Home Blog Page 40

डोंबिवली पश्चिम येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्री राम नवमी उत्साहात साजरी..


संपादक: मोईन सय्यद l प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी रास्ता क्रांती डिपार्टमेंट स्टोअर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, पदाधिकारी किशोर मानकामे, प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, तानाजी मालुसरे, प्रमोद कांबळे, कविता गावंड, वैशाली दरेकर, किरण मोंडकर, परदेशी, ऋतुराज इत्यादी पदाधिकारी, ठाकरे गटाचे शिवसैनिक, कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव आणि साईबाबा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजपाचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आणि माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या वतीने डोंबिवली पश्चिम येथे गुप्ते क्रॉस रोडवर श्रीराम नवमी आणि साईबाबा प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे भेट देऊन दोन्ही उत्सवासाठी उपस्थित राहिलेल्या भाविकांना शुभेच्छा देत श्रीराम व साईबाबा यांचे मनोभावे दर्शन घेतले. सायंकाळी जनार्दन पेडणेकर बुवा आणि संजय पवार बुवा यांच्या डबलबारी भजनाचा अटीतटीचा सामना रंगला. हा सामना पाहण्यासाठी डोंबिवलीतील रसिकांनी तोबा गर्दी केली होती.

श्रीराम आणि साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती .यात महिला भाविकांची लक्षणीय संख्या होती. या भाविकांना प्रसाद म्हणून सकाळी साडेदहा वाजल्या पासून रात्री साडेअकरा वाजे पर्यंत भंडाऱ्याचे आयोजन केले होते. रात्री मध्यरात्रीपर्यंत हा भंडारा सुरू होता. या महाभंडाऱ्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. गेली अनेक वर्ष धात्रक कुटुंबाच्या वतीने हा उपक्रम विष्णुनगर प्रभागात आयोजित करण्यात येत असतो. डोंबिवली पश्चिम येथील रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर येथे व नगरसेवक म्हणून धात्रक दांपत्याने दोन टर्म आपल्या दोन्ही प्रभागात विकास कामे केली आहेत. नागरिकांना सार्वजनिक सोयी सुविधांचा लाभ मिळवून दिल्यामुळे धात्रक कुटुंब आणि आगामी काळात बहुदा सामाजिक सेवेमध्ये प्रवेश करणारी त्यांची कन्या पूजा हे लोकप्रिय झालेले आहेत. डोंबिवली पश्चिम येथील भाजपाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांच्या साह्याने सदर उत्सव उत्साहात संपन्न झाला.

 

महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अयोध्या नगरीत कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रामनवमी उत्साहात साजरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महेश पाटील प्रतिष्ठान च्या वतीने डोंबिवली मानपाडा येथील अयोध्या नगरीतील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, शिंदे गटाचे शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष मनोज घरत, ग्रामीण भाजप महिला अध्यक्ष मनीषा राणे, कामाचे कार्याध्यक्ष देवेन सोनी, समाजसेवक सुजित नलावडे तसेच डोंबिवली शहरातील राजकीय, व्यावसायिक, उद्योजक, विविध संस्थाचे तसेच सामाजिक संघटनांच्या व्यक्तींनी या राम मंदिरास भक्ती भावाने भेट दिली. डोंबिवलीत जवळजवळ सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. त्यातीलच एक हिंदू धर्मीय बांधवांच्या साठी महत्त्वाचा दिवस म्हणजे रामनवमी. हा दिवस डोंबिवली येथे विविध सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रमांनी साजरा होत असतो. यंदा रामनवमी जन्मोत्सवासह गुरु पुष्यामृत योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी असे योग एकत्रितपणे आले असल्यामुळे रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठीचा उत्साह अजूनच वाढला.

अयोध्या नगरीत देखील देखील रामनवमीच्या उत्सवाचे वातावरण होते. यावेळी महेश पाटील प्रतिष्ठानचे संचालक तसेच माजी नगरसेवक महेश पाटील म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीतील आयोध्या नगरीमध्ये रामनवमी साजरी करण्यात येत असून संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. भक्तगणांना प्रत्यक्ष अयोध्येत जाता येत नसले तरी, त्यांच्यासाठी हिच अयोध्या नगरी आकर्षक रोषणाईने सजली असून, पहाटेपासून श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची रीघ लागली आहे. सकाळपासून भजन कीर्तनाचा सोहळा मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सायंकाळी मानपाडा येथील अग्रवाल हॉल मध्ये सुमारे ४००० भक्तगणांना प्रसाद म्हणून भंडाऱ्याचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक, आरोग्य विषयक व्यक्तिगत सहाय्य नागरिकांसाठी केले जाते. महेश पाटील यांची पत्नी पल्लवी पाटील, त्यांची मुले आणि प्रतिष्ठानचे महिला मंडळ या रामनवमी उत्सवात हिरीरीने आणि उत्साहात सहभागी झाले होते.

‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ च्या वतीने श्रीराम नवमी निमित्त गीत रामायण आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे नाट्यरुपांतर सादर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जान्हवी मल्टी फाउंडेशन च्या डोंबिवली पश्चिम येथील जन गण मन शाळेच्या प्रांगणात श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांचा जीवनपट आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत नाट्यरूपात सादरीकरण करण्यात आले. सीतामाई, लक्ष्मण, हनुमानजी, लव कुश आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे ढोल ताशामध्ये अश्व रथातून आगमनाच्या उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

जान्हवी मल्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि संस्थेच्या कोषाध्यक्षा कुमारी जान्हवी राजकुमार कोल्हे तसेच ज्ञानेश्वरीवर पीएचडी केलेल्या डॉ. सौ.अनुराधा सुधीर कुलकर्णी, ब्रह्मकुमारीचे माउंटअबू वरून खास उपस्थित असलेले डॉ. कुमार वैद्य, सौ.चारुलता गुजराती असे अनेक मान्यवर या राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित होते.

सुमारे २०० कलावंत आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, प्रेक्षक तसेच पत्रकार बंधू-भगिनी यांच्या साक्षीने नाट्यमय, रंगारंग आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ.राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच आपला छंद जोपासला पाहिजे आणि डिजिटल डॉट्स ही संकल्पना। मांडली. रोज सायंकाळी सात ते आठ वाजता आपण सर्वांनी दूरदर्शन आणि भ्रमणध्वनी म्हणजेच ‘डिजिटल वर्ल्ड’ पासून दूर राहावे म्हणजेच त्याचा वापर एक तासासाठी करूच नये आणि या वेळात आपला छंद जोपासावा असे सांगितले. भविष्यात संस्थेत सम्राट अशोक, महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित असे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले जातील असेही ते म्हणाले.

डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष बजरंग वाळुंज आणि ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांचा सत्कार डॉ. कोल्हे यांनी केला. पत्रकार नरेंद्र थोरावडे, केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक अवधूत सावंत, अनघा पाटील, मीनल पवार, आयूषी विचारे उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना जान्हवी मल्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि संस्थेच्या कोषाध्यक्षा कुमारी जान्हवी राजकुमार कोल्हे यांची होती आणि ती कल्पना प्रत्यक्षात साकाराण्यासाठी श्रेया कुलकर्णी, अभिषेक देसाई, प्रमोद पगारे आणि सर्व जेएमएफ परिवारातील सदस्य यांनी अथक प्रयत्न केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांनी बग्गीमध्ये बसण्याचा मनमुराद आनंद घेतला व कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ने झाली.

 

नांदिवली पंचानंद येथील गावदेवी आईचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

यंदाही दरवर्षी प्रमाणे नांदिवली पंचानंद येथील गावदेवी आईचा मानाच्या साडीचा व अलंकाराचा पालखी सोहळा बुधवारी दुपारी संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने नांदिवली गावात देवीची पालखी काढण्यात आली होती. पालखीच्या मिरवणुकीमध्ये पारंपारिक गीते बँडवर वाजवण्यात आली. या पालखीच्या मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीमध्ये गुलाल उधळत पालखी उत्सवानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक गीतांवर सगळ्याच आबाल वृद्धांनी ठेका धरला होता. पालखी गावदेवीच्या देवळाजवळ आल्यानंतर फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावदेवी आईचे आरती करून सर्व भक्तांना प्रसाद वाटण्यात आला.

गावदेवी मंदिराचे अध्यक्ष चांगदेव सिताराम म्हात्रे, उपाध्यक्ष तुकाराम पुंडलिक म्हात्रे, उमेश बाबूराव पाटील, जितेंद्र मधुकर म्हात्रे, अनिल सिताराम म्हात्रे, वर्गीस पदू म्हात्रे, विजय म्हात्रे, दीपक कृष्णा म्हात्रे, बंडू पदू म्हात्रे, यशवंत बाबुराव म्हात्रे, दिनेश अनंता पाटील, बबन हनुमान म्हात्रे, जनार्दन विठ्ठल म्हात्रे, राजेंद्र हरिश्चंद्र म्हात्रे आणि इतर पदाधिकारी, महिला गावदेवी आईचा सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी झटत होते.

गावदेवी पालखी उत्सवाचे ४९ वे वर्ष असून, पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षात गावदेवी आईचा उत्सव प्रवेश करणार आहे. सुवर्ण महोत्सव मोठ्या धुमधडाकात व उत्साहात गावदेवी आईचा पालखी सोहळा करण्यात येईल. असे गावदेवी उत्सव मंडळाचे पदाधिकारी अनिल सीताराम म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. या गावदेवी देवळात दरवर्षी गुढीपाडव्याला भंडाऱ्याचा मोठा सोहळा आयोजित करण्यात येत असून सुमारे ५००० भक्तगणांना महाभोजनाचा लाभ दिला जातो. गावदेवी ही नांदिवली पंचानंदची नवसाला पावणारी जागृत ग्रामदेवता असल्याचे गावदेवी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नांदीवली पंचानंद येथील ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी या गावदेवी पासळखी सोहळ्याचे आयोजन केले होते.