Home Blog Page 65

‘आरबीआय’कडून रेपो दरात वाढीची घोषणा; कर्जे पुन्हा महागण्याची चिन्हे !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय बँक म्हणून ओळखली जाणारी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ देशातील सर्व बँकांना व्यवसायाचा परवाना तर देतेच शिवाय परवाना काढून घेण्याचे अधिकार देखील या बँकेकडे आहेत. रिझर्व्ह बँकेकडे बँकिंग व्यवसायाचे नियमन करण्याचे अधिकार असल्याने वेळोवेळी पतधोरण ठरवण्यात या बँकेची भूमिका महत्वपूर्ण ठरते. नुकत्याच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे रेपो दरात वाढ होणार आहे, त्यामुळे विविध बँकेकडून कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना याचा फटका बसण्याची स्थिती निर्माण होणार आहे.

‘रेपो रेट’ म्हणजे ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून देशातील बँकांना कर्ज उपलब्ध केल्या जाते त्यावर आकारण्यात येणारे व्याज दर असतात त्यामुळे हे दर स्वस्त असेल तर देशातील बँक देखील ग्राहकांना स्वस्तात विविध कर्जे उपलब्ध करून देतात. मात्र जर ‘रेपो रेट’ महागला तर इतर बँका देखील व्याजदर वाढवितात त्याचा नेमका फटका कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसतो. अशीच काहीशी स्थिती आता निर्माण होणार आहे. यापूर्वी देखील रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली होती. यंदा रिझर्व्ह बँकेकडून अनेकदा रेपो दरात वाढ केल्या जात आहे, ही परिस्थिती कर्जदारांवरील कर्जाचा बोजा वाढविणारी ठरणार आहे.

सध्या जागतिक मंदीचे सावट असताना देशांतर्गत महागाईला नियंत्रण लागणे आवश्यक आहे, मात्र मंदीचा परिणाम भारतावर होणार नसल्याचे आशादायी चित्र निर्माण करत अशाप्रकारे रेपो दराच्या वाढीचा काय अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम येत्या काळात होणार का ? हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे. भारतासारख्या देशात जिथे कष्टकरी वर्ग स्वप्ने साकारण्यासाठी बँकेकडून कर्जे घेतात त्यांना यामुळे अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल, हे देखील तितकेच सत्य आहे, हा नियम मध्यमवर्गीयांना देखील तितकाच लागू होतो.

 

राजभवनातील त्या ‘मॉडेल’ सोबत फोटोमुळे राज्यपाल पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि वाद यांचे जणू अतूट नाते असल्याची स्थिती आहे, आजवर वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले राज्यपाल आता एका नव्या प्रकरणाने लक्ष्य बनण्याची लक्षणे दिसून येत आहे. प्रसिद्ध हिंदी टेलिव्हिजन मालिका ‘भाग्य लक्ष्मी’ फेम मायरा मिश्रा हिचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासोबत राजभवनात काढण्यात आलेले फोटो खुद्द मॉडेलने ट्विटर अकाउंट वर शेअर केल्याने नव्याने वाद उफाळून आला आहे.

मायरा मिश्रा हिने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती यावेळी खुर्चीवर बसून तसेच राजभवन परिसरात विविध जागी तिने राज्यपालांसोबत फोटो काढले होते, हे सर्व फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केल्याने मनसेने यावर संतप्त प्रतिक्रिया देत आक्षेप घेतला आहे. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी या फोटोंना शेअर करत ट्विटर पोस्ट द्वारे खडेबोल सुनावले आहे, ही बाई राजभवनात काय करत आहे ? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही असा प्रश्न मनसे नेत्याकडून उपस्थित केला गेला आहे.

दरम्यान हे ट्विट अधिक लोकांपर्यंत वेगाने पोहचत असल्याने अगोदरच शिवरायांवर वादग्रस्त विधान केल्याने राज्यपालांविरोधात राज्याचे वातावरण तापले असताना त्यात नव्याने एका नव्या वादाची भर पडणार आहे. मनसेनंतर इतर काही विरोधी पक्ष राज्यपालांवर प्रश्नांची सरबत्ती करण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीतच कुठल्या ना कुठल्या मुद्द्याने आजवर राज्यपाल वादाचे कारण बनले आहे, मात्र यावेळी एका वेगळ्याच प्रकरणाने विरोधाचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

१५० कोटी निष्क्रिय खाती हटीवण्याचा एलॉन मस्कचा ट्विटर बाबतीत महत्वपूर्ण निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जगभरात प्रसिद्ध असलेली मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर हल्ली चांगलीच चर्चेत येत आहे, बहुधा वापरकर्त्यांचे ट्विट व्हायरल होत असते मात्र सध्या ट्विटरच्या नवीन मालकामुळे ट्विटर चर्चेत राहत आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून अनेक बदल या समाज माध्यमाबाबतीत घेण्यात आले आहे. ट्विटरच्या संबंधी चर्चेच्या विषयांपैकी कर्मचारी कपातीचा निर्णय, ब्लू टिक प्रीमियम सबस्क्रिबशन प्लॅन इत्यादींचा यामध्ये समावेश राहिला आहे. आता नव्याने घेण्यात येत असलेल्या निर्णयानुसार ट्विटर जवळपास १५० कोटी निष्क्रिय खाती हटविणार असल्याची माहिती आहे.

एलॉन मस्क यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरवर जवळपास १५० कोटी अशी निष्क्रिय खाती आहेत जी एकदा लॉग इन केल्यावर परत वापरण्यात आली नाही अथवा बहुतेक वापरकर्ते पासवर्ड विसरल्याने त्यांनी परत लॉग इन करण्याचा प्रयत्न केला नाही. या सर्वांचा एकंदरीत परिणाम बघता ही सर्व खाती निष्क्रिय अवस्थेत आहेत. यामुळे ट्विटर वर नाहक तसेच निष्क्रिय अकाउंटची गर्दी झाली आहे. अशा सर्व अकाउंटला हटविण्याची कारवाई केल्या जाणार आहे, यामुळे ट्विटरवर नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ट्विटरवर असलेल्या निष्क्रिय खात्याची माहिती देणारे एक अद्ययावत तसेच अचूक परिणाम देणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून याद्वारे निष्क्रिय, तसेच वापरातून बाद असलेली खाती संपूर्णपणे ट्विटरवरून हटविण्यात येणार आहे, ज्यांची संख्या १५० कोटीच्या घरात आहे. बोगस ट्विटर अकाउंटच्या विरुद्ध एलॉन मस्क यांची सुरुवातीपासूनच कठोर भूमिका राहिली आहे. त्यामुळे या नवीन निर्णयामुळे ज्या वापरकर्त्यांची खाती सुमारे एक वर्षांहून अधिक कालावधीपासून लॉग इन करण्यात आली नाही ती सर्व डिलीट केल्या जाणार आहे. हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह राहणार असून, यामुळे बोगस तसेच नाहक तयार करून ठेवलेल्या खात्यांचे ट्विटरवरील अस्तित्व संपुष्टात येणार आहे.

 

संजय राऊतांना जीवे ठार मारण्याच्या धमकीमुळे खळबळ; सीमावाद प्रकरणाचे कनेक्शन असल्याचा संशय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकरणाने चर्चेत असतात. नुकतीच काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झालेल्या संजय राऊतांची राजकारणातील सक्रियता पुन्हा पूर्वीप्रमाणे वाढली आहे, यावेळी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रकरणी देखील राऊतांनी काही विधाने केली होती. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती, देसाईंच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या वाहनांवर यापूर्वी दगडफेकीचे प्रकार घडले होते. कर्नाटक मधील कन्नड वेदिका संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक असून, संजय राऊतांना काल दोनदा फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. दरम्यान शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेद्वारे संजय राऊतांना सज्जड दम देत म्हटले होते की, “आत्ताच जेलमधून सुटला आहात, पुन्हा जेल मध्ये जावं लागेल” त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शंभूराज देसाई यांच्या या विधानानंतर संजय राऊतांना फोन आल्याने देखील संशय अधिक वाढत चालला आहे.

राऊतांना धमकीचा फोन आल्याने कन्नड वेदिका संघटनेवर संशय व्यक्त करण्यात येत असून, सध्या याबतीत नेमका कुणाचा संबंध आहे हे निश्चित नाही. मात्र, येत्या काळात यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणि सीमावाद प्रकरण पुन्हा पेटण्याची दाट शक्यता आहे. संजय राऊत मागील काही दिवसांपासून सतत शिंदे-फडणवीस सरकारवर सीमावाद प्रकरण योग्यरीत्या हाताळल्या न गेल्याच्या टीका करत आहे, त्यामुळे त्यांना शांत राहण्याचा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिला आहे. मात्र या दोन नेत्यांमध्ये वाद विकोपाला जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

 

सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री आणि महाविकास आघाडी नेत्यांदरम्यान बैठक; सामोपचाराने तोडगा निघण्याची शक्यता..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सीमाप्रकरणी पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असून कर्नाटकमधील काही संघटना या विषयाला हिंसक वळण देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना याआधी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक, महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर चढत निदर्शने करणे इत्यादी प्रकार सुरु आहेत. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा देखील दहन केल्याने आता सर्व सीमा उल्लंघन करण्याचे कार्य कर्नाटक कडून झाले आहे, नेमक्या या वादावर तोडगा निघावा म्हणून महाविकास आघाडीचे नेते पुढाकार घेताना दिसून येत आहे. सीमावाद प्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे तसेच अरविंद सावंत यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली.

यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाविकास आघाडी नेत्यांमध्ये बैठकीच्या वेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे महाराष्ट्रविरोधात प्रक्षोभक वक्तव्य, राज्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येणारी वादग्रस्त विधाने, शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रात केली जात असलेली उलटसुलट विधाने इत्यादी विषय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना विश्वास व्यक्त केला की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आश्वस्त केले आहे, त्यामुळे नक्की काहीतरी मार्ग ते काढतील.

सध्या गुजरातमध्ये नव्याने भाजपने विजय प्राप्त केला असल्याने या राज्यातील शपथविधी आटोपल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरण सोडविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकार याप्रकरणी जातीने लक्ष देत प्रकरण सोडवणार व कुठल्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही, असा आम्हाला विश्वास असल्याचे मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी मांडले. एकंदरीतच महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमावाद प्रकरणी सक्रिय झाल्याने, राज्य सरकारची याप्रकरणी भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे कारण वेळीच हे प्रकरण नियंत्रणात आणले गेले नाही तर चिघळले जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही असंही त्या बोलल्या.