Home Blog Page 58

उर्वरित निर्वाह भत्ता लवकरच देणार – मंत्री संजय राठोड


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आला आहे. उर्वरित निर्वाह भत्ता वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच विद्यार्थ्यांना देण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्या डॉ.मनिषा कायंदे यांनी शासकीय वसतिगृहातील समस्यांबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री राठोड बोलत होते. मंत्री राठोड पुढे म्हणाले राज्यात मागासवर्गीय मुलामुलींचे ४४१ शासकीय वसतिगृहे असून मान्य विद्यार्थी संख्या ४३ हजार ३५८ इतकी आहे. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यात येतात. सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाच्या पुरुष आणि महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वसतिगृहात मुक्कामी राहून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी “संवाद” उपक्रम राबविण्यात आला. या संवाद उपक्रमामध्ये काही वसतिगृहातील गृहपालांविरुद्ध अनेक बाबी निदर्शनास आल्या. अशा गृहपालांना कारणे दाखवा नोटाला बजावून दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध चौकशीची कार्यवाही करण्यात येत आहे. असे मंत्री संजय राठोड यांनी उत्तरात सांगितले.

वसतिगृहामध्ये फर्निचर साहित्य पुरवठ्यासाठी ५९ कोटी

राज्यातील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये आवश्यक सोयीसुविधा आणि साहित्य पुरविण्यासाठी समाज कल्याण आयुक्तालयाला ५९ कोटी ४३ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातून वसतिगृहात लोखंडी कॉट, ड्युअल डेस्क, साग टेबल, कपाट आदी फर्निचर साहित्य पुरवठा करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे असे मंत्री राठोड यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले.

मागासवर्गीय वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी वर्ग

राज्यातील ३१ शासकीय वसतिगृहांच्या इमारत दुरुस्तीसाठी एकूण ७ कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करण्यात आली असून दुरुस्तीची कार्यवाही सुरु आहे असेही राठोड यांनी सांगितले.

वसतिगृहातील विनाप्रवेशित विद्यार्थ्यांबाबत चौकशी

शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये प्रवेश नसलेले आणि वर्षानुवर्षे वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत सदस्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. वसतिगृमध्ये विनाप्रवेशित विद्यार्थी राहत असल्यास याबाबत चौकशी करण्यात येईल. तसेच या विद्यार्थ्यांची इतरत्र राहण्याची सोय करण्याच्या सूचना देखील देण्यात येईल असे मंत्री राठोड यांनी उत्तरात सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, श्रीकांत भारतीय, आमश्या पाडवी, अभिजीत वंजारी आणि उमा खापरे यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले होते.

हिवाळी अधिवेशनावर केले १०० कोटी खर्च – अजित पवार


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दोन दिवसांपूर्वी, नागपूर हिवाळी अधिवेशनात आलेल्या आमदारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था असलेल्या आमदार निवासात ताटं आणि कपबशा शौचालयात धुण्याचा प्रकार उजेडात आला. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनावर एकूण किती खर्च केला जातो याचा खुलासा केला.

कपबशांच्या व्हिडीओनंतर अमोल मिटकरी यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये विधान भवन इमारत परिसरात असलेल्या शीतल ज्यूस सेंटरचे कर्मचारी शौचालयाच्या प्रवेशद्वारासमोरच संत्र्याची साल काढताना, इतर फळे धुताना आणि कापताना आढळले. त्यामुळे अधिवेशनात सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या सर्वांवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. जवळपास १०० कोटी रुपये आपण या हिवाळी अधिवेशनावर खर्च करतो. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लागणे, त्यांच्या भल्याची कामे होणे अपेक्षित आहे. त्यासाठीच आम्ही काम करतो. पण कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा येथे येणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसेल, तर ही गंभीर बाब आहे. नुकताच एक गंभीर प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित यंत्रणा गंभीर झालेली दिसत नाही. अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

 

तुमच्या ईपीएफ संबंधित ईपीएस ९५ खात्याचा आर्थिक लाभ कसा घ्यावा ? ‘ईपीएफओ’ने दिली माहिती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  तुम्हीही ईपीएफओ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. ईएफआयएफओ खातेदारांच्या हितासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत असून अनेक योजना चालवत आहे. नोकरदार आणि पगारी वर्गातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि संकटाच्या काळात या योजना अतिशय उपयुक्त ठरतात. ईपीएफओचे सध्या देशभरात सहा कोटीहून अधिक ग्राहक आणि ७५ लाख पेन्शनर लाभार्थी आहेत. ईपीएफओ खातेधारकांसाठी कामगार मंत्रालय ईपीएस-९५ नावाची योजना चालवत आहे. या (ईपीएस) अंतर्गत खातेदारांना किमान महिन्याचे पेन्शन मिळते. ईपीएफओने ट्विट करून आपल्या खातेदारांना या योजनेची माहिती दिली आहे.
  पेन्शन संस्थेच्या म्हणण्यानुसार, ईपीएस-९५ योजनेत खातेदार तसेच त्यांच्या विधवा पुरुष किंवा महिला तसेच मुलांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत, जर एखाद्या खातेदाराचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदारास किमान १००० रुपये मासिक पेन्शन दिली जाते. पेन्शनर पेन्शनर असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदारालाही संरक्षण दिले जाते. याअंतर्गत पेन्शनधारकाला मिळणाऱ्या पेन्शनपैकी निम्मे म्हणजे ५० टक्के रक्कम विधवा स्त्री किंवा पुरुषाला दिली जाते.
  एवढेच नव्हे तर खातेदाराच्या मृत्यूवर खातेदाराच्या जोडीदाराला मिळणाऱ्या पेन्शनच्या २५ टक्के इतकी रक्कम दोन मुलांना मिळते. दोन्ही मुलांना वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत २५-२५ टक्के इतकी समान रक्कम मिळते. या योजनेचे संपूर्ण नाव ‘कर्मचारी पेन्शन योजना-१९९५’ असे आहे. १९९५ मध्ये ही योजना सुरू झाल्यामुळे ईपीएफओ योजनेचे नाव ईपीएस-९५ ठेवण्यात आले होते.

 

 

आनंद दिघेंच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचला होता; नंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे ठाण्यातील नेते आणि दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. परंतु, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन आणि आदेशाप्रमाणे त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सामान्यांना भासवण्यात आले, असा धक्कादायक आणि गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. तसेच हा प्रकार ज्या २ शिवसैनिकांना सहन न झाल्याने त्यांना देखील संपवण्याचे आदेश बाळासाहेबांनी दिल्याचा आरोप सुद्धा यावेळी निलेश राणे यांनी केला आहे. एका मुलाखती दरम्यान बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.

दम्यान, मुलाखतीत आरोप करताना निलेश राणे म्हणाले, ‘नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना नेहमीच एक मर्यादा पाळली होती. आम्ही याआधी बाळासाहेब ठाकरेंवर केव्हाही आरोप केले नव्हते. आमच्या राणेसाहेबांचं आज सुद्धा बाळासाहेबांवर प्रेम होतं, परंतु स्वतः ते कधीच व्यक्त करु शकले नाहीत. मी त्यांना राणे साहेब बोलत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. त्यांचा जर जाहीर कार्यक्रमात कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. अशा परिस्थितीत आम्हाला सुद्धा बाळासाहेबांची खरी परिस्थिती सगळ्यांना सांगावीच लागेल.

ठाण्यातील तसेच शिवसेनेतील वरिष्ठ नेते धर्मवीर आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू इस्पितळात झाल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र हे २ शिवसैनिकांना अजिबात सहन झालं नाही, त्यामुळे त्यांचा देखील आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. ही केस कशी काय दाबली गेली ? असे अनेक सवाल करीत निलेश राणे यांनी गंभीर आरोप करत शिवसेनेला तोंडघशी पाडले आहे. तसेच मी स्वतः आजपर्यंत खूप मर्यादा ठेवल्या होत्या परंतु, जर राणेसाहेबांवर कोणी खालच्या पातळीचे माणून आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असेल तर आपण हे सहन करणार नाही असे सुद्धा त्यांनी ठणकावले. कारण माझ्यासाठी राणेसाहेब महत्वाचे बाळासाहेब नव्हे. आम्ही आजवर मर्यादा पाळली, परंतु विनायक राऊतांनी व्यासपीठावर ती अजिबात पाळली नाही असे निलेश राणे म्हणाले.

तसेच बाळासाहेबांना बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमला देखील ठार करायचे होतं. तसे अनेक वेळा प्रयत्न सुद्धा झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय ? हे तुम्ही मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन. बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर कोणा कोणाचे मृत्यू झाले हे सर्व जाहीरपणे सांगेन. त्यामुळे आमच्या नादी लागायचं नाही, आम्हाला राणे म्हणतात, अशा शब्दांत माजी खासदार निलेश राणे यांनी आरोप केले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं महाराष्ट्र विधानसभेतून निलंबन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं महाराष्ट्र विधानसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्यासाठी अपमानजनक शब्द वापरल्याप्रकारणी जयंत पाटील यांचं आज निलंबन करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं ?

विधानसभेमध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावे करण्यात आले होते. यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे ६ वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांकडून आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यावरून विरोधकांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. “माझी विनंती आहे की आपण फक्त भास्कर जाधव यांना थोडं बोलण्याची परवानगी द्यावी. तिकडच्या १४ लोकांना बोलायची परवानगी दिली. मी इकडनं एकटा बोललो आहे. सभागृहं असं कसं चालवताय तुम्ही ? आज फक्त भास्कर जाधवांना बोलू द्या म्हटलं तर तुम्ही ऐकत नाही विरोधी पक्षाचं. तुम्हाला सभागृह चालवायचं नाही का ? अख्खा विरोधी पक्ष म्हणतोय की एका भास्कर जाधवांना बोलू द्या. ही आमची विनंती आहे”, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

दरम्यान, भास्कर जाधवांना बोलू दण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर जयंत पाटील यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. भास्कर जाधवांनीही तशी मागणी करायला सुरुवात केली.”आमची हरकत आहे. १४ सदस्य समोरून बोलले, १४ वेळा कामकाज तहकूब केलं. आम्हाला एका सदस्याला बोलू देत नाही. तुम्ही सदस्यांचा जीव घेताल अध्यक्ष महोदय”, असं भास्कर जाधव म्हणाले. दरम्यान, याचवेळी जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका”, असं म्हटलं. त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. “जयंत पाटील यांना निलंबित करा”, अशी मागणी आमदारांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही “जयंत पाटील, हे आपल्याकडून अपेक्षित नाही”, असं म्हणत नाराजी व्यक्त केली आणि कामकाज तहकूब केलं. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांविषयी असंवैधानिक शब्दप्रयोग केल्याचा आरोप जयंत पाटलांवर ठेवण्यात आला. यावर विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची कारवाई केली.