Home Blog Page 49

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही निशाणी एकनाथ शिंदे यांचीच..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एकनाथ शिंदे गटाला दिले असून उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे गटाला हा मोठा दणका दिला असून, एकनाथ शिंदे यांच्या गटाला “शिवसेना” हे नाव दिले असून मूळ पक्षाचे धनुष्य बाण हे चिन्ह ही एकनाथ शिंदे यांनाच देण्यात आले आहे.

ठाकरे घराण्याकडे आता शिवसेना नाही

निवडणूक आयोगाने आज हा निर्णय घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षाच्या नाव आणि अधिकारावरून लढाई सुरू होती. यामुळे ठाकरे घराण्याच्या हातून आता तरी शिवसेना निसटली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवेसना प्रमुख म्हणून ओळखले जाणार आहेत.

शिवसेनेतील बदल आयोगाला माहितीच नाहीत

२०१८ मध्ये शिवसेना पक्ष घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ च्या पक्ष घटनेत समाविष्ट केलेले पक्षांतर्गत लोकशाही नियम बदलण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडून बदलांना मान्यता दिली होती. पण २०१८ मधील बदल नोंदवले गेले नाहीत असे आजच्या आयोगाच्या निकालात स्पष्ट झाले आहे. २०१८ मध्ये शिवसेना पक्षाने पक्ष घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नसल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. पक्षीय निवडणुका न घेताच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला आहे असे आयोगाने म्हटले आहे.

हा निर्णय लोकशाही ला घातक

आजचा हा निर्णय हा अत्यंत अनपेक्षित आहे चोरालाच तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत, देशात आता बेबंदशाही माजली आहे अशी प्रतिक्रिया उध्दव ठाकरे यांनी यावर दिली आहे. आमची मशाल आता पेटली आहे, आमची शिवसेना लेचीपेची नाही, आमच्या देव्हाऱ्यात शिवसेना प्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आहे तो आमच्याकडेच राहील असेही ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, आयोगाचा निकाल हे कट कारस्थान आहे हे स्पष्ट झाले आहे, मात्र धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही, चोरांना आता आनंद झाला असेल पण तो अल्पकाळच टिकेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

सामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजना अवश्य पोहोचवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांच्या लाभाचे वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. हा नवीन कल्याण पॅटर्न आहे. राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत, तरच हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमांतर्गत शासकीय योजनांच्या लाभाचा वितरण सोहळा व भव्य लाभार्थी सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार नरेंद्र पवार आदी या कार्यक्रमात उपस्थित होते.

या मेळाव्यात कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, मातृत्व वंदन योजना, श्रावणबाळ योजना, सखी आरोग्य किट, आदी योजनेच्या लाभाचे सुमारे दहा हजारहून अधिक लाभार्थींना वितरण करण्यात येणार आहे. यातील काही प्रातिनिधिक लाभार्थींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, आग्र्याच्या लाल किल्यातील दिवाण-ए-आम मध्ये १९ तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यास मंजुरी मिळाली आहे. हा आनंदाचा क्षण आहे. या कार्यक्रमास मंजुरी दिल्याबद्दल प्रधानमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शपथविधी नंतर घेतलेले प्रत्येक निर्णय हे सर्वसामान्यांना मदत करणारे, त्यांना न्याय देणारे आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजना कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे व सरकार घरापर्यंत पोचण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यासाठी मोठी तरतूद आहे. राज्याच्या हितासाठी निर्णय घेत आहोत. ठाण्यात रस्ते विकसित केले. त्याप्रमाणे कल्याणमध्ये चांगले रस्ते होण्यासाठी प्रकल्पबधितांना युएलसीची घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू. राज्यातील तरूण स्वतःच्या पायावर उभा राहून दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक होण्यासाठी ‘इनोव्हेशन हब’ला राज्य शासन सहकार्य करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचवू या. योजना फक्त कागदावरच न राहता लोकांपर्यंत अवश्य पोहोचल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना आवर्जून सांगितले.

 

४०० कोटी रुपयांचा नागपूरमध्ये वाळू घोटाळा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी पदाचा गैरवापर करीत नागपूर मध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांचा वाळू घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राजेश ठाकरे जिल्हाध्यक्ष भाजपा ग्रामविकास पंचायतराज तथा माजी जिल्हा उपाध्यक्ष नागपूर यांनी केला.

उच्चस्तरीय चौकशी व्हावी

नागपूर येथील शिंदे गटातील स्थानिक राजकारणी यांनी पदाच्या दुरुपयोग करीत गौण खनिज संदर्भात (वाळू घोटाळा) ४०० कोटीपेक्षा अधिक रुपयांचा शासकीय महसुल गिळंकृत केला. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारची फसवणूक केलेली आहे. त्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

काय आहे आरोप ?

राज्य सरकार द्वारा वैनगंगा नदी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे खनीकर्म महामंडळाला शासकीय प्रकल्पास वाळू उपलब्ध करून देण्याकरिता या नदीवरील चार घाट आरक्षित करण्यात आलेले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील व ब्रह्मपुरी तालुक्यातील अरहर – नवरगांव, बोडदा चिंचगाव आणि हळदा या नावाने वैनगंगा नदीवरचे चार घाट खणीकर्म महामंडळाला शासकीय प्रकल्पास तसेच शासकीय योजनेअंतर्गत चालू असलेल्या विविध विकास कामांना वाळू पुरवण्याकरिता दिलेले होते. शासकीय प्रकल्पाचे नाव पुढे करून अवैधरित्या थेट नदीमधून वाळू उत्खनन करून खाजगी बांधकामाच्या ठिकाणी पाठवून करोडो रुपयांची वाळू परस्पर विकण्यात आली. नियमानुसार वाळू उत्खनंन स्थानिक मजुराच्या माध्यमातून करायचे असते आणि नदीतून स्टॉक यार्ड पर्यंत ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करायची असते, परंतु या ठिकाणी सर्व नियम कायदा बाजूला ठेवत थेट नदीमधून ट्रक द्वारे, पोकलेन द्वारे हजारो ट्रक वाळू बाहेर विकण्यात आली, असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या संदर्भातील एक पुरावा म्हणजेच नागपूर जिल्ह्यातील भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत खनीकर्म महामंडळाच्या रेती वाहतूक करीत असणारा ट्रक व ट्रक चालक यांच्यावर झालेली कारवाई तसेच थेट नदी मधून पोकलेन द्वारे रेती उत्खनन करीत ट्रक मध्ये लोड करून सरळ खाजगी प्रकल्पाला खुलेआम देण्यात येत होतं.तेव्हा वरील सर्व उत्खनन व्यवहाराची व अनियमित आर्थिक व्यवहाराची निष्पक्षपणे उच्चस्तरीय चौकशी व्हावी या करिता केंद्र सरकारच्या एजन्सीकडे सदर प्रकरण द्यावे अशी मागणी ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

गुन्हे शाखा घटक-३ कडून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांना अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १३/०२/२०२३ रोजी रात्री २२.३० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व येथील शेलार नाक्याजवळील शंकर मंदिराच्या बाजूला फिर्यादी देवेंद्र राजभर हा पाणीपुरी खात असताना आरोपी नामे १) शिवा तुसांबड, २) छोटा चंदया, ३) मोठा चंदया, ४) वाणी हे तीथे आले व आपसात संगनमत करून फिर्यादी देवेंद्र राजभर यांस चाकूचा धाक दाखवून दमदाटी करून त्याच्या जवळील ₹ १८,२००/- रोख रक्कम जबरीने काढून घेतल्याबाबत रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. ६१/२०२३ भादंवि कलम ३९२, ३९७, ५०६, ३४ प्रमाणे दि. १४/०२/२०२३ रोजी दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना दि.१५/०२/२०२३ रोजी गुन्हे शाखा घटक-३ चे पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्री.मोहन कळमकर व पथकाने डोंबिवली पूर्वेकडील बंदिश पॅलेस येथे सापळा रचून १) शिवा रिषीपाल तुसांबड (वय:१९ वर्षे) राहणार. गजा डुक्करवाला याचे घराजवळ, सार्वजनिक शौचालयाच्या समोर, त्रिमूर्तीनगर, शेलार नाका, डोंबिवली (पूर्व), २) आकाश उर्फ वाणी हिरू राठोड (वय:२१ वर्षे) राहणार. रणविर डॉक्टरांच्या क्लिनिक समोर, स्वतःचे घर, त्रिमूर्तीनगर, शेलार नाका, डोंबिवली (पूर्व) येथून ताब्यात घेऊन त्यांच्या पोलीस अभिलेखाची पडताळणी केली असता आरोपी शिवा रिषीपाल तुसांबड याच्या विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात ७ व खडकपाडा पोलीस ठाण्यात १ असे एकूण विविध ८ गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले.

सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. अशोक मोराळे, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री.शिवराज पाटील, मा.सहा.पोलीस आयुक्त श्री.राजकुमार डोंगरे, यांच्या मर्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक श्री. मोहन कळमकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. नवनाथ कवडे, पोहवा. अनुप कामत, पोहवा. बालाजी शिंदे, पोहवा. बापूराव जाधव, पोहवा. विलास कडू, पोना. सचिन वानखेडे, पोशि. गोरक्ष रोकडे यांनी केली आहे.

 

हॉटेलमध्ये आढळला पोलीस शिपायाचा मृतदेह..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

यवतमाळ येथे जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळला. ही घटना सोमवारी सकाळी स्थानिक दत्त चौकातील हॉटेल मकरंदमध्ये उघडकीस आली. पोलीस शिपायाचा नेमका मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट झाले नसून, पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मागीलाल चव्हाण (वय: ३१ वर्षे) राहणार. पुसद असे मृतक पोलीस शिपायाचे नाव असून ती वडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होतो. गेल्या एक महिन्यापूर्वी त्याची शहर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात रुजु झाल्यानंतर दोन दिवसापासून तो स्थानिक दत्त चौकातील हॉटेल मकरंदमध्ये राहत होता.

१२ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सदर पोलीस शिपाई हॉटेलमध्ये गेला होता. दरम्यान १३ फेब्रुवारी रोजी सकाळी हॉटेलच्या रुममधून बाहेर न आल्याने आतमध्ये पाहिले असता मागीलाल चव्हाण हा पोलीस शिपाई मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलीसांना अजून मृत्यूचं नेमकं कारण कळु शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. गेल्या काही दिवसापूर्वीच त्याचा साखर पुडा झाला होता. त्याच्या मागे त्याचे आई-वडील, बहिण, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.