Home Blog Page 59

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महानगरपालिका आस्थापनेवरील 21 कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नती

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: गेल्या अनेक वर्षे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत शिपाई, मजूर, शिपाई तथा सफाई कामगार, रखवालदार, सफाई कामगार अश्या 21 कर्मचाऱ्यांना अखेर लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे आपला पदभार सांभाळत उत्कृष्ट कामगिरी करत असताना हे कर्मचारी पदोन्नतीसाठी प्रतिक्षीत होते.

महानगरपालिकेच्या आकृतीबंध व सेवाशर्ती नियमात पदोन्नतीने लिपीक पद भरण्याचे प्रमाण 25% होते. सदरची बाब मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी लक्षात घेत शासनाच्या मंजुरीने पदोन्नतीने लिपीक पद भरण्याचे प्रमाण 40% करून एका अर्थाने गेल्या अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली त्यामध्ये सुनिल राठोड, तुकाराम तळपे, श्रीकांत धिवर, सतीश सुळे, प्रवीण गढरी, समीर भोपतराव, भारती सानप, संतोष तिटमे, सुजित घोणे, कुणाल म्हात्रे, फिरोज तडवी, सचिन गोसावी, योगेश चौधरी, दिपक मोहिते, राकेश गायकवाड, दक्षता केंजळे, प्रविण दिवे, नितीन बर्नवाल, आत्माराम तुंगार, माधव होकारणे, ललिता जोजारे या कर्मचाऱ्यांना लिपीक टंकलेखक या पदावर पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड यांनी ही पदोन्नती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांची कामे वेळेत व तत्परतेने व्हावीत या हेतूने आयुक्त यांनी ही पदोन्नती दिली असून त्या सर्व पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांकडून जनतेची कामे इमानेइतबारे केली जातील अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

डोंबिवलीचे माजी शहरप्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी; शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीचे रहिवासी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख आणि नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांची बुधवारी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली. संजय राऊत यांचे खास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाऊंची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरुन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

संजय राऊत यांचे खास समर्थक म्हणून मागील अनेक वर्षापासून भाऊ चौधरी यांची ओळख होती. राऊत यांचा आश्रय आणि आशीर्वादाने भाऊ चौधरी यांनी शहरप्रमुख, पालिका निवडणुकीतील उमेदवारी ते नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदापर्यंत मजल मारली होती. कोणतेही संघटन कौशल्य, जनसंपर्क नसलेला आणि सामान्य शिवसैनिकाला मानाची पदे देण्यात आल्याने डोंबिवलीतील जुनेजाणते शिवसैनिक त्यावेळी नाराज होते. राऊत यांचा पाठिंबा असल्याने उघडपणे कोणीही याविषयी चकार शब्द काढत नव्हते.

डोंबिवली शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून भाऊ चौधरी यांनी पदभार सांभाळला होता. या कालावधीत विधायक कामे करण्यापेक्षा सवतासुभा पध्दतीने कामे करण्याची त्यांची पध्दत असल्याने निष्ठावान शिवैसनिक मध्यवर्ति शाखेपासून दुरावले होते. राऊत आणि थेट मातोश्रीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे असा भाऊंचा अविर्भाव असल्याने त्यांच्या वाटेला कोणत्याही शिवसैनिकाने कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही, असे आता शिवसैनिक उघडपणे बोलतात.

शहरप्रमुख असताना संघटनापेक्षा गटतटाचे राजकारण अधिक तयार झाले होते. कोणतेही विधायक कार्यक्रम त्या काळात शहरप्रमुख त्यांनी राबविले नाहीत. गॅस पुरवठादार व्यावसायिक म्हणून भाऊंची ओळख आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरात त्यांची ‘मॉडर्न गॅस’ कंपनी आहे. कोरोना महासाथीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा झाला पाहिजे म्हणून स्थापन समितीत भाऊ चौधरी यांचा सक्रिय सहभाग होता. नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने जिल्ह्याला सुरळीत ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या कामात भाऊंनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. कोरोना काळात नाशिकमधील शेतकऱ्यांची औषध फवारणी यंत्र कल्याण, डोंबिवलीत आणून शहर स्वच्छतेत त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली होती. स्वच्छतेचा नाशिक पॅटर्न म्हणून हा उपक्रम प्रसिध्द झाला होता.

रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी शिवसेनेविषयी काही वाद्ग्रस्त वक्तव्य केले होेते. त्यावेळी दानवे यांचा निषेध करण्यासाठी भाऊ चौधरी यांनी दानवे यांच्या प्रतिमेची गा‌ढवावरुन धिंड काढली होती. त्याचा राग आल्याने भाजपचे माजी नगरसेवक आणि आता शिंदे गटातील महेश पाटील यांनी भाऊ चौधरी यांना त्यांच्या गोग्रासवाडीतील घराजवळ गाठून भाऊंच्या तोंडाला काळे फासले होते. यावेळी प्रतिकार करण्याऐवजी काळे फासताना भाऊ चौधरी हसत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित झाले होते. त्याचीच चर्चा सर्वत्र त्यावेळी सुरू होती. या प्रकाराविषयी शिवसेना नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मागील निवडणुकीत ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवक पदाचे उमेदवार होते. दांडगा जनसंपर्क नसल्याने ते पराभूत झाले होते. डोंबिवलीत शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक यांच्याशी त्यांचे सख्य नव्हते. नेते संजय राऊत भाऊंच्या पाठीशी असल्याने कोणी कधी भाऊंशी पंगा घेण्याचा घेण्याचा प्रयत्न केला नाही.

नाशिकमध्ये नाराजी

नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख असतानाही स्थानिक खासदार, आमदार, पदाधिकारी चौधरी यांच्या कामकाज पध्दतीमुळे नाराज होते. स्थानिक पातळीवर भाऊंचे कोणत्याही पदाधिकाऱ्याशी सूत जुळत नसल्याने त्यांना नाशिकमध्ये पदाची सोय करुन देण्यात आली होती. अशी चर्चा होती.

आर्थिक कोंडीमुळे शिंदे गटात उडी

ठाणे जिल्ह्यातील अनेक महापालिका, इतर शासकीय विभागात भाऊ चौधरी निविदा प्रक्रियेतील स्पर्धेतून कामे घेत होते. बहुतांशी कामे वरिष्ठांच्या आशीर्वादाने भाऊंना मिळत होती. या कामांची देयके भाऊंचे वरपर्यंत असणाऱ्या संपर्कामुळे झटपट मिळत होती. शिवसेनेत फूट पडुनही भाऊंनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले होते. कामे आमच्यामुळे (शिंदे गट) मिळाली आणि सोबत (ठाकरे गट) त्यांना देता. त्यामुळे शिंदे गटाकडून भाऊंची महापालिकांमधील कामे, देयकांबाबत कोंडी करण्यास सुरुवात झाली होती. तो त्रास वाढू लागल्यामुळे भाऊ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची कुणकुण लागताच उध्दव ठाकरे यांनी भाऊंची हकालपट्टी केली असल्याचे समजते. भाऊंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही. भाऊ तिकडे गेल्यामुळे आम्हाला काही फरक डोंबिवलीत पडणार नाही असे शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

योग गुरू रामदेव बाबा यांच्या ‘पंतजली’ कंपनीला मोठा धक्का; कंपनीला टाकले काळ्या यादीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील योगगुरू रामदेव बाबा यांनी निरोगी राहण्यासाठी बनविलेल्या औषध कंपनी असलेली पतंजलीची सर्व उत्पादने बनवणाऱ्या बाबा रामदेव यांच्या ‘दिव्य फार्मसी’ला मोठा धक्का बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे पतंजलीच्या ‘दिव्य फार्मसी’ला नेपाळने काळ्या यादीत टाकले आहे. केवळ ‘दिव्य फार्मसी’ विरोधातच नव्हे तर १६ भारतीय औषध कंपन्यांविरोधातही हे कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे.

नेपाळच्या ‘ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटी’च्या या निर्णयानंतर नेपाळमध्ये पतंजली उत्पादनांच्या निर्मितीवर मोठं संकट उभं राहिलं आहे. ‘दिव्य फार्मसी’ सोबतच नेपाळमध्ये काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या १६ भारतीय औषध कंपन्यांसमोरही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पतंजलीसह सर्व १६ भारतीय औषध कंपन्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) औषध निर्मिती मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्या. नेपाळमध्ये या औषधांचा पुरवठा करणाऱ्या स्थानिक एजंटला कडक सूचना देत औषध प्रशासन विभागाने १८ डिसेंबर रोजी नोटीस बजावली आहे. त्यांना या कंपन्यांची सर्व उत्पादने तातडीने मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. विभागाने जारी केलेल्या नोटिसीनुसार, सूचीबद्ध कंपन्यांनी तयार केलेली औषधे नेपाळमध्ये आयात किंवा वितरित केली जाऊ शकत नाहीत. विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओच्या मानकांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांची यादी नेपाळमध्ये जाहीर करण्यात आली आहे. ज्या कंपन्या डब्ल्युएचओच्या मानकांचे पालन करते, त्यांनाच नेपाळमध्ये औषधे विकण्याची परवानगी आहे.

काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये ‘दिव्य फार्मसी’ शिवाय रेडिएंट पॅरेंटर्स लिमिटेड, मर्क्युरी लॅबोरेटरीज लिमिटेड, अलायन्स बायोटेक, कॅप्टॅब बायोटेक, अॅग्लोमेड लिमिटेड, जी लॅबोरेटरीज, डॅफोडिल्स फार्मास्युटिकल्स, जीएलएस फार्मा, युनिझुल्स लाइफ सायन्सेस, कॉन्सेप्ट फार्मास्युटिकल्स, श्री आनंद लाइफ सायन्सेस, आयपीसीए लॅबोरेटरीज, कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड, डायल फार्मास्युटिकल्स आणि मॅक्चर लॅबोरेटरीज यांचा समावेश आहे.

 

अंबरनाथ एमआयडीसी येथील कंपनीत झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी मधील कंपनीत झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीतील नेलेस (वॉलमेट) कंपनीत पाईपलाईन कंट्रोलसाठी वापरले जाणारे प्रेशर कंट्रोल वॉल तयार केले जातात. या कंपनीत २८ वर्षीय श्रीकांत सुरेश कदम हा कर्मचारी काम करत होता. आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास श्रीकांत हा कंपनीत काम करत असताना प्रेशर कंट्रोल वॉलमध्ये हवा भरून त्याची चाचणी केली जात असताना अचानक हा वॉल फुटला आणि त्याचं झाकण श्रीकांतच्या अंगावर उडालं. या दुर्घटनेत श्रीकांत हा गंभीर जखमी झाला, तर अन्य दोन कामगारही जखमी झाले. या तिघांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र तिथे श्रीकांत याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. यातील मयत श्रीकांत कदम याला कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.

 

महाराष्ट्र नक्षलवाद्यांना घाबरून थांबणार नाही – देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गडचिरोली येथील सूरजागड प्रकल्पाचे काम बिलकुल थांबू दिले जाणार नाही, स्थानिकांना तिथे मोठा रोजगार दिला आहे, आता नक्षलवादी दलामध्ये स्थानिक लोक नाहीत, त्यांना अन्य राज्यातून लोक आणावे लागत आहे, स्थानिक युवकांना आता रोजगार मिळतो आहे यामुळे नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात ठामपणे सांगितले.

आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना आलेल्या धमकीची गंभीर नोंद शासनाने घेतली आहे. त्यांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
सुरजागड प्रकल्प या भागातील विकासाला एक नवा आयाम देणारा प्रकल्प आहे. आणखी २०,००० कोटींची गुंतवणूक तेथे होत आहे. आता जनतेचे सुद्धा त्याला समर्थन मिळत आहे असे फडणवीस म्हणाले.

साखर कारखाने, सूत गिरण्या आणि इतर शासकीय मालमत्ता यांना शासन कर्ज हमी देते, त्या बुडीत गेल्यानंतर अशा कारखान्यांच्या मालमत्ता विकत घेताना खासगी लोकांना फायदा होतो, आता राज्य सरकारची मालमत्ता कंपनी यावर नियंत्रण ठेवेल, त्यामुळे शासनाचे होणारे नुकसान टाळता येईल, रिझर्व्ह बँकेची परवानगी या कंपनीला मिळण्यासाठी अकासमिक्ता निधी दिला आहे असा खुलासा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला, सर्व प्रकारच्या मालमत्ता धारक शासकीय संबधित कंपनी यात समाविष्ट आहेत, असेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा खुलासा मागितला होता.