Home Blog Page 70

भारतीय लष्करात महिलांची भरती सुरु, पुण्यात तीन टप्प्यात पार पडणार भरती प्रक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेअंतर्गत ६ ते ११ नोव्हेंबरपर्यंत खडकी (पुणे) येथील ‘बीईजी अँड सेंटर’ येथे महिला लष्कर भरतीची प्रकिया पार पडणार आहे. त्यात महाराष्ट्रासह गोवा, गुजरात व दमणमधील तरुणींना सहभागी होता येणार आहे.

सैन्य दलाच्या येथील दक्षिण मुख्यालयाच्या वतीने महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लष्करात महिलांना संधी मिळावी, देश सेवेची जबाबदारी त्यांनाही पार पाडता यावी, यासाठी हा भरती मेळावा होणार आहे. खडकी येथे होणाऱ्या या भरती मेळाव्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

अशी होणार भरती

भारतीय लष्करात होत असलेली महिलांची ही भरती तीन टप्प्यात होणार आहे. त्यात शारीरिक, वैद्यकीय व लेखी परीक्षा अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिला उमेदवारांना लेखी परीक्षा देता येणार आहे. तसेच गुणवत्तेवर आधारित अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर या महिला उमेदवारांना भारतीय सैन्य दलात लष्करी पोलीस विभागात ‘अग्निवीर’ म्हणून दाखल केले जाणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा; छगन भुजबळ यांची चेतावणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

कर्नाटक सरकार महाराष्ट्राची गावे घेण्याची घोषणा करत आहे आणि महाराष्ट्रातील सरकार त्याकडे बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारने आता कडक भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी करतानाच केंद्राने देखील यात हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारला कडकरित्या समज दिली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हे प्रकरण कोर्टात असताना या प्रकरणाला चिथावणी कोण देत आहे याची माहिती देखील घेतली गेली पाहिजे.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जर कर्नाटकाने गुंडगिरी थांबवली नाही तर पुन्हा एकदा ‘गनिमी कावा’ दाखवावा लागेल असा इशारा दिला आहे. इतर गावांची मागणी करणाऱ्या कर्नाटकने अगोदर महाराष्ट्राची बेळगाव, कारवार, बीदर,भालकी इत्यादी गावे महाराष्ट्राला द्या आणि नंतर कांगावा करा ही दादागिरी आणि गुंडगिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही मराठी माणसाला त्याचे उत्तर देता येत नाही असे नाही पण महाराष्ट्राच्या संयमाचा अंत कर्नाटकने पाहू नये असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

बेळगावसह कर्नाटकातील मराठी माणसांसोबत आम्ही नेहमीच आहोत असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेकरिता जनार्दन सावंत व श्रिया नाईक मुंबईचे कर्णधार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोहा, रायगड येथे होणाऱ्या ४८ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेकरिता मुंबईचा कुमार व मुली संघ मुंबई खो-खो संघटनेचे कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा यांनी जाहीर केला तो खालील प्रमाणे.

मुंबई कुमार संघ:
जनार्दन सावंत (कर्णधार), पियुष काडगे, हर्ष कामतेकर, रोहित केदारे, भावेश बने (सर्व विद्यार्थी क्रीडा केंद्र), राजेश मंडल, देवांग ताम्हणेकर (उप कर्णधार), नितेश अष्टमकर (सर्व ओम साईसश्वर सेवा मंडळ), हार्दिक मोहिते, राज जोशी (सर्व वैभव स्पो. क्लब), विशाल खाके, तन्मय भुवड (सर्व श्री समर्थ व्यायाम मंदिर), अमित पाल (युवक क्री. मंडळ), विघ्नेश कोरे (अमरहिंद मंडळ), सुरज वैश्य (सरस्वती स्पो. क्लब), प्रशिक्षक : सागर मालप (विद्यार्थी), व्यवस्थापक : प्रथमेश जाधव (विद्यार्थी)

मुली संघ:
श्रिया नाईक (कर्णधार), तनवी मोरे (सर्व श्री समर्थ व्या‌ मंदिर), अथश्री तेरवणकर, रश्मी दळवी, ईशाली आंब्रे, कादंबरी तेरवणकर (सर्व ओम साईश्वर सेवा मंडळ), काजल पासी, मुस्कान शेख, शर्वी नडे (सर्व शिवनेरी सेवा मंडळ), प्रतीक्षा राज, भक्ती बोऱ्हाडे (आर्य सेना), सृष्टी पाष्टे (ओम समर्थ भा. व्या. मंदिर), रुद्रा नाटेकर (अमरहिंद मंडळ), स्पूर्ती चंदुरकर (उप कर्णधार) (वैभव स्पो. क्लब), जान्हवी लोंढे (सरस्वती कन्या संघ), प्रशिक्षक : श्रीकांत गायकवाड (ओम साईश्वर सेवा मंडळ), व्यवस्थापिका: कविता परब (ओम साईश्वर सेवा मंडळ)

 

रायगड येथे ४८ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रायगड मधील रोहा येथे सुरू होत असलेल्या महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ‘रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन’ आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा ८ ते ११ डिसेंबरला रोहा येथे होणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील सुमारे पावणेसातशे खेळाडू आणि पदाधिकारी, पंच व प्रशिक्षक मिळून दोनशेहून अधिक जणं उपस्थित राहणार आहेत.

सदर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा रोहा तालुक्यातील धाटाव-रोठ येथील परमपुज्य पांडुरंग शास्त्री आठवले औद्योगिक विद्यालय आणि एम. बी. मोरे फाडंडेशन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. खासदार सुनिल तटकरे, माजी क्रीडामंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे, उपाध्यक्ष विजय मोरे, जिल्हा सचिव आशिष पाटील हे गेले पंधरा स्पर्धेची जय्यत तयारी करत आहेत.

स्पर्धेसाठी पाच मैदाने तयार करण्यात आली आहेत. सकाळ व दुपार सत्रात (रात्री प्रकाशझोतात) हे सामने होणार असून त्यासाठी फ्लडलाईटची व्यवस्था केली गेली आहे. चार दिवस चालणार्‍या या स्पर्धेला मुला-मुलींचे ४४ संघ, त्यांचे प्रशिक्षक, पंच व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या संघांना स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थितीसाठी ८ डिसेंबरला सकाळी ८ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. रेल्वेस्थानकावरुन संघांना निवासाच्या ठिकाणी पोच करण्यासाठी आणि निवासापासून मैदानावर ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ तारखेला मा. माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनेचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट्स फेस्टिव्हलचे झाले दिमाखात उद्घाटन!

हजारो नागरिकांचा पहिल्याच दिवशी प्रतिसाद; शंकर महादेवन यांच्या गायनाने मिरा-भाईंदरकर रसिक मंत्रमुग्ध

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील सर्वात मोठ्या ‘संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल’ चे काल राज्य सरकारचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शानदार जल्लोषात , प्रचंड गर्दीत उदघाटन झाले. पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या प्रत्यक्ष लाईव्ह गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजारो मिरा-भाईंदरकर संगीत रसिक या गायनाचे साक्षीदार बनलेच आणि ते मंत्रमुग्ध झाले. मिरा-भाईंदर शहरातील हजारो नागरिकांनी पहिल्या दिवशी या भव्य महोत्सवाला भेट देऊन आनंद घेतला.

प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्याकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक, भाईंदर पूर्व येथे हे फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे.

संपूर्ण मैदान फेस्टिव्हलसाठी सजले असून परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मिरा-भाईंदर आर्ट्स फेस्टिवलचे उद्धाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले.

यावेळी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, मिरा-भाईंदर वसई-विरारचे पोलिस आयुक्त सदानंद दाते, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, भाजपा जिल्हाध्यक्ष रवि व्यास, युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, जिल्हाप्रमुख राजू भोईर, विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

रात्री या कार्यक्रमाला केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची विशेष उपस्थिती होती. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, तुतारीच्या निनादात जल्लोषात महोत्सवाचे उदघाटन झाले.

देश-विदेशातील सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला हजारो मीरा भाईंदरकर उपस्थित होते. आपल्या गाण्याच्या अनोख्या शैलीत शंकर महादेवन यांनी त्यांची बहुतेक गाजलेली गाणी सादर केली आणि त्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत होता,

प्रत्येक गाण्यावर उपस्थित संगीत रसिक थिरकले, तरुण-तरुणी अक्षरश: नाचत होते. आमदार प्रताप सरनाईक हे माझे गेल्या २० वर्षांपासून मित्र असून त्यांच्यामुळे मी मिरा भाईंदरमध्ये हा लाईव्ह शो करीत आहे, मिरा भाईंदर सारखे दर्दी रसिक प्रेक्षक कुठेच नाहीत, असे सांगत शंकर महादेवन यांनी या भव्य कला महोत्सवाचे कौतुक केले.

या कला महोत्सवाचे उदघाटक मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, “शहर विकासाच्या दिशेने जात असताना जनतेची सांस्कृतिक भूक भागवणे हे सुद्धा गरजेचे आहे. आमचे मित्र प्रताप सरनाईक यांचे व त्यांच्या टीमचे या भव्य फेस्टिव्हल आयोजनाबद्दल मन:पूर्वक कौतुक करतो. कोरोनाच्या नंतरच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात या भागातील जनतेची सांस्कृतिक गरज पूर्ण करण्याचे काम या मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून त्यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राने ज्याचा गौरव करावा असा फार मोठा ‘उपवन आर्ट फेस्टिवल’ आमदार सरनाईक ठाण्यात गेली अनेक वर्षे आयोजित करतात. अशा फेस्टिव्हलची सातत्याने ठाणेकर व ठाण्याच्या आसपास राहणारे नागरिक वाट पाहत असतात. आज तशीच लक्षवेधी रोषणाई, किंबहुना उपवन फेस्टिव्हल पेक्षाही चांगली रोषणाई मिरा-भाईंदर मध्ये मी स्वतः अनुभवली. एखादी गोष्ट फार मनापासून करण्याचे काम सरनाईक करीत असतात. एखादा कार्यक्रम ज्यावेळी ते करत असतात त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये जीव ओतून त्या कार्यक्रमाची उंची वाढविण्याचे काम प्रताप सरनाईक सातत्याने करतात म्हणूनच हा फेस्टिवल उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने जात आहे” असे सांगत आमदार सरनाईक यांचे मंत्री चव्हाण यांनी कौतुक केले.

रामदास आठवले यांच्या कवितांना प्रतिसाद!

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आर्ट फेस्टिव्हलला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. ‘मुझे भी है संगीत का ज्ञान, इसलिये मै हू शंकर महादेवन का फॅन’, ‘जो गाता है मन भावन, नाम है उनका शंकर महादेवन’, ‘प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदरमध्ये उभा केला आहे हेवन, कारण इथे आलेले आहेत शंकर महादेवन’ अशा कविता सादर करून आठवले यांनी प्रचंड टाळ्या मिळवल्या. प्रताप सरनाईक हे कार्यसम्राट आमदार आहेत, खूप विकासकामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत. मोठे नाट्यगृह, विविध समाज भवने व अनेक विकासकामे सरनाईक यांनी केली आहेत. सरनाईक यांचा नंबर जरूर मंत्रिमंडळ विस्तारात लागेल. एकदा तुम्हाला मंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री तुमचा नक्की विचार करतील आणि मी तुमची शिफारस करेल अशा शब्दात आठवले यांनी कौतुक केले.

आर्ट फेस्टिव्हलचे आकर्षक प्रवेश द्वार, रांगोळी प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, विविध कला प्रदर्शन यांच्या दालनातही नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी होत आहे. तसेच लहान मुलांसाठी ‘गेम झोन’ खाद्यप्रेमींसाठी खाद्य विभाग, कल्चरल ऍक्टिव्हिटी, फन फेयर, सेल्फी पॉईंटसह अनेक आकर्षक कला-संस्कृतीशी निगडित गोष्टी फेस्टिव्हलमध्ये असून १२ डिसेंबरपर्यंत फेस्टिव्हलमध्ये मीरा भाईंदरच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.