Home Blog Page 53

पतीला सोडून राहणाऱ्या महिलेची हत्या करणाऱ्या प्रियकराला दीड महिन्यानंतर अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पतीला सोडून प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलेची हत्या करणाऱ्या प्रियकराला उल्हासनगर हिल लाईन पोलिसांकडून दीड महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली होती. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा परिसरातील एका चाळीत घडली. खळबळजनक बाब म्हणजे मृत महिला ज्या व्यक्ती सोबत राहत होती, त्यानेच तिची हत्या करून पळ काढल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध पोलीसांनी सुरु केला असता, दीड महिन्यानंतर पोलीसांना आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. वैभव देवकाते असे बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मीबाई मनोहर तायडे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

शेजाऱ्यांना आढळून आला मृतदेह

मृत महिला दोन महिन्यापूर्वी आरोपी प्रियकर वैभव सोबत अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा भागातील साईबाबा चाळीतील भाड्याच्या घरात राहण्यास आली होती. ती मूळची अकोला जिल्ह्यातील पिंपळखुंटे गावात राहणारी होती. त्यातच मृतक महिला लक्ष्मीबाई मनोहर तायडे आरोपी वैभवकडे सतत लग्नाचा तगादा लावत होती. यामुळे दोघांमध्ये वादही होत होते. असाच वाद ७ नोव्हेंबर रोजी झाला होता. त्याच पहाटेच्या सुमारास तिची चाकूने गळा चिरून घरताच निर्घृण हत्या केली गेली. सकाळी सात वाजल्याच्या सुमारास तिचा मृतदेह ती राहत असलेल्या घरात शेजाऱ्यांना आढळून आला. मात्र तिच्यासोबत रहाणारा वैभव पसार झाला होता.

आधी साडीने तिचा गळा आवळला, नंतर चाकूने  गळयावर केले सपासप वार

घरात खून झालेल्या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी हिललाईन पोलिसांना देताच पोलीस पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत लक्ष्मीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला. मृतदेहाच्या अहवालात आदी साडीने तिचा गळा आवळला नंतर चाकूने गळयावर वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून वैभवचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला.

औरंगाबाद शहरातून दीड महिन्यानंतर अटक

तपासा दरम्यान वैभव देवकाते हा याच भागातील एका बांधकाम साईटवर वाहनचालक असल्याचे पोलीसांना समजले. पोलीसांनी आरोपीची अधिकाअधिक माहिती गोळा करून त्याच्या शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ, गुन्हे प्रकटीकरणं टीमचे सुभाष घाडगे, बाबू जाधव, बडे आणि प्रमोद लोंढे या पोलीस पथकाची नेमकणूक करण्यात आली. मात्र आरोपी हा वेळोवेळी राहण्याचे ठिकाण बद्दल असल्याने पोलीसांना गुंगारा देत होता. त्यातच पोलीस पथकाला गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी वैभव हा औरंगाबाद शहरात असल्याची माहिती मिळताच, पोलीस पथकाने औरंगाबाद शहरातून दीड महिन्यानंतर वैभव देवकाते याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. ह्या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे करत आहेत असे प्रसिध्दी माध्यमांना सांगण्यात आले.

कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण नाही; वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मकतेने विचार करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

संपकरी वीज कर्मचाऱ्यांशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर राज्य शासन मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याने संपकरी वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेत असल्याचे घोषित केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ऊर्जा विभागातील संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यावेळी आमदार भाई जगताप, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, ‘महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ‘महानिर्मिती’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री फडणवीस म्हणाले, वीज कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा शासन सकारात्मकपणे विचार करत असून वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नाही. सर्व कायदेशीर आयुधे वापरून पॅरलल लायसन्स संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (एमईआरसी) मध्ये आक्षेप मांडण्यात येईल. कंपनीवर होणारा परिणाम व ग्राहकांचे हित यावेळी प्राधान्याने मांडण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वीज कंपन्या अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असून आर्थिक बळकटीकरणासाठीही ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही काही नावीन्यपूर्ण कल्पना मांडाव्यात त्यांचे नक्कीच स्वागत करण्यात येईल. फ्रॅन्चायजी कुठे करायच्या याचा विचार होणे गरजेचे असते. फ्रॅन्चायजीचा उपयोग झाला पाहिजे. त्याद्वारे काही नवीन पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणार

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यांचे मानधन थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. त्यांची सामाजिक सुरक्षितता जपण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जास्तीची गुंतवणूक होऊन नव्याने पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत यावर भर देण्यात येत आहे. जलविद्युत प्रकल्पांसंदर्भातही निर्णय घेण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी ‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ संचालित ‘जनगणमन’ शाळेच्या चिल्ड्रन्स स्मॉल सेविंग बँकेचे उद्घाटन उत्साहात संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिमेकडील ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ च्या सहकार्याने ‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ संचालित ‘जनगणमन’ शाळेच्या चिल्ड्रन स्माॅल सेविंग बँकेचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या उद्घाटनाला माजी नगरसेवक विश्वनाथ राणे ‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव प्रेरणा कोल्हे, जान्हवी मल्टी फाउंडेशनच्या जान्हवी कोल्हे, डोंबिवली युनियन बँकेचे व्यवस्थापक अवनीश कुमार, शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक वर्ग, पालक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात उपस्थित होता.

यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मंगल पांडे यांच्या ऐतिहासिक क्षणांचे भावनेने ओथंबून भरलेले नाट्य सादरीकरण केले. त्याला उपस्थितांकडून कडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

लहान मुलांमध्ये विशेषता, विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता यावी. याकरिता प्रथमच जनगण शाळेमध्ये विद्यार्थी बँक, विद्यार्थ्यांनी सुरू केलेली व विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन असलेली बँक सुरू करत असल्याबद्दल विश्वनाथ राणे आणि डॉ. कोल्हे यांनी युनियन बँकेचे आभार मानले. संचालक डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या संकल्पनेतून ही बँक निर्माण झाल्याने डॉ. कोल्हे यांचे अभिनंदन आणि कौतुक राणे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या बँकेला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे अवनिष कुमार यांनी सांगितले.

 

डोंबिवलीतील उद्योजकांना ‘महावितरण’ च्या नोटीसा; सुरक्षा अनामत रकमेविरुद्ध उद्योजकात संतापाची लाट..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील उद्योगक्षेत्रात कोरोना सारख्या भीषण महामारीनंतर आर्थिक बाजू कशी बशी सावरणाऱ्या डोंबिवलीतील उद्योजकांना महावितरणाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. डोंबिवलीत एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक ग्राहकांना सुरक्षा अनामत रकमेच्या लाखापासून ते कोटी पर्यंत आलेल्या नोटिसांमुळे उद्योजकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे खेळते भांडवल धोक्यात येण्याचा संभव असल्याचे कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या ‘कामा’ या उद्योजकाच्या संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड कडून औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना दिलेल्या नोटिसात उच्च दाब व जोडणीच्या ग्राहकांना सुरक्षा अनामत रक्कम देण्याच्या सूचना अचानक या नोटिसाद्वारे देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळानंतर जड उद्योग, रसायन उद्योग, कापड उद्योग, तसेच लघुउद्योग, सूक्ष्म लघु उद्योग कोरोनाच्या महाभयंकर महामारीतून कसेबसे तगले आहेत. असं असताना आता डिसेंम्बर २०२२ पासून अशा प्रकारच्या नोटिसा उद्योजकांना ‘महावितरण’ कडून देण्यात येत आहेत. यामुळे अनेक उद्योजक आर्थिक कोंडीत सापडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उद्योजकांकडे असलेले खेळते भांडवल या नोटीसीतून देयक म्हणून आलेल्या रकमेसाठी भरले गेले तर उद्योग सुरू ठेवण्यासाठी भांडवल शिल्लक राहणार नाही. त्यामुळे उद्योग जोमाने कसा सुरू राहील ? याबाबत ‘कामा’ संघटनेचे कार्यकारी सदस्य उदय वालावलकर यांनी भिती व्यक्त केली आहे.

डोंबिवलीतील उद्योगांना आजतागायत अविरत आणि अखंडित वीज मिळाली नाही. कसेबसे उत्पन्न मिळवून देतात त्यांना लाखो करोडो रुपयांची अनामत रक्कमांची नोटीसा बजावण्यात काय हेतु आहे ? असा प्रश्न संघटनेच्या वतीने विचारण्यात आला असून, जग ‘हाय टेक’ तंत्रज्ञान अवलंबत असताना, महावितरण मात्र जुन्याच तांत्रिक पद्धतीने वीज वितरण करीत असल्याची खंत ‘कामा’ संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

 

दुतर्फा फुलझाडे बहरत एमआयडीसीतील रस्ते स्वच्छ होणार – उपायुक्त अतुल पाटील


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील ‘एमआयडीसी’ या औद्योगिक क्षेत्रातील अस्वच्छता आणि बकाल परीसर असल्याचा डाग आता पुसला जाणार आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने एक अभिनव संकल्प अभियान नव्या वर्षापासून राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियाना अंतर्गत परिसरातील रस्ते स्वच्छ होणार असून, रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडे बहरणार आहेत. यासाठी येथील उद्योजक संघटना, औद्योगिक परिसरातील संस्था यांचे सहाय्य घेण्यात येईल असे पालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले. या भागास भेट दिल्यानंतर त्यांनी या अभियानाची माहिती दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे आणि अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली येथील एमआयडीसी फेज मधील नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छता मोहिमेने करण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमे अंतर्गत संजय नगर – अभिनव शाळा हा रस्ता प्रामुख्याने सफाई साठी हाती घेण्यात आला आहे. प्रमोशन लॉज, साई पूजा लॉज, गणेश भुवन हॉटेल, संजय नगर जुना डम्पिंग ग्राउंड या भागात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात येत आहे.

या विशेष स्वच्छता मोहिमेसाठी जेसीबी आणि डंपर उपलब्ध केलेले आहेत. एक जानेवारीपासून या भागामध्ये विशेष मोहीम राबविण्याचे योजना महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले कि, डोंबिवली औद्योगिक परिसरातील फेज एक आणि फेज दोन मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याच्या तक्रारी येत आहेत त्यामुळे एक जानेवारीपासून येथे विशेष मोहीम पालिकेच्या वतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी स्वतंत्र जेसीबी, डंपर उपलब्ध करून देण्यात आले. एमआयडीसी परिसरात सुमारे साडेपाचशे औद्योगिक कारखाने आहेत. त्या कारखान्यांना आणि येथील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही रस्त्यावर कचरा टाकू नये. आपला परिसर स्वच्छ राहावा यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे संस्था संघटनांना आवाहन आहे. या परिसरातील स्वच्छते सोबत रस्ते सुशोभित करणे गरजेचे आहे फुलझाडे, ग्रीन बेल्ट रस्त्याच्या किनाऱ्याला करण्याची योजना आहे. ‘कामा’ संघटनेला सुद्धा महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. येथे अनेक कारखाने असल्यामुळे महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

सहाय्यक आयुक्त भरत पवार, उपमुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, स्वच्छता अधिकारी संदीप किस्मतराव, तसेच स्वच्छता निरीक्षक जयंत गाडे, अनिकेत धोत्रे आणि पालिकेचे कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे साफसफाई चे काम जोमाने सुरू आहे. ‘कामा’ या उद्योजकांच्या संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांची पालिका अधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर पालिकेकडून अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर, ‘कामा’ संघटनेच्या वतीने पालिकेला पूर्ण सहकार्य केले जाईल असे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले, मात्र स्वच्छता अभियान पूर्ण झाल्यानंतर पालिकेने देखभालीची जबाबदारी पूर्ण करावी अशी अट ‘कामा’ संघटनेच्या वतीने घालण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.