Home Blog Page 320

भारताच्या फायद्यासाठी दिशाभूल करणारी मोहीम तब्बल 15 वर्षं चालवण्यात आली?

दिल्ली : भारताच्या फायद्यासाठी दिशाभूल करणारी मोहीम तब्बल 15 वर्षं चालवण्यात आली आणि यासाठी किमान 750 खोटी माध्यमं (Fake Media Outlets) आणि बंद पडलेल्या अनेक संस्थांसोबतच मरण पावलेल्या एका प्राध्यापकाचाही वापर करण्यात आल्याचं एका तपासातून उघडकीला आलंय.

ज्या व्यक्तीच्या नावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याची पायाभरणी करणाऱ्या मूळ संस्थापकांपैकी एक होते आणि 2006मध्ये वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं.

“आम्ही उघडकीला आणलेलं आतापर्यंतचं हे सर्वांत मोठं नेटवर्क आहे,” EU डिसइन्फोलॅबचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अॅलेक्झांद्रे अलाफिलिपे सांगतात. याच EU डिसइन्फोलॅब हा तपास करून बुधवारी याविषयीचा एक प्रदीर्घ अहवाल प्रकाशित केलाय.

“आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी आणि युनायटेड नेशन्समधील ह्युमन राईट्स काऊन्सिल आणि युरोपियन पार्लमेंटच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याच्या प्राथमिक हेतूने या नेटवर्कची रचना करण्यात आली होती,” असं EU डिसइन्फोलॅबने म्हटलंय.

EU डिसइन्फोलॅबने हे नेटवर्क गेल्या वर्षी काही प्रमाणात उघडकीला आणलं होतं पण या नेटवर्कच्या कामाचं स्वरूप बरंच विस्तारलं असून सुरुवातीला वाटलं त्यापेक्षा हे जाळं अधिक मोठं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

या नेटवर्कचा भारत सरकारशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत पण खोट्या माध्यमांनी तयार केलेला कन्टेन्ट वा मजकूर जास्तीत जास्त प्रमाणात पसरवण्यावर या नेटवर्कचा मोठा भर आहे. यासाठी या नेटवर्कने एशियन न्यूज इंटरनॅशनल म्हणजेच ANI वृत्तसंस्थेची मदत घेतल्याचं उघड झालंय. ही भारतातली सर्वांत मोठी वृत्तसंस्था असून या तपासादरम्यान या संस्थेवरही लक्ष ठेवण्यात आलं.

भारताचा शेजारी आणि शत्रू देश असणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधातली प्रचारमोहीम राबवणं हा या नेटवर्कचा हेतू असल्याचं ब्रसेल्समधल्या या EU डिसइन्फोलॅबच्या संशोधकांचं म्हणणं आहे. या दोन्ही देशांनी गेली अनेक वर्षं एकमेकांच्या विरोधातल्या कहाण्या सांगितलेल्या आहेत.

65 देशांतून चालवण्यात येणाऱ्या भारताला झुकतं माप देणाऱ्या 265 वेबसाईट्स गेल्यावर्षी संशोधकांनी उघडकीला आणल्या होत्या. दिल्लीस्थित श्रीवास्तव ग्रूप (SG) या होल्डिंग कंपनीशी त्यांचा संबंध असल्याचं आढळलं होतं.

श्रीवास्तव ग्रूपद्वारे चालवण्यात येणारं हे ऑपरेशन 116 देशांमध्ये पसरलं असून त्यांनी युरोपियन पार्लमेंट आणि युनायटेड नेशन्सच्या सदस्यांनाही मोहरा केल्याचं EU डिसइन्फोलॅबने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या – इंडियन क्रॉनिकल्स नावाच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

या SG च्या कारवायांबद्दल युरोपियन युनियन आणि युनायटेड नेशन्सच्या कर्मचाऱ्यांना कितपत माहिती होती आणि या कारवाया रोखण्यासाठी गेल्या वर्षीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना काही करता येणं शक्य होतं का, याविषयीच्या शंका आता उपस्थित केल्या जातायत.

एका नेटवर्कमधल्या विविध घटकांमध्ये दिशाभूल करणारी माहिती (Disinformation) पसरवण्याबाबत इतका समन्वय असल्याचं EU डिसइन्फोलॅबच्या संशोधकांना यापूर्वी कधीच आढळलं नसल्याचं अलाफिलिपे यांनी म्हटलंय.

“गेली 15 वर्षं आणि अगदी गेल्या वर्षी पितळ उघडं पडूनही या नेटवर्कने प्रभावीपणे काम सुरू ठेवलंय. यावरूनच इंडिया क्रॉनिक्लसच्या मागच्या लोकांनी किती बारकाईने आणि झपाटून काम केलंय, ते दिसून येतं. अशी काम योजण्यासाठी आणि करत राहता येण्यासाठी तुमच्याकडे फक्त काही कंम्प्युटर्स असून चालत नाही. त्यापेक्षा जास्त यंत्रणा असावी लागते,” अलाफिलिपे सांगतात.

पण यापुढचा तपास केल्याखेरीज इंडियन क्रॉनिकल्सचा संबंध भारतीय गुप्तचर यंत्रणांशी लावणं योग्य नसल्याचं संशोधकांनी म्हटलंय.

आता उघडकीला आलेलं नेटवर्क हे ‘सर्वाधिक सातत्य असणारं आणि गुंतागुंतीच्या कारवाया करणाऱ्या नेटवर्कपैकी एक’ असल्याचं डिसइन्फर्मेशन नेटवर्कचे तज्ज्ञ असणाऱ्या बेन निम्मो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

निम्मो हे ग्राफिका नावाच्या डिजीटल मॉनिटरिंग फर्मचे इन्व्हेस्टिगेशन्स डायरेक्टर आहेत. याविषयी बोलताना ते यापूर्वी खासगी पातळीवर चालवण्यात आलेल्या मोठ्या ऑपरेशन्सचं उदाहरण देतात. ते म्हणतात, “ही ऑपरेशन्स मोठी आहेत म्हणजे ती थेटपणे एखाद्या देशाद्वारे राबवण्यात येत असावीत, असा याचा अर्थ होत नाही.”

हा सगळा तपास ओपन सोर्स पद्धतीने करण्यात आला. म्हणजे सार्वजनिकरीत्या उपलब्ध असणाऱ्या माहितीद्वारे तपास करण्यात आलाय.

याप्रकारे करण्यात आलेल्या तपासामध्ये श्रीवास्तव ग्रूपचे (SG) युएनची मान्यता असणाऱ्या किमान 10 संस्थांसोबतच इतरांशीही संबंध असल्याचं उघडकीला आलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर टीका करत भारताच्या हेतूंचा पुरस्कार करण्यासाठी या संस्थांचा वापर केला जात होता.

“या अशा थिंकटँक्स आणि NGOवर जिनिव्हामध्ये लॉबिंग करण्याची, निदर्शनांचं आयोजन करण्याची, पत्रकार परिषदेत आणि UNच्या इतर कार्यक्रमांत बोलण्याची जबाबदारी असते. आणि एक मान्यताप्राप्त संस्था म्हणून अनेकदा युएनमध्ये संधी दिली जाते,” असं हा अहवाल म्हणतो.

युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काऊन्सिलची स्थापना झाल्याच्या काही महिन्यांनंतर 2005च्या उत्तरार्धामध्ये श्रीवास्तव ग्रूपच्या नेतृत्वाखालच्या या कारवायांना सुरुवात झाली.

यात एका विशिष्ट एनजीओकडे या संशोधकांचं लक्ष गेलं. या संस्थेचं नाव – कमिशन टू स्टडी द ऑर्गनायझेशन ऑफ पीस (CSOP). 1930च्या दशकात या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि 1975मध्ये तिला UNची मान्यता मिळाली. पण त्यानंतर ही संस्था फारशी कार्यरत राहिली नाही.

याच CSOPचे माजी अध्यक्ष होते प्रा. लुई बी. सॉन. (Prof Louis B Sohn) ते 20व्या शतकातल्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कायदा तज्ज्ञांपैकी एक होते आणि हार्वर्डच्या लॉ स्कूलमध्ये 39 वर्षं त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं होतं.

याच व्यक्तीची नोंदणी CSOPचे प्रतिनिधी लुई शॉन (Louis Shon) म्हणून 2007च्या युएन ह्युमन राईट्स काऊन्सिल च्या सत्रासाठी करण्यात आली. आणि त्यानंतर 2011मध्ये वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या वेगळ्या एका कार्यक्रमासाठीही या नावाने नोंदणी करण्यात आली.

ही नाव नोंदणी पाहून संशोधकांना धक्काच बसला. कारण प्रो. सॉन यांचं 2006मध्ये निधन झालं होतं.

प्रा. सॉन यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचं म्हणत हा तपास अहवाल या संशोधकांनी या प्राध्यपक सॉन यांच्या स्मृतीला अर्पण केलाय.

“2005मध्ये CSOP ला पुन्हा जागृत करत त्या संस्थेची ओळख काहीजणांनी चोरल्याचं आमच्या पहिल्या तपासात आढळलं.”

यासोबतच मान्यता नसणाऱ्या (Non Accredited) इतर काही संस्थांनी पाकिस्तानची प्रतिमा मलिन करायच्या हेतूने, भारताच्या बाजूने शेकडो वेळा हस्तक्षेप केल्याचंही तपासात आढळलं. या संस्थांना मान्यताप्राप्त संस्थांच्या वतीने UNHRC मध्ये संधी देण्यात आली.

इतर वेळी ज्या संस्था आणि एनजीओंचा त्यांच्या धोरणांवरून वरवर पाहता भारत वा पाकिस्तानाशी काहीही संबंध वाटत नसे, अशांना UNHRC मध्ये बोलायची संधी मिळे आणि त्या संस्था आणि NGO पाकिस्तानवर टीकास्त्र सोडत.

मार्च 2019मध्ये UNHRCचं सत्र सुरू असताना युनायटेड स्कूल्स इंटरनॅशनल (USI) या UNची मान्यता असणाऱ्या आणखी एका संस्थेने त्यांचा बोलायचा कालावधी हा अॅम्सटरडॅममधल्या युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीज (EFSAS) नावाच्या संस्थेच्या योआना बाराकोव्हा या प्रतिनिधीला दिला. युनायटेड स्कूल्स इंटरनॅशनलचेही श्रीवास्तव ग्रूपशी थेट संबंध असल्याचं आढळून आलं आहे.

या सत्रामध्ये बोलताना योआना बाराकोव्हा यांनी ‘पाकिस्तानने केलेल्या अत्याचारांविषयी’ आपलं म्हणणं मांडलं. EFSAS ही संस्था USIची भागीदार होती आणि या दोन संस्थांमधल्या तडजोडीमध्ये आपण सहभागी नसल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं. बीबीसीने EEFSASच्या संचालकांशी संबंध साधायचा प्रयत्न केला पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही.

1971मध्ये स्थापन करण्यात आलेली ANI ही वृत्तसंस्थाही SGशी संबंधित भारताच्या बाजूने झुकणाऱ्या मतांना चालना देण्याचं काम करत असल्याचं दिसून येतंय.

ANI स्वतःचं वर्णन ‘भारत, दक्षिण आशिया आणि जगभरामध्ये 100पेक्षा जास्त ब्युरोज असणारी दक्षिण आशियाची आघाडीची मल्टीमीडिया वृत्तसंस्था’ असं करते. भारतातली वृत्त माध्यमं विशेषतः प्रसारमाध्यमं ANIच्या मजकुरावर अवलंबून असतात.

मेंबर्स ऑफ द युरोपियन पार्लमेंट (MEPs) ने लिहीलेले आणि पहिल्यांदा EU क्रॉनिकल या SGशी संबंधित फेक न्यूज साईटवर प्रसिद्ध झालेले लेख ANIने किमान 13 वेळा पुनर्प्रकाशित केल्याचं EU डिसइन्फोलॅबला आढळलं. यातले बहुतेक लेख पाकिस्तानविरोधी होते, तर काही चीन विरोधी होते.

यापूर्वीच्या EU डिसइन्फोलॅबच्या अहवालामध्ये EP टुडे या दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईटचं नाव आल्यानंतर मे 2020मध्ये EU क्रॉनिकल चा जन्म झाला. आधीचीच वेबसाईट बंद करून नवीन नावाने सुरू करण्यात आली.

EU डिसइन्फोलॅबच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय, “या कारवाया घडवून आणणाऱ्यांनी इतरांची नावं आणि ओळख चोरली आणि EU ऑब्झरर्व्हर सारख्या माध्यमांप्रमाणेच स्वतःला भासवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी युरोपियन पार्लमेंटचे लेटरहेड वापरले, वेबसाईट्सची नोंदणी एका नव्या अवतारात आणि खोट्या फोन नंबर्सनिशी केली, युनायटेड नेशन्सना खोटे पत्ते दिले, स्वतःच्य मालकीच्या थिंकटँक्सची पुस्तकं छापण्यासाठी पब्लिशिंग कंपन्या तयार केल्या.

“त्यांनी अनेक पातळ्यांवर फेक मीडिया वापरला आणि एकमेकांचा दाखला देत गोष्टी छापल्या. ज्या राजकारण्यांना खरोखरच महिला आणि अल्पसंख्याकांचे हक्क जपण्याची इच्छा होती त्यांचा गैरवापर जिओपोलिटिकल हेतू साध्य करण्यासाठी करण्यात आला आणि टोकाची भूमिका गाठण्यासाठी कट्टर विचारसरण्याच्या राजकारण्यांना संधी देण्यात आली.”

या सगळ्या ‘प्रभाव पाडण्यासाठीच्या’ प्रयत्नांना अधिकृत भासवण्यासाठी ANI वृत्तसंस्थेचा वापर करण्यात आल्याचं अलाफिलिपे सांगतात. “माहिती पोहोचवण्यासाठीच्या इतर कोणत्याही मार्गापेक्षा विश्वसनीयता मिळवण्यासाठी आणि आपला मजकूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ANIवर सर्वांत जास्त भिस्त होती,” असंही अलाफिलिपे सांगतात.

लेख सौजन्य : बीबीसी मराठी

स्वप्नांची नगरी ‘मुंबई’ सारखी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणं खरोखर शक्य आहे का?

मुंबई, प्रतिनिधी : दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आलेले उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूडच्या 50 हून अधिक प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांची भेट घेतली. उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यात देशातील सर्वांत मोठी ‘फिल्म सिटी’ उभारण्याचा निर्णय घेतलाय.

नोएडामध्ये बनवण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीबद्दल चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारसोबतही चर्चा केली.

प्रोड्युसर आणि दिग्दर्शकांसोबत फिल्म सिटीची रूपरेषा आणि बॉलीवुड समोरील आव्हानं या विषयावरही त्यांनी चर्चा केली.

पण, उत्तरप्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्म सिटीमुळे मुंबईच्या फिल्म उद्योगाला धोका आहे का? यावर बॉलीवुडचं म्हणणं काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक आणि डिस्ट्रीब्यूडर राज बंसल बीबीसीशी बोलताना सांगतात, “हिंदी चित्रपटांसाठी मुंबई वगळता इतरत्र काहीच होत नसल्याचं माझं पहिल्यापासून मत आहे. जयपूरमध्ये आम्ही काही गोष्टी शक्य होतात का? यासाठी प्रयत्न केले होते. पण, काही होऊ शकलं नाही. उत्तरप्रदेश सरकारने यासाठी प्रयत्न सुरू केलेत, ही चांगली गोष्ट आहे.”

ते पुढे सांगतात, “ही अत्याधुनिक फिल्मसिटी सुरू झाल्यानंतर चित्रपटांचं प्रॉडक्शन वाढण्यास मदत होईल. मुंबईत चित्रपटांसाठी काम फार मर्यादीत होतं. इथं टीव्ही सिरिअलचं काम खूप आहे. आता, वेब सिरीज बनू लागल्या आहेत. मोठे सेट उभारल्यामुळे फिल्मसिटी बूक होत होती. आता नोएडामध्ये फिल्मसिटी तयार होत असल्याने काम वाढेल. येत्या काही दिवसात चित्रपट निर्मीतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.”

बॉलीवूड स्टार्स मुंबईत रहातात. शूटिंगनंतर त्यांना आपल्या घरी जाणं सोपं असतं. मग, अशा परिस्थितीत आपलं घर सोडून ते नोएडामध्ये शूटिंगसाठी काही महिने रहाणं पसंत करतील?

यावर बोलताना राज बंसल म्हणतात, “असं आधी होत असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आधी कलाकार एक दिवस शूटिंग केल्यानंतर तीन दिवस येत नव्हते. मात्र, आता चित्रपटांच्या शूटिंगसाठी ते घरापासून दूर रहातील. काम लवकरात-लवकर संपवण्याचा त्यांच्या प्रयत्न असेल.”

हल्ली, शूटिंग संपवून 40 दिवसात चित्रपट तयार होतो. शक्य तितक्या लवकर चित्रपटाचं शूटिंग संपवण्याची कलाकारांची अपेक्षा असते. त्यामुळे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांचा पैसा जास्त खर्च होणार नाही, असं बंसल पुढे सांगतात.

“मुंबईहून दिल्लीला जाणं सहज शक्य आहे. विमानांची संख्या जास्त आहे, पंचतारांकित हॉटेल्स आहेत. त्यामुळे काहीच अडचण येणार नाही,” असं राज बंसल पुढे सांगतात.

बॉलीवुडमध्ये फक्त कलाकारच नाहीत. तर सेट्सवर काम करणारे मजूरही मोठ्या संख्येने काम करतात. मग या मजुरांचं काय? यावर बोलताना राज बंसल दाक्षिणात्य चित्रपटांचं उदाहरण देतात. ते म्हणतात, मुंबईतील मजुरांच नुकसान होणार नाही.

ते पुढे म्हणतात, “दक्षिण भारतातील चित्रपट निर्मात्यांची स्वत:ची टीम असते. काम करणारे मजूर वेगळे असतात. उत्तर भारतातून अनेक मजूर कामासाठी मुंबईत येतात. आता, नोएडामध्ये शूटिंग सुरू झालं तर मजुरांना कामासाठी मुंबईत यावं लागणार नाही. त्यांना त्यांच्या घराजवळच रोजगाराची संधी मिळेल.”

मला फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते. अशा घोषणा अनेकवेळा करण्यात आल्या. यावेळी, ही फक्त घोषणाच राहू नये, तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असं बंसल यांच मत आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉई युनिअनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांच्या सांगण्यानुसार, “नोएडामध्ये फिल्म सिटी उभारल्यामुळे बॉलीवुडला नक्कीच फायदा होईल. फिल्म इंडस्ट्री मोठी होईल. चित्रपट बनवण्यासाठी आधी मुंबईत यावं लागत असे. आता उत्तरप्रदेशातील लोक आपल्या राज्यातच चित्रपट बनवू शकतील.”

“लखनऊमध्ये मोठ्या चित्रपटांचं शूटिंग सुरू आहे. सरकार दिड ते दोन कोटी रूपयांची सब्सिडी देत आहे. सद्य स्थितीत चित्रपट बनवण्यासाठी प्रोड्यूसर सोयी-सुविधांच्या शोधात असतो. खर्च कसा कमी करता येईल? कोणत्या शहरात स्वस्त पडेल? याचा विचार केला जातो,” असं ते पुढे म्हणतात.

परदेशात शूटिंगसाठी जाणाऱ्यांना 30-40 टक्के सब्सिडी मिळते. परदेशात चांगले लोकेशन आणि सुविधा मिळत असल्याने लोक बाहेर शूटिंग करतात.

दुसरीकडे भारतात मात्र फिल्मसिटीबाहेर शूटिंग करायचं असल्यास फार कठीण आहे. अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. परवानगी असेल तरी, महापालिका, पोलीस आणि रहिवासी अडवणूक करतात, याची खंत तिवारी व्यक्त करतात.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, परवानगी घेऊनही ही प्रॉपर्टी आमची आहे असं म्हणत लोक लूटतात.

तिवारी पुढे सांगतात, “ज्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतील, त्याच ठिकाणी काम होईल. आता आमच्या स्पर्धेत अनेक लोक उतरले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत आले. त्यांनी बॉलीवुडशी चर्चा केली. अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरूख खान आणि सलमान खान सारख्या कलाकारांनी उत्तरप्रदेशात शूटिंग केलं आहे.”

चांगल्या सुविधा मिळत असल्याने लोक उत्तरप्रदेशात जात आहेत. महाराष्ट्रात कोणीच लक्ष देत नाही. आम्हाला सरकारसोबत चर्चा करायची असेल तर पहिल्यांदा आम्हाला सरकारी बनवं लागतं, असा त्यांचा आरोप आहे.

बी एन तिवारी सांगतात, “सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर याचा परिणाम दिसून येईल. महाराष्ट्र सरकारने चांगल्या सुविधा देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत.”

लेख सौजन्य : बीबीसी मराठी

जगातील सर्वात मोठ्या मैदानावर रंगणार भारत-इंग्लंड डे-नाईट टेस्ट मॅच

मुंबई, प्रतिनिधी : जगातील सर्वात मोठे असे नाव लौकिक मिळविलेल्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात गुलाबी बॉलने टेस्ट सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) जय शाह यांनी गुरुवारी म्हटलं की, नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसह गुलाबी बॉलने टेस्ट सामन्यांचे आयोजन केले जाईल. या मालिकेचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे.

७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड भारत दौर्‍यावर येणार आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका होईल. मंडळाने या दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोटेरा हे दोन्ही देशांमधील डे नाईट टेस्ट मॅचचे आयोजन करणार असल्याची माहिती दिली होती.

अहमदाबाद गुलाबी बॉलने टेस्ट सामने खेळले जाणार आहे. टेस्ट सीरीज ७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. आणि डे-नाईट टेस्ट २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळली जाणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय टीम भारतात परतेल. बीसीसीआयने आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर २०२० मधील वनडे वर्ल्डकपवर आधारित वनडे आणि टी-२० मालिकेसाठी योजना आखली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या अंतर्गत कर्णधार विराट कोहलीची टीम पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपची तयारी करेल.

तरुणपणीच योग्य ठिकाणी गुंतवणूक करा! म्हातारपणात दिसतील बचतीचे फायदे!

मुंबई, प्रतिनिधी : स्वत:साठीच्या पुरेशा खर्चासाठी, विविध कामे तसेच आरामदायी जीवनशैलीकरिता पैसे बाजूला ठेवून दीर्घकालीन योजना आखण्यासंबंधीचा दृष्टीकोन योग्य असू शकतो. वेळोवेळी गुंतवणूक केल्याने व्याज वाढेल. त्यामुळे कार, मालमत्ता खरेदी किंवा सुटीवर जाण्याची वैयक्तिक इच्छा होईल, तेव्हा पैशांचा झालेला संचय कामाला येईल, असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे वरिष्ठ इक्विटी संशोधन विश्लेषक जयकिशन परमार यांनी व्यक्त केले.

१. चक्रवाढ व्याज लक्षात ठेवून बचत करणे: एखाद्या पदवीधराला नवी नोकरी लागते तेव्हा खर्च कमी होतो, असे बहुतांशवेळा दिसून येते. त्यामुळे याच काळात लहान रकमेची बचत आणि चक्रवाढ व्याज घेत, वेळोवेळी संपत्ती कशी वाढवता येईल, हे पाहणे योग्य ठरते. तसेच, पगार जमा होतो तेव्हा ते रिकरिंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, प्रोव्हिडंट फंड इत्यादीमध्ये जमा करता येतो. त्यामुळे काही काळानंतकर पैसे वाढतात व संबंधित व्यक्तीला जेव्हा गरज असते, तेव्हा ते उपयुक्त ठरू शकतात. सतत बचत केल्यानंतर ३० ते ४० वर्षांनंतर त्यांची रक्कम किती होईल, याची कल्पना करा. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर अशा व्यक्तीला खूप आराम मिळू शकतो.

२. २१ व्या शतकात गुंतवणूक करणे सोपे: आजच्या तरुण पिढीमध्ये एक नवा प्रवाह दिसून येतो. बँक आणि इतर वित्तीय सेवा प्रदात्यांकडून मिळालेले विविध पर्याय आजमावून पाहण्यात त्यांना कमालीचा रस आहे. ९० किंवा २००० च्या सुरुवातीच्या काळाप्रमाणे किचकट न भासता ही सर्व प्रक्रिया आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. बँका, ब्रोकरेज फर्म, म्युच्युअल फंड इत्यादींसारख्या वित्तीय संस्थांनी त्यांचे स्वत:चे अॅप लाँच केले असून त्यातून लाखो तरुणांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांनी केवळ गुंतवणूक करायला सुरुवात केली असे नाही तर म्युच्युअल फंड्स, बाँड्स, स्टॉक व मोडिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची माहितीही ते घेत आहेत.

३. कुटुंबाच्या भविष्यासाठी नियोजन: वैयक्तिक आयुष्य जगताना भविष्यात अनेक जबाबदाऱ्या जोडल्या जातात. त्यामुळे वित्तीय नियोजन नसेल तर मोठा त्रास भोगावा लागू शकतो. एखाद्याचे लग्न झाले, मूल झाले तर खर्च चौपट होऊ शकतो. यातच नियोजनशून्य दृष्टीकोन असेल तर आणखी मोठा खर्च झेलावा लागू शकतो. लवकर गुंतवणूक केल्यास एक सुरक्षिततेची जाणीव होते. मग कुटुंबात जेव्हा तीव्र गरज असते, घरात आवश्यक वस्तू खरेदी करायच्या असतात, तेव्हा याचा फायदा होतो.

४. अनपेक्षित करिअर बदल आणि स्वत:मध्ये गुंतवणूक: आज दररोज जगातील इंडस्ट्रीमध्ये दर काही वर्षांनी बदल होत असताना कामाच्या ठिकाणीही कालौघात बदल होऊ शकतो. एखाद्या स्त्री किंवा पुरुषाने एखाद्या परिस्थितीत करिअर सुरू करण्याची योजना आखली असेल, तेव्हा ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. पण तरुण वयापासूनच वित्तीय दृष्टीकोनातून निर्णय घेतले गेल्यास करिअरमधील महत्त्वाचे निर्णय सहजपणे घेता येतात. एखादा अतिरिक्त शैक्षणिक अभ्यासक्रम करू शकतो किंवा जगाच्या सफरीवर जाऊ शकतो. गुंतवणूक नियोजन केल्याने लोकांना असंख्य संधी आणि स्वातंत्र्य उपभोगण्यास मिळू शकते.

५. जोखीम पत्करण्याची संधी मिळते: तरुणांमध्ये जोखीम पत्करण्याची क्षमता जास्त असली तरीही कुटुंब तयार करण्याच्या टप्प्यावर येताना त्यांना आयुष्यातील मोठी गुंतवणूक करण्याची वेळ येते. मोठ्या मार्जिनसाठी निवृत्तीची योजना आकाराला येईपर्यंत अस्थिर पोर्टफोलिओची निवड करता येते. मार्केटमध्ये गँबलिंग करण्यासाठी पुरेसे भांडवल मिळवण्याकरिता बचतीची सोय होते. तसेच काही कल्पनाही आकारास येऊ शकतात. सुरुवातीच्या २० वर्षात बचत करायला शिकल्यास लोकांना नवा बिझनेसदेखील सुरू करता येऊ शकतो.

लेख सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स