Home Blog Page 52

भाजपचे हिंदुत्व ‘ ढोंगी ‘ असल्याची विद्याताई चव्हाण यांची ‘जन जागर यात्रा’ रॅलीदरम्यान खरमरीत टिका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवलीत भाजप विरोधात राष्ट्रवादी तर्फे ‘जन जागर यात्रा’ रॅली काढ्यात आली होती. या रॅली दरम्यान भाजपाने विकासाचे कोणतेही काम केलेले नाही. दिशाभूल करून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी, भाजप नुसतं हिंदुत्व हिंदुत्व करीत आहे. मात्र भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी यावेळी केली आहे.

डोंबिवली येथे बेरोजगारी आणि महागाई विरोधातल्या ‘जन जागर यात्रा’ रॅली निमित्त आल्या असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही खोचक टीका केली आहे. यावेळी ठाणे विभागीय अध्यक्षा ऋता आव्हाड, प्रदेश संघटक सचिव व ठाणे जिल्हा निरीक्षक माया कटारिया, जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, डोंबिवली विधानसभा १४३ चे अध्यक्ष सुरेश जोशी, महिला अध्यक्ष तनुजा पाटणकर, कार्याध्यक्ष नंदू धुळे, प्रदेश पदाधिकारी रमेश हनुमंते, खजिनदार मिलिंद भालेराव, ऍडव्होकेट ब्रह्मा माळी, वार्ड अध्यक्ष भरत गायकवाड, इतर मान्यवर पदाधिकारी, महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक या जन जागर यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महापालिकांच्या निवडणुका गेले वर्षभर होत नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलीच मोकळीक मिळाली आहे. या अधिकाऱ्यांचा वाट्टेल तसा मनमानी कारभार सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी काम करीत नाहीत. कल्याण-डोंबिवली मध्ये भाजपाने नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवलेल्या नाहीत. भाजपने तर कामचं केलेले नाही. बेरोजगारी वाढून महागाईने जनता होरपळलेली असताना, भाजप नुसतं हिंदुत्व हिंदुत्वच करीत आहे. मात्र भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी आहे. त्यामुळे मूलभूत समस्यांवरील लक्ष विचलित होत आहे. कल्याण-डोंबिवलीत काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. २७ गावातील नागरिक टॅक्स भरत असताना सुद्धा, त्यांना चालायला चांगले रस्ते व मूलभूत सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे निवडणुका होणे गरजेचे आहे. निवडणुका झाल्या की, नगरसेवक निवडून येतील. या नगरसेवकांना निदान नागरिक जाब तरी विचारू शकतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली हे घाणेरडे शहर असल्याची टीका केली होती. याबद्दल विद्या चव्हाण म्हणाल्या की, गडकरी हे नेहमी खरं बोलतात. यावेळी मोदी-शहा आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर देखील त्यांनी टीका केली.

बुधवारी डोंबिवली येथे आयोजित ‘जन जागर यात्रा’ रॅली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जोशी यांच्या गणेश नगर मधील संपर्क कार्यालयापासून महागाई आणि बेरोजगारी विरोधातल्या जन जागर यात्रेला सुरुवात झाली. ही रॅली डोंबिवली पश्चिम येथील नवापाडा, भोईरवाडी, सम्राट चौक, उमेश नगर, गुप्ते रोड, अशी काढण्यात आली होती. गुप्ते रोड येथे सायंकाळी यात्रेची सांगता झाली. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी चौक सभा घेऊन बेरोजगारी आणि महागाई विरोधात नागरिकांचे जन जागर करण्यात आले. या यात्रेस नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. या रॅलीदरम्यान ‘महंगाई कम करो, मोदी-शहा होश मे आओ, शिंदे-फडणवीस होश मे आओ’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.

दि.बा. पाटील जयंतीदिनी शेतकऱ्यांच्या आत्मदहनाचा निर्णय कल्याण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सोनारपाडा गावातील संरक्षित कुळांसहित जमीन परस्पर विकल्याच्या प्रकरणी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दि.बा.पाटील यांच्या जयंती दिनी आज आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. कल्याण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर गावातील शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन तूर्तास पुढे ढकलले आहे. सोनारपाडा गावातील संरक्षित कुळांसहित जमीन परस्पर विकल्याच्या प्रकरणी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून देखील अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने सोनारपाड्यातील शेतकऱ्यांनी लोकनेते दि.बा.पाटील यांच्या जयंती दिनी १३ जानेवारी रोजी उपासमारीमुळे सहकुटुंब आत्महत्या करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

शेतकऱ्यांच्या आत्मदहन करण्याच्या इशाऱ्याची दखल घेत मनसे आमदार राजू पाटील, शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदारांनी शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा व आत्मदहनापासून परावृत्त व्हावे अशी विनंती केली. त्यांचे निवेदन वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला आहे.

तर शेतकऱ्यांची मागणी शासनाकडे पोहोचवण्यासाठी तहसीलदारांची भेट घेतली असून तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच याबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मिळून महसूल मंत्र्यांची भेट घेऊन या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून शेतकऱ्यांच्या जागा त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी करणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

यावेळी बैठकीला सोनारपाडा येथील शेतकरी जितेंद्र ठाकूर, महेंद्र म्हात्रे, नवनीत म्हात्रे, शिवनाथ म्हात्रे, हरिदास जोशी, ज्ञानदेव ठाकूर, सोपान ठाकूर, गणपत केणे, रवींद्र म्हात्रे, दिलीप ठाकूर यांच्यासह महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सोनारपाड्यातील शेतकऱ्यांचा लोकनेते दि.बा. पाटील जयंतीदिनी आत्महत्येचा इशारा !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने शासन प्रशासनाच्या संगनमताने संरक्षित कुळे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची बांधकाम व्यावसायिकाला परस्पर जमीन विक्री केल्याने, उपासमारीची वेळ आल्याने सोनार पाडा (मौजे दावडी) येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीदिनी मंत्रालय किंवा मुंबई भिक्षा सोसायटीच्या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

सोनार पाड्यातील शेतकरी व त्यांचे पूर्वज १९३२ पासून शेत जमिनी कसत आहेत. भात,भाजीपाला अशी तत्सम पिके घेत आहेत. असे असताना मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने आम्हां शेतकऱ्यांची कुठलीही विक्री परवानगी च्या विश्वासात न घेता ८० (८०.७१) एकर जमिनीची परस्पर विक्री केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. भारतीय संविधान अनुच्छेद २१ चा भंग करून ही विक्री बांधकाम व्यावसायिक अजय प्रताप अशर आणि जतीन देसरिया यांना परस्पर विक्री करण्यात आली आहे. तत्कालीन धर्मदाय आयुक्त एन.व्ही.जोशी यांना खोटी माहिती देऊन ही विक्री करण्यात आली आहे. धर्मदाय आयुक्तांच्या विक्री परवानगी मध्ये ते १ ते ७१ क्रमांकाच्या संरक्षित कुळांचा उल्लेख आलेला आहे. सदर जमिनीचे सातबारा आमच्या नावावर आहेत. पिकपाणी उतारे आहेत.अशाप्रकारे शेत जमीन विक्री करण्याचा बेकायदेशीर प्रकार हिंदुस्थानात प्रथमच झाला असावा.

आजपर्यंत शासनाच्या ५८ विभागात आमच्या केसेस आम्ही लढवित आहोत. निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या ‘मित्र’ संस्थेवर सरकारने बांधकाम व्यवसायिक अजय प्रताप अशर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही अशी भावना झाल्याने, विधिमंडळाचे माजी उपसभापती नरहरी झिरवळ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे की लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जयंतीदिनी आम्ही सोनारपाडा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या साहित्य नगरीत दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत डोंबिवलीत दहा दिवस रंगणार दोन लाख पुस्तकांचा आदान प्रदानचा भरगच्च शानदार सोहळा कार्यक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत मानाचा तुरा ठरलेले ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष असून यंदा दोन लाख पुस्तकांचे आदान प्रदान करून जगभरात या शहरातील सोहळ्याचा विक्रम गाजवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २० ते २९ जानेवारी या कालावधीत हा सोहळा आपल्या डोंबिवलीतील ह.भ.प सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणात संपन्न होणार आहे.

या सोहळ्याच्या शुभारंभाला प्रख्यात साहित्यिक अच्युत गोडबोले, उमाताई कुलकर्णी, प्रख्यात राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर, डोंबिवलीचे लाडके सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.

त्या सर्व परिसराला यंदा एपीजे अब्दुल कलाम नगरी असे नाव देण्यात येणार असून पुस्तकांनी त्यांची प्रतिकृती साकारण्यात येणार असून ते एक प्रमुख आकर्षण असणार आहे. त्यासोबतच पुस्तकाचे इग्लु, पिरॅमिड आणि अन्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

दहा दिवसांत माजी केंद्रीय लोकसभा स्पीकर सुमित्राताई महाजन, महेश कोठारे, प्रणव सखदेव, अरुणा ढेरे, प्रल्हाद दादा पै, वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक, रोहन चंपानेरकर, श्रीकांत बोजेवार, अतुल कुलकर्णी, अशोक कोठावळे, सुदेश हिंगलासपुरकर, दिनकर गांगल, कुमार केतकर, अरुण शेवते, अक्षय बर्दापूरकर, कमलेश सुतार, प्रसाद मिराजदार , प्रभू कापसे, वैद्य परीक्षित शेवडे यांच्यासह अनेक लेखक, साहित्यिक, प्रकाशक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सर्व उपक्रमात कल्याण-डोंबिवली महापालिका देखील यंदा सहभागी झाली असून ती एक जमेची बाजू आहे, ‘वाचाल तर वाचाल’ ही वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने आयुक्त चितळे यांनी या उपक्रमात महापालिका सढळ हस्ते सहकार्य करणार असल्याचे सांगून त्यांनी तातडीने वास्तू देऊन सहकार्याचा हात पुढे केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण हे तर ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असतात. साहित्य टिकणे वाढीस लागणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अशा नात्याने ते नेहमीच मदत करतात, या सोहळ्याला देखील त्यांनी भरीव अर्थ सहाय्य केले असून कल्याण डोंबिवली महापालिका आणि ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ हे या उपक्रमाचे सहआयोजक असल्याचे मुख्य आयोजक पुंडलिक पै यांनी सांगितले.

राष्ट्रपती महामहीम द्रौपदीजी मुर्मू मॅडम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

शहरातील सुमारे ४० साहित्यिक मंडळी या उपक्रमात सहभागी असून त्यांचे सर्व साहित्य यावेळी प्रदर्शनाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे.

कॉफी टेबल बुक


यानिमित्त ‘फ्रेंड्स लायब्ररी’ एक कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण करणार असून त्यात जवळपास ७५ मान्यवरांचे लेख आहेत, ‘आझादी के ७५ साल’ या थीमवर आधारित ते पुस्तक प्रसिद्ध होणार असून त्याचे अनावरण शुभारंभाच्या दिवशी होणार आहे.

या सर्व उपक्रमात प्रख्यात ‘एम्स हॉस्पिटल’ने हॉस्पिटल पार्टनर ही महत्त्वाची जबाबदारी उचलली आहे. डॉ.मिलींद शिरोडकर यांनी त्याबाबत पुढे येऊन या सोहळ्यात मोलाचे योगदान दिले आहे.

यानिमित्ताने शहरातील ३०हून अधिक शाळा त्यांच्या माध्यमातून १५ ते १९ जानेवारी दरम्यान ग्रंथ दिंडी काढणार आहेत. त्यात सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होतील. तसेच ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ आणि आयोजकांच्या माध्यमातून १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून मानपाडा चार रस्ता टिळक चौक सर्वेश हॉल फडके पथ गणेश मंदिर या मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.


पत्रकार परिषदेला मंत्री चव्हाण, महापालिका सिटी इंजिनियर रोहिणी लोकरे, वृंदा भुस्कुटे, दीपाली काळे, दर्शना सामंत, धनश्री साने, ललिता छेडा, प्रवीण दुधे, प्रभू कापसे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

५ तोळे सोने असलेली ऑटो रिक्षात विसरलेली बॅग रिक्षावाल्याने केली परत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथील प्रवासी दिपाली राजपुतय या दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ‘श्रम-साफल्य बंगला’ ते डोबिवली स्टेशन मच्छीमार्केट असा प्रवास करत होत्या. रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की बँग रिक्षामध्ये राहीली आहे. त्यावेळी त्यांनी ताबडतोब रिक्षा स्टँण्डवर येऊन चौकशी केली. तेव्हा महात्मा फुले रोड रिक्षा स्टँण्डवरील रिक्षा चालक श्री.संतोष राणे, रिक्षा क्र. एमएच ०५ डीएल ४१८५ यांनी त्यांच्या रिक्षामध्ये शोध घेतला असता प्रवाशांची ५ तोळ्याचे दागिने असलेली बँग सापडली. त्यांनी ती बँग प्रवासी महिला यांना संपुर्ण दागिन्यासह प्रामाणिकपणे परत केली.

या प्रामाणिकपणाबद्दल कल्याण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मंदार धर्माधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गित्ते यांनी रिक्षा चालक श्री.संतोष राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.