Home Blog Page 41

अज्ञात इसमांनी फाडले ठाकरे गटाचे बॅनर; डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छांचे बॅनर काही अज्ञात इसमांनी फाडल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर डोंबिवलीत काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी डोंबिवली पोलीस तक्रार ठाण्यात दाखल केली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील ठाकरे गटाच्या शहर शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ६ च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी हे बॅनर फाडले असून रविवारी सकाळी बॅनर फाडल्यचे निदर्शनास येताच डोंबिवलीतील ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डोंबिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा रजि क्र. ४८२/२०२० आयपीसी कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करत या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

 

मुख्य नेते पदावरून संजय राऊत यांची गच्छंती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. यानंतर आता शिंदे गटाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच शिवसेनेच्या शाखा या शिंदे गटाच्या नेत्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. यापुढे जात आज शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी शिंदे गटातील ज्येष्ठ नेते, खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या नियुक्तीचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आले.

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. “२१ फेब्रुवारी २०२३ ला मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. यामध्ये एकमताने ठराव करण्यात आला आहे की, संजय राऊत हे आता संसदेतील मुख्य नेतेपदी नसणार आहेत. तर गजानन किर्तीकर यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.”

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संसदीय नेतेपदावर गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली. याआधी यापूर्वी लोकसभेत शिवसेनेच्या मुख्य गटनेतेपदी खासदार संजय राऊत होते. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संसदेतील शिवसेनेचे कार्यालयदेखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले होते. त्यानंतर संजय राऊतांची मुख्य गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यांनतर आज शिवसेनेने हे पाऊल उचलले आहे.

 

सुशिक्षित-सुसंस्कृत डोंबिवलीकर काल्पनिक सण साजरे करताना शहिदांचे वास्तव बलिदान नाकारत आहेत – कॉम्रेड काळू कोमासकर


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जात, धर्म, पंथ, सण हे सर्व काल्पनिक असून राजकारणी व राज्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांची दिशाभूल करून देशासाठी ज्या शहिदांनी बलिदान केले आहे, त्या शहिदांचे वास्तव डोंबिवलीकर नाकारत आहेत. अशी टीका लालबावटा रिक्षा युनियन चे अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कौन्सिल सदस्य कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी डोंबिवलीकरांवर केली आहे.

२३ मार्च या शाहिद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, शहिद राजगुरू, शहीद सुखदेव यांना डोंबिवली येथील बाजीप्रभू चौकात आदरांजली वाहण्यासाठी इंदिरा चौक, टिळक चौक मार्गे बाजीप्रभू चौक अशी रॅली काढून एका कार्यक्रमाचे आयोजन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि लाल बावटा रीक्षा युनियन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी काळू कोमास्कर बोलत होते. या शहीद दिनाच्या कार्यक्रमात डोंबिवलीतील पंधरा संघटनांनी सहभाग दिला होता.

दिनांक २३ मार्च शहिद दिनानिमित्त डोंबिवली शहरात विविध संघटनांनी मिळून रॅली व सभेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात बाजीप्रभू चौकात उभारलेल्या शहिद स्मारकापासून करण्यात आली, “इन्कलाब झिंदाबाद, भगतसिंग के देश में हिंदू-मुस्लिम जातीवाद नही चलेगा” अश्या घोषणांनी रॅली दरम्यान डोंबिवलीचे रस्ते दणाणत होते. रॅलीचे रूपांतर बाजीप्रभू चौकात सभेमध्ये झाले. क्रांतिकारी गीताने सभेची सुरुवात करण्यात आली. सभेमध्ये काँम्रेड काळू कोमास्कर, जनता दल सेक्युलरचे राज्य सचिव रवी भिलाने, बहुजन मुक्ती पार्टीचे गौतम वाघचौरे, संयुक्त जयंती उत्सव मंडळाचे दीपक अहिरे, विद्यार्थी संघटनेचे अष्टपाल कांबळे, हॉकर्स फेडरेशनचे बबन कांबळे, अनिसचे कॉ.संजय पटेल, परेश काटे, राष्ट्र सेवा दलाचे जीवराज सावंत, कॉम्रेड शहिद भगतसिंग मित्रमंडळाचे कॉ.महेश आवारे, स्वाभिमानी शिक्षण संघटनेचे संजय गायकवाड, अन्याय अत्याचार निर्मूलन समितिचे केणी हे उपस्थित होते.

 

यावेळी कार्यक्रमात काळू कोमासकर म्हणाले की, “देशात गुढीपाडव्यासारख्या स्वागत यात्रेला महत्त्व दिले जाते. हे सण, जात, पंथ, धर्म हे काल्पनिक आहेत. परंतु ज्या शहिदांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांचा विसर सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणविणाऱ्या डोंबिवलीकरांना पडला आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे“. रॅली दरम्यान अनेकांनी विचारले ही कशासाठी रॅली आहे. त्याचप्रमाणे काळू-कोमासकर यांनी महागाई मध्ये होरपळत चाललेल्या गरीब सामान्य माणसाची व्यथा मांडताना, भाजपला लक्ष्य केले. तर रवी भिलाने यांनी डोंबिवलीत आल्यानंतर मला काम करण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळते असे सांगितले. शाहीर पंकज कांबळे यांनी आपल्या शाहिरीने सभेचे वातावरण उत्साही केले. कार्यक्रमाची सांगता घोषणा आणि क्रांतिकारी गीताने करण्यात आला.

 

ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल कांबळे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

श्री. शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाज बांधवांचा अपमान केला. न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते.

न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते ? असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते.

‘मोदी’ या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही शशिकांत कांबळे यांनी पत्रकात नमूद केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील शहराध्यक्ष अभिजीत करंजुले, नाना सूर्यवंशी, संजय आदक, नगरसेविका पाटील, संतोष शिंदे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 

मालमत्ता कर आकारणी अंतिम जप्तीच्या नोटीसीमुळे डोंबिवलीतील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण; कर आकारणी दुरुस्ती साठी ‘कामा’ चे निवेदन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने डोंबिवली येथील एमआयडीसी भागातील उद्योजकांना भूखंड मालमत्ता कर आकारणी संदर्भात जप्तीच्या अंतिम नोटीसा देण्यात आल्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या ‘कामा’ संघटनेने महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांना उद्योजकांना दिलासा देणारी कर दुरुस्ती प्रणाली महापालिकेच्या वतीने करण्यात यावी असे निवेदन दिले आहे.

उद्योजकांच्या ‘कामा’ संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मंगेश चितळे यांची भेट घेतली. याबाबत देवेन सोनी यांनी अशी माहिती दिली की, ग्रामपंचायत कडून या उद्योजकांच्या भूखंडांना कर लावला जात असे. परंतु कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे येथील २७ गावे समाविष्ट करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने शंभर पट कर उद्योजकांच्या भूखंडांना लावला गेला आहे. कोरोनाच्या काळातून उद्योजक कसेबसे सावरत असताना, हा कर उद्योजकांना परवडत नाही. कोरोना काळामध्ये काही लघुउद्योग बंद पडले असून, या उद्योजकांना सुद्धा अवाच्या सव्वा सुमारे करोडो रुपयांचा कर पालिकेने लावला आहे. आता हे कर न भरल्यास त्यांना अंतिम जप्तीच्या नोटीसा देण्यात आल्या असून, त्यामुळे डोंबिवलीतील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेमध्ये एमआयडीसीतील उद्योजकांना दिलासा देणारी कर प्रणाली दुरुस्ती करण्यात यावी. असा देखील ठराव करण्यात आला होता. मात्र त्याबाबत महापालिकेकडून आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही. २०१७-१८ पासून मालमत्ता कर हा जुन्या पद्धतीने आकारणी करण्यात यावा ही पालिकेला मागणी आम्ही करत आहोत. ज्यांची मिळकत २००२ च्या पूर्वीची आहे. त्याप्रमाणे कर आकारणी सुरू करावी असा ठराव महापालिकेने केला आहे. हे वारंवार आम्ही महापालिकेला निवेदनाद्वारे सांगितलेले आहे. पुन्हा डिसेंबर २०२० पासून आम्ही मालमत्ता कर दुरुस्ती बाबत पाठपुरावा करत असूनही, अद्याप त्याबाबत महापालिकेने कोणतेही पाऊल उचललेले नाही.

‘कामा’ संघटनेच्या वतीने पालिकेला दिलेल्या निवेदनात डोंबिवली येथील टप्पा एक आणि टप्पा दोन यामधील भूखंडाचे निवासी,औद्योगिक आणि बिगर निवासी असे वर्गीकरण स्तर करावेत. सध्या निवासी आणि बिगर निवासी असे दोन स्तर आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील तीन स्तर असावे असे निर्देश दिले होते. राज्यातील नाशिक आणि अंबड पालिकांमध्ये तीन स्तर असणारी रचना औद्योगिक क्षेत्रात आहे. मालमत्ता कर यासंबंधी महापालिकेने काही उद्योजक भूखंडधारकांना नोटीसा दिल्या आहेत. त्या तात्काळ मागे घ्याव्यात किंवा त्यांना स्थगिती द्यावी आणि १८९ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा. तोपर्यंत कोणतीही कारवाई एमआयडीसीतील उद्योजकांवर करू नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

दुरुस्ती कर आकारणी प्रणालीप्रमाणे उद्योजक एक हाती कराची रक्कम भरण्यास तयार आहे असे ‘कामा’ संघटनेच्या वतीने उपस्थित पत्रकारांना सांगण्यात आले. परंतु ही दुरुस्ती कल्याण-डोंबिवली महापालिकेने करावी, अशी विनंती कामाच्या वतीने निवेदनाद्वारे आयुक्तांना करण्यात आली आहे. येत्या आठवड्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची भेट ‘कामा’ संघटनेच्या वतीने घेण्यात येईल असे संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.