Home Blog Page 56

“मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय”,अजित पवारांचा बावनकुळेंना टोला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

माझ्या बारामती दौऱ्यामुळेच अजित पवार इतके प्रभावित झाले की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले, कोण कोणाचा योग्य कार्यक्रम करणार, हे जनता २०२४ मध्ये सांगेल. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

एक दिवसापूर्वीच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बावनकुळे यांच्या बारामती दौऱ्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, “एवढा मोठा ताकदीचा नेता मला आव्हान देत आहे. हे ऐकून मी घाबरलो. आमच्या सर्वांची झोप उडाली आहे. मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय. बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार २०२४ मध्ये होणाऱ्या पराभवामुळे अपमानित होण्यापेक्षा मला राजकारण सोडलेले बरे असे वाटते.” असे अजित अजित पवार प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हणाले.

 

महिलेच्या गर्भाशयातील २.२५ किलो वजनाच्या १४ फायब्रॉइड्स काढण्यात वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना यश!

मिरारोड, प्रतिनिधी: मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स येथील स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ रचना शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमला 39 वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून 2.25 किलो वजनाचे फायब्रॉइड काढण्यात यश आले आहे.

गर्भाशयात असलेल्या विविध आकाराच्या अनेक फायब्रॉइड्समुळे आणि गर्भाशयाच्या अवयवाची रचना विकृत झाल्यामुळे रुग्णाला मासिक पाळीत असामान्य रक्तस्त्रावाची तक्रार होती. तिला भविष्यात तिला गर्भधारणेत अडचणी येणार नाही याची देखील पुरेपुर खबरदारी घेण्यात आली.

महिला रुग्ण आयुषी मेहरा (नाव बदलले आहे) ही एक गायिका आहे तिला मासिक पाळीत होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव, वेदनादायक पाळी अशा तक्रारी होत्या. वेदना वाढत गेल्याने तिची प्रकृती ढासळू लागली आणि तिच्या दैनंदिन कामात व्यत्यय येऊ लागला. रुग्णाला वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरारोड येथे पाठवण्यात आले जेथे तिला त्वरित वैद्यकीय मदत मिळाली.

फायब्रॉइड्समुळे महिलेचे पोट गर्भवती स्री सारखे दिसू लागले होते.

डॉ. रचना शर्मा सांगतात गर्भाशयातील फायब्रॉइड्स ही एक अशी स्थिती आहे जिथे स्त्रीच्या गर्भाशयात कर्करोग नसलेल्या गाठी दिसून येतात. उपचार न केल्यास, ते आकाराने मोठ्या होतात आणि मूत्राशय आणि आतड्यांसारख्या आसपासच्या अवयवांवर दबाव टाकतात. फायब्रॉइड सामान्यतः सर्व वयोगटातील महिलांमध्ये दिसून येतात. स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अनेकदा गंभीर गुंतागुंत निर्माण होते.

या रुग्णाला काही वर्षांपासून मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होत होत्या. सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाचे मोठे फायब्रॉइड दिसले, सर्वात मोठे 12″-13″ होते. तिला प्रथम मायोमेक्टॉमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता, म्हणजे प्रजननक्षमतेला हानी न पोहोचविता फायब्रॉइड्स काढून टाकणे.

डॉ रचना पुढे म्हणाल्या, आम्ही प्रसंगावधान राखुन या शस्त्रक्रियेचे नियोजन केले. सहसा अशा मोठ्या फायब्रॉइड्ससह, संपूर्ण गर्भाशय काढून टाकले जाते, कारण यात गर्भाशयाला वाचवणे आव्हानात्मक ठरते. परंतु रुग्णाला भविष्यात गर्भधारणा करायची असल्याने ते आव्हान पेलत तिचे गर्भाशय वाचविण्यात आले. सोनोग्राफीमध्ये 9 मोठ्या आकाराचे फायब्रॉइड आणि इतर लहान फायब्रॉइड्स दिसून आले. आम्ही एकूण 14 फायब्रॉइड्स काढले ज्यांचे वजन सुमारे 2.25 किलो होते.

आम्ही एकाच चीराद्वारे शक्य तितक्या फायब्रॉइड्स काढल्या, कारण गर्भाशयावर अधिक चीरे तिच्या भावी गर्भधारणेसाठी धोकादायक असतील. ही मोठी शस्त्रक्रिया असल्याने ती पूर्ण होण्यासाठी ४ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. एनेस्थेसिया देत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा झाला आणि 36 तासांनंतर आहाराचे सेवन केले. वोक्हार्ट हॉस्पिटल्स मिरारोड येथील “ममा केअर” युनिट कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला योग्यरित्या हाताळून सर्व सुविधांनी सुसज्ज आहे.

“माझ्या शरीरात अनेक फायब्रॉइड्स वाढत आहेत हे मला माहीत देखील नव्हते. मला क्रॅम्पिंग, वेदनादायक मासिक पाळी आणि असामान्य मासिक रक्तस्त्राव होत होता. माझे शरीर फुगले होतो आणि असह्य वेदना होत होत्या. गर्भाशयात तब्बल 14 फायब्रॉइड्स असल्याचे समजल्यावर मला धक्काच बसला. यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल मी वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानते. माझ्यासाठी हा एक चमत्कारच होता कारण डॉक्टरांनी माझ्या गर्भाशयाचे रक्षण केले. मला आनंद आहे की मला नवीन आयुष्य मिळाले आहे,” असे सांगून रुग्ण आयुषी मेहरा (नाव बदलले आहे) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कल्याण डोंबिवली मध्ये रस्त्याचे जाळे पसरल्यास विकासाला चालना मिळणार – खासदर श्रीकांत शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली मध्ये रस्त्याचे जाळे पसरल्यास विकासाला चालना मिळणार आहे. डोंबिवली पश्चिम येथे पांडूशेठ बाळा जोशी चौक ते जुनी डोंबिवली रस्त्याचे काँक्रीटीकरण उद्घाटनाप्रसंगी कल्याण-डोंबिवकीचे लोकप्रिय खासदर श्रीकांत शिंदे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक रणजित जोशी यांनी कार्यालय समोर फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले.

डोंबिवली पश्चिम येथील पांडूशेठ बाळा जोशी चौक ते जुनी डोंबिवली रस्त्याचे काँक्रीटीकरण तब्बल १३.५० कोटी निधी उभारण्यात आले आहे. हा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून उपलब्ध केला गेला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भूमिपूजन समारंभ प्रसंगी सांगितले. त्यामुळे प्रवास सुकर होऊन प्रवाश्यांच्या वेळ देखील वाचणार आहे. खासदर श्रीकांत शिंदे यांनी बोलताना या रस्त्या बरोबर माणकोली उड्डाणपुला मार्गे टिटवाळा परिसर जोडण्याचा आपला मानस असल्याचे सांगत त्यासाठी एमएमआरडीए कडून निधी उपलब्ध केला जाईल अशी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक रणजित जोशी, दिपेश म्हात्रे, शशिकांत कांबळे, भाऊ चौधरी व इतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

‘३२ वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरलं’, आदित्य ठाकरेंच्या विधानावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिंदे गटाचे आमदार व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिवाळी अधिवेशात एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. दिशाच्या मृत्यूप्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप शेवाळेंनी केला. यानंतर दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली.

या घडामोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. “एका ३२ वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. त्यामुळे बदनामीचे प्रयत्न होत आहेत. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्री ज्या प्रकरणात सापडले आहेत, त्यावरून आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जात नाही. राज्यपाल आणि घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ३२ वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं,” असं विधान शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी केलं होतं.

आदित्य ठाकरेंच्या या विधानावर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्हाला आदित्य ठाकरेंवर बोलण्याची काहीही गरज नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसैनिक आहोत. आदित्य ठाकरेपेक्षा माझ्या मुलाचं वय जास्त आहे,” असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.

आधी चौकशी होऊ द्या की थेट फाशी लावणार- गुलाबराव पाटील

दरम्यान, गुलाबराव पाटलांनी गायरान जमिनीच्या घोटाळ्या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधीपक्ष सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, ते ठीक आहे. पण याची तुम्ही पहिली चौकशी करणार की नाही? की थेट फाशी लावणार… आधी चौकशी करा. चौकशीत तथ्य आढळलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. त्यासाठी सरकारचं काम बंद पाडायचं आणि लोकांना मिळणारा न्याय मिळू द्यायचा नाही, ही लोकशाहीमध्ये विधिमंडळाच्या कामकाजाची पद्धत नाही,” अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.

 

कर्जत – जामखेड तालुक्यात होणार औद्योगिक वसाहत; उद्योगमंत्र्यांची विधानसभेत माहिती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कर्जत-जामखेड तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार कार्यवाही करू, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. उदय सामंत उत्तर देत होते.

यावेळी ते म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने २९३ औद्योगिक क्षेत्र विकसित केली असून महामंडळामार्फत विविध आकाराचे ८६ हजार ४१७ भूखंड आखण्यात आले आहेत. यापैकी ६२ हजार ३१७ औद्योगिक, ६ हजार १४४ व्यापारी व ४ हजार ५७ निवासी भूखंडांचे वाटप करण्यात आले आहेत. मौजे पाटेगाव व खंडाळा येथील औद्योगिक वसाहतींबाबत उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली असून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी सांगितले. याबाबत राज्य शासन सकारात्मक असून राज्यात विविध उद्योग यावेत, हीच शासनाची भूमिका आहे. मात्र, कायदेशीर तरतुदी तपासून निर्णय घेणार असल्याचे, मंत्री श्री. उदय सामंत यांनी स्पष्ट केले. लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत सदस्य शेखर निकम यांनी सहभाग घेतला.