Home Blog Page 43

मनसे चे राजू पाटील यांच्या आमदार निधीतून मतदारसंघात ‘युटीडब्लुटी’ आधुनिक तंत्रज्ञानाने रस्ता..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघातील रस्त्याचे काम युटीडब्लुटी या आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११० सोनार पाडा, गोळवली मधील नेपच्यून हॉस्पिटल ते शंकरा नगर या भागातील सदर रस्त्याचे बांधकाम या आधुनिक तंत्रज्ञाने होणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.

आमदार राजू पाटील यांनी आपल्या मतदारसंघात आमदार निधीतून विविध विकास कामांचा धडाका लावला असून डोंबिवली येथील गावदेवी नेपच्यून हॉस्पिटल आणि ललित काटा येथे रस्त्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यूटीडब्लूटी (अप्पर थीन व्हाईट टॉप) हे अत्यंत जलद गतीने रस्ते तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान असून या तंत्रज्ञानाचा वापर नेपच्यून रुग्णालय ते शंकरा नगर येथे करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी ४० लाखा रुपायांचा आमदार निधी त्यांनी मंजूर केला आहे या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजू पाटील म्हणाले की कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात हा प्रभाग येत असून महापालिका येथील विकास कामांकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे या नवीन रस्त्यांच्या कामासाठी माझ्या आमदार निधीतील फंड मी देत आहे. हे रस्ते तयार झाल्यानंतर धुळी चा त्रास कमी होईल. रस्ते तयार होत असताना लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजू पाटील यांनी यावेळी केले.

तसेच ललित काटा ते सोनार पाडा तलाव येथे डांबरीकरण रस्ता तयार करण्यात येत असून त्यासाठी २५ लाखांचा आमदार निधीतून फंड देण्यात येत असल्याचे देखील आमदर राजू पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. शुभारंभ प्रसंगी गणेश म्हात्रे, मनसेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

 

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून भोपर देसलेपाडा येथील अनधिकृत नळ जोडण्या निष्काशीत करण्याची धडक मोहीम सुरू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेली सात आठ वर्ष डोंबिवली येथील भोपर गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून त्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विरोधात भोपर ग्रामस्थांनी मंगळवारी शनी मंदिर येथे तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचा धसका घेऊन महापालिकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गुरुवारपासून अनधिकृत नळ जोडण्या निष्काशीत करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. गुरुवारपासून सीएनजी पंप ते देसलेपाडा अशी कारवाई सुरू करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यापासून सहा अनधिकृत नळ जोडण्या सापडल्या असल्याची माहिती सूत्रांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

याबाबत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ दिलखुश माळी म्हणाले की हे भोपर ग्रामस्थांचे यश आहे. गेली अनेक वर्ष भोपर गावातील पाणी टंचाई बाबत महापालिकेकडे आम्ही सातत्याने अर्ज-विनंत्या असा पाठपुरावा करत होतो. परंतु महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे आम्हाला तीव्र आंदोलनाचा पर्याय निवडावा लागला. या आंदोलनाला भोपर गावातील ग्रामस्थ नागरिक आणि डोंबिवलीतील विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते समाजसेवक आदींनी पाठिंबा दिला. विशेषता भोपरगावातील महिलां पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात उतरल्या होत्या. ठोस कारवाई करा, अशी भूमिका घेतल्यामुळे अखेर महापालिकेला अनधिकृत नळ जोडण्या निष्काशीत करण्याची कारवाई गुरुवारपासून करावी लागली आहे. यासाठी आम्ही भोपर गावातील ग्रामस्थांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे महापालिकेने सुद्धा तातडीने निर्णय घेऊन अनधिकृत नळ जोडण्या निष्काशित करण्याची कारवाई सुरू केली. याबद्दल महापालिकेला धन्यवाद देत अधिकारी किरण वाघमारे, शैलेश कुलकर्णी यांचे सुद्धा आभारी आहोत.

नितीन माळी आणि मधुकर माळी म्हणाले की, हा महापालिकेचा विजय असून यापुढे भोपर वासियांना चांगल्या दाबाने पाणी येऊ शकेल याबद्दल भोपरवासीयांचे आम्ही मनापासून आभार मानतो. कारवाई दरम्यान एकनाथ सदू पाटील, गंगाराम पाटील, रंगनाथ ठाकूर जयवंत माळी, वैजनाथ देसले, हरिचंद्र देसले, दिलखुश माळी, ऍड. ब्रह्मा माळी, विश्वास माळी, मधुकर माळी, तानाजी पाटील, नितीन माळी, संतोष माळी, जयवंत पाटील, रमेश पाटील, ज्ञानेश्वर माळी आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने कारवाई समयी उपस्थित होते.

 

आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांचा आणखीन एक तुघलकी फर्मान!

नियमबाह्य पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार दिले उद्यान विभागाला!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले जेंव्हा पासून शहरात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करीत आहेत तेंव्हा पासून त्यांनी अनेक वादग्रस्त आणि नियमबाह्य निर्णय घेतले असल्याची चर्चा आता शहरात सर्व स्तरातून केली जात आहे. महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतल्या नंतर दिलीप ढोले यांनी मी म्हणजेच कायदा अशा पद्धतीने कार्य करण्यास सुरुवात केली आहे.

प्रशासक म्हणून कार्यरत असताना दिलीप ढोले यांनी गेल्या चार महिन्यात दोनशेहून जास्त प्रशासकीय ठराव मंजूर केले असून त्या ठरावांपैकी अनेक ठराव हे नियमबाह्य असल्याचे बोलले जात आहेत. त्यातच त्यांनी आता आणखीन एक नियमबाह्य आणि वादग्रस्त तुघलकी फर्मान काढले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार उद्यान विभागाला दिले असून नियमांचा भंग केला असल्याचे दिसून येत आहे.

मुळात शहरातील सर्व विभागांचे बांधकाम (स्थापत्य) व विद्युत याचे नवीन बांधकाम किंवा देखभाल दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फतच केली जातात. त्याकरिता आवश्यक असलेला शैक्षणिक अर्हता प्राप्त शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता असा प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी वर्ग सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्त केलेला असतो. त्या अधिकारी कर्मचारी वर्गा मार्फत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करूनच सार्वजनिक बांधकाम विभागा तर्फे स्थापत्य अथवा विद्युत यांची विकासकामे केली जातात. मात्र सध्या उद्यान विभागात फक्त एकच कंत्राटी कनिष्ठ अभियंता नियुक्त केलेला आहे. तोच अंदाजपत्रक तयार करतो आणि नगररचना विभागाचे अभियंता सचिन पाटील त्यावर सह्या करीत आहेत.

मुळात कोणत्याही विकासकामांचे १०० टक्के अंदाजपत्रक तपासण्याचे काम उपअभियंत्या मार्फत केले जाते अंदाजपत्रक तपासून त्या अंदाजपत्रकाची कार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता यांची तांत्रिक मान्यता घेऊन पुढील प्रक्रिया उद्यान विभागातर्फे करून निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश उद्यान विभागाकडून काढले जातात. ज्या बांधकामांचे कार्यादेश दिले आहेत त्यांची कामे निविदेनुसार आणि अंदाजपत्रकानुसार करून घेणे आवश्यक असते. त्या बांधकामाचे साहित्याची गुणवत्ता प्रयोग शाळेत व जागेवर तपासणी करून घेणे, बांधकामाचे त्रयस्थ लेखापरीक्षण करून घेणे, दररोज बांधकामाचे मोजमापाची नोंद करणे हि कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांचे बांधकाम यांच्या नियम पुस्तिकेनुसार स्थायी कनिष्ठ अभियंता व उप अभियंता यांची असून मोजमापे नोंदवून १०० टक्के तपासून उप अभियंता यांना नोंद घ्यावी लागते, तर कार्यकारी अभियंता यांना ५ टक्के तपासणी करून नोंद घ्यावी लागते. हि सर्व प्रक्रिया प्रशिक्षित अनुभवी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली standard specification नुसार पार पाडावी लागते आणि हीच कार्यपद्धती असताना प्रशासक दिलीप ढोले यांनी मात्र उद्यान विभागाला बांधकाम आणि विद्युत विषयक कामे देऊन नियमाचा भंग केला असल्याचे बोलले जात आहे. हि कामे एका कंत्राटी कनिष्ठ अभियंता यांचेवर सोपविता येत नाहीत.
त्याच बरोबर उद्यान विभागातील उपमुख्य उद्यान अधीक्षक आणि उपायुक्त(उद्यान) यांना बांधकाम व विद्युत कामांच्या अंदाजपत्रकावर सह्या करण्याचे अधिकार देखील नाहीत. त्याच बरोबर मोजमाप पुस्तिकेवर देखील सह्या करण्याचे अधिकार त्यांना नाहीत किंवा कायद्यात तशी तरतूद देखील नाही.

“उद्यान विभागात सध्या स्थापत्य आणि विद्युत यांचे कार्य करण्यास आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त एकही अभियंता किंवा अधिकारी नियुक्त केलेला नसताना आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी उद्यान विभागाचे अधिकारी हंसराज मेश्राम आणि नागेश वीरकर यांचा बालहट्ट पुरविण्यासाठीच आणि आर्थिक हित जोपासण्यासाठी हा तुघलकी निर्णय घेतला आहे असे बोलले जात आहे”

अशा प्रकारे जर एका कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांकडून कामे करून घेतली तर त्या कामांची गुणवत्ता राखली जाईल का? किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांचे बांधकाम यांच्या नियम पुस्तिकेनुसार जर काम झाले नाही आणि त्यामुळे जर भविष्यात काही गंभीर समस्या निर्माण झाली तर त्यासाठी जबाबदार कोण असणार? जर बांधकाम आणि विद्युत यांची कामे महानगरपालिकेच्या इतर विभागा मार्फत केली जाणार असतील तर मग बांधकाम विभागाची गरजच काय? असा प्रश्न आता निर्माण झालेला असून आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले मात्र आपल्या मनमर्जी प्रमाणे नियमबाह्य आणि तुघलकी निर्णय घेत असल्याची चर्चा मिरा-भाईंदर शहरात केली जात आहे.

भोपरवासीयांच्या उग्र आंदोलनात पालिका अधिकाऱ्यांना घेरल्याने अधिकारी नमले; अनधिकृत नळ जोडण्यावर गुरुवार शुक्रवारी करणार कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेले कित्येक वर्ष डोंबिवलीतील भोपर व देसलेपाडा गावात तीव्र पाणीटंचाई असून यासाठी भोपरवासीयांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन केले. या उग्र आंदोलनामुळे महापालिकेचे अधिकारी नमले. आंदोलन स्थळी पालिका अधिकारी आले असता आंदोलकांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. येत्या गुरुवारी व शुक्रवारी अनधिकृत नळ जोडण्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पाणी खात्याचे वरिष्ठ अभियंता किरण वाघमारे यांनी दिल्यानंतर या आंदोलनकर्त्यांनी पालिकेचे अधिकारी वाघमारे आणि कुलकर्णी यांची आंदोलन स्थळातून सुटका केली.

सविस्तर वृत्त असे की गेली अनेक वर्ष डोंबिवली येथील भोपर गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत असून आज भोपर ग्रामस्थांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात शनी मंदिर येथे धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनासाठी डोंबिवलीतील अनेक मान्यवर नागरिक सहभागी झाले होते. गेली सात आठ वर्ष भोपर गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेने एक एक्स्प्रेस पाईपलाईन टाकलेली असून, या पाईपलाईन मधून अनधिकृत बांधकाम करणारे चोरून कनेक्शन घेत असतात. भोपर गावांमध्ये अनधिकृत बांधकाम फोफावले असून, या बांधकामांना पाणी मिळते. परंतु सामान्य नागरिकांना पाणी मिळत नसल्याची तक्रार या आंदोलनात ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून कल्याण डोंबिवली महापालिकेकडे पाणीटंचाई बाबत ग्रामस्थांमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही वर्षापासून अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी टाक्यांचे बांधकाम सुरू आहे. अत्यंत धीम्या गतीने त्यांचे बांधकाम सुरू आहे. भोपर गावांमध्ये पाणीटंचाई असताना महापालिका कायम दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार या आंदोलनात प्रसिद्धी माध्यमांसमोर करण्यात आली. आंदोलनामध्ये भोपर वासियांना पाठिंबा देण्यासाठी डोंबिवलीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक विविध पक्षातील नेते मंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. सायंकाळी तीन वाजले तरी महापालिकेचे अधिकारी किरण वाघमारे हे आले नव्हते. वारंवार त्यांना संपर्क साधून येण्यासाठी विनंती ग्रामस्थांमार्फत केली असता त्यांनी संदप गावात कारवाई सुरू असल्याचे सांगत येण्याचे टाळत होते. मात्र साडेतीन वाजता आंदोलन स्थळी आले असता त्यांनी गुरुवार किंवा शुक्रवारी अनधिकृत नळ जोडण्यावर कारवाई करू असे सांगताच, आंदोलनातील काही महिला व कार्यकर्ते चिडले. आंदोलनात सहभागी झालेले नेते व ज्येष्ठ कार्यकर्ते या आंदोलकांना समजाविण्याचे काम करीत होते. मात्र महिलांनी व्यासपीठाजवळ येत आजच कारवाई करा असा एकसुर लावला. त्यामुळे दोन्ही अधिकारी गांगरून गेले होते. जमलेल्या आंदोलकांना नेमके काय सांगावे हे त्यांना सुचत नव्हते. बहुदा वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांनी पुन्हा एकदा गुरुवारी शुक्रवारी अनधिकृत नळ जोडण्यावर कारवाई करू असे सांगितले.

त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांची सुटका केली. या आंदोलनात ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, व्यासपीठावर एकनाथ पाटील. काळू कोमसकर, ऍड. ब्रह्मा माळी, मधुकर माळी, शिवाजी माळी, नाना (गंगाराम) शेलार, रंगनाथ ठाकूर, दीपक ठाकूर, अभिमन्यू माळी, वैजनाथ देसले, युवा मोर्चाचे गजानन पाटील, महेश संते, दिलखुश माळी, रमेश पाटील, विश्वास माळी, रमेश देसले आणि मुकेश पाटील आंदोलनात सहभाग घेऊन उपस्थित होते.

आमदार हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांची तब्बल साडे नऊ तास चौकशी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ‘ईडी’ने दोन महिन्यात आज तिसऱ्यांदा छापेमारी केली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून ४ वाजून ३५ मिनिटांनी बाहेर पडले.

आज झालेल्या कोल्हापूरात छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. ‘ईडी’च्या पथकाने येताना सोबत प्रिंटरही आणला होता. अधिकाऱ्यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या छापेमारीत तिन्ही वेळची एकच टीम होती. मात्र, आजच्या टीममध्ये अधिक अधिकाऱ्यांची संख्या होती.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरणांची ‘ईडी’कडून हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित ‘ईडी’कडून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत ‘ईडी’कडून हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, पुण्यातील ब्रिक्स कंपनीशी निगडीत तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, मुलीचे घर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय तसेच कागल तालुक्यातील सेनापती कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर छापेमारी करण्यात आली आहे. आतापर्यंत केलेल्या छापेमारीचा कोणताही तपशील समोर आलेला नाही. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत ‘ईडी’कडून ३५ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर ४० कोटींचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कागलमध्ये मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ‘ईडी’ची छापेमारी साडे नऊ तास सुरु होती. सकाळी सात वाजता ‘ईडी’चे पथक कागलमध्ये पोहोचले. छापेमारी सुरु असताना मुश्रीफ यांची दोन मुले घरी होती. दरम्यान, हसन मुश्रीफ अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत आहेत. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी घरात लहान मुलं तसेच मोठा मुलगा आजारी असतानाही ‘ईडी’कडून चौकशी होत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती.