Home Blog Page 54

दोन घरफोडीत चोरट्यांनी केला पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक शहरात वेगवेगळय़ा भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घरफोडी प्रकरणी गंगापूर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना जुने नाशिक येथील काझीगढी भागात घडली. छाया ओमप्रकाश सोनार (राहणार: शितळादेवी मंदिराजवळ, काझीगढी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनार कुटुंबिय सोमवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी पेटीत व कोठ्यांमध्ये ठेवलेली रोकड, सोनसाखळी व मोबाईल असा सुमारे ७५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.

दुसरी घटना गंगापूर रोड भागात घडली. संदिप निवृत्ती गिते (राहणार: अतुल अपार्टमेंट, नवरचना स्कूल नर्सरीरोड, सावरकर नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गिते कुटुंबिय ३१ डिसेंबर निमित्त बाहेर गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गिते याच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूम मधील लाकडी कपाटात ठेवलेले सुमारे ९६ हजार २०० रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले. त्यात मंगळसुत्र आणि कानातील टॉप्सचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.

 

राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र श्री २०२२’ शरीरसौष्ठव स्पर्धेत डोंबिवलीच्या रमेश तोमर यांनी पटकावले तृतीय पारितोषिक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘महाराष्ट्र हौशी शरीरसौष्ठव संघटना’ आणि ‘रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना’ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र श्री २०२२’ शरीरसौष्ठव स्पर्धेत डोंबिवलीतील ‘फ्लेक्स जिम’ चे ४५ वर्षीय रमेश तोमर यांना तृतीय पारितोषिक पटकावले आहे. ही स्पर्धा २५ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे पार पडली ज्याचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. या स्पर्धेत १२२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

किशोर शेट्टी यांच्या ‘फ्लेक्स जिम’ मध्ये रमेश तोमर गेली १६ वर्ष सलग सराव करीत आहेत. ‘ठाणे श्री’, ‘महाराष्ट्र श्री’, किताबाचे ते मानकरी ठरले असून, देशपातळी वरील ‘भारत श्री’ या शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी त्यांची जोमाने तयारी सुरु आहे.

या स्पर्धेच्या तयारी करिता त्यांना त्यांच्या नियमित आहारात दररोज सव्वा किलो चिकन,२० अंडी, प्रोटीन, मल्टी व्हिटॅमिन, मास्याचे तेल, कॅल्शियम, सफेद तांदूळ, ओट्स, मध, जाम याचा समावेश करावा लागत असून त्याकरिता त्यांना दरमहा दीड लाख रुपये खर्च असून ते या स्पर्धेची तयारी करत असून ‘फ्लेक्स जिम चे किशोर शेट्टी हे त्यांचे प्रशिक्षक असून त्यांच्याकडून प्रशिक्षण व मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे आणि त्यांच्या पत्नी कडून वेळोवेळी मिळणारा योग्य व पुरक आहारामुळे या स्पर्धेत मानकरी ठरलो आहे अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात. मसालेदार व चमचमीत आहार न घेता ते फक्त उकडलेले अन्न प्राशन करून ते महत्वाच्या डाएट वर भर देत असल्याचे बोलले. शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत त्यांना आतापर्यंत मिळाली नसून त्याबद्दल त्यांनी प्रसिद्धी माध्यामांसमोर खेद व्यक्त करत स्वखर्चाने ते या स्पर्धेचे तयारी करत असल्याचे सांगितले.

रमेश तोमर हे व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून ते या स्पर्धेसाठी सकाळी ४ ते ६ या वेळेत कारडीओ व एब्स आणि ११ ते ४ वर्कआऊट असा सराव करत आहेत. १९९८ मध्ये झालेल्या ‘डोंबिवली मॅरेथॉन’ स्पर्धेमध्ये रमेश तोमर यांनी १० किलोमीटर शर्यतीत भाग घेत ही शर्यत ३३ मिनिटं १२ सेकंद एवढ्या कमी वेळेत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला होता. भाजप डोंबिवली पूर्व मंडल उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांनी रमेश तोमर यांचे अभिनंदन करुन ‘भारत श्री’ स्पर्धेच्या किताबासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महापालिकेच्या नवीन रस्ता कर आकारणीला काँग्रेसचा विरोध

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिकेचा कालावधी संपलेला असून महासभा आणि स्थायी समिती अस्तित्वात नसताना महापालिकेवर प्रशासक म्हणून कार्यरत असलेले दिलीप ढोले यांनी आपल्या मनमर्जीने सर्वसामान्य जनतेवर नव्याने ‘रस्ता कर’ लावण्याचा निर्णय घेतला आहे तो अयोग्य असून करदात्या नागरिकांवर नवा आर्थिक भुर्दंड लावणे अयोग्य असल्याचे सांगत रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांना निवेदनाद्वारे केली आहे.

नगरसेवक पदाचा कालावधी संपल्याने राज्यशासनाने प्रशासकीय राजवट लावली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात अनिश्चितता आहे, त्यात प्रशासकीय राजवटीत प्रशासक या नात्याने आयुक्तांकडून करवाढी सारखे जन विरोधी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप नागणे यांनी केला आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून कित्येक भागात सुविधा न देता अनेक वर्षांपासून मलप्रवाह कर वसूल केला जात आहे, त्यात शहरातील मलनिस्सारण केंद्र प्रक्रिया अभावी (एस. टी. पी. प्लांट) बंद अवस्थेत आहेत. याबाबतीत जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्तांना निवेदनही दिले होते, युवक काँग्रेसने जन आंदोलन करून सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली तरीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागणे यांनी केला आहे.

दरम्यान राज्यसरकार व पालिकेचा असे दोन दोन प्रकारचे शिक्षण कर वसूल करूनही पालिका शिक्षणाचा दर्जा सुधारलेला नाही. सुविधा देणार नसाल तर मग जनतेने कर का भरावेत असा सवाल नागणे यांनी केला आहे. शहरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांची वाट लागलेली असताना रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली दर महिन्याला लाखो रुपयांची टेंडर काढून उधळपट्टी केली जात आहे.

या प्रशासक दिलीप ढोले यांनी तात्काळ हा निर्णय रद्द न केल्यास शहरातील जनतेवर लादण्यात येणाऱ्या या अन्याय्य रस्ता कर (रोड टॅक्स) आकारणी विरोधात मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा मिरा भाईंदर शहरातील काँग्रेस पक्षाने दिला आहे.

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

फिफा फुटबॉल विश्वचषक तीन वेळा जिंकणारे महान ब्राझिलियन खेळाडू पेले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले.

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांचे संपूर्ण नाव एड्‌सन आरेंटीस डू नाशसिमेंटू असे होते. त्यांचा जन्म ब्राझीलमधील ट्रेस कुरसँइस येथील एका गरीब कुटुंबात झाला, लहानपणापासून त्यांना फुटबॉलची आवड होती. अप्रतिम कौशल्य, कमालीचे चापल्य, आक्रमकता, अचूक अंदाज आणि शारीरिक सुदृढता यांच्या बळावर पेलेची कारकीर्द यशस्वी ठरली. गोल करण्याची त्याची क्षमता अद्वितीय होती. जगभरचे चहाते त्यांना ‘किंग’ पेले किंवा ‘ब्‍लॅक पर्ल’ म्हणून ओळखू लागले.

पेले यांची एकूण गोलसंख्या

१,३६३ सामान्यांत १,२८१ एवढी होती. १ ऑक्टोबर १९७७ रोजी, वयाच्या ३७ व्या वर्षी पेले फुटबॉल खेळातून निवृत्त झाले.

 

अनिल देशमुखांच्या भेटीला संजय राऊत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कथित १०० कोटी वसुली प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आले आहेत. आज खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

राऊत म्हणाले, “अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ ते सार्वजनिक जिवनात आहेत. त्यांची संपूर्ण कारकीर्द निष्कलंक आहे. त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलं आहे. त्यांनी विदर्भातेच नेतृत्व केलं आहे. मात्र, ज्या पद्धतीने त्यांच्यावर माझ्यावर तसंच नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली आहे, यावरून मनी लॉंडरिंग कायद्याचा कशा पद्धतीने गैरवापर होतो आहे, हे दिसून येईल”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“काल शरद पवार यांनीही सांगितलं की आमच्यावरील कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर कसा होतो, त्याच उत्तम उदाहरण आहे. शेवटी कायद्याची लढाई शेवटपर्यंत लढून आम्ही घरी पोहोचलो आहे”, असेही ते म्हणाले.

“या देशातील न्यायवस्थेत असे काही रामशास्री आहेत. ज्यांच्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. अनिल देशमुखांना जामीन देताना उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणं फार गंभीर आहेत. माझ्या जामीनाच्या बाबतीतही सत्र न्यायालयाची निरीक्षणं अत्यंत गंभीर आहेत. अशा वेळी ज्या तपास यंत्रणांनी चुकीची कारवाई केली, राजकीय सुत्रधार म्हणून ज्यांनी काम केलं. त्यांच्या भविष्यात कारवाई नक्कीच होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.