Home Blog Page 66

समृद्धी महामार्ग लोकार्पण कार्यक्रमावरून प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांवर शरसंधान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राच्या दूरगामी विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या समृद्दी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील कार्य जवळपास पूर्णत्वास गेले आहे, लवकरच हा मार्ग जनतेच्या सेवेत खुला करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामार्गाचे लोकार्पण केले आहे. नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा बघता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याला निमित्त ठेवून पंतप्रधानांवर टीकेची तोफ डागली आहे. मराठवाडा साहित्य संमेलनाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती, यावेळी बोलताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मुद्दा उपस्थित करताना उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र प्रकरणी महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहे, याबाबतीत अगोदर स्पष्टीकरण द्यावे, नंतरच शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या महामार्गाचे लोकार्पण करावे. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जी अरेरावी सीमावादावर लावली आहे, त्यावर पंतप्रधानांनी सणकून बोलले पाहिजे. सध्या महाराष्ट्र, पंतप्रधानांच्या भूमिकेची या प्रश्नी वाट बघत आहे, असे देखील ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने समृद्धी महामार्ग हा सुरु झालाच पाहिजे, राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या महामार्गाचे कार्य आमच्या शासनकाळात अधिक झाले, असे देखील नमूद करायला यावेळी उद्धव ठाकरे विसरले नाही. एकीकडे राज्यातील मोठ्या महामार्गाचे लोकार्पण करायचे आणि दुसरीकडे कर्नाटकाने महाराष्ट्राचा मार्ग बंद करण्याचे कार्य सुरु केले आहे, त्यामुळे या प्रश्नावर पंतप्रधानांनी आपले मत ठेवणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

सीमावाद प्रकरणी खुद्द शिवसेनाप्रमुख तीन महिने कारावास भोगून आले होते, त्यामुळे त्यांच्या नावाच्या महामार्गाचे लोकार्पण होताना सीमाप्रश्नी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. एकदंरीतच उद्धव ठाकरेंनी उदयाला होणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यावरून केंद्र सरकारला घेरण्याचे संपूर्ण प्रयत्न केल्याचे त्यांच्या या विधानातून दिसून आले.

 

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी १३ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांना जामीन मंजूर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कथित १०० कोटी वसुली प्रकरणी मागील १३ महिन्यांपासून तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून अनिल देशमुख प्रयत्न करत होते, मात्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवल्याने देशमुखांच्या जामिनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांना काही अटीशर्तींसह १ लाख रुपये इतक्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांनी जबरदस्तीने १०० कोटी इतकी वसुली करण्याचे आदेश पोलीसांना दिल्याचे प्रकरण प्रकाशझोतात आले होते. याप्रकरणी ‘ईडी’ व ‘सीबीआय’ने खंडणी व आर्थिक गैरव्यवहार असे गंभीर आरोप अनिल देशमुखांवर ठेवले होते. हे सर्व आरोप राजकीय आकसापोटी होत असल्याचे मत अनिल देशमुखांनी व्यक्त केले होते, त्यामुळे १३ महिन्यांपासून याप्रकरणी तपासणी व सुनावणीचे सत्र सुरु होते. दरम्यानच्या काळात अनिल देशमुखांचे प्रकृतिस्वास्थ देखील खालावले होते.

अखेर न्यायालयाने अनिल देशमुखांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. वाढते वय, आजार इत्यादी कारणे अनिल देशमुखांनी जामीन अर्जात नमूद केले होते, या सर्व बाबींचा विचार करत न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. देशमुखांना जामीन मंजूर होताच त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आले.

 

आगरी महोत्सव २०२२’ चा उद्घाटन सोहळा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साह जल्लोष व दिमाखात संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदा डोंबिवलीतील सावळाराम क्रीडासंकुलात दिनांक १२ ते १९ डिसेंम्बर रोजी सुरू होत असलेल्या ‘आगरी युथ फोरम’ तर्फे १८ व्या अखिल भारतीय ‘आगरी महोत्सव २०२२’ च्या उद्घाटन समारोहाचा शुभारंभ राज्यमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते लोकनेते आणि हभप वारकरी समुदायातील बुवा महाराज मंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.

खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आगरी महोत्सवाचे उदघाटन व्हायचे होते, परंतु गुजरात येथील शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यामुळे माझ्यावर ही जबादारी आली आणि मला ही संधी मिळाली आणि या भव्य आगरी महोत्सवाचे उदघाटन माझ्या हस्ते झाले याचा आनंद होत आहे असेही नामदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारच्या ओबीसी आरक्षण धोरणामुळे आगरी समाजाला न्याय मिळाला

नवी मुंबई येथील विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा पाटील यांचं नाव देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. विमानतळबाबत अनेक समस्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केले. ओबीसी आरक्षणाचे काम शिंदे फडणवीस सरकारने करुन आगरी समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. यामुळे समाजातील अनेकांना चांगली संधी मिळेल असे वक्तव्य नामदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केले.

यावेळी व्यासपीठावर ‘आगरी युथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वझे, आमदार गणपत गायकवाड, माजी उत्पादनशुल्क मंत्री जगन्नाथ पाटील, रामशेठ ठाकूर, दशरथ पाटील, हभप. बाळकृष्ण महाराज, चेतन महाराज, जयेश महाराज, प्रल्हाद महाराज, भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

नामदार चव्हाण पुढे म्हणाले, आगरी महोत्सव उत्तरोत्तर वाढत चालला आहे. यामध्ये समाजातील विविध घटक एकत्र येतात. समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा सत्कार या व्यासपीठावर होतो हे याचे वैशिष्ट्य आहे. ९० वे साहित्य संमेलन करण्यासाठी या ‘आगरी युथ फोरम’ने पुढाकार घेतला त्याचे कौतुक आजही होत आहे. ‘आगरी युथ फोरम’ सकरात्मक काम करीत असल्याने समाज प्रबोधनाचे कार्य होत आहे.

यावेळी आमंदार गणपत गायकवाड म्हणाले कि, समाजात १८ वर्ष हा उत्सव एकत्रितपणे टिकणं मोठं काम होतं आणि ते झालेलं आहे. समाजाचं संस्कृतीत परिवर्तन करण्याचे काम वारकरी संप्रदायातील महाराजांनी केले. समाजाला एकत्र ठेवण्यात आगरी समाजाचा मोलाचा वाटा आहे.

यावेळी रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, या आगरी महोत्सवात विविध सामाजातील बांधव सहभागी होत असतात. दि.बां पाटील यांच्या नावाने पाच जिल्ह्यांतून झालेली एकी पुढे कायम ठेवली पाहिजे. अखिल आगरी समाजाचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, दि.बांच्या नावाचा ठराव करून केंद्राकडे पाठवा असे आगरी महोत्सवाच्या व्यासपीठावरुन पाटील यांनी ना.रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली. दरम्यान ‘कणसा’ या स्मरणिकेचे प्रकाशन नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना गुलाब वझे यांनी केली तर सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.

 

डोंबिवली पोलीसांकडून पावणे तीन लाख रुपये किंमतीच्या मोटरसायकल हस्तगत करत चोरास अटक करून चार गुन्हे उघडकीस..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोटार सायकल चोरी करणाऱ्यास डोंबिवली पोलीसांनी अटक करून एकूण २,७९,०००/- रुपये किंमतीच्या ४ मोटार सायकल हस्तगत करून, ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी तरुण करण किशोर सागवेकर (वय: १८ वर्षे) व्यवसाय: नोकरी, राहणार खोली क्र.५, शिव अमृत चाळ, ‘ए’/विंग डोंबिवली पश्चिम याची इंस्टाग्रामवर ओळख झालेला व्यक्ती नामे अनिकेत वाडकर याने त्याला भेटायचे आहे असे सांगून करण सागवेकर याला ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ, डोंबिवली (पूर्व) येथे भेटून करण सागवेकर याच्याकडे असलेली नवीन मोटार सायकल ही कशी चालते हे पाहण्यासाठी घेऊन गेला तो परतलाच नसल्याने याबाबत रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्यात फिर्यादी करण सागवेकर याने दिलेल्या तक्रारीवरुन डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर इसमास कल्याण (पश्चिम) परिसरातून अटक केली. त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने कोपरी- ठाणे, कोलशेत-ठाणे, मानपाडा-डोंबिवली व ठाकुर्ली-डोंबिवली परीसरात मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून ४ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनिल कुराडे (डोंबिवली विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि. सरडे, पोनि. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. योगेश सानप, सपोनि. बळवंत भराडे, पोहवा. विशाल वाघ, पोहवा. शंकर निवळे, पोहवा. प्रशांत सरनाईक, पोहवा. भणगे, पोना. कोळेकर, पोना. दिलीप कोती. नितीन सांगळे, शिवाजी राठोड, निलेश पाटील यांनी केली. दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. योगेश सानप करत आहेत.

 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बेळगांव, कारवार, धारदार, निपाणी सह ८१४ गाव जे कर्नाटक राज्यात आहेत, ते महाराष्ट्रामध्ये विलीन होण्यासाठी १९५६ पासून प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीष विडोळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीष विडोळकर यांच्या वतीने महाराष्ट्रातील १५० गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे.

काय आहे याचिका ?

मिळालेल्या माहितीनुसार, सतीष विडोळकर यांच्या वतीने महाराष्ट्रातील १५० गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे. या १५० गावांपैकी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील २५ गावं हे तेलंगणामध्ये जाऊ इच्छितात. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांतील ४० गावं कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील ४ गावांनी मध्यप्रदेशमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे.

चंद्रपुर जिल्ह्याच्या सीमाभागातील १४ गावं तेलंगणा राज्यात जाऊ इच्छितात. या गावांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने १९९७ ला महाराष्ट्राच्या बाजूने दिला आहे. नाशिकमधील काही गावांनी गुजरातमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे, तर सोलापूर जिल्ह्यातील काही गावं कर्नाटक राज्यात जाऊ इच्छितात. या गावांनी दुसऱ्या राज्यात जाऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना सुविधा द्याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे.

त्याचबरोबर बेळगांव, कारवार, धारदार, निपाणी सह ८१४ गाव जे कर्नाटक राज्यात आहेत, ते महाराष्ट्रामध्ये विलीन होण्यासाठी १९५६ पासून प्रतिक्षेत आहेत. या गावांना महाराष्ट्रात विलीन करून घ्यावं. महाराष्ट्र राज्य विरूद्ध भारत सरकार आणि इतर हा वाद २००४ पासून प्रलंबित आहे. या संदर्भात ऍड. राजसाहेब पाटील, ऍड. विजय खामकर, ऍड. तुषार भेलकर, ऍड. सुप्रिया वानखेडे याचिकाकर्त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे.