Home Blog Page 69

मुलींना मिळणार मोफत स्कूटी, अर्ज करा आणि २ दिवसात मिळवा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज मुलींनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे. एक काळ असा होता जेव्हा मुलींना फारसे लिहिण्या-वाचण्याची परवानगी नव्हती आणि त्यांना घरची कामे करायला लावली जायची, पण आता काळ बदलला आहे. आणि आज मुली केवळ अभ्यासातच नाही तर नोकरीतही मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत, आणि हळूहळू त्यांच्या पुढे जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारही मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत, ज्याचा त्यांना थेट फायदा होत आहे. उत्तर प्रदेश सरकारची ‘राणी लक्ष्मीबाई योजना’ आहे, ज्याचा लाभ राज्यात राहणाऱ्या मुलींना लवकरच मिळणार आहे.

योजनेबद्दल जाणून घ्या

या योजनेचे नाव आहे ‘राणी लक्ष्मीबाई योजना’, जी सरकार लवकरच राज्यातील मुलींसाठी सुरू करणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील मुलींना मोफत स्कूटी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात या योजनेची माहिती दिली होती.

खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाल्याची गृहिणींसाठी खुशखबर !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

खाद्यतेलाच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहे. तसेच वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडून गेलं आहे. मात्र अशातच सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोयाबीन तेलाचे ९०० एमएल चे पाऊच १४ रुपयांनी स्वस्त झाले. तर १५ किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर अडीचशे रुपयांनी खाली आले.

हे दर कमी हाेण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील पाम तेलाच्या दरातील घसरणीसोबत स्थानिक पातळीवर सर्वच तेलबियांची आवक वाढल्याचा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत सोयाबीन तेल प्रती पाऊचे दर १४२ रुपये होते. ते मंगळवारी १२७ रुपये झाले. संयुक्त कुटुंबाला जास्त प्रमाणावर लागणाऱ्या तेलाची गरज भागवण्यासाठी पंधरा किलोचा डबा घेतला जातो.

या डब्याचे दर गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत २४०० रुपयापर्यंत गेले होते. ते मंगळवारी २५० रुपयांनी कमी होऊन २,१५० रुपयापर्यंत खाली आले. सर्वच खाद्यतेलात काही प्रमाणात पामतेल समाविष्ट केले जाते. त्याचे दर कमी अधिक झाले की सर्वच तेलांच्या दरामध्ये चढ-उतार होतात. विशेष म्हणजे दिवाळीच्या आधीपासूनच तेलाच्या दरात वाढ सुरू होती. आता ते पहिल्यांदाच घसरले आहेत.

 

शहर स्वच्छता व सुशोभिकरण करणाच्या कामांकडे काटेकोपरपणे व गतीमानतेने विशेष लक्ष देण्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडून निर्देश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शहर स्वच्छतेमध्ये देशात तृतीय क्रमांकाचा उच्च स्तर गाठल्यानंतर तो स्तर उंचाविण्याची आपली जबाबदारी वाढली असून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ ला सामोरे जाताना आपल्या कामामध्ये अधिक नीटनेटकपणा आणावा आणि क्षेत्रीय स्तरापासून महानगरपालिकेच्या सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांनी अधिक काटेकोपरपणे व गतीमानतेने स्वच्छता व सुशोभिकरण करणाच्या कामांकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ विषयक कामांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी प्रत्येक स्तरावरून केलेल्या कामाचे निरीक्षण व परीक्षण केले जाईल तसेच या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई तसेच सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी व संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वच्छताविषयक कामे सुव्यवस्थित रितीने व्हावीत व त्यावर सुयोग्य नियंत्रण असावे यादृष्टीने कृती आराखडा मांडला व त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यामध्ये प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी विभागप्रमुख दर्जाचा नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांच्याव्दारे आठवड्यातून एकदा स्वच्छताविषयक कामांचे निरीक्षण केले जाईल असे स्पष्ट केले. स्वच्छता कामांचा दर्जा राखला जावा याकरिता ‘स्वच्छ भारत मिशन’च्या टूलकिटनुसार १४ बाबींची चेकलिस्ट तयार करण्यात आली असून त्या चेकलिस्टप्रमाणे क्षेत्रीय स्तरापासून मुख्यालय स्तरापर्यंत स्वच्छता निरीक्षणाची जबाबादारी सोपविलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने तपासणी करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.

यापुढील काळात आठवड्याभरात केलेल्या स्वच्छता कामांचा प्रत्येक मंगळवारी आयुक्तांमार्फत विभागनिहाय आढावा घेतला जाणार असून त्यासोबतच आयुक्त विभागवार भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी देखील करणार आहेत. स्वच्छतेप्रमाणेच सुशोभिकरण हा देखील एक महत्वाचा भाग असून सुशोभिकरणाची कामे तत्परतेने सुरु करावीत व त्यामध्ये मागील वर्षीच्या चांगल्या चित्रभिंती धुवून घेणे, आवश्यकतेनुसार काही चित्रभिंतींची पुनर्रंगरंगोटी करणे व नव्या संकल्पना राबवून काही चित्रभिंती नव्याने निर्माण करण्याचे आयुक्तांनी सूचित केले. याशिवाय शिल्पाकृतींची डागडूजी तसेच कारंजे दुरुस्ती करून ती कार्यान्वित करण्याची कार्यवाही तातडीने करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

सुशोभिकरण कामांचा प्रभाव प्रथमदर्शनी नजरेत भरेल अशा दृश्य स्वरुपात साकारला पाहिजे असे स्पष्ट करीत आयुक्तांनी नागरिकांना आनंद वाटेल अशाप्रकारे नवी मुंबईचे चित्र बदलून टाका अशा सूचना केल्या. स्वच्छतेमध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या मानांकनात नवी मुंबईकर नागरिकांच्या सहभागाचा महत्वाचा वाटा असून प्रत्येक विभागात आठवड्यातून किमान एक स्वच्छता विषयक उपकम लोकांच्या सहभागातून राबवावा आणि त्याला व्यापक प्रसिध्दी द्यावी अशाही सूचना आयुक्तांनी याप्रसंगी केल्या. स्वच्छतेच्या अनुषंगाने कोणत्या बाबींची तपासणी करायची याविषयी सादरीकरणाव्दारे बाबनिहाय सविस्तर माहिती देण्यात आली.आपण करीत असलेल्या स्वच्छताविषयक कामात सातत्याने सुधारणा करणे व समोर दिसत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना करीत राहणे गरजेचे असून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ पेक्षा अधिक चांगले चित्र निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने काम करावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. आजच्या बैठकीतील प्रत्येकाने जबाबदारीने काम करण्याचा हा संदेश महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कर्मचा-यापर्यंत पोहचवावा व त्याच्या तीव्रतेची जाणीव करून द्यावी असेही त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना सूचित केले.

प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी अधिक कृतीशील होण्याची गरज व्यक्त करीत प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा पुढाकार घेत राबवाव्यात असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भाग सिडको, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एपीएमसी, एमएसईडीसी अशा विविध प्राधिकरणांकडे असून त्यांनाही शहर स्वच्छतेचे महत्व जाणवून देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत या प्राधिकरणांसमवेत तत्परतेने स्वच्छता विषयक चर्चात्मक बैठकीचे आयोजन करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे आपले ध्येय केवळ घोषणेपुरते नसून ते साकारण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याची गरज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी माझ्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कटिबध्द होऊया व याकामी स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊया असे सूचित केले.

 

उल्हासनगर पोलिसांकडून चार पत्रकारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगरमधील प्लास्टिक उत्पादन बनवण्याचा कारखाना बंद करण्याची धमकी देत चार पत्रकारांनी चाळीस हजार रुपये खंडणी घेतली. याबद्दल त्यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी फरार असून, पुढील तपास सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की उल्हासनगरमधील एका प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखानदाराला तक्रार करण्याची धमकी देत, कारखाना बंद करण्याच्या नावाने कारखानदाराकडून चाळीस हजार रुपये खंडणी घेणाऱ्या चार पत्रकाराविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खंडणीखोर कारखान्याच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून त्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. शिवकुमार मिश्रा, राजेश शर्मा, रेखा दिघे, नितेश खेटवानी असे गुन्हा दाखल झालेल्या पत्रकारांची नावं आहे.

१ लाख रुपयांची मागणी, ४ पत्रकारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल: 
उल्हासनगरमधील सतिष चाळ कंपाऊंड परिसरात मामल पॉलीमर्स एल.एल.पी नावाने जोसेफ जॉन डिसूजा यांचा प्लास्टिकचा कारखाना आहे. या कारखान्याची प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी मॅनेजर उदय खिल्लीरी यांना खंडणीखोर पत्रकारांनी दिली. त्यानंतर १४ नोव्हेंबर आणि २१ नोव्हेंबर रोजी या आरोपींनी कारखाना बंद करण्याची धमकी देत, १ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोड करून ३० हजार रोख आणि १० हजार ‘गुगल पे’ वर ऑनलाईन असे एकूण ४० हजारांची खंडणी घेतल्याची तक्रार कारखान्याचे मालक जोसेफ जॉन डिसूजा यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिली.

अनोखळी खंडणीखोर :
कारखान्याचे मालक डिसूजा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी चार पत्रकारांसह इतर अनोखळी खंडणीखोर विरोधात भादंवि कलम ३८५, ३८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच चारही आरोपी फरार असून हे आरोपी विविध साप्ताहिक आणि युट्युब चॅनेलचे पत्रकार असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.

राज्यातील अंतिम निर्णयाकरिता सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर; नवीन वर्ष उजाडणार !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना पक्षाला खिंडार पडून निर्माण झालेले ठाकरे गट आणि शिंदे गट आपसात शिवसेना कुणाची या मुद्द्यावर लढत असताना, सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालय दरबारी दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून याप्रकरणी निकालाची वाट पाहत असताना, याबाबतीत निकालाचे घोंगडे पुढील वर्षापर्यंत भिजत पडणार आहे असे दृश्य आहे. वर्ष २०२३ मध्ये याप्रकरणी १० ते १५ जानेवारीच्या दरम्यान निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे न्याययमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्याने १६ आमदारांच्या अपात्रतेवर निकाल लांबणार आहे.

या प्रकरणी वर्ष २०२२ मध्ये निकाल येण्याची शिवसेनेच्या ठाकरे गटाला आशा लागली होती, मात्र हे वर्ष निकालाविनाच निघून जाणार असल्याची स्थिती सदृश्य आहे. ठाकरे गटाच्या सुभाष देसाई यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांविरुद्ध अपात्रतेची कारवाई व्हावी याकरिता सर्वोच्च न्यायालय दरबारी याचिका दाखल केली असून, याबतीत निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. पुढील सुनावणीची तारीख अध्याप पर्यंत स्पष्ट करण्यात आली नसल्याने, नेमक्या कुठल्या दिवशी पुढील वर्षी सुनावणी होणार हे देखील एक कोडेच ठरणार आहे.

दोन्ही गटांना लिखित बाजू मांडण्याचे आदेश दिल्यानंतर आज याप्रकरणी सुनावणी होणार होती, मात्र एकीकडे न्यायमूर्ती सुट्टीवर आहे तर दुसरीकडे नाताळाच्या निमित्ताने न्यायालयाला सुट्ट्या असल्याने सुनावणी पुढील वर्षी ढकलल्या जाणार हे आता निश्चित झाले आहे. एकंदरीतच शिवसेना कुणाची हा मुद्दा थंड बस्त्यात गुंडाळला जाणार असून, नेमक्या सुनावणीच्या दिवशी याबाबतीत चर्चा होणे अपेक्षित आहे.