Home Blog Page 62

महाविकास आघाडीचा निषेध महामोर्चा.


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत महाविकास आघाडीकडून भायखळा येथील रिचर्डसन ऍन्ड क्रूडास कंपनी ते आझाद मैदान असा प्रचंड महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएमसह अनेक बडे नेत्यांसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी लाखोच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला गोलबोट लागू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी ११ वाजता भायखळा येथील रिचर्डसन ऍन्ड क्रूडास कंपनी पासून सुरू झालेला हा मोर्चा जे.जे मार्ग उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाईम्स ऑफ इंडिया मार्गी दुपारी आझाद मैदानात दाखल झाला. यावेळी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार संजय राऊत, युवा नेते आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, सचिन अहिर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात, मुंबई अध्यक्ष भाई जगताप, वंचित चे ऍड प्रकाश आंबेडकर, भाकप चे कॉ. प्रकाश रेड्डी, माकपचे मिलींद रानडे इत्यादी नेते सहभागी झाले होते. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली “भगतसिंह कोश्यारी हटाव महाराष्ट्र बचाव व फुले-शाहू-आंबेडकरांचा विजय असो”, अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएमसह अनेक बड्या नेत्यांची भाषणे झाली.

 

बिल्कीस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांना मोठा धक्का देत सामूहिक बलात्कार करणाऱ्यांच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. २००२ साली गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या ११ आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली होती.

या आधी बिल्किस बानो यांच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर बिल्किस बानो यांच्या वकील शोभा गुप्ता यांची केलेल्या विनंतीनंतर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील दोषींची चांगल्या वर्तवणुकीच्या आधारे तुरुंगातून सुटका करण्यात आल्याचे गुजरात सरकारकडून सांगण्यात येत असताना एक मोठा खुलासा झाला होता. तुरुंगातून सुटका झालेल्या एका दोषाीविरोधात तो पॅरोलवर असताना विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब समोर आली आहे.

 

मुलीचा आज विवाह असताना कन्यादान करायचे सोडून पोलीस आयुक्त महामोर्चाच्या ड्युटीवर तैनात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात होणाऱ्या सण, उत्सव, सभा, मोर्चात पोलीस कर्मचारी हा २४ तास ड्युटीवर तैनात असतो. त्यांच्या कुटुंबापासून दूर पोलीस आपल्या कर्तव्याला जागत महत्व देतात. असेच एक उदाहरण आजही समोर आले आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचे आज लग्न होते. परंतु, महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्याने सामन्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे कन्यादान न करता कर्तव्यावर हजर झाले आहेत. याचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत ठाण्याला अजिंक्यपद तर पुण्याला उपविजेतेपद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमार गटात ठाण्याने तर मुली गटात उस्मानाबादने अजिंक्यपद मिळवत इतिहास रचला. मुलींच्या गटात उस्मानाबादचे हे सलग दुसरे अजिंक्यपद असून नाशिकचे सलग दुसरे उपविजेतेपद आहे. तर ठाण्याने गेल्या वर्षी मिळवलेल्या तिसर्‍या क्रमांकावरून हनुमान उडी मारत अजिंक्यपदाला गवसणी घातली. गेल्या वर्षी कुमारांमध्ये अहमदनगर व उस्मानाबादने विजेते व उपविजेतेपद मिळवले होते व या वर्षी या दोन्ही संघांना उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला.

मा. खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाटाव (ता. रोहा) येथील कै. नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय आणि एम.बी मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर हे सामने संपन्न झाले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा विवेकानंद पुरस्कार कुमार गटात ठाण्याच्या रूपेश कोंढळकरला तर मुलींचा सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा सावित्री पुरस्कार उस्मानाबादच्या अश्विनी शिंदेला देऊन गौरवण्यात आले. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या दोन्ही खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’ कडून त्यांच्या नावावर नोंदणी करून इलेक्ट्रिक बाईक पुणे येथे देणार असल्याचे जाहीर केले.

मुलींमध्ये उस्मानाबादची नाशिकला सलग दुसर्‍या वर्षी धोबीपछाड

मुलींच्या अंतिम फेरीच्या सामन्यात उस्मानाबादने नाशिकवर १०-९ असे ५ मि. राखून एक गुणाने दणदणीत विजय मिळवत सलग दुसर्‍या वर्षी अजिंक्यपद मिळवले. मध्यंतरला उस्मानाबादकडे ७-३ अशी ४ गुणांची आघाडी होती. उस्मानाबादच्या अश्विनी शिंदेने (४, ३.३० मि. संरक्षण व ३ गुण) अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. तिला प्रणाली काळे (२.५०, १.३० मि. संरक्षण व १ गुण ), संपदा मोरे (१.४०, १ मि. संरक्षण व १ गुण ) यांनी चांगली साथ दिली. या खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावरच उस्मानाबादला सलग दुसर्‍या वर्षी नाशिकला धोबीपछाड देता आली तर नाशिकला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. नाशिक तर्फे सोनाली पवार (१.३०, २ मि. संरक्षण), दीदी ठाकरे (१.३० मि. संरक्षण व ५ गुण ) यांनी चांगला खेळ केला. मात्र उस्मानाबादच्या आक्रमक खेळापुढे नाशिकचा टिकाव लागू शकला नाही. मुलींमध्ये ठाणे व सांगलीने तृतीय क्रमांक पटकवला.

कुमारांमध्ये ठाण्याने उडवला पुण्याचा धुव्वा

कुमारांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने पुण्याचा १४-१२ असा ७.४० मिनिटे राखून २ गुणांनी पराभव केला. ठाण्याने आक्रमक खेळ करत मध्यन्तरला ११-४ अशी ७ गुणांची आघाडी घेतली होती त्यामुळेच ठाण्याने दादागिरी करत पुण्याचा धुव्वा उडवला. ठाण्याच्या रुपेश कोंडाळकरने (३, १.४० मि संरक्षण व ५ गुण) अष्टपैलू कामगिरी केली. त्याला सुरज झोरे (१ मि. संरक्षण व २ गुण ), वैभव मोरे (१.४०, १.१० मि. संरक्षण व १ गुण ) यांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे बलाढ्य पुणे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पुण्याकडून चेतन बिका (१.४० मि. संरक्षण व २ गुण ), विवेक ब्राम्हणे (२.१० मि, संरक्षण व ३ गुण), आकाश गायकवाड (२ गुण) यांनी पराभव टाळण्याचा केलेला निकराचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. कुमारांमध्ये उस्मानाबाद व अहमदनगर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेच्या पारितोषिक सोहळ्यासाठी खासदार सुनील तटकरे, माजी राज्यमंत्री आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राज्य खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य खो-खो संघटनेचे सचिव ऍड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

वैयक्तिक पारितोषिक मुली व कुमार गट

उत्कृष्ट संरक्षक : प्रणाली काळे (उस्मानाबाद), सुरज झोरे (ठाणे )

उत्कृष्ट आक्रमक : दीदी ठाकरे (नाशिक), चेतन बिका (पुणे )

अष्टपैलू खेळाडू : अश्विनी शिंदे, उस्मानाबाद (सावित्री पुरस्कार), रुपेश कोंडाळकर, ठाणे (विवेकानंद पुरस्कार)

 

पंख्यात अडकून तुटलेले 20 महिन्याच्या बाळाचे बोट पुन्हा जोडण्यात वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आले यश!

मुंबई, प्रतिनिधी: प्लास्टिक सर्जरीद्वारे 20 महिन्यांच्या बाळाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूचे तुटलेले बोट पुन्हा जोडण्यात मिरारोड येथील वोक्हार्ट हाँस्पिटलचे डॉ. सुशील नेहते, सल्लागार प्लास्टिक हँड अँड मायक्रोसर्जन आणि डॉ. प्रताप नाडर, सल्लागार प्लास्टिक रिकन्स्ट्रक्शन अँड एस्थेटिक सर्जन यांना यश आले आहे.

घरामध्ये खेळत असताना चालू असलेल्या टेबल फॅनमध्ये हात घातल्यामुळे एका 20 महिन्यांच्या बाळाच्या उजव्या हाताचे बोट कापले गेले. मुलाच्या पालकांनी हे कापलेले बोट उचलून स्वच्छ रुमालात गुंडाळले आणि नंतर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले. मुलाची प्रकृती खालावल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तात्काळ मिरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले.

डॉ. प्रताप नाडर, सल्लागार प्लॅस्टिक रिकन्स्ट्रक्टीव्ह अँड एस्थेटिक सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरारोड सांगतात की, बाळाला आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या उजव्या हाताच्या बोटातून रक्त येत होते. अशा परिस्थितीत मुलावर तातडीने उपचार करणे आवश्यक होते. पालकांच्या संमतीने मुलाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे मुलाचे कापलेले बोट पुन्हा जोडण्यात आले. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुमारे 3 तास चालली. शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले. आता हे मुल या बोटाचा वापर खाणे, वस्तू उचलणे, वस्तू ठेवणे अशा सर्व कामांसाठी करु शकतो.

डॉ. सुशील नेहेते, सल्लागार प्लास्टिक, हँड अँड मायक्रोसर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल सांगतात की, लहान मुलांमध्ये इम्प्लांट शस्त्रक्रिया करणे खूप आव्हानात्मक असते. अनेक वेळा मुले खेळत असताना अशा दुर्घटना घडतात. अशा आपत्कालीन परिस्थितीत काय करावे ते याबाबतीत पालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.

जसे की, विच्छेदन केलेला भाग पुन्हा जोडण्यासाठी ताबडतोब रुग्णालयात आणणे आवश्यक, विच्छेदन केलेला भाग रुमाल किंवा सुती कपड्यात गुंडाळलेला असावा आणि तो प्लास्टिकच्या पिशवीत, बर्फाच्या पॅकवर, आणि कंटेनरमध्ये ठेवावा. उघड्या हातांनी त्या भागाला स्पर्श करू नये. वेळीच उपचार केले तर कापले गेलेले अवयव पुन्हा जोडले जाऊ शकते. या मुलाला वेळीच हॉस्पिटलमध्ये आणले होते त्यामुळे आम्ही त्याचे बोट वाचवू शकलो. हॉस्पिटलने त्याच्यावर तातडीने उपचार केले नसते तर त्याचे बोट गमावले असते. अशा घटनांपासून मुलांना वाचवण्यासाठी पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

या घटनेविषयी बोलताना बाळाचे पालक सांगतात की, “बाळाचे बोट कापलेले पाहून आम्ही खूप घाबरलो होतो. आमचे बाळ खूप रडत होते. आम्हाला वाटले की आता हे बोट पुन्हा जोडणे शक्य नाही. पण आम्ही कापलेले बोट घेऊन वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. वोक्हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने प्रसंगावधान राखून तुटलेले बोट पुन्हा जोडले. माझ्या मुलाला नवीन जीवन दिल्याबद्दल आम्ही डॉक्टरांचे आभार मानतो”