Home Blog Page 36

डोंबिवली सांडपाणी उदंचन प्रकल्पास अधिक दर्जा प्राप्त होणार ; ‘निरी’ संस्थेच्यावतीने पहाणी अहवाल सादर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरातील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता उद्योजकांची कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) संघटना कायम कटिबद्ध राहिल असे संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. निरी संस्थेने डोंबिवली येथील सामान्य उदंचन प्रक्रिया प्रकल्पास (सीईटीपी ) मार्च २०२३ मध्ये भेट दिली होती. या प्रकल्पाच्या कार्याबाबत ‘निरी’ ने समाधान व्यक्त केले आहे. हा प्रकल्प अधिक अद्यावत तंत्रज्ञान युक्त करण्यासाठी ‘कामा’ संघटनेने विकास आराखड्याचा प्रस्ताव ‘निरी’ ला दिला होता. याबाबतचा अहवाल ‘निरी’ ने ‘कामा’ संघटनेकडे दिला असून आता डोंबिवली सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पास अधिक दर्जा प्राप्त होणार असल्याचा विश्वास कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी व्यक्त केला आहे. यामुळे कारखान्यातून सोडण्यात येणारे सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया दर्जेदार होईल आणि सांडपाण्यातील रासायनिक घटकांचे प्रमाण कमी होईल.

‘कामा’ संघटनेचा पर्यावरण संरक्षणासाठी सुरू असलेल्या कार्याचा आढावा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी पत्रकारांना विषद केला. ‘कामा’ संघटनेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात.५ जून या पर्यावरण दिनानिमित्त एकल वापर प्लास्टिक वर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी २०२२ साली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने एका जागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. दर पावसाळ्यात डोंबिवली आणि इतर परिसरात वृक्षारोपण करण्यात येते. भारतातील विविध राज्यांतील पर्यावरण संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ‘कामा’ चे सदस्य किंवा पदाधिकारी सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे उद्योजकांच्या विविध संघटनांनी आयोजित केलेल्या पर्यावरण विषयक उपक्रमात सहभागी होत असतात. या सहभागातून पर्यावरण संरक्षणासाठी नेमके काय कार्यक्रम राबविण्यात यावे याचं मौलिक विचार ऐकायला मिळतात.

नागपूर येथे ‘निरी’ (नॅशनल एनव्हायरोमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात याचा अनुभव आला. असे देवेन सोनी यांनी सांगितले. ‘निरी’ संस्थेने डोंबिवली येथील सामान्य उदंचन प्रक्रिया प्रकल्पास (सीईटीपी) मार्च २०२३ मध्ये भेट दिली होती. या प्रकल्पाच्या कार्याबाबत ‘निरी’ने समाधान व्यक्त केले आहे. हा प्रकल्प अधिक अद्यावत तंत्रशुद्ध तंत्रज्ञान युक्त करण्यासाठी ‘कामा’ संघटनेने विकास आराखड्याचा प्रस्ताव ‘निरी’ ला दिला होता. याबाबतचा अहवाल ‘निरी’ ने ‘कामा’ कडे दिला असून आता डोंबिवली सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पास अधिक दर्जा प्राप्त होणार असल्याचा विश्वास ‘कामा’ चे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर झालेल्या वार्तालापात व्यक्त केला आहे.

‘कामा’ संघटनेच्या पर्यावरण संरक्षण विषयक उपक्रमासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते द्वितीय वसूंधरा पारितोषिकाचा मान मिळाला होता.

 

जन्मजात दुर्मिळ आजार असणाऱ्या महिलेवर वॉक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार!

मुंबई, प्रतिनिधी: डिप वेन थ्रोम्बोसिस या विकाराने पिडीत असलेल्या एका ५९ वर्षीय महिलेवर मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहे. या आजारामुळे महिलेच्या डाव्या पायाला मोठी सूज आली होती. आता महिलेची प्रकृती उत्तम असून तिला घरी सोडण्यात आले आहे.

मीरारोड येथील वॉक्हार्ट रुग्णालयातील कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. आशिष मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे.
विरारमध्ये राहणाऱ्या वंदना देसाई (नाव बदललेले आहे) यांना पायात असहय वेदना जाणवत होत्या. पायाला सूज असल्याने त्यांना चालतानाही येत नव्हतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय चाचणी केली असता त्यात डिप वेन थ्रोम्बोसिस असल्याचं निदान झालं.
डीप वेन थ्रोम्बोसिस ही एक वैद्यकीय स्थिती आहे. विशेषतः पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. ही समस्या संसर्ग व जळजळ किंवा इतर कारणांमुळे होऊ शकते. डीवीटी विविध कारणांमुळे होऊ शकतो. ज्यामध्ये शस्त्रक्रिया, दुखापत, गर्भधारणा, हार्मोन थेरपी, कर्करोग आणि काही अनुवांशिक किंवा शारीरिक विकार यांचा समावेश होतो.

डीवीटीच्या लक्षणांमध्ये प्रभावित भागात वेदना, सूज, उबदारपणा आणि लालसरपणा यांचा समावेश होतो. याशिवाय डीवीटी असलेल्या काही लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाही. डीवीटीच्या निदानामध्ये सामान्यतः अल्ट्रासाऊंड, सीटीस्कॅन यांसारख्या इमेजिंग चाचण्यांचा समावेश असतो. रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ नयेत आणि फुफ्फुसात जाण्यापासून रोखण्यासाठी अंटीकोआगुलंट औषधे (रक्त पातळ करणारे) समाविष्ट असतात.

मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील सल्लागार इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. आशिष मिश्रा म्हणाले की, “रूग्णाच्या पायाची सूज डाव्या मांडीपर्यंत वाढली होती. इकोकार्डियोग्राफी हे सौम्य पल्मोनरी हायपरटेन्शन सह हृदयाचे सामान्य कार्य सूचित करते. शस्त्रक्रियेनंतर पुढील ३ दिवसांत डाव्या खालच्या अंगावरील सूज ५०% पेक्षा जास्त दूर झाली आणि रूग्णाला वैदयकीयदृष्ट्या सुधारित स्थितीत ओरल अँटीकोग्युलेशन आणि सपोर्टिव्ह थेरपीने सोडण्यात आले.

रूग्ण महिलेनं आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “माझ्या पायाला सूज आली होती. ज्यामुळे मला चालणे, उभे राहणे किंवा बसणे देखील कठीण होत होते. दैनंदिन कामे करण्यासाठीही कुटुंबियांवर अवलंबून राहावे लागत होते. शिरांशी संबंधित दुर्मिळ जन्मजात शारीरिक विकार असल्याचं निदान झाल्यावर मी घाबरून गेले होते. पण वेळीच निदान व उपचार करून माझे प्राण वाचविल्याबद्दल मी वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानते. आता मी ठीक झाली असून माझी दैनंदिन कामे करू लागली आहे.”

मिरा भाईंदर शहरातील प्रस्तावित करवाढीला काँग्रेसचा विरोध, आंदोलनाचा इशारा!

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन केले सादर!

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महापालिकेचा कालावधी ऑगस्ट २०२२ मध्ये संपल्याने राज्यशासनाने आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर केल्याचे जाहीर करूनही आता नव्याने १०% रस्ता कर, १० ते १५% पाणीपुरवठा लाभ कर, २५ ते ३०% पाणीपट्टी मध्ये करवाढ, अर्धा टक्का अग्निशमन सेवा करवाढ तसेच परिवहन सेवा बस भाड्यात वाढ, अश्या प्रकारचे कर वाढीचे प्रशासकीय निर्णय का व कसे घेण्यात आले? असा सवाल करीत काँग्रेस ने प्रस्तावित करवाढीला विरोध केला आहे.

 

जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, माजी गटनेते जुबेर इनामदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप चे सरकार सत्तेत असताना भाजप च्या माजी आमदार व विद्यमान आमदार यांना करवाढीवर आंदोलन करण्याची वेळ येते हे दुर्दैव असल्याची टीका सामंत यांनी केली. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या उपस्थितीत आम्ही आयुक्तांची भेट घेतली तेव्हा सर्वसामान्य जनतेवर करवाढ लादली जाणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन दिले होते असे जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी सांगितले.

उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करू नका अश्या प्रकारचे निवेदन त्यावेळी आयुक्तांना देण्यात आले होते, त्यानंतर अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, आयुक्तांनी तसे जाहीर ही केले होते. तश्या बातम्या विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या, मग आता अचानकपणे करवाढ का केली जात आहे? प्रशासकीय राजवट असताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित असताना आयुक्तांनी ज्या पध्दतीने करवाढ केली आहे ती अयोग्य असून याबाबतीत सकारात्मक विचार करून करवाढीचा निर्णय रद्द करून सर्वसामान्य करदात्या नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा जनहितार्थ काँग्रेस पक्षाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी माजी नगरसेविका मर्लिन डीसा, रुबिना शेख, गीता परदेशी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन तर्फे ‘आई महोत्सव’ दिमाखात साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन तर्फे गेली १३ वर्ष ‘कै. रिटा पॉल आई महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आपला विकास, मुलांचा उत्कर्ष व समाजासाठी आदर्श बनणाऱ्या सामान्यातील असामान्य अश्या १० आई श्रीमती सुनेत्रा चंद्रशेखर पाटील, लता कळसकर, बेन्सी जोसेफ, ललिता अंबादास डोंगरे, लीला शिंगोले, संध्या मंगल अंभोरे, रेणुका नाईक, लीलावती लक्ष्मण म्हात्रे, निर्मला धोत्रे, मोनाबाई काळूराम बांगर यांचा सत्कार रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. कैलाश जेठानी व डॉ. अरुण पाटील यांचे हस्ते झाला.

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन’ अध्यक्ष ऍनी बिजॉय, पॉल पेरापिल्ली, डॉमनिक व जॉन पॉल, डेव्हिड ओमन, सेक्रेटरी निकीता जैन व योगेश झांबरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला तसेच निकीता जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

१२ तासात सव्वा दोन लाखाचे मोबाईल जप्त करत डोंबिवली पोलीसांनी केले चोरट्यांना गजाआड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या दोघा चोरट्यांना जेरबंद करण्यात डोंबिवली पोलीसांना यश आले आहे. मोबाईल दुकानाचे शटर उचलटून मोबाईल चोरणाऱ्यांना डोंबिवली रामनगर पोलीसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान (वय: २५ वर्षे) राहणार: श्री समर्थ सेंटर, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व आणि सागर श्याम पारखे (वय: २३ वर्षे) राहणार: श्री समर्थ कृपा, कृपा सर्विस सेंटर, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व, असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून गुन्हा घडल्यापासुन अवघ्या १२ तासात दोघा चोरट्यांना पकडण्यात डोंबिवली रामनगर पोलीसांना यश आले. चोरट्यांकडून एकूण रुपये २,३७,०६०/- किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. १४ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील उर्सेकर वाडी येथील मधुबन गल्लीतील नव डोंबिवली सोसायटी, डी-विंग, गाळा न.३० येथील ‘प्रिया मोबाईल’च्या दुकानाचे शटर दोन अनोळखी इसमांनी उचकटुन दुकानात प्रवेश करून एकूण रुपये ४,०७,१२०/- किंमतीचे मोबाईल चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्यादी सुंदरम विश्वनाथ गवंडर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि तडवी (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बळवंत भराडे, पोउनि केशव हासगुळे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशिराम लोखंडे, पोहवा विशाल वाघ, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड यांनी मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू केला. दोघा चोरट्यांना फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान आणि सागर श्याम पारखे यांना गुन्हा घडल्यापासून अवघ्या १२ तासाच्या आत अटक केली. अटक केलेल्या चोरट्यांवर मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास डोंबिवली पोलीस ठाण्याचे सपोनि बळवंत भराडे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबीवली विभाग, सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शन व देखरेखी खाली सपोनि वळवंत भराडे, केशव हासगुळे, पोउनि विजय कांबळे, पोहवा सुनिल भणगे, भालेराव, तुळशिराम लोखंडे, विशाल वाघ, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड, राहुल ठाकूर यांनी कामगिरी बजावली आहे.