररोड नांदेड या १५५ कि. मी.रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली होती त्यानुसार या रेल्वे मार्गाच्या सर्वेचे काम २०१६ मध्येच पूर्ण झाले असून या रेल्वे मार्गासाठी दोन हजार ५२ कोटी ९३ लक्ष अंदाजित खर्चास मंजुरी ही मिळालेली आहे. परंतु अद्यापही या कामाला सुरुवात झालेली नाही. हा रेल्वे मार्ग गुलबर्गा ते नांदेड असा असून लातूररोड जंक्शन वरुन अहमदपूर लोहा मार्गे नांदेड जाणार असल्यामुळे या रेल्वे मार्गामुळे प्रवाशी नागरीकाबरोबरच व्यापाऱ्यांना देखील मोठा फायदा होणार असून व्यायसायिक दृष्ट्या लातूररोड हे औद्योगिक केंद्र बनणार आहे.

त्यामुळे रेल्वेच्या उत्पनातही वाढ होणार आहे. हा रेल्वे मार्ग मराडवाठा विभागाचे भुषण ठरणार आहे. याकरिता या भागातील लोकांची गरज लक्षात घेवून लवकरात लवकर रखडलेल्या लातूररोड नांदेड या रेल्वे मार्गाचे काम सुरु करावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. लातूर रेल्वे स्थानकावर आ. पाटील यांनी सोलापूर विभागाचे रेल्वेचे उपायुक्त एस. सी.जैन, आर.पी.गुजराल, मुकेश लाल, व्ही.पी. चौधरी या अधिकाऱ्यांना निवेदन.दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, माजी जि.प सदस्य दयानंद भाऊ सुरवसे, गणेश फुलारी, सिध्देश्वर अंकलकोटे, अनिल वाडकर, गणपत कवठे, तुकाराम जाधव, बिलाल पठाण, विजय मारापल्ले आदीसह अनेकजण उपस्थित होते.

बाबासाहेब पाटील – लातूर-मुंबई रेल्वे पूर्वीप्रमाणेच तिरुपती विशेष रेल्वे चालू करा!
लातूर ते मुंबई व मुंबई ते लातूर ही रल्वे सध्या आठवड्यातुन चार दिवस सुरु आहे परंतु या रेल्वेसाठी प्रवाशी संख्या जास्तच असल्याने पूर्वीप्रमाणे आठवड्यातून सातही दिवस नियमित रेल्वेसेवा चालू करून प्रवाशांची गैरसोय दुर करावी. तसेच तिरुपतीला जाण्यायेण्यासाठी विशेष लातूर तिरुपती रेल्वे सुरु करुन तिरुपती भक्तांची सोय करावी.

मिरा- भाईंदरमध्ये भराव माफियांच्या धुमाकुळीकडे महसूल अधिकारी, पालिका – पोलिसांसह राजकारण्यांची “अर्थपूर्ण” डोळेझाक

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा- भाईंदर शहरामध्ये भराव माफियांनी धुमाकूळ घातला असून राजरोसपणे सीआरझेड, कांदळवन, नैसर्गिक पाणथळ व ना-विकास क्षेत्रात देखील भराव सुरु आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शहर बुडण्याचा धोका वाढला असताना महापालिका, पोलिसांसह राजकारणी नगरसेवक आणि महसूल विभागा कडून मात्र ह्या गंभीर प्रश्नी अर्थपूर्ण रित्या डोळेझाक सुरु आहे.

महापालिकेचे रस्ते – पदपथ व अन्य बांधकाम नव्याने करताना ते तोडल्यावर डेब्रिस मोठ्या प्रमाणात निघते. तसेच जुन्या इमारती पाडून तसेच घर वा वाणिज्य बांधकाम दुरुस्ती मधून डेब्रिस निघते. इमारतीचे पायलिंग व खोदकाम, मेट्रोचे खोदकाम आदी मधून माती – दगड आदी मोठ्या प्रमाणात निघत आहे. शिवाय मुंबईतून भरणीसाठी येणारे डंपर सुद्धा मोठ्या संख्येने आहेत.

कांदळवना सह नैसर्गिक पर्यावरण, पाणथळ, सीआरझेड व नाविकास क्षेत्र आदी संवेदनशील क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेसह नगरसेवक, पोलीस, महसूल, वन विभाग आदींची आहे. तसे असताना शहरात राजरोसपणे डेब्रिस आणि माती- दगड आदींची भरणी ह्या संरक्षित क्षेत्रात सुरु आहे. ह्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहेच शिवाय पावसाळ्यात नैसर्गिक पाणी साठवून ठेवणारे हे पाणवठे नष्ट होऊन पुराचा धोका वाढत आहे.

महापालिकेने तर भराव रोखण्यासाठी पथके नेमली असून स्वच्छता निरीक्षक , कनिष्ठ अभियंता आणि प्रभाग अधिकारी आदींना भराव रोखण्याची जबाबदारी दिलेली आहे. परंतु माती भराव विरोधी पथके आणि संबंधित अधिकारी वर्ग मात्र जाणीवपूर्वक ह्या बेकायदा भरावां कडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे जो पर्यंत कोणी नागरिक तक्रार करत नाहीत तो पर्यंत राजरोस भराव सुरूच असतात. त्यातच कंस्ट्रक्शन वेस्ट मॅनेजमेंट कायद्या नुसार डेब्रिसचा बेकायदा भराव रोखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु डेब्रिसची सर्रास बेकायदा वाहतूक आणि भराव केले जात असताना पालिका जबाबदारी झटकत आहे.

ह्या भराव माफियांना पोलिसांचा असलेले वरदहस्त देखील गंभीर आहे. कारण डेब्रिस – माती आदीची वाहतूक करणारे डंपर व लहान टेम्पो हे रस्त्यांवरून उघडपणे फिरत असतात. एरव्ही सामानाच्या टेम्पो आदीं पासून नागरिकांना तपासणी साठी अडवणाऱ्या पोलिसां कडून हे भरणीचे डंपर, टेम्पो मात्र कसे दिसत नाहीत? असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत. पोलिसांचे बिट मार्शल व अधिकारी नियमित गस्त घालतात पण ह्या भराव व भरणी माफियांकडे कानाडोळा करतात. वास्तविक कांदळवन समिती मध्ये पोलीस देखील असून त्यांची सुद्धा कांदळवन संरक्षणाची जबाबदारी आहे.

एरव्ही उठसुठ सोशल मीडियावर फोटोसेशन करणारे व मनासारखे झाले नाही तर तक्रारी व सभागृहात ओरडणारे पालिका पदाधिकारी, नगरसेवक तसेच राजकारणी देखील ह्या बेकायदा भरणी आणि भरणी माफियां विरुद्ध चकार शब्द काढत नाहीत. नगरसेवकांच्या प्रभागात डेब्रिस आणि मातीची भरणी चाललेली असताना सुद्धा त्या विरोधात कारवाई साठी पुढाकार घेत नाहीत. माती – दगड भरावाच्या कारवाईची जबाबदारी महसूल विभागावर मुख्यत्वे असली तरी इतक्या मोठ्या क्षेत्रासाठी केवळ चार ते पाच तलाठी कुठे पुरणार असा सवाल केला जातो. पण तलाठी – मंडळ अधिकारी स्वतःहून गस्त घालून ह्या माफियांना जरब बसवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत.

एकूणच ह्या बेकायदेशी भराव आणि माफियांनी बिनधास्तपणे घातलेल्या धुमाकुळास नगरसेवकां पासून पालिका, पोलीस, महसूल आदी सर्वच यंत्रणांचा वरदहस्त असल्याचे नाकारता येणार नाही. भरणी करून खाजगी जमीन मालक, विकसक आदींना भूखंड तयार करून दिले जातात. खाजगीच नाही सरकारी जागेत देखील भराव मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. भराव करून अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. भराव टाकण्यासाठी वरून पैसे सुद्धा मिळतात. बक्कळ फायद्याच्या ह्या भरावाच्या बेकायदेशीर धंद्यात अनेकांचे उखळ पांढरे होत असल्यानेच ह्या माफियांवर ठोस कारवाई केली जात नसल्याचे आरोप होत आहेत. या संदर्भात परिमंडळ १ मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही .

“नंदकिशोर देशमुख (अपर तहसीलदार) – शहरासाठी आमच्याकडे केवळ चार – पाच तलाठीच आहेत तरी तक्रारीच्या अनुषंगाने कांदळवनात भराव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व दंडाची कारवाई केली जाते. महापालिका आणि पोलिसांना संयुक्त बैठक बोलावून कार्यवाहीची रूपरेषा ठरवण्यात येईल .

“दिलीप ढोले (अतिरिक्त आयुक्त , महापालिका)- महापालिके कडून ह्या प्रकरणी अजिबात दुर्लक्ष केले जाणार नाही. भराव झालेल्याची माहिती तपासून त्यावर तात्काळ आवश्यक ती कारवाई केली जाईल . वॉटर बॉडीज – कांदळवन मधील भराव काढून घेतला जाईल . कांदळवन व वॉटरबॉडी शहरासाठी महत्वाच्या आहेत .

भाईंदर पूर्वेकडील नवघररोडवर ओमसाई गेस्ट हाऊसमध्ये लागली भीषण आग! अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखून आटोक्यात आणली आग

भाईंदर, प्रतिनिधी : भाईंदर पूर्वेकडील नवघररोडवर असलेल्या भाजपचे माजी नगरसेवक यशवंत कांगणे यांच्या ओमसाई गेस्ट हाऊस या हॉटेलमध्ये काल रात्री उशिरा अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

आगीचे नेमके कारण अजून समजले नसले तरी विजेच्या तारेमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाच्या हॉटेलमध्ये लागलेल्या या आगीत हॉटेलचे किचनचे सामान, फर्निचर, फास्टफूडचे काउंटर, पानाची गादी, पार्टिशन, मुख्य प्रवेशद्वाराचे फर्निचर व इतर वस्तू असे एकूण अंदाजे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज असून ह्या हॉटेलचे नूतनीकरण गेल्या काही महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. संपूर्ण हॉटेलचे बांधकाम दुरुस्ती करून त्याचे इंटेरिअरचे काम नवीनच करण्यात आले होते.

अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचल्याने ओमसाई गेस्ट हाऊस लागलेली आग आटोक्यात येऊन परिसरातील इतर इमारतीना होणारा आगीचा धोका टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थानक अधिकारी सदानंद पाटील, बिट फायरमन विठ्ठल भाबल, संजय मोरे, वासुदेव भोईर सह इतर अग्निशमन जवानांनी आपले कर्तव्य बाजावत ही आग वेळेवरच आटोक्यात आणली.

भाईंदर पूर्वेला नवघररोडवर असलेले भाजपचे वादग्रस्त माजी नगरसेवक असलेले यशवंत कांगणे यांच्या मालकीचे असलेले हे ओमसाई गेस्ट हाऊस आधीपासूनच अनधिकृतपणे बनविण्यात आले असल्यामुळे वादग्रस्त ठरले होते आणि आता काही दिवसांपूर्वीच या होटेलची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात आले होते तरी देखील ही कशी आग लागली? किंवा ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आली? याबाबत तर्कवितर्क करण्यात येत आहेत. यात सत्य परिस्थिती काय आहे ते अग्निशमन दलाच्या चौकशी नंतर लवकरच स्पष्ट होणार आहे.

आजीवन काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेला मिरा-भाईंदर शहरातील काँग्रेसचा आधारस्तंभ हरवला!

भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर शहरात राजकीय पटलावर अगदी सरपंच पदापासून अनेक पदं भूषविलेले काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, महानगरपालिकेचे माजी महापौर तुळशीदास दत्तू म्हात्रे यांचे दिर्घ आजारामुळे मंगळवार 01 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मिरा-भाईंदर शहराच्या कॉंग्रेसमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन सोबतच प्रदेशाध्यक्ष आणि महासूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर अनेक नेत्यांनी दुःख प्रगट केले असून त्यांना श्रद्धांजली वाहीली आहे.

संपुर्ण आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असेलेले तुळशीदास म्हात्रे यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात मिरा-भाईंदर शहराच्या सरपंच पदापासून सुरू केली तर त्यांचा हा राजकीय प्रवास मिरा-भाईंदर शहराचे महापौर पदापर्यंत पोहोचला होता. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात करत असताना काँग्रेसचे पक्ष्याचे ब्लॉक अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, स्थायी समिती सभापती आणि महापौर अशा प्रकारची अनेक महत्त्वाची पदे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भूषवली आहेत तसेच ते आगरी समाजाचे नेते देखील होते.

त्यांच्या संपूर्ण आयुष्यात काँगेस पक्षाच्या वाढीसाठी केलेले त्याग आणि समर्पण हे फार मोलाचे आहे आणि म्हणूनच त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला कधीही भरून न-निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना काँगेसचे जेष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा पश्चात्य त्यांना दोन मुले व सुना नातू-नातवंड असा संयुक्त परिवार आहे.
माजी महापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुळशीदास म्हात्रे यांच्या निधनामुळे अनुभवी समर्पित लोकसेवक हरपला असल्याचे बोलत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तुळशीदास म्हात्रे यांना श्रद्धांजली वाहिली.