Home Blog Page 37

तहसीलदार कार्यालय समोर काँग्रेसचे जय भारत सत्याग्रह आंदोलन

“बहुमताच्या जोरावर भाजप कडून हम करे सो कायदा पद्धत राबविली जात असल्याने देशाची राज्यघटना धोक्यात!” – मुझफ्फर हुसैन

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७५ वर्षातील मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या राजवटीत चुकीच्या धोरणांमुळे देश अधोगतीला गेल्याची टीका काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी केली. काँग्रेसने देश घडवला व मोठा केला परंतु आज देश एका उद्योगपतीच्या इशाऱ्यावर चालवला जात आहे हे दुर्दैव आहे.

काँग्रेसच्या वतीने जय भारत सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले आहे, ” जबाब दो मोदीजी” म्हणत संसद ते सडक अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्याची मागणी करीत भाईंदर येथील तहसीलदार कार्यालयाला घेराव घालत निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सचिव आनंद सिंह, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक राजीव मेहरा, गीता परदेशी, फरीद कुरेशी, अश्रफ शेख, महिला अध्यक्ष रूपा पिंटो यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक, सेलचे अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुझफ्फर हुसैन पुढे म्हणाले की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशवासियांना “डरो मत” चा संदेश दिला असून जे प्रश्न संसदेत विचारले तेच प्रश्न सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून विचारत आहेत परंतु नरेंद्र मोदी आपल्या उद्योगपती मित्रासाठी काहीही बोलण्यास तयार नाहीत याचा अर्थ हा देश कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे, प्रश्न विचारला म्हणून राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व तडकाफडकी रद्द केले जाते, ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे, आरक्षण हटवून मनुवादाला प्रोत्साहन देत समान नागरी कायदा आणण्याचा डाव आखला जात असल्याचे हुसैन म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर जीएसटी लावून महागाई वाढवली, बेरोजगारी वाढल्याने युवक नाराज, महिला असुरक्षित असल्याने देशाची जनता रस्त्यावर उतरून आगामी काळात मोदींना जाब विचारेल असे प्रदेश सचिव आनंद सिंह म्हणाले. देशाची घटना धोक्यात आली असून धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद असे मुद्दे पुढे करून वातावरण कलुषित करीत मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी सांगितले. यावेळी अनिल सावंत, रुबिना शेख, दिनेश सक्सेना, श्याम शहारे, सिद्धेश राणे, राकेश राजपुरोहीत, महेंद्र सिंह, कुणाल काटकर, साहेबलाल यादव यांनी विचार व्यक्त केले.

कल्याण जिल्हा भाजपा तर्फे परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याचे वतीने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत पोहोचावेत व सामाजिक समरसता सर्वांगी रुजावी याकरिता बाबासाहेबांनी केलेले काम जगातील सर्वात लोकशाही मोठी असलेल्या देशाचे लिहिलेले संविधान कायदा हा सर्वात मोठा आहे. सर्वांना समान न्याय मिळावा, कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत हेच विचार बाबासाहेबांनी रुजवले. पूर्वीच्या जातीवादाच्या भिंती मोडून सर्व समाजामध्ये शिक्षण रुजलं पाहिजे समाजातील तळागाळातील घटक मोठा झाला पाहिजे याकरता बाबासाहेबांनी देशातल्या सर्व जातींसाठी काम केले.

यंदाच्या १३२ व्या परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रसंगी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नाना सूर्यवंशी, मनोज राय, अर्जुन म्हात्रे, विलास खंडी झोड, मुकेश सेंघानी, मोरेश्वर भोईर, अनिरुद्ध जाधव, अर्चना सूर्यवंशी, नितीन शिंदे, संतोष शिंदे, संतोष होळकर तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महिला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेण्याचा उपविजेती वैष्णवी पाटील हीचा मोठा गाव यात्रेत निर्धार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथील गावदेवी माता यात्रेनिमित्त मोठा गाव देवीचा पाडा येथील ग्रामदेवता श्री गावदेवी आईच्या निमित्त देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने कुस्तीच्या जंगी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून ‘महिला महाराष्ट्र केसरी’ची उपविजेती वैष्णवी पाटील यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आगामी महिला महाराष्ट्र केसरीच्या विजेतीपदाची गदा घेऊन येणार असल्याचा निर्धार कुस्तीपट्टू वैष्णवी पाटील यांनी येथे प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला. मोठा गाव येथील होत असलेल्या महिला कुस्ती सामन्यांमध्ये वैष्णवी पाटील या सहभागी होत असत.


यावेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, राजेश मोरे, सुरेश मोरे, एकनाथ म्हात्रे, हरिचंद्र पाटील, मनसेचे प्रकाश भोईर, ‘महाराष्ट्र केसरी’ सईद चौस तसेच मोठा गाव देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व्यासपीठावर उपस्थित होते. ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दीपेश म्हात्रे यांनी वैष्णवी पाटील यांचा चांदीची गदा देऊन सत्कार केला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना वैष्णवी पाटील म्हणाल्या की, या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये गावातील जत्रा आणि ग्रामस्थ मंडळाचे आणि येथील प्रशिक्षकांचे मी आभार मानते. तसेच राजतातून आलेल्या स्पर्धकांना स्फूर्ती देण्यासाठी महिला महाराष्ट्र केसरी’ची उपविजेती वैष्णवी पाटील हिने गदा घेऊन कुस्तीच्या आखड्याला एक फेरा मारला.

मी ‘महाराष्ट्र केसरी’ची उपविजेती झाल्यानंतर मला सर्व स्तरातून खूप प्रेम मिळाले. मी जरी उपविजेती झाले असले तरी हे मला इतके मिळालेले प्रेम पाहून माझ्या मनात आता अशी भावना निर्माण झाली आहे की, मी आगामी महिला महाराष्ट्र केसरी विजेती पदाची गदा खांद्यावर घेऊन येणार आहे. यासाठी मी अधीक मेहनत घेऊन परिश्रम करत आहे.

तर दीपेश म्हात्रे म्हणाले की तुम्ही पाहिले असेल की, या कुस्ती सामन्यांमध्ये लहान लहान मुलांनी भाग घेतला होता. हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे. यातून अनेक वैष्णवी पाटील आणि सईद चौस सारखे खेळाडू घडत असतात. हा खेळ अधिकाधिक मुलांपर्यंत जावा यासाठी ट्रस्ट प्रयत्न करीत आहे. या कुस्ती सामन्यात हजार एक कुस्तीगीर सहभागी झाले होते. राज्याच्या गावागावातून स्पर्धेसाठी एक कुस्तीगीर आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. हे सामने पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक रसिक जमा झाले होते.

 

देवेंद्र फडणवीस यांनी ‘बार्टी’च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून शब्द पाळला – अमित गोरखे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्यात भाजप व शिवसेना सरकारने अनुसूचित जातीच्या संशोधन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) च्या सरसकट ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली. या संदर्भात विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना ८ मार्च २०२३ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द सरसकट ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून पाळला आहे, असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या संशोधन करणाऱ्या ८६१ विद्यार्थ्यांची ‘बार्टी फेलोशिप’ मंजुरीसाठी प्रतीक्षेत होती. तसा प्रस्ताव तत्कालीन बार्टीचे महासंचालक यांनी बार्टी नियामक मंडळ यांच्या मान्यतेने २६ डिसेंबर २०२२ आणि १ फेब्रुवारी २०२३ रोजी असे दोन वेळा प्रस्ताव मंजुरीसाठी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाकडे मंत्रालय मुंबई येथे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाचा आधार घेत ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ च्या धरतीवर अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सुद्धा बार्टी कडून सरसकट फेलोशिप देण्यात यावे, असे पत्र अमित गोरखे यांनी दिले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित गोरखे यांना आश्वासन दिले होते की, अधिवेशन संपताच सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांच्यासोबत चर्चा करून हा विषय मार्गी लावला जाईल. त्यांनी दिलेल्या या आश्वासनाची अखेर पुर्तता झाली आहे.

या संदर्भात अमित गोखे म्हणाले की, बार्टीला फेलोशिपसाठी अर्ज केलेल्या ८६१ संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. फेलोशिपच्या प्रश्नाबाबत फलनिष्पत्ती प्राप्त झाली. याविषयी महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थी आझाद मैदानावर फेलोशिपसाठी उपोषण करीत होते. त्यापैकी काही विद्यार्थी माझ्या संपर्कात होते. उपोषणाला बसण्या अगोदरपासून ते फोन करून प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न निकाली काढण्यात यावा, अशी विनंती करीत होते.या प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्यातील मातब्बर लोकांनी या विषयासंदर्भात आपआपल्या परीने पाठ पुरावा केला. अखेर या लढाईला यश मिळाले. शासनाला प्रथम पत्र देऊन सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर शासनाने हा विषय निकाली काढला आहे. विद्यार्थ्यांनी देखील भाजप-शिवेसना सरकारचे धन्यवाद व्यक्त केले असून विद्यार्थ्यांच्या वतीने माझ्याकडून देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त करतो असे ते म्हणाले.

केंद्र व राज्य सरकार सदैव जनतेच्या हिताचे कामे करीत आहे. शेतकरी वंचित घटक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्न बाबत त्यांच्या समस्येचं निराकरण करून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले आहे. वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारत देशाला जो मूलमंत्र दिला आहे. त्याचे सामाजिकरण करून समता प्रस्थापित करण्याचे उदिष्ट साध्य केले जात आहे. समाजातील सामाजिक स्थर उंचावून राष्ट्राची राष्ट्रीय अखंडता साध्य व सिद्ध करण्याचे काम भारतीय जनता पार्टीने हाती घेतलेले आहे. हे या निर्णावरून स्पष्ट होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील चैत्यभूमी वर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिवादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वरात्री दादर येथील चैत्यभूमीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन जयंती सोहळ्याच्या निमित्ताने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी संपूर्ण देशभरातून लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर जमतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. तसेच आगामी ३ दिवस रात्री वांद्रे वरळी सी-लिंक वरील विद्युत रोषणाई सुरू ठेवण्याचे निर्देश एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले.

तसेच यानंतर चेंबूर येथील सिद्धार्थनगर येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या अशोकस्तंभाचे लोकार्पण केले. तसेच बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, नागसेन कांबळे तसेच आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर नेते आणि भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.