Home Blog Page 55

ही तर हिऱ्यापोटी निपजली गारगोटी, त्यांची अंडी पिल्ली आमच्याकडे..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अडीच वर्ष राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं त्याला चालना देण्याचं काम आम्ही केलं आहे, आज सरकारला सहा महिने पूर्ण झाले आहेत, अनेक सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. अडीच वर्षात आघाडी सरकारने एकही मान्यता दिली नव्हती असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले, ते विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते.

ठाकरे शिवसेना गटाचा समाचार घेताना ते म्हणाले की बाळासाहेबांच्या विचारा सोबतच प्रबोधनकरांच्या विचारांना ही तिलांजली दिली, आम्हाला अनेक प्रकारे हिणवलं गेलं, मात्र बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली कामं करतो म्हणूनच गोविंद बागेत न जाता रेशीम बागेत गेलो असे सांगत ज्यांना अंडी पिल्ली माहीत आहेत त्यांना हिम्मत दाखवण्याची भाषा केली जात आहे अशी टीका त्यांनी केली.
आम्ही कोरोनात पीपीई कीट घालून रुग्णालयात फिरलो, पूर्वी लाठ्या काठ्या खाल्ल्या, आम्हाला आव्हान देऊ नका, तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या लालसेसाठी शिवसेना प्रमुखांना तुरुंगात टाकणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, ही तर हिऱ्यापोटी निपजलेली गारगोटी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

बाल वीर दिवस साजरा करायला गेलो तर टीका केली, हा शीख धर्मीयांचा आणि बलिदान करणाऱ्यांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कायम वंदनीयच आहेत आणि राहणार, मात्र त्यांच्या वारसांकडे पुरावे कोणी मागितले, छत्रपती संभाजीराजे यांच्या कडे उमेदवारी साठी प्रतिज्ञापत्र कोणी मागितले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान कोण करतो, याबद्दल का बोलत नाही असे खडा सवाल त्यांनी केला.

महात्मा फुले दाम्पत्याचे तैलचित्र आम्हीच मंत्रालयात लावले, त्यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाड्यात करण्याचे काम सुरू आहे, बाळासाहेबांचे तैलचित्र विधिमंडळात लावले, वडुजला छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक करू, प्रताप गडावरील अतिक्रमण हटविले तसेच पंढरपूर कॉरिडॉर चे काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही अशीही ग्वाही त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन, पत्रकार अर्णव गोस्वामी, राहूल कुलकर्णी , अभिनेत्री कंगना राणावत, आमदार रवी राणा, खासदर नवनीत राणा यांच्या वर केलेल्या कारवाया , षडयंत्र याबद्दल काय, आम्ही सहन करतो म्हणून काहीही बोलाल का ? आम्हीही खस्ता खाल्ल्या आहेत, घरा दारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही काम करतोय, तोंड आहे म्हणून काहीही बोलायचं हे चालणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला.

हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल आणि जनतेची कामं पूर्ण ताकदीने करेल, पुढच्या वेळेस संपूर्ण ताकदीने पुन्हा निवडून येऊ, लोकायुक्त विधेयक मंजूर करून आम्हीच भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न केले,
आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करीत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काम करता आलं पाहिजे अशी व्यवस्था आम्ही करतो आहे, महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कारवाई साठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात सत्तर हजार कोटींच्या उद्योग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यातून मोठी रोजगार निर्मिती होईल, दोन तीन महिन्यात मोठे उद्योग इकडून तिकडे जाऊ शकत नाहीत , मात्र येणाऱ्या उद्योगांकडे टक्केवारी कोणी मागितली, उद्योगांचे प्लॉट परावर्तीत कोणी केले याची चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर केले.

 

१०७ बलात्कारांच्या घटनेने हादरले कल्याण-डोंबिवली शहर; वाचा सविस्तर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वर्षभरात १०७ बालात्काराच्या घटनेने कल्याण-डोंबिवली शहर हादरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी बलात्काराचे ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यात यंदा २३ ने वाढ झाली असून १०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्लीतील निर्भया हत्याकांडनंतर देशासह राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत अंमलबजाणीसाठी कठोर कायद्यासह अनेक पथके स्थापन करण्यात आली आहे. मात्र तरीही महिलांना “पावला पावलावर असते भय, आणि सरकारनं म्हणे केली संरक्षणाची सोय’ असा अनुभव कल्याण-डोंबिवली शहरात पहावयास मिळाला आहे. खळबळजनक बाब म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी बलात्काराचे ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यात यंदा २३ ने वाढ झाली असून १०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून गेल्यावर्षी १८ वर्षाखालील ४८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तिच यंदा ५८ झाली आहे. तर १८ वर्षावरील महिलांवर अत्याचार मध्ये गेल्यावर्षी ३६ तर यंदा ४९ गुन्हे नोंद झाल्याचे समोर आले आहे.

विनयभंगाच्या घटनेत देखील वाढ

१०० टक्के गुन्ह्यांचा तपास पोलीसांनी केला असला तरी महिला कल्याण-डोंबिवली शहरात सुरक्षित नसल्याचे यावरून दिसून येते. तर विनयभंगाच्या घटनेत देखील वाढ झाली असून गेल्यावर्षी १२० गुन्हे नोंद होते, त्यातील १११ गुन्ह्यांची उकल झाली होती. यंदा १८० विनयभंगाचे गुन्हे दाखल असून १७४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. यामध्ये १८ वर्षावरील गुन्हे जास्त आहेत.

अपहरणाच्या घटनां २२४ च्या घरात

अपहरणाच्या घटनां मध्ये देखील यंदा वाढ झाली आहे. मागील वर्षी १५४ घटना अपहरणाच्या नोंद झाल्या होत्या यंदा त्यात वाढ होऊन हा आकडा २२४ च्या घरात गेला आहे. १८ वर्षांखालील मुलींचे अपहरणमध्ये १४५ घटना नोंद झाल्या आहेत, तर मुलांंमध्ये ७३ घटना नोंद आहेत. १८ वर्षांवरील मुली १ तर मुलांच्या ५ घटनांची नोंद आहे. या गुन्ह्यांची देखील ८० टक्के उकल पोलीसांनी केली आहे.

संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या १०० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत

कल्याण-डोंबिवली शहरात वाढती गुन्हेगारी पाहता, पोलीसांनी कल्याण डोंबिवलीतील १२ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या सराईत १०० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये खेमा गँग, कल्याण पूर्व अभिजित कुडुलकर गॅंग, डोंबिवलीतील वांग्या गॅंग व सोनसाखळी चोरी करणाऱ्या ८ इराणी गॅंगचा समावेश आहे.

पोलीसांच्या आरोग्यावर ताण

कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत ८ पोलीस ठाणे आहेत. परिसरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा पोलीसांनी अहोरात्र प्रयत्न केला आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या विचारात घेता या पोलीस ठाण्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.परिणामी गुन्ह्यांचा तपास, नाकाबंदी, व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न, १२ ते १४ तासांची ड्यूटी, रजा तर सोडाच हक्काची सुटीही अनेकदा घेता येत नाही. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभांना जाता येत नाही. अशा ताण-तणावाने पोलीसांचे रोजचं जगणंच व्यापलेलं आहे. ताणतणाव आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे पोलीसांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मूळव्याध या आजारांचे प्रमाण वाढलेले आहे.

३ हजारच्या आसपास गुन्हे दाखल

कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत २०२२ मध्ये अखेरपर्यंत जवळपास ३ हजारच्या आसपास गुन्हे विविध पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. पोलीसांची उल्लेनीय कामगिरी आणि सीसीटिव्हीच्या स्मार्टनेसपणामुळे शहरातील गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण हे ८० टक्के आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे १०० टक्के उघडकीस आले आहेत. कल्याण-डोंबिवलीत यंदाच्या वर्षी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८० टक्के महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण पाहता बलात्कार, विनयभंग यांसारखे गुन्हे देखील १०० टक्के उघडकीस आले आहेत.१२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली गेली आहे, तर एमपीडीए अंतर्गत नऊ जणांवर कारवाई केली आहे. तर १०० गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली आहे, अशी माहिती झोन-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

सीसीटीव्हीचा स्मार्टनेस आला उपयोगी

कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच अनेक दुकाने आणि सोसायटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. शहरात सुमारे १ हजारांच्या वर सीसीटिव्ही कॅमेरे लावल्यामुळे एखादा गुन्हा घडला, तर त्या आरोपीला पकडण्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज हा मोठा दुवा ठरत असल्याने पोलीसांनी सांगितले.

दाखल तसेच उघड झालेले गुन्हे            2022                             –                      2021
गुन्हे दाखल/उघड                        –                 दाखल/उघड

खून                                                  18/18                             –                     19/18

खूनाचा प्रयत्न                                     22/22                             –                     17/17

दरोडा                                                 1/1                                 –                      0/0

जबरी चोरी                                      140/117                              –                  101/66

घरफोडी                                          154/93                               –                   170/67

चोरी                                                 616/311                             –                   611/242

वाहन चोरी                                        381/176                             –                  390/147

दुखापत                                             399/383                            –                  366/359

बलात्कार                                           107/107                            –                    84/83

विनयभंग                                           180/174                             –                  120/111

‘नववर्षाचे स्वागत करताना व्यसनापासून दूर रहा’; वाहतूक वपोनि उमेश गीत्ते यांचे नागरिकांना खुले आव्हान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नववर्ष २०२३ स्वागताचा पूर्वसंध्येला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून राबवल्या जाणाऱ्या ‘द’ दारूचा नव्हे तर ‘द’ दुधाचा या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देताना डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गीत्ते यांनी नागरिकांना वरील आव्हान केले .
दारू पिऊन अथवा कुठलीही नशा करून नववर्षाचे स्वागत करून नका. कुठलंही व्यसन करून वाहने चालवू नका, यात तुमच्याच जिविताला धोका संभवतो. ‘ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह’ विरुद्ध ची कारवाई वाहतूक पोलीसांना नागरिकांच्या सुरक्षेसाठीच करावी लागते, अशावेळी वाहतूक विभागावर प्रचंड ताण पडतो, अशी चिंता त्यांनी बोलताना व्यक्त केली.

शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या पुरोगामी विचारांच्या संकल्पनेतून राबवला जात असलेल्या ‘द’ दारूचा नव्हे ‘द’ दुधाचा’ अश्या व्यसन विरोधी उपक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या उपक्रमाला डोंबिवलीतील नागरिकांनी प्रचंड व मोठ्या उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डोंबिवली शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या या उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री.रोहित सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला. दूध वाटून, व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करित नववर्षाचे स्वागत करतानाच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित श्री दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेली छोटी पुस्तिका युवकांना भेट देण्यात आल्या.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, काँग्रेस यांच्यासह विविध संस्था आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून या व्यसनविरोधी उपक्रमाला पाठिंबा दिला.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त श्री गणेश चिंचोले, महाराष्ट्राचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस चे डोंबिवली विधानसभा कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक श्री. नंदकुमार धुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. सुशील सामंत, सीपीआयचे कॉम्रेड अरुण वेळासकर, अंनिस ठाणे शाखेचे विजय मोहिते, डोंबिवली शाखेचे नितीन सेठ, उदय देशमुख, संध्या देशमुख , शशिकांत म्हात्रे, निमेश पाटील, विद्याधर राणे, एलन क्लासचे चीफ श्री गणेश देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील फलदेसाई, मंगेश जाधव इत्यादी सहकाऱ्यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शवून सर्व नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

डोंबिवली स्टेशन जवळील राजाजी पथ येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ५ ते ७ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे युवकांनी आणि स्त्रियांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून अशा उपक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. दुधाचा ग्लास देवून, नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अशा स्तुत्य उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. प्रवीण देशमुख यांनी समस्त नागरिकांना केले.

 

पंतप्रधान मोदींना मातृशोक: हिराबेन मोदींचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन.


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरु होते. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ डिसेंबर रोजी ‘यू एन मेहता’ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.

“एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असं मोदी म्हणाले आहेत. “मी तिला १०० व्या वाढदिवसानिमित्त भेटलो होतो तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, बुद्धीने काम करा आणि शुद्धपणे आयुष्य जगा,” असंही मोदींनी अन्य एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘यू एन मेहता’ रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या मृत्यूची माहिती एका पत्रकाद्वारे जारी केली आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी ‘यू एन मेहता’ रुग्णालयामध्ये हिराबेन मोदी यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरच्या श्वास घेतला, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.


हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अथक परिश्रम करण्याच्या वृत्तीमुळे सातत्याने चर्चेत असतात. नरेंद्र मोदी हे देशासाठी सर्वस्व झोकून देऊन दिवसरात्र काम करतात, असे त्यांच्या समर्थकांकडून अभिमानाने सांगितले जाते. मोदींच्या याच गुणाचा प्रत्यय शुक्रवारी देशवासियांना आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे तीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. नरेंद्र मोदी यांनी साधारण सहाच्या सुमारास ट्विट करुन आईच्या निधनाबद्दल सर्वांना माहिती दिली. यानंतर नरेंद्र मोदी आपल्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अहमदाबाद येथील आपल्या भावाची घरी पोहोचले. येथून सकाळी आठच्या सुमारास हिराबेन मोदी यांची अंत्ययात्रा निघाली. यानंतर तास-दीड तासात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी दिला. आईच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करतील, असा अनेकांचा अंदाज होता. परंतु, नेमक्या याचवेळी नरेंद्र मोदी यांनी आपण इतरांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले. पंतप्रधान मोदी हे आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून अवघ्या काही तासांमध्ये पुन्हा देशसेवेसाठी रुजू झाले.

‘एसएससी’ व्याख्यानमाला मार्गदर्शिकेत दहावीचे वर्ष भविष्याच्या दृष्टीने करिअरला वळण देणारे; हभप प्रकाश महाराज यांचे प्रतिपादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या व्याख्यानमालेचे यशस्वीरित्या नियोजन तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळाच्या वतीने गेली चोवीस वर्ष सातत्याने आयोजिले जात आहे. आजच्या युगात शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावीचे वर्ष हे त्यांच्या करिअरला वळण देणारे अंत्यंत महत्वाचे वर्ष आहे असे हभप प्रकाश महाराज यांनी तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या शुभारंभी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

या शुभारंभाप्रसंगी हभप हनुमान महाराज, प्रकाश म्हात्रे, रतन म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, मुकेश पाटील, प्रेमा म्हात्रे, डॉ.सुनिता पाटील, अरुण पाटील, गजानन म्हात्रे, रघुनाथ पाटील, केशव पाटील, व्याखाते व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रकाश म्हात्रे म्हणाले कि, हि व्याख्यानमाला यंदा ‘रौप्य महोत्सवी’ वर्षात पदार्पण करत आहे. विद्यार्थ्यांच्या मनातली अभ्यासाबाबत भिती, दडपण या मार्गदर्शिकेमुळे कमी होईल. या व्याख्यानमालेत उपस्थित राहून, अधिक गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करा. तर हभप प्रकाश महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा. प्रत्येक वर्षी हि व्याख्यानमाला वुंध्दीगत होत आहे. आजच्या युगात शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावीचे वर्ष करिअरला वळण देणारे अंत्यंत महत्वाचे वर्ष आहे. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

गुरुवार २९ ते ३१ डिसेंबर पर्यंत या व्याख्यानमालेत विविध शाळेतील तज्ञ शिक्षक मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. कल्याण डोंबिवलीतील तेरा शाळेतील सुमारे दिड हजार विद्यार्थी यात सहभागी झाले असून, या विद्यार्थ्यांची दुपारच्या भोजनाची सोय भक्त मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे आणि सचिव पंढरीनाथ पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.