Home Blog Page 50

राज्याच्या विकासात प्रसारमाध्यमांचे मोठे योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरीमन पॅाईंट येथील एक्सप्रेस टॅावर इमारतीत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकसत्ता समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद गोयंका, संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते.

काळ, समाजकारण, राजकारण बदलले तरीसुद्धा गेल्या ७५ वर्षांपासून लोकसत्ताने आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता कायम ठेवल्याबद्दल कौतुक व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात चांगले काम करणाऱ्या विविध संस्थांना पुढे आणण्याचे काम आणि महिला, युवकांसाठी लोकसत्ता समूहामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे. राज्याच्या विकासात माध्यमांचे योगदान मोठे आहे. आम्हीही राज्यात लोकसत्ता आणली आहे. गेल्या सात महिन्यात राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. त्यांना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यमे करीत असून ही माध्यमे विकासाची वाट दाखविणारे आहेत. त्याचबरोबर राज्य शासन करीत असलेल्या कामांचे मूल्यमापन देखील माध्यमे करीत असतात, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प राबवित असून या प्रकल्पांना गती दिली जात आहे. यात राज्यातील रस्त्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी व्यवस्था उभी करण्यासाठी गेमचेंजर असलेला ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ गडचिरोली पर्यंत, नागपूर-गोवा महामार्ग, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता प्रस्तावित आहे. याचबरोबर राज्यात मेट्रो प्रकल्प सुरु आहेत. अशा विविध प्रकल्पांमुळे वाहनांची संख्या कमी होऊन पर्यायाने प्रवाशांची वेळेची बचत होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई ही आर्थिक राजधानी असून कोस्टल रोडसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प हाती घेतले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हेच राज्य शासनाचे ध्येय असून त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याची आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पहिल्यांदाच आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे. राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. उद्योगवाढीसाठी नुकतेच दावोस येथे कोट्यवधींचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्याच्या उद्योगवाढीला चालना मिळणार आहे. राज्याच्या विकास आणि लोकहितासाठी प्रसारमाध्यमांनी सूचना केल्यास त्यांच्या सूचनांवर राज्य शासनाकडून नक्कीच कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आश्वस्त केले. यावेळी ‘लोकसत्ता वर्षवेध २०२२’ या वार्षिकांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

जगातील सर्वच क्षेत्रात ब्राह्मणांची उत्तुंग भरारी – देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जेव्हा लढण्याची वेळ आली तेव्हा हाती तलवार घेतली आणि समाजाला सुधारकांची गरज असताना सुधारकांचे काम केले. जगातील प्रत्येक क्षेत्रात ब्राह्मणांचे योगदान असून ब्राह्मणांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण उद्योजकांच्या परिषदेत डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृह सांगितले. ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’च्या मुंबई विभागातर्फे डोंबिवलीतील उद्योजकांच्या दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तिथे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या परिषदेला देशाच्या विविध भागातून ७०० हून अधिक ब्राह्मण उद्योजक उपस्थित होते. रविवारपासून ब्राम्हण उद्योजकांची दोन दिवसीय परिषद डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुणवंत उद्योजकांना ‘उद्यम जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, अरविंद कोऱ्हाराळकर, महेश जोशी, श्वेता इनामदार, मकरंद पुंडलिक, अरविंद नांदापूरकर, विवेक वामोरकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कडोंमपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे, अभिनेते प्रशांत दामले उपस्थित होते.

ब्राह्मण समाजाने समाजाला वेळोवेळी दिशा देण्याचे काम केलेलं आहे ब्राह्मण समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या निस्वार्थीपणे काम करीत आहेत त्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्यावेळी लढण्याची वेळ आली त्यावेळी हाती तलवार घेत आणि ज्यावेळी समाजाला सुधारण्याची वेळ आली त्यावेळी सुधारकाचे काम केले. प्रसंगी आपल्याच समाजाच्या माणसासमोर उभे राहण्याला ते कधीच कचरले नाहीत. आता स्टार्टअप पासून ते मोठ्या उद्योग व्यवसाय पर्यंत ब्राह्मण समाजाने प्रगती केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण जगातील आर्थिक क्षेत्रांमध्ये पाचव्या स्तरावर आहोत २०३० साली आपण तिसऱ्या क्रमांकावर येऊ असा आशावाद यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

देशातील दूरसंचार क्रांतीमुळे नवे नवे व्यवसाय उभे राहिले असून या नव्या व्यवसायांना आपण समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण समाजामध्ये विशेषता तरुणांमध्ये शिक्षणाच्या व रोजगाराच्या बाबतीत कमतरता व्यक्त केली जाते. ही कमतरता दूर करण्याचे काम समाजाने केले पाहिजे जगामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत हे समजून सांगणारं कुणीतरी हवं. देश वेगाने प्रगती करत असताना ब्राह्मण समाजाने मोठे योगदान देशांमध्ये दिलेला आहे त्याच पद्धतीने यापुढेही ब्राह्मण समाजाने देशात आपले योगदान द्यावे. जगातील सात महत्वपूर्ण उद्योग कंपन्यांमधील चार कंपन्यांचे मुख्य अधिकारी हे ब्राम्हण समाजातील असल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून उल्लेख केला. विदेशातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात ब्राम्हण वर्गाची सरशी असून बाकरवडी ते मद्य निर्मितीपर्यंत साऱ्या क्षेत्रात ब्राम्हण उद्योजकांनी भरारी घेत देशाच्या उद्योग आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लावत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत बोलून दाखविले.

बीबीएनजी सारख्या संस्था शासनाकडे कधी काही मागत नसून त्या स्वयंभू असून त्यांचे कौतुक करत सरकार म्हणून अश्या संस्थांना गरजू व्यावसायिक, मार्गदर्शन, शिक्षण, रोजगार संधी याविषयी काही मदत साहाय्य हवे असल्यास आपण ते व्यक्तिशः आणि सरकार म्हणून मदत करू असे आश्वासन तेथील उपस्थित उद्योजकांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्या तरुणांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू केली आहे असेही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन पेन्शनर्ससाठी एक कौन्सिल तयार करावी – खासदार सुप्रियाताई सुळे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सभागृहात केली.

दरम्यान काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यानिमित्ताने सरकारला करुन दिली. पेन्शन स्कीमचा (ईएसओपी) मुद्दा सभागृहात उपस्थित झाला असून हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तो आवर्जून नमूद करताना देशातील साठ लाख पेन्शनर्संनी एका दिवसाचे उपोषण केले होते. त्यांचे प्रतिनिधी ४ मार्च रोजी पंतप्रधानांनादेखील भेटले होते. यावेळी त्यांनी सरकार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे त्याचे पालन करेल असे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा प्रश्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी विचारला.

यासंदर्भात महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी समितीने एक अहवाल तयार केला आहे. त्याबाबतही गेल्या नऊ वर्षांमध्ये सरकारने काहीही केलेले नाही ही बाबही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी निदर्शनास आणून दिली. पंतप्रधानांनी या पेन्शनर्सना त्यांच्या हक्काचा पैसा देणार असल्याचे वचन दिले आहे. या पेन्शनर्संनी आपल्या वेतनातून ४७० रुपये, ५४१ रुपये , १२५० रुपये योगदान दिले आहे. त्यांना आता मासिक निवृत्तीवेतन ४६० रुपये आहे. एवढ्या तुटपुंज्या रकमेत त्यांचा निर्वाह कसा काय होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करताना या लोकांनी हा देश घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना आपण वाऱ्यावर कसे सोडू शकतो असा संतप्त सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई तर्फे मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर, महानुभवापासून ते अगदी अलिकडच्या सोशल मीडिया युगापर्यंत मराठी परंपरेचा एक दीर्घ असा वारसा आहे. देशी आणि परदेशी भाषांचे आक्रमण होऊनही मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत असताना, जगाच्या व्यवहाराची भाषा असलेल्या इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि शिक्षणामुळे मराठी माणसांसमोर भविष्याविषयी चिंता व्यक्त करणारे बरेच प्रश्न सध्या उभे राहिले आहेत. ते योग्य कि अयोग्य याची चर्चा व्हावी या हेतूने वृत्तपत्र चळवळीचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा’ या विषयावर शाखाप्रमुख संजय भगत पुरस्कृत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शब्दमर्यादा १२०० असून इच्छुकांनी युनिकोड मराठीमध्ये टाईप करून लेख <rajandesai759@gmail.com> या मेल आयडीवर पाठवावेत, रोख पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असून लेख दि. २० फेब्रुवारी पर्यंत पाठवावेत, पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर-पश्चिम येथील मराठी भाषा दिवस कार्यक्रमात होईल अशी माहिती मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या
प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी राजन देसाई – ८७७९९८३३९०  यावर संपर्क साधावा.

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करत ₹ ९,९१,०५० चा महसूल जमा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर वाहतूक उपविभागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय रघुनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोकल तसेच वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार व त्यांच्यासोबत असलेले वॉर्डन यांच्या कडून शहाड रेल्वे स्टेशन, शहाड जकात नाका, म्हारळ जकात नाका, शांतीनगर, उल्हास नगर रेल्वे स्थानक, सतरा सेक्शन, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्या दंडात्मक कारवाईतून एकूण ९९२ चलन आकारणी करण्यात आली असून सरकारी तिजोरीत ९,९१,०५० रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे.