Home Blog Page 42

कडोंमपा आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांच्या हस्ते ‘रिजन्सी अनंतम’ मधील बायो गॅस प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बायोगॅस वर शाळेत असताना आपण सर्वांनी अभ्यास केला होता. पण ही गोष्ट फार कमी वेळा अमलात आणली जाते. सरकारच्या वतीने किंवा महानगरपालिकेच्या वतीने अशा पद्धतीचे प्रकल्प बऱ्याच ठिकाणी उभे केले जातात. पण खाजगी गृह संकुलामध्ये फार कमी वेळा बायोगॅस प्रकल्प उभारला जातो. पण डोंबिवली मध्ये यंदा पहिल्यांदाच एका खाजगी गृह संकुल ‘रिजन्सी अनंतम’ मध्ये बायोगॅस प्रकल्प उभारला गेला आहे. ज्यामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेवर पडणारा कचऱ्याचा भार थोड्याफार प्रमाणात कमी होईल. ओल्या कचऱ्याचे विघटन जागेवर करता येणं शक्य असल्यामुळे त्या गॅस मधून मिळणाऱ्या विजेमुळे त्या प्रकल्पाची मशीन तर कार्यरत राहीलच पण त्यासोबतच परिसरातील स्ट्रीट लाईट वर येणारा विजेचा खर्च देखील कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक श्री.भाऊसाहेब दांगडे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते बायोगॅस प्रकल्पाची मशीन ऑन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी महेश अग्रवाल, अनिल भटिजा, उद्धव रूपचंदानी, विकी रूपचंदानी, संतोष डावखर तसेच रिजन्सी अनंतम मधील रहिवाशी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. बायोगॅस प्रकल्प उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.

‘पाणी वाचवा’ या विषयावर एक छोटेसे स्किट देखील रिजन्सी अनंतम मधील रहिवाशांनी सादर केले. सर्वांनी मिळून पाणी वाचवण्यासाठी आणि कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी जाहीर रित्या शप्पथ देखील घेतली. यावेळी बायोगॅस प्रकल्प या विषयावर चित्रकला व पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये रिजन्सी अनंतम मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एकूण दहा हजार रुपये ची रोख बक्षिसे आणि ट्रॉफी देण्यात आल्या. ज्यामध्ये आपली कला रेखाटून वेदांत राणे व रुद्रा पराडकर यांनी प्रथम, अथर्व वाणी व मनुष् कलवारी यांनी द्वितीय, प्रणव येवले व तनिष्का निर्गुण यांनी तृतीय पारितोषिकावर नाव कोरले.

 

भाजपाचे समीर चिटणीस यांच्या संपर्क कार्यालयाचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन..*


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय जनता पक्षाचे डोंबिवली पश्चिम मंडळाचे सरचिटणीस समीर चिटणीस यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. यावेळी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पश्चिम मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी, माजी अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, माजी नगरसेवक मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, माजी अध्यक्ष संजीव बिडवाडकर, युवा आघाडी अध्यक्ष मितेश पेणकर, महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस शिवाजी आव्हाड, चिटणीस बंधू, त्यांचे कुटुंबीय मित्रमंडळी, डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक, रिक्षा चालक आणि इतर मान्यवर मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी रोड वर असलेल्या अंबिकानगर येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. भावे सभागृह येथे समीर चिटणीस यांचे कार्यालय होते. या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम तसेच लोकउपयोगी कामे, शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. पारदर्शी व्यावसायासोबत सामाजिक कार्यात चिटणीस बंधूंचा डोंबिवलीमध्ये सहभाग असून, समीर चिटणीस यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोकण तसेच कोरोनाच्या काळामध्ये कोकणात आणि डोंबिवली मध्ये नागरिकांना सहाय्यभूत ठरेल असे कार्य त्यांचे सहकारी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू केले होते. डोंबिवली पश्चिम येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये समीर चिटणीस हे अभ्यासू लोकप्रिय व्यक्तिमत्व असून, सर्वपक्षीय मित्रमंडळी त्यांचे स्नेही आहेत. समीर चिटणीस हे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मर्जीतील असून डोंबिवली पश्चिम येथील भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे भाजपमधील त्यांचे सहकारी पाहत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सामाजिक कार्याचा व्याप आणि कार्यकर्त्यांचा राबता वाढल्याने आकाराने मोठे कार्यालय घ्यावे लागल्याची चर्चा उद्घाटन झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

 

कल्याण-डोंबिवलीच्या अर्थसंकल्पामध्ये या रेशनकार्ड धारकांसाठी अंत्यविधी सुविधा मोफत देण्याचा निर्णय..*


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अंत्यविधीची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय आज सादर झालेल्या बजेटमध्ये घेण्यात आला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी चालू आर्थिक वर्षासाठी कोणताही करवाढ नसणारे २ हजार २६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये नेहमीच्या आर्थिक तरतुदींसोबतच महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य आणि पायाभूत सुविधा वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

त्याचसोबतच यंदाच्या बजेटमध्ये नविन आरोग्य सुविधा, शहर स्वच्छता, घनकचरा प्रकल्प, प्राथमिक शिक्षण, क्रिडा यासह भटके आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्य सुविधांची तरतूद, पार्किंग पॉलिसी, रस्ते विकास, स्मशानभूमी, ऊर्जाक्षम पथदिवे, कचऱ्यापासून खत निर्मिती, स्मार्ट गव्हर्नन्ससाठी आदी महत्वाच्या मुद्दयांसाठी आवश्यक तरतूद करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्य लेखा अधिकारी लक्ष्मण पाटील, शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव संजय जाधव, परिवहन व्यवस्थापक दिपक राऊत यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या रेशनकार्ड धारकांसाठी मोफत अंत्यविधी सुविधा..

केडीएमसी प्रशासनाने यंदाच्या बजेटमध्ये मोफत अंत्यविधीची सुविधा पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठी करण्यात आल्याचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मोहीम..

तर यासोबतच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अत्यंत कळीचा मुद्दा असलेल्या अनधिकृत बांधकामांसाठीही महापालिका प्रशासन विशेष मोहीम राबविणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या मोहिमे अंतर्गत शासन नियमांच्या चौकटीत बसणाऱ्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.

केडीएमसीच्या अर्थसंकल्पामधील ठळक तरतुदी..

* मे २०२३ पर्यंत केडीएमसी क्षेत्रात शंभर टक्के ऊर्जा क्षम पथदिवे बसवणे

* अधिकाधिक रस्ते आणि परिसराचे सौंदर्यीकरण करणे

* प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी विद्युत वाहिनी किंवा गॅस दाहिनी उभारणे

* केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी विनाशुल्क अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करणे

* कंटेनर टॉयलेट सुविधा उपलब्ध करणे

* पालिका क्षेत्रातील विविध तलावांचे पुनरुज्जीवन करणे

* अमृत योजनेअंतर्गत २७ गावांमध्ये पावणेतीनशे किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे विणणे

* कल्याण डोंबिवली १५ नवीन जलकुंभ उभारणे

* डोंबिवली शहरात चाळीस वर्षे जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलून टाकणे

* पंधराव्या वित्त आयोगानुसार प्राप्त निधीतून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, धुळशमन प्रकल्प, सी ऍण्ड डी वेस्ट प्रोजेक्ट उभारणे

* सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी हेल्थ वेलनेस सेंटर उभारणे

* नवीन प्रसूतीगृह आणि कॅन्सर सेंटर उभारणे,

* कॅथलॅब, केमोथेरपी, रेडिओथेरपी केंद्र उभारणे

* नवीन सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरू करणे

* भटक्या मांजरांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण करणे

* महापालिका रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया स्वतंत्र उभारणे

* पाळीव प्राण्यांचा दवाखाना उभारणे

* मान आणि पाठीच्या मणक्याच्या आजारावर उपचाराकरता केंद्र स्थापन करणे

* डोंबिवलीत शवविच्छेदन केंद्र सुरू करणे

* अद्ययावत रोग निदान केंद्र सुरू करणे

* आधारवाडी डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी निष्कासित करण्यासाठी पुढील कार्यवाही करणे

* स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी कचरा उचलण्यासह प्रक्रिया राबवणे

* प्रत्येक प्रभागाकरिता एक मोबाईल टॉयलेट खरेदी करणे

* महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य स्टोअर रूम तयार करणे

* शाळांची नूतनीकरण करण्यासह डिजिटल क्लासरूम उभारणे

* गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी महापालिकेचे क्रीडा संकुल नामांकित खेळाडूंना चालवण्यासाठी देण्यात येणे

* महापालिकेच्या आरक्षित सर्व जागा एक वर्षाच्या आत वापरात आणणे

* शंभर टक्के पेपरलेस कारभारासाठी एप्रिल २०२३ पासून टप्प्याटप्प्याने ऑफिस प्रणाली राबवण्याचा निर्णय

* महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वॉर रूम तयार करणे

* महिलांसाठी विशेष मैदाने बनवणे

* महापालिकेच्या मिळकतीमध्ये चार ठिकाणी महिला बचत गटांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणे

दरम्यान, यासारख्या ठळक मुद्द्यांचा आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. आज सादर झालेले हे बजेट वाचायला आणि ऐकायला जरी चांगले वाटत असले तरी त्याची प्रत्यक्ष कितपत अंमलबजावणी होते हे लवकरच स्पष्ट होईल.

 

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या प्रामाणिक जवानाचा आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते सत्कार!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: बागेश्वर धामचे धर्मगुरू धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मैदानात मिळालेली दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चैन पोलीसांना सुपूर्द करणारे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शिवाजी केदार यांचा सत्कार 21 मार्च रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 18 मार्च 2023 रोजी मिरारोड पूर्वेकडील एस. के. स्टोन येथील मैदानात बागेश्वर धामचे धर्मगुरू धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दर्शनाकरिता मिरा भाईंदर शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अनेक जवान देखील तैनात करण्यात आले होते. त्यापैकी एक जवान शिवाजी केदार हे देखील सुरक्षिततेसाठी तैनात असताना त्यांना सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारे गर्दीच्या ठिकाणी जमीनीवर पडलेली अंदाजे 2 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन मिळाली.

2 लाख रुपये किमतीची ही मिळालेली सोन्याची चैन महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शिवाजी केदार यांनी प्रामाणिकपणे व तातडीने मिरारोड येथील कानाकीय पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांच्या ताब्यात दिली.

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवनाने अशा प्रकारे प्रामाणिकपणा दाखवून दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चैन परत केली म्हणून मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांचा सत्कार केला.

मिरारोड पूर्वेकडील एस. स्टोन मैदानात 18 व 19 मार्च हे दोन दिवस बागेश्वर धामचे धर्मगुरू धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आमदार गीता जैन आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. बागेश्वर धामचे धर्मगुरू धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दर्शनाकरिता मिरा भाईंदर शहरा बरोबरच देशातील अनेक शहरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

कार्यक्रमाच्या दोन दिवसांत या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान येथील बांवरीया गँगच्या टोळीतील 50 ते 60 महिलांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी 35 ते 40 महिलांच्या गळ्यातील अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक महिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अशा वेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या प्रामाणिक सुरक्षा रक्षकाचा आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्यामुळे सर्व स्तरावरून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

डोंबिवली पोलीसांकडून सुझुकी ऍक्सेस स्कुटी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ७०,०००/- रुपये किमतीची स्कुटी हस्तगत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक २३/०२/२०२३ रोजी ११.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी देवराज मेघजी बारवाडी (वय: ४४ वर्षे) धंदा:- फुटवेअर व्यवसाय डोबिवली पश्चिम हे त्यांचे सारस्वत बँक डोंबिवली पूर्व येथे बँकेत काम असल्याने त्यांची मोटार सायकल स्कुटी सुझुकी ऍक्सेस – एमएच०४ केके ५२७६ ही पीपी चेंबर जवळ असलेल्या सारस्वत बँकेच्या मेन गेटच्या समोर ‘सिल्वर कॉईन बिल्डींग’ येथे स्कुटी पार्क करुन बँकेत कामानिमीत्त गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची ७०,००० रुपये किंमतीची स्कुटी ही चोरी केली म्हणुन फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून डोंबिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र.७२/२०२३ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

नमुद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सपोनि योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, भणगे, लोखंडे, पोअं. राठोड, गवळी यांनी तपासादरम्यान चोरीस गेलेली सुझुकी ऍक्सेस स्कुटी ज्या ठिकाणीवरून चोरीस गेली त्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून त्याचा मागोवा घेत सदर आरोपीस राहत असलेल्या परीसर तुकाराम रसाळ चाळ, लोढा, डोबिवली पूर्व या ठिकाणी पाळत ठेवून सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्यास अटक करण्यात आली व त्याच्याकडून नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल स्कूटी सुझुकी ऍक्सेस एमएच ०४ केके ५२७६ ही हस्तगत करण्यात आली.

सदरची कामगिरी मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३,कल्याण चे सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) तडवी, यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, सचिन भालेराव, भणगे, लोखंडे, पोअं. राठोड, गवळी, पोना. कोती यांनी कामगीरी पार पाडली.