Home Blog Page 48

निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा भव्य शुभारंभ!

भाईंदरसह देशभरात 1100 ठिकाणी राबवले स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान
स्वच्छ जलाबरोबरच स्वच्छ मनाचीही आवश्यकता आहे- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

भाईंदर, प्रतिनिधी: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीचा छट घाट (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला. याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले.

बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.
या परियोजनेचा शुभारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाण्याचे अनन्यसाधारण महत्व समजावून सांगितले तसेच ईश्वराने आपल्याला हे अमृतरुपी जल दिले आहे त्याचा निर्मळ स्वरुपात सांभाळ करणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे सांगितले. पाणी निर्मळ होण्याबरोबरच मनेही निर्मळ होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करुन सद्गुरु माताजी म्हणाल्या, की आपण संतांसारखे जीवन जगून परोपकाराचे कार्य करत राहायचे आहे.

या परियोजनेच्या अंतर्गत मुंबईलगत असलेल्या मीरा भाईंदर येथील उत्तन समुद्र किनाऱ्यावर हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले ज्यामध्ये 600 पेक्षा अधिक निरंकारी सेवादल व अन्य भक्तगणांनी भाग घेतला. याप्रसंगी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांच्यासह उपायुक्त रवी पवार, उपायुक्त शरद नानेगांवकर आणि मीरा भाईंदर भाजपा जिलाध्यक्ष रवी व्यास आदि मान्यवरांनी उपस्थित राहून मिशनच्या कार्याचे कौतुक केले तसेच स्वत: साफसफाई करत स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला.

या व्यतिरिक्त मुंबईसह नवी मुंबई, ठाणे जिल्हा व उरण परिसरात व्यापक स्वरूपात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ठाणे शहरातील स्वच्छता कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले. त्यामध्ये प्रामुख्याने आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मध्य प्रदेशमधील जिल्हाधिकारी नवजीवन पवार, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आदिंचा समावेश होता. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलाव येथे केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी स्वच्छता अभियानास भेट देत निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे बदलापूर येथे नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील उपस्थित राहून मिशनच्या उपक्रमाची प्रशंसा केली.

या परियोजनेमध्ये जास्तीत जास्तीत युवावर्गाचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमामध्ये केवळ पर्यावरणपूरक उपकरणांचाच वापर करण्यात आला. प्लास्टिक किंवा थर्माकॉल इत्यादिंच्या वस्तू पूर्णपणे वर्जित होत्या.

“माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत “वनमहोत्सव 2023” यशस्वीरित्या संपन्न!

वन महोत्सव 2023 समारोप प्रसंगी अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चा अध्यक्ष, मणींदरजित सिंह बिट्टा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन यांची विशेष उपस्थिती लाभली तर
आयुक्त दिलीप ढोलेंनी मानले सर्वांचे आभार!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभुमीवर “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत दिनांक 25, 26 व 27 फेब्रुवारी रोजी “वनमहोत्सव 2023” आयोजित करण्यात आला होता. दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी सदर वन महोत्सव 2023 समारोप प्रसंगी अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चा अध्यक्ष, मणींदरजित सिंह बिट्टा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन यांची विशेष उपस्थिती लाभली. वन महोत्सव 2023 मिरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.

पंचतत्वावर आधारित असलेल्या मूल्यांच्या माहितीची जनजागृती करणेकामी महानगरपालिकामार्फत वनमहोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या वनमहोत्सवात पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी विविध प्रकारचे भव्य विक्री प्रदर्शन आयोजन करण्यात आले. सदर प्रदर्शनामध्ये औषधी वनस्पती, बी-बियाणे रोपे, नर्सरी, आयुर्वेदिक व सौंदर्य उत्पादने, हस्तकला व हॅण्डलुम उत्पादने, विविध प्रकारचे, अलंकार, खाद्यसंस्कृती, पर्यावरण संवर्धन प्रकल्प जसे की सोलार सेल्स, सोलार बॅटरी, EV चार्जिंग पॉइंट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी श्रेणीतील प्रदर्शन भरवण्यात आले होते.

तसेच 27 फेब्रुवारी 2023 म्हणजेच समारोपाच्या दिवशी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने, चित्रकला स्पर्धा विजेता, सायक्लोथॉन विजेता क्रीडा महोत्सव 2023 मधील विजेत्यांना अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चा अध्यक्ष, मणींदरजित सिंह बिट्टा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

मणींदरजित सिंह बिट्टा यांनी पर्यावरणाशी निगडित आयोजित केलेल्या “वनमहोत्सव 2023” या उपक्रमाचे व पर्यावरण संवर्धनासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून सतत राबवत येत असल्याने मिरा-भाईंदर महापालिकाचे अभिनंदन व कौतुक त्यांनी केले. शहरातील नागरिकांनी पर्यावरण आणि निसर्ग याविषयी संवेदनशील बनणे, नैसर्गिक साधन संपत्तींचे संवर्धन करण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका आयोजित माझी वसुंधरा अभियान अंतर्गत “वनमहोत्सव 2023” मध्ये शहरातील जबाबदार नागरिक म्हणून सहभाग नोंदवल्यामुळे हा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला यासाठी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी मिरा भाईंदर शहरवासीयांचे आभार व्यक्त केले.

मिरा-भाईंदर कला क्रीडा महोत्सव-२०२३ चे आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते शुभारंभ

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: गुरुवार 23 फेब्रुवारी 2023 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत मिरा-भाईंदर कला-क्रीडा महोत्सव 2023 चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (घ.क.व्य.) रवी पवार, उपायुक्त (क्रीडा) कल्पिता पिंपळे, महानगरपालिका अधिकारी, शालेय मुख्याध्यापक व स्पर्धेत भाग घेणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान आयुक्त यांनी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्त्व वाढावे, त्यांचा शारीरिक व सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

मिरा-भाईंदर कला क्रीडा महोत्सव अंतर्गत 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत विविध खेळ व सांस्कृतिक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 23 फेब्रुवारी रोजी कबड्डी व लंगडी, 24 फेब्रुवारी रोजी खो-खो व लगोरी, 25 फेब्रुवारी रोजी धावणे व 26-27 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक स्पर्धा व खुला क्रिकेटचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.

मशाल प्रज्वलन करून स्पर्धेस उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी शुभेच्छा दिल्या व सदर कला-क्रीडा महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्या असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे आहे.

डोंबिवलीत महाशिवरात्री उत्साहात साजरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली शहरात आणि ग्रामीण भागात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात तसेच ग्रामीण भागातील श्रीशंकर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शंकर मंदिरात भक्तांना फळवाटप सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांनी शंकराच्या मंदिराजवळ रांगा लावून भोले शंकराचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरणात शिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

महाशिवरात्रीनिमित्त शहरातील सर्वात जुन्या असलेल्या पिंपळेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. बेलपत्र, बेलफळे वाहत, शिवलिंगावर दूध अर्पण करून यथासांग पूजा करण्यात आली. येथील शिवमंदिरात भाविकांनी पूजा करून महाशिवरात्र हा उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी या सणानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक शिवभक्तांनी भंडाऱ्याचेही आयोजन केले होते. आगामी निवडणुका पाहता अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भक्तांना शुभेच्छा देण्याचे मंदिर परिसरात बॅनर्स लावल्याचे दिसून येत होते.

श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळातर्फे महाशिवरात्री हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीत भजन-कीर्तन तसेच अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दुसऱ्या दिवशी हजारोच्या संख्येने भाविक येथे महाप्रसादाचा लाभ घेत असतात. सागाव, मानपाडा, सोनारपाडा, सागर्ली परिसरातील अशा गावांमधील भाविक श्रावणी सोमवारीच नव्हे, तर प्रत्येक दिवशी या मंदिराला भेट देत असतात. येणाऱ्या सर्व भक्त जणांसाठी प्रसाद म्हणून खिचडी, केळी, खजुराचे वाटप केले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोकप्रतिनिधी या मंदिरास भक्तिभावाने भेट देत असतात. मंदिराचे विश्वस्त प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे, पूजा मात्रे, पंढरीनाथ पाटील, रिक्षा संघटनेचे अंकुश म्हात्रे हे महाशिवरात्रीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी झटत असतात.

श्री सागांवेश्वर शिवमंदिर यांच्या वतीने महाशिवरात्रीचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष कर्ण जाधव यांनी मानपाडा क्रॉस रोडवरील शिवमंदिर येथे केले होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे भक्तांसाठी भंडारा ठेवण्यात आला होता. ‘मानस प्रचार हौसाबाई चॅरिटेबल ट्रस्ट’ सेवा संस्थेच्या वतीने श्री राम कथायज्ञ श्री रामजी मिश्रा महाराज यांचे सुश्राव्य किर्तन १० ते १८ फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले होते. रात्रीपासून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांनी रीघ लावली होती यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाशिवरात्रीच्या सकाळीच मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतल्याचे कर्ण जाधव यांनी सांगितले. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळते काही दिवसापूर्वी श्री त्रिंबकेश्वर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘दर्शन यात्रा’ आयोजित केली होती महादेवाच्या भक्तांना दूर जाऊ लागू नये म्हणून हे मंदिर २०१४ साली बांधण्यात आल्याचे कर्ण जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले, ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक मदत करणे त्याप्रमाणे सामाजिक कार्य नेत्रदान वैद्यकीय शिबिर असे आयोजित आम्ही करीत असतो असे ते म्हणाले.

कोपर येथील नागेश्वर मंदिरात देखील ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीचा भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी असा हा साप्ताहिक कार्यक्रम होता यामध्ये धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन, हरिपाठ इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात आले होते तसेच १९ फेब्रुवारी रविवारी रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

“अमित शाहजींनी जे सांगितले ते केले” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने नुकतेच पक्षाचे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे सुपूर्द केले. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खरी शिवसेना-खोट्या शिवसेना वादाला पूर्णविराम मिळालेला आहे. मात्र, उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्रमक भूमिका घेत हा शिवसेनेच्या नावाची आणि चिन्हाची चोरी असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण वादावर आता प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदार फोडून महाराष्ट्रात भाजपच्या पाठिंब्याचे सरकार स्थापन करण्याचे विधान केले. अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “अमित शाहजींनी मला सांगितले, शिंदे जी तुम्ही पुढे जा. आम्ही तुमच्या मागे खडकासारखे उभे राहू. शाहजींनी जे सांगितले ते केले.”

शिवसेनेच्या वादावर अमित शहांनी उद्धव गटाची खिल्ली उडवली

खऱ्या शिवसेना वादावर निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वागत केले आहे. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, ‘सत्यमेव जयते’ हा शब्द काल प्रत्यक्षात उतरला. निवडणूक आयोगाने दूधाचे दूध पाण्याचे पाणी केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही मिळाल्याचे ते म्हणाले. जे खोट्याचा आधार घेत ओरडत होते, त्यांना आज सत्य कोणाच्या बाजूने आहे हे कळले आहे. ते म्हणाले की, आज पुण्यातील कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील सर्व जागा शिवसेना आणि भाजपच्या वाट्याला जातील, असा ठराव घेऊन जायचे आहे.

या कार्यक्रमात अमित शहा यांच्या हस्ते ‘मोदी @२०’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पद वाटप करण्याबाबत कोणताही करार झाला नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली असे अमित शहा म्हणाले.