Home Blog Page 51

उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नका!

कोणतीही करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्याची काँग्रेसची मागणी

भाईंदर: सध्या मीरा भाईंदर महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे, उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट न करता त्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना केली आहे.

कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध नसताना शहरातील नागरिकांवर विविध मार्गांनी कर लादले आहेत तर नव्याने 10 टक्के रस्ता कर लागू करण्यासाठी प्रशासकीय निर्णय घेतल्याने त्याला काँग्रेस पक्षाने यापूर्वीच विरोध केला आहे. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासक या नात्याने आयुक्तच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शिंदे- फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण, वॉर्ड रचना, नगरसेवक संख्या, पॅनल पद्धत आदींचे कारण देत प्रकरण न्यायप्रविष्ठ करीत प्रलंबित ठेवल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट किती असावी याचीही कालमर्यादा हवी असे नागणे म्हणाले.

महासभा घेण्याचा अधिकार महापौरांना असतो तर धोरणात्मक निर्णय, धोरण ठरविण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना असला तरी प्रशासक या नात्याने राज्यशासनाने आयुक्तांना बहाल केलेले अधिकार तसेच प्रशासकीय राजवटीत आजतागायत किती सभा घेतल्या व प्रशासकीय ठराव केले याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात प्रशासनाकडे मागितली असल्याचे काँग्रेस प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी सांगितले.

येणाऱ्या काही दिवसांत मिरा भाईंदर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारच्या नवीन कर वाढीचा प्रस्ताव आल्यास त्याला काँग्रेस पक्षातर्फे विरोध केला जाईल असे स्पष्ट मत काँग्रेसचे मिरा भाईंदर शहाराराचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी व्यक्त केले आहे!

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन’ या संस्थेची सातवी वार्षिक जागतिक परिषद आयोजित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई: ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन या संस्थेची सातवी वार्षिक जागतिक परिषद डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे. ही संस्था जगभरातील ब्राह्मण व्यावसायिकांना एकमेकांशी व्यावसायिक रित्या जोडण्यासाठी कार्यरत आहे आणि त्याच माध्यमातून समाज बांधवांना नोकरी पेशातून व्यावसायिक आणि उद्योगी बनवण्यात आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान देण्यात परिवर्तित करत आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी माननीय पद्मभूषण पद्मविभूषण आणि पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ संशोधक श्री. अनिलजी काकोडकर उपस्थित राहणार आहेत तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र शासन मा. श्री. रवींद्रजी चव्हाण ह्यांची पण उपस्थिती लाभणार आहे.

डोंबिवली येथील तसेच डोंबिवली बाहेरील सन्माननीय प्रथित यश असे उद्योगपती आणि महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेले विविध सन्माननीय व्यक्ती वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत ज्यामध्ये सर्वश्री सतीश मराठे, संजय लोंढे, दीपक घैसास, उदय निरगुडकर, संजय खरे, डॉक्टर अजय शेष, शशांक पेंडसे, निवृत्त लष्करी अधिकारी सुदर्शन हसबनीस इत्यादी मान्यवर व्यक्ती सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात प्रतिथयश व्यावसायिकांना ‘उद्यम कौस्तुभ’ पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे आमंत्रण दिले गेले आहे. या परिषदेमध्ये विचार, व्यवसाय आणि विकास या त्रिसूत्री वर आधारित अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, ज्यात व्यावसाय संदर्भात अनेक चर्चासत्रे, मान्यवरांचे मार्गदर्शन, ट्रेड फेअर, फॅशन शो, अशासारखे अनेक कार्यक्रम असणार आहेत व त्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील आणि भारताबाहेरील देखील अनेक उद्योगपती आणि व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत असे ‘बीबीएन ग्लोबल असोसिएशन’ या संस्थेचे सहसंचालक श्री.अरविंद कोऱ्हाळकर यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इच्छुक ब्राह्मण व्यावसायिकांनी <www.parivartan23.in> ह्या वेबसाईटवर रजिस्टर करणे अथवा 7208266169 ह्या क्रमांकावर फोन करून आपली उपस्थिती निश्चित करायची आहे असे आयोजकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

 

तृतीयपंथीयांसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी उचलले मोठे पाऊल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सबका साथ सबका विकास असे म्हणत असताना तृथीयपंथीय हा देखील समाजातील एक घटक आहे. या घटकातील लोकांच्या समस्यांकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. या समाजातील लोकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी पुढाकार घेतला असून महाजन यांच्या हस्ते मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयामध्ये देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत तृतीयपंथीयांना पुरुष कक्षात किंवा महिला कक्षात भरती करायचे हा मोठा प्रश्न असायचा मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या विशेष कक्षात तृतीयपंथीयांवर शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

कमी वेळात अत्यंत मेहनतीने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी हा विशेष कक्ष सुरु केल्याबद्दल त्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, तृतीयपंथीयांच्या अनेक वैद्यकीय समस्या होत्या, या समस्य सोडवून या घटकाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून ३० खाटांचा विशेष कक्ष आजपासून जी.टी. रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे.

या विशेष कक्षात येणाऱ्या तृतीयपंथीयांवर उपचार करण्यासाठी अद्यावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. २ व्हेंटिलेटर, मॉनिटर, सेमी आयसीयू यासह येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. येत्या काही काळात सर जे.जी.समूहाच्या सेंट जॉर्ज, जे.जे. रुग्णालय आणि कामा हॉस्पीटल येथेही विशेष कक्ष सुरु करण्यात येईल. जे.जे. रुग्णालयात आजपासून व्यसनोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उपचार, समुपदेशन तसेच पुनर्वसनाची गरज असते. आजपासून हे व्यसनोपचार केंद्र कार्यान्वित झाले असलयाचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. भालचंद्र चिखलकर, गौरी सावंत, सलमा खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष बाबतच्या मार्गदर्शन सूचना पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

गिरीश महाजनांनी तृतीयपंथीयांसाठी उचलले मोठे पाऊल

राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सध्या १३ जिल्हयांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हयात सक्षम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करणे यावर भर असणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

आतापर्यंत राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयात भरती होत असताना केस पेपरवर महिला किंवा पुरुष असे दोनच रकाने असायचे आता तृतीयपंथीय असा हा नवीन रकाना सुध्दा असणार असलयाचे या कार्यक्रमादरम्यान आपल्या प्रस्ताविकात डॉ. सापळे यांनी सांगितले.

 

डोंबिवलीतील ‘होली एंजल्स’ शाळेचे राष्ट्र उभारणीसाठी योगदान महत्त्वाचे – कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शालेय शिक्षण घेण्याच्या वयातच विद्यार्थ्यांवर योग्य प्रकारे संस्कार होणे गरजेचे आहे. डोंबिवलीतील ‘होली एंजल्स’ शाळेच्या व्यवस्थापनाकडून राष्ट्र उभारणीसाठी संस्कार केले जात असून, हे राष्ट्रासाठी मोठे योगदान असल्याचे प्रांजळ मत कॅबिनेट मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी शाळेचे कौतुक करताना मांडले.

डोंबिवलीतील गांधी नगर पीएनटी मधील ‘होली एंजल्स’ शाळेच्या दोन दिवसीय ३३ वा वार्षिकोत्सव नुकताच पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नामदार रवींद्र चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर उपस्थित होली एंजल्स शाळेचे संस्थापक डॉ.ओमेन डेव्हिड, मॅनेजिंग ट्रस्टी लीला ओमेन, प्राध्यापक बीजाॅय ओमेन, रोटरीयन जिल्हा गव्हर्नर कैलास जेठाणी, मुख्याध्यापिका रफट शेख अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

यावेळी नामदार रवींद्र चव्हाण यांनी शाळेचे कौतुक करताना सांगितले कि, विद्यार्थ्यांचे पालक, होली एंजल्स शाळेचे शिक्षक, व्यवस्थापन यांच्या अथक प्रयत्नांमुळे कुमारी दिक्षा सुवर्णा या विद्यार्थीनीने यंदा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९९.६० टक्के गुण प्राप्त करुन महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक आणि खेळात देखील आंतरराज्यीय स्तरावर अग्रेसर आहेत. शालेय शिक्षणाच्या वयातच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. डोंबिवलीतील ‘होली एंजल्स’ शाळेच्या व्यवस्थापनाकडून राष्ट्र उभारणी साठी उत्तम संस्कार केले जात असून, हे राष्ट्रासाठी मोठे योगदान असल्याचे प्रांजळ मत कॅबिनेट मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी शाळेचे कौतुक करताना मांडले. डॉ.ओमेन डेव्हीड व लिला ओमेन यांना शैक्षणिक क्षेत्रातील दिर्घ अनुभव असल्याने राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी घडत असल्याचे नामदार चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले. वार्षिकोत्सवात कुमारी दिक्षा सुवर्णा हिचा सत्कार नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. शैक्षणिक आणि खेळात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मॅनेजिंग ट्रस्टी लिला ओमेन आणि संस्थापक ओमेन डेव्हिड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेच्या दोन दिवसीय ३३ व्या वार्षिक उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या विविध कला सादर केल्या. या वार्षिक उत्सवासाठी सलग दोन दिवस पालक वर्ग मोठ्या संख्येने शाळेच्या प्रांगणात उपस्थित होता.

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली ती याच शाळेची माजी विद्यार्थिनी जिने २००९ साली दहावीच्या महाराष्ट्र राज्य बोर्डात ९१.६९ % गुण पटकावून शाळेत तिसरी आलेली कुमारी.अदिती अवधुत सावंत हिने जगातील ९ व्या मानांकित अमेरिकेतील एम्स शहरातील ‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी’ तून ‘मास्टर्स इन ऍरोस्पेस ऍण्ड ऍरोनॉटीकल इंजिनियरिंग ची पदवी घेऊन नोकरी करत असून भारतात सध्या अमेरिकेतून सुट्टीवर आलेली आहे.

तिने खास करून या ३३ व्या वार्षिकोत्सवास उपस्थित राहून नामदार रवींद्र चव्हाण व ‘होली एंजल्स’ शाळेचे संस्थापक ओमेन डेव्हिड, लीला ओमेन, प्राध्यापक बिजॉय ओमेन, ऍनी बिजॉय, मुख्याध्यापिका रफट शेख, माजी शिक्षिका अनिता सोनावने, नेहा कामत, वीजी श्रीनिवासन, जयंती अखिलेश्वरन, रेवती टीचर यांना भेटून कृतज्ञता व्यक्त करत शाळेच्या समस्त विध्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकीर्दीकरिता शुभेच्छा दिल्या.

“बारामतीत चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात” म्हणणाऱ्या पडळकरांवर अजित पवार संतापले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत असतात. सोमवारी नाशिकमध्ये पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. गेल्या ४० वर्षात चुलते आणि पुतण्यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

एका कार्यक्रमाला संबोधित करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, बारामतीचे चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात. महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांचा निधी यांनी पळवला आहे. शिरुर तालुक्याचा बिबट्या संदर्भातील १००० हजार कोटींचा निधी बारामतीला नेला. पण, बारामतीत एकही बिबट्या नाही. गेल्या ४० वर्षात यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागांचं नुकसान केलं. त्यामुळे आपली वाताहात केली,” असं गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, “प्रत्येकाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. उपटसुंभ लोकांना उत्तर देण्यास अजित पवार मोकळा नाही. तो काय एवढा मोठा नेता लागून गेला नाही. डिपॉजिट जप्त करुन पाठवलं आहे.”

“प्रश्न उपस्थित करणाऱ्यामध्ये ताकद आहे का ?”

कृषी प्रदर्शनासाठी शरद पवारांनी पैसे घेतले, असा आरोप भाजपाने केल्याचं प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यावर अजित पवारांनी सांगितलं, “कृषी प्रदर्शन होतं असताना शरद पवारांनी पैसे मागितले, असं सांगणारा एक शेतकरी उभा करा, मी राजकारण सोडून देईन. प्रश्न उपस्थित करणाऱ्यामध्ये ताकद आहे का? आव्हान स्वीकारत राजकारणातून निवृत्त व्हायचं. भारताला स्वयंपूर्ण करण्यात काम शरद पवारांनी केलं. त्याची नोंद जगाने घेतली,” असेही अजित पवार म्हणाले.