Home Blog Page 64

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, येत्या तीन दिवसांत ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस !..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशावर ‘मंदौस’ चक्रीवादळाचं संकट घोघावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागात ‘मंदौस’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. आता महाराष्ट्रावरही या चक्रीवादळाचे सावट असून काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, ‘मंदौस’ चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता असून इतर ठिकाणी हवामान कोरडे राहिल, याशिवाय राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

आधीच आर्थिक वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसचं झाला नाही, त्यामुळे पेरणीला विलंब झाला. पेरणी झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. आता रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाल्यास याचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रविवारी मंदौस चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूवर दिसून आला होता. आता या वादळाची दिशा बदलून नैऋत्य झाली आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राकडे येणार नाही. तरी सुद्धा राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. आज सकाळपर्यंत मंदौस वादळ आणखी कमजोर होणार असून किमान तापमानात थोडी वाढ होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

 

अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ नवाब मलिकांनाही जामीन मिळणार? मुंबई हायकोर्टात आज तातडीने सुनावणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मलिक यांचा जामीन फेटाळला होता. या निर्णयाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना आज जामीन मिळणार की त्यांना तुरूंगातच राहावे लागणार याकडेच सर्वाचं लक्ष लागून आहे.

गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असलेल्या जमीन खरेदी प्रकरणी मलिक यांनी कुर्ला येथे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने गुन्हा दाखल करत फेब्रुवारीत त्यांना अटक केली होती.

विशेष न्यायालयात नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळण्यात आल्याने मलिक यांच्या वतीने जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला. या अर्जावर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर सुनावणी निश्‍चित करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी जामीन मिळाला. कथित १०० कोटी गैरव्यवहार प्रकरणात मुंबई हायकोर्टाने देशमुखांचा जामीन मंजूर केला. मात्र, पुढच्याच क्षणी कोर्टाने त्यांच्या जामीनाला १० दिवसांची स्थगिती सुद्धा देण्यात आली कारण, सीबीआयने या जामीनाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं हायकोर्टाला सांगितलं. यासाठी १० दिवसांचा स्थगिती या निर्णयावर द्यावी, अशी मागणी सीबीआयने केली. सीबीआयच्या विनंती मान देऊन न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यानंतर आता नवाब मलिक यांनी सुद्धा जामीनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर आज तातडीने सुनावणी होणार असून देशमुखांपाठपाठ नवाब मलिक यांनाही जामीन मिळतो का ? की त्यांना तुरुंगातच रहावे लागते याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

 

मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांचं युतीबाबत मोठ विधान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘इंदु मिल’च्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने म्युझियम उभं करण्यात यावं यासाठी मागणी केली होती मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी इंदू मिलमध्ये पुतळा बसवण्याची मागणी केली, त्याच विषयावर आज चर्चा झाली.

आता पुतळ्यासोबत म्युझियम देखील उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. त्याच विषयावर रूपरेषा ठरवण्यासाठी चर्चा झाली. येवढंच या बैठकीत झालं बाकी कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. तर त्यांनी शिवसेने सोबतच्या युतीवर भाष्य केलं ते म्हणाले, “काँग्रसवाल्यांनी आम्हाला वापरायचं तेवढं वापरलं, तरीही आम्ही कधीही भाजप सोबत जाण्याचा विचार केला नाही. सेने सोबतच्या युतीवर ऑफर आम्ही त्यांना दिली होती मात्र त्यांच्या समोर एक अट ठेवली होती की, तुम्ही भाजपची साथ सोडा परंतु सेना त्यावेळी साथ सोडायला तयार नव्हती. मात्र आता युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे.” त्यामुळे आजूनही ठाकरे-आंबेडकर ऐकत्र येतील की नाही हे अजून तरी स्पष्ट झालं नाही.

 

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी लावण्यात आलेले ३०७ कलम काढले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विविध संघटनांनी निषेध केला आहे. चंद्रकांत पाटलांवर पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी ११ पोलीसांवर निलंबनाची कारवाई केली होती. या निलंबित पोलीसांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात त्यांचावर लावण्यात आलेले ३०७ हे कलम काढून टाकण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या ११ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, संघटनांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता या पोलिसांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आलं आहे. यात तीन पोलिस अधिकारी व आठ पोलीसांचा समावेश आहे. या प्रकरणात ३०७ हे कलम काढून टाकले आहे.

 

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर गृहमंत्री अमित शाह म्हणाले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापली बाजू मांडली. त्यानंतर सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची एक संयुक्त समिती तयार करुन त्यामध्ये चर्चा करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला. तसेच हा वाद न्यायालयात असल्याने न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर दावा करु नये असे निर्देश अमित शाह यांनी दिले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या सांगलीतील आणि सोलापुरातील काही गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळाले होते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावलं. संसदेच्या इमारतीत जवळपास २५ मिनीटे ही बैठक झाली. त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले.