Home Blog Page 63

आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत डोंबिवलीकर महिलांनी सुवर्ण पदकांची लयलूट करत डोंबिवलीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मलेशियातील क्वालालांपुर येथे झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र योगा फेडरेशनचे महाव्यवस्थापक सुरेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली मलेशियात गेलेल्या भारतीय संघात २२ खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १३ सुवर्ण, चार रजत व तीन कांस्य पदके मिळवली. योगा स्पोर्ट्स, रिदमीक योगा, आर्टिस्टिक योगा अशा तीन प्रकारे पार पडलेल्या या स्पर्धेत या तिन्ही प्रकारात नोव्हायसिस, सब ज्युनिअर, ज्युनिअर, युथ, वरिष्ठ व प्रौढ गट या मध्ये संपन्न झाली. भारतासह मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया, व्हिएतनाम तसेच श्रीलंका या देशांमधून एकूण ६२ खेळाडूंचा सहभाग होता.

दिनांक २६, २७, २८ नोव्हेंबर रोजी मलेशिया येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० ते ६५ या वयोगटात  भारताचे नेतृत्व करणाऱ्या डोंबिवलीतील सौ. राधिका श्रीकृष्ण केतकर (वय: ६१ वर्षे) यांनी सुवर्ण पदक पटकावून प्रथम स्थान मिळविले आहे तर ४० ते ५० वयोगटात  मीना घनवट (वय: ४६ वर्षे) यांनीही मलेशियात झालेल्या सात देशांतर्गत ‘जागतिक योगा स्पोर्ट्स फेडरेशन’ तर्फे आयोजित ८ व्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

ह्या प्रवासादरम्यान आलेल्या आर्थिक तसेच अनेक अडचणींवर मात करत या दोघींनीही हे यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर डोंबिवलीकरांकडून तसेच सर्वच स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. डोंबिवली येथील योगविद्याधम येथे या दोघींनी योग प्रशिक्षण पूर्ण केले आहे. योगगुरू रामदेव बाबा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून हे यश प्राप्त केल्याचे राधिका केतकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.


‘योगा कल्चर असोसिएशन’ तर्फे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पायऱ्या पार करत आंतरराष्ट्रीय स्तर ह्या दोन्ही महिला पार करून भारतासाठी सुवर्णपदक मिळवले आहे. भारतातून एकूण १९ स्पर्धक व आंतरराष्ट्रीय स्तरावर ६२ स्पर्धकांमधून राधिका केतकर व मीना घनवट यांनी सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल डोंबिवली भाजप पूर्वमंडलाचे उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.

 

शरद पवारांना फोनवरून धमकी का दिली ? आरोपीचा पोलीसांसमोर खुलासा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी वारंवार धमकीचे फोन करणाऱ्या एका व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. शरद पवार यांना का धमकी दिली, पोलिसांनी आरोपीची खडसावून चौकशी केली असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पोलीसांनी सांगितले की, आरोपी शरद पवार यांच्यावर रागावला होता कारण त्याची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत पळून गेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा बिहारमधून अटक करण्यात आलेल्या ४६ वर्षीय नारायण सोनी याची पत्नी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत पळून गेल्याने संतापला होता. तसेच शरद पवार यांनी या कामात हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे शरद पवारांना धमकी दिली असल्याचं त्यानं सांगितलं आहे.

त्यानंतर आरोपी नारायण सोनी याला बुधवारी मुंबईत आणून न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या तीन-चार महिन्यांपासून आरोपी नारायण सोनी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाला स्वतः नावाने फोन करत होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने अपशब्द वापरले आणि काही प्रसंगी ड्युटीवर असलेल्या कॉन्स्टेबलला ‘मुंबई आके देसी कट्टे से उडा दूंगा’ असे सांगितले. पोलीसांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरून त्याला ओळखले आणि इशारा दिला. परंतु असे असूनही, आरोपीने फोन करणे सुरूच ठेवले, त्यामुळे सोमवारी भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ आणि ५०६-२ यासह संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्याकडे सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करायची मागणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. मराठा युवा सेनेनंतर आता विश्व वारकरी सेनेने ही मागणी केली आहे. सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ ‘विश्व वारकरी सेने’ने गंगासागर येथे घेतली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात सर्वत्र व्हायरल होत असताना आता वारकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

‘विश्व वारकरी सेने’चे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वारकऱ्यांना शपथ देऊन सुषमा अंधारे ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ दिली आहे. आगामी काळात राज्यातील वारकरी देखील अशी शपथ घेतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात सुषमा अंधारे व वारकरी संघटना यांच्यात नवीन संघर्ष बघायला मिळू शकतो.

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी याआधी मराठा युवा सेनेने देखील केली आहे. अंधारे यांचं हिंदुत्व खोटं आहे. त्यांची हक्कालपट्टी न केल्यास शिवसेना भवनासमोर महाआरती करणार असल्याचा इशारा ‘मराठा युवा सेने’ने दिला आहे.

 

‘सिल्व्हर ओक’ वर शरद पवार यांना फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने गुन्हा दाखल होत पक्षात खळबळ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुन्हा त्यांच्या वाढदिवसादिनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी फोन करून ‘देशी कट्ट्याने ठार मारू’, अशी धमकी दिली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिल्याची माहिती आहे.

पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गांवदेवी पोलीसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे.

 

“शिंदे गटाला वेळ देण्यासाठी निवडणूक आयोगानं तारीख पुढे ढकलली”; अरविंद सावंतांचा गंभीर आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरी शिवसेना आमचीच असून ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह आम्हालाच मिळावं, अशी मागणी दोन्ही गटाकडून केला जात आहे. हे प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं आहे.

खरी शिवसेना कुणाची ? याबाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने २३ डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला होता. ठाकरे गटाकडून जवळपास २० लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाकडे जमा केली आहेत. शिंदे गटाकडून मात्र किती प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत, याबाबतची स्पष्टता नाहीये. एकंदरीत अशी स्थिती असताना निवडणूक आयागाने प्रतिज्ञापत्रे जमा करण्याची तारीख पुढे ढकलली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. शिंदे गटाला आणखी वेळ मिळावा म्हणून निवडणूक आयोगाने ही तारीख पुढे ढकलली, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. ते नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, “शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्राची संख्या मोठी आहे. हा आकडा २० लाखांच्या आसपास आहे. पण निवडणूक आयोग आता पळवाट काढत आहे. निवडणूक आयोगाने २३ डिसेंबर शेवटची तारीख दिली होती. पण ही तारीख पुढे ढकलण्याचं कारण काय होतं ? हे मला कळलं नाही. शिंदे गटाला वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या संस्था बरबटल्या आहेत. महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार बसलं आहे, त्याच्यावर अजूनही निर्णय दिला जात नाही. ही बाब गंभीर असून लोकशाहीसाठी धोकादायक आहे. केवळ निर्णय पुढे ढकलायचं काम सुरू आहे. कारण त्यांना नकार देता येत नाहीये आणि होकार कसा देणार ? अशी अडचण निर्माण झाली आहे. हे सगळं राजकीयदृष्ट्या सुरू आहे. उद्दिष्ट आणि कर्तव्यापासून या संस्था भरकटल्या आहेत” अशी टीकाही अरविंद सावंतांनी केली आहे.