Home Blog Page 47

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरले हे भारतीय वंशाचे उद्योजक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अमेरिकेत पुढील वर्षी होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये आता भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी उतरले आहेत. ‘फॉक्स न्यूज’वर दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आता ते सोशल मिडिया व्हिडीओद्वारे निवडणूक लढवण्यासाठी निधी संकलित करण्याबाबत लोकांना आवाहन करत आहेत.

रामास्वामींबाबत थोडक्यात माहिती

रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असलेले विवेक रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना पक्षात प्रवेश केला. विवेक यांनी २००३ मध्ये सिनसिनाटी येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं. २००७ मध्ये त्यांनी हार्वर्डमधून पदवी घेतली. ३७ वर्षीय विवेक रामास्वामी हे आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आहेत. ‘ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर’ मधील सर्जन आणि सहाय्यक प्राध्यापक अपूर्व तिवारी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. २०२२ मध्ये त्यांनी स्ट्राइव्ह ऍसेट मॅनेजमेंट नावाची नवीन कंपनी स्थापन केली. विवेक त्या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

त्यांनी अमेरिकन कॉर्पोरेट्स मधील सामाजिक न्यायाच्या समस्यांवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यांनी बायोफार्मास्युटिकल कंपनी रिव्हॉल्ट सायन्सेसची स्थापना केली आहे. विवेक यांचे आई-वडील केरळहून अमेरिकेला गेले होते. त्यांचे वडील इंजिनिअर असून आई मानसोपचारतज्ज्ञ आहे. केरळमधील, वेदकेंचेरी, पलक्कड हे त्यांचे मूळ गाव.

राज्यातला पहाटेचा शपथविधी रंगतदार वळणावर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

२०१९ साली राज्यात राष्ट्र वादीच्या सहकार्याने सत्ता स्थापन करीत पहाटेच्या वेळी झालेल्या शपथ विधीची बाब आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली विधाने याला कारणीभूत ठरली आहेत. शिवसेना सोबत येत नाही असे पाहून भाजपाने २०१९ ला राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन केले आणि सकाळी लवकर फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असा शपथविधी झाला होता .

हा निर्णय शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा खुलासा नुकताच फडणवीसांनी करीत एकच खळबळ उडवून दिली होती, त्यावर थेट नकार न देता शरद पवार यांनी फडणवीस हे हुशार व्यक्ती आहेत मात्र ते असे काही बोलतील अशी अपेक्षा आपल्याला नव्हती असे सांगत नेहमीप्रमाणे गूढ वाढवले होते.

पुन्हा पवारांनी यावर भाष्य करीत त्यावेळी लागलेली राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी हा विषय झाल्याचे सांगत याबाबतच्या चर्चेला पुन्हा हवा दिली तर ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत कोणी कोणाच्या भेटी घेऊन काय सांगितलं तेही पवारांनी सांगावे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी देत या विषयाला पुन्हा रंगतदार वळणावर आणले आहे.

 

पुन्हा १०० रुपयांत सरकार कडून आनंदाचा शिधा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिका धारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा पुन्हा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.

कोणाला मिळेल हा शिधा ?

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना हा ‘आनंदाचा शिधा’ मिळेल.

१ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ‘ई-पास’द्वारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ‘ई-पास’ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा ‘आनंदाचा शिधा’ दिला जाईल.

हा ‘आनंदाचा शिधा’ देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील सरकार तर्फे मान्यता देण्यात आली.

 

१० घरफोड्यांची उकल आणि १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत मानपाडा पोलीसांनी केले घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मानपाडा पोलीसांना बंद घराची रेकी करून दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे केवळ तीन महिन्यात या आरोपीने डोंबिवली परिसरात धुमाकूळ घालत १० घरफोड्या केल्याची पोलीसांना कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले १२ लाखांचे दागिनेही हस्तगत केले आहेत. शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चैनाळे (वय: २६ वर्षे) असे गजाआड केलेल्या अट्टल घरफोड्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीला अटक करण्याविषयी सांगताना परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरीचे गुन्हे वाढल्याने गुन्ह्याचा उकल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सपोनि. सुनिल तारमळे, अविनाश वणवे यांच्यासह विशेष पथक स्थापन करून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू केला असता पोलीस तपासावेळी एक संशयित व्यक्ती एका इमारतीच्या खाली सुरक्षा रक्षकासोबत बोलत असल्याचे घरफोडी झालेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीला अटक

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या त्या संशयित व्यक्तीचा शोध सुरु केला असता, हा व्यक्ती अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावात राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस पथकातील सपोनि. अविनाश वणवे, सुनिल तारमळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा. राजेंद्र खिलारे, गडगे, ठिकेकर, पवार, पाटील, माळी, मिसाळ, पोना. भोईर, किनरे, पवार, पाटील, पोशि. मंझा, चौधर, आहेर, आव्हाड या पथकाने व्दारली गावात सापळा रचून आरोपी शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चैनाळे याला ताब्यात घेतले.

१२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मानपाडा, डोंबिवली आणि विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथीदाराच्या मदतीने बंद घराचे कुलूप, कडी कोयंडा तोडून १० घरफोड्या केल्याची पोलीसांना कबुली दिली. त्यानंतर घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून १० घरफोडीच्या गुन्ह्यातील २०० ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

१० घरफोड्या केल्याची दिली कबुली

अटकेतील आरोपी मूळचा कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील राहणारा असून तो काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुंबई परिसरात आला होता. तर गेल्या तीन महिन्यांपासून तो अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावात राहत आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत डोंबिवली भागात १० घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली. त्याने आणखी काही घरफोड्या केल्याची शक्यता असल्याने पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहे.

 

डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. डोंबिवली येथील शिवसेना मध्यवर्ती शाखे जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटी पूर्व (ए)चे अध्यक्ष सदाशिव शेलार, डोंबिवली शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी पूर्व (बी)चे अध्यक्ष नवेंदु पाठारे, डोंबिवली शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी (ए) चे अध्यक्ष शशिकांत चौधरी, डोंबिवली शहर (ब) ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. एकनाथ म्हात्रे, डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटी पूर्वचे जनरल सेक्रेटरी अशोक सदू कापडणे, अभय टावरे, जीतेंद्र मुळे, श्री. रमेशचंद्र जैन तसेच डोंबिवली शहरातील सर्व नागरिकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी, युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, तसेच काँग्रेस पदाधिकारी,महिला पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, ह्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी सर्वानी हजर राहून महाराजांना मानवंदना दिली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अनुसरून काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. महाराजांच्या सिद्धांताची बांधिलकी समाजासोबत होती. त्या विचारांचे काँग्रेस पक्षाचे धोरण आहे. आगामी पालिकेची निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून येतील असे काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.